Thursday, July 16, 2020

मी असा घडलो : २


मी कसा घडत गेलो ह्याचा जेंव्हा मी विचार करतो तेंव्हा त्याचे उत्तर मला माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन आयुष्यात मिळते. मला वाचनाची आवड लहानपपासूनच  होती. त्यात मी रमत असे. माझे खेळाकडे फारसे लक्ष नसे. ते तसे चुकीचेच होते. खेळातून जे सांघिक गुण निर्माण होतात त्याचा माझ्यात अभाव होता आणि आहे.Team Work and Leadership Quality हे दोन गुण अतिशय महत्वाचे असतात. ते खेळातूनच निर्माण होतात किंवा जोपासले जातात. पुढे नोकरी करताना किंवा स्वतःचा व्यवसाय करताना माझ्या हे लक्षात आले की हे गुण आपल्यात नाहीत ते त्यामुळेच. त्याचा परिणाम मी भोगला आहे. माझ्या हे  खूपच उशिरा लक्षात आले, सामाजिक सेवा संस्थेत कार्य करतांना मला हे प्रकर्षाने जाणवू लागले व त्यामुळेच मी हे गुण आत्मसात करण्याचा मनापासून प्रयत्न केला. ते जमले ते सामाजिक संस्थांशी जोडले गेल्यानंतर, Networking हे ही शिकलो ते त्याच काळात. व्यवसाय करताना मार्केटिंग आणि सेल्ससाठी नेट्वर्किंग तर आवश्यक असतेच. हे गुण शाळा – कॉलेजातच कमवायचे असतात. आपल्याच जगात रमले तर पुढे फार कठीण होते किंवा आपण दुसर्यावर अवलंबून राहतो. आपल्या चांगल्या संधी हुकतात किंवा आपल्याला मर्यादित यश मिळते.
       
दुसरा एक महत्वाचा अभाव माझ्यात आहे तो म्हणजे मी संगीत किंवा गाणे कधी शिकलो नाही. माणसाला संगीत आणि गाणे येणे आवश्यक आहे. शास्त्रीय संगीताचा कान असणे आवश्यक आहे .तो स्वतःचा एकलेपणा सहज घालवू शकतो. आपल्याला चांगले नृत्य येणे आवश्यक आहे. जेंव्हा तुम्ही समूहात मजेने वेळ घालवीत असतात तेंव्हा नृत्य करावयास कोणी आमंत्रित केले तर आपल्याला थोडे व्यवस्थित नाचता आले पाहिजे . असे प्रसंग जेंव्हा येतात तेंव्हा आपण त्यात विशेष रस घेऊन भाग घेतला पाहिजे. त्यात  आनंद ही असतो, 
       
मला मराठी भावगीते आणि हिंदी सिनेमातील गाणी आवडतात. पण मी अधिक रमतो ते गाण्यातील शब्दात. मला शब्दांचे खूप आकर्षण आहे .शब्द मला भावतात. त्यातील कवी मन मला अधिक मोहित करते. त्या शब्दातून मला जीवनाची विलाक्षण जाणीव होते. गाण्यातील शब्द मला माझ्या मनाच्या आकाशात उंच उंच घेऊन जातात व मी ते झोके घेताना रमतो.  मला शब्दप्रभू कवींनी नेहमीच भुरळ घातली आहे.
       
लहानपणी मला मोठ्यांनी कविता वाचणे खूप आवडत असे.” काव्यवाहिनी” हे कवितांचे संकलित केलेले सुंदर पुस्तक माझ्याकडे अनेक वर्षे होते. त्या पुस्तकातूनच मला अनेक मोठ्या कवींची ओळख झाली. बालकवींची ‘ ती फुलराणी ‘ आणि केशवसुतांची ‘ तुतारी मला त्या पुस्तकात भेटली. सर्वच अर्वाचीन कवी त्या कवितेच्या पुस्तकामुळे मला परिचित झाले. वसंत बापट , ग दि माडगुळकर , विंदा करंदीकर , मंगेश पाडगावकर, ना धो महानोर , सुरेश भट, शिरीष पै आणि बा भ बोरकर ह्यांच्या  काव्य संमेलनाना मी आवर्जून गेलो आहे . 'माझे विदयापीठ' लिहिणारे नारायण सुर्वे , कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज , माधव ज्युलियन  , वा रा कांत , कवी अनिल ( कुसुमानील) , शांताबाई शेळके , इंदिरा संत असे कितीतरी कवी आणि कवियत्री ह्यांच्या कविता  मी महाविद्यालयीन जीवनातच वाचल्या होत्या.

मी औरंगाबादच्या ज्ञान विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी. तेंव्हा हे एकच शासकीय महाविद्यालय होते. खाजगी महाविद्यालये नुकतीच सुरु झाली होती. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे महाविद्यालय नुकतेच सुरु झाले होते. तसेच देवगिरी महाविद्यालय . ह्या नवीन महाविद्यालयांनी हुशार मुले आपल्या महाविद्यालयात यावी म्हणून आमंत्रणे पाठविली होती व काही सवलती दिल्या होत्या. सरकारी महाविद्यालयात मेरीट लिस्ट लागत असे व शिष्यवृत्ती मिळत असत. तेथे प्रवेश मिळणे अधिक महत्वाचे असे. मला ह्या महाविद्यालयात सरकारी शिष्यवृत्ती मिळाली आणि माझे शिक्षण मोफत झाले . त्यावेळी डॉ आंबेडकरांनी सुरु केलेले  मिलिंद महाविद्यालय खूप प्रसिद्ध होते. त्यांच्या प्रयोगशाळा चांगल्या होत्या. प्राध्यापक प्रसिद्ध होते. बहुतेक जण मुंबईहून आलेले होते. 

मी बी.एससी. झालो असलो तरी पदवीच्या दुसर्या वर्षापर्यंत मराठी ही माझी दुय्यम भाषा होती त्यामुळे मराठी भाषेचा अभ्यास आम्हाला कम्पलसरी होता. पण त्या भाषेची आवड निर्माण करणारे नावाजलेले मराठी प्राध्यापक आमच्या ज्ञान विज्ञान महाविद्यालयात होते. आमचे प्राचार्य होते मराठी विषयाचे  मा गो देशमुख. मराठीच्या  प्राध्यापक मंडळीत होते गो मा पवार आणि वसंत कुंभोजकर. प्रा. भगवंत देशमुखांची बदली कोल्हापूरला झाली होती. त्यावेळी  मराठी विषय घेऊन बी ए , एम. ए झालो असतो तर मराठीचा प्राध्यापक नक्कीच  झालो  असतो. त्यावेळी नव्याने सुरु झालेल्या मराठवाडा विद्यापीठात होते प्रसिद्ध समीक्षक प्रा वा ल कुलकर्णी आणि प्रा सुधीर रसाळ. शेवटी मराठीला पदवीच्या दुसर्या वर्षी सोडले पण वाचनाची आवड कायम राहिली. त्याचवेळी इंग्रजी साहित्याची आवड लावली ती डॉ मुतालिक सरांनी. ते इंग्रजीचे उत्तम प्राध्यापक होते. त्यावेळी निवडक इंग्रजी साहित्य वाचले.त्याचा नंतर उपयोग झाला 
मी विज्ञानाचा विद्यार्थी, आमचे फिजिक्सचे प्राध्यापक होते मार्तंडराव शेळगांवकर आणि उमादीकर. मार्तंडराव ह्यांचा मी आवडता विद्यार्थी. त्यांचे मार्गदर्शन खूप उपयोगी पडले. रसायन शास्त्राचे प्राध्यापक होते डॉ करंबेळकर ( Organic Chemistry ) , संपत राय( Physical Chemistry ) आणि कब्बीनवार Inorganic Chemistry). कब्बीनवार सर एन सी सी चे प्रमुख होते.आम्हाला एन. सी. सी. सक्तीची होती. मला 'B' Certificate मिळाले होते.  डॉ करंबेळकर हे उंच , धिप्पाड आणि गोरे होते. नुकतेच नागपूरहून त्यांची बदली झाली होती. ते खूप छान शिकवत असत. त्यांना  आम्ही 'देवमाणूस ' म्हणत असू. संपत राय छान शिकवत. मला केमिस्ट्री फार आवडत नसे. माझी आवड पदार्थविज्ञान. गणित हा विषय शिकवीत असत मुळे आणि देव सर. मुळे सर नुकतेच नागपूरहून आले होते. ते गणित विषय तज्ञ होते. 
माझ्या हे खूप उशिरा लक्षात आले की विज्ञान विद्यार्थ्याला सर्व विज्ञान विषयात गोडी असणे आवश्यक आहे. पुढे हे सर्व विषय एकमेकात इतके मिसळतात की आपल्याला ह्या विषयांची माहिती नसली की फार जड जाते. मी भाभा अणू संशोधन केंद्रात Radiological Physics हा अभ्यासक्रम करीत असताना मला  Chemistry विषय माहित असल्यामुळे त्रास झाला नाही पण  , Botany , Zoology , Anatomy and Physiology ह्या विषयाची कमी माहिती असल्यामुळे थोडासा त्रास झाला. Anatomy हा विषय अभ्यासक्रमासाठी आवश्यक होता त्यामुळे एक डॉक्टर तो विषय आम्हाला ३ महिने शिकवीत होता. ते जर माहित नसेल तर Use of Isotopes in Medicine हे आम्हाला काय समजणार? तसेच Use of Isotopes in Agriculture ह्या विषयासाठी Botany माहित असणे आवश्यक आहे. पुढे संशोधन करीत असताना लक्षात आले की सर्व विज्ञान शाखांची माहिती आज आवश्यक झाली आहे. तंत्रज्ञान संशोधनात ही ते अतिशय आवश्यक झाले आहे. आपण जी विज्ञान शाखा ऐच्छिक नाही तिकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच विज्ञान शाखेमुळे आपण पुढील शिक्षण - संशोधन करताना अडकून पडतो. सर्व विषयाचे  बर्यापैकी ज्ञान असणे आवश्यक आहे.     
महाविद्यालयात असतानाच माझे वाचन चालूच असे . त्यावेळी मराठीचे पांच लघुकथाकार हे पुस्तक आम्हाला अभ्यासक्रमाला होते. त्यामुळे  अरविंद गोखले , वामन चोरघडे , व्यंकटेश माडगुळकर, गंगाधर गाडगीळ ह्यांच्या कथांची ओळख झाली. नंतर व पु काळे ह्यांनी आपला ठसा उमटविला होता.त्याकाळात अरविंद गोखले आघाडीचे कथाकार होते . त्यांचा ‘ मंजुळा ‘ हा कथासंग्रह खूप आवडला होता. वामन चोरघडे ह्यांच्या कथा वेगळ्या वळणाच्या होत्या. व पु काळे ह्यांचे  कथाकथनाचे एकपात्री प्रयोग जोरात चालू होते . द मा मिरासदार ह्यांचे विनोदी कथावाचन म्हणजे एक हास्याचा धबधबा होता. ते औरंगाबादेतील एका महाविद्यालयात होते. नंतर मराठी साहित्यात भुरळ पाडली ती पु शि रेगे ह्यांच्या कवितेने आणि त्यांच्या वेगळ्या असलेल्या कथेने. रेगे ह्यांचा ‘ मनवा ‘ हा कथासंग्रह भुरळ घालणारा होता.'मनवा' ह्या कथा संग्रहातील मनू ह्या नावामुळेच मी माझ्या मोठ्या मुलीला ‘ मनू’ ह्या नावाने हाक मारीत असे. तिचे शाळेतील नांव होते  ‘ क्षितिजा’ . ते घेतले बां भ बोरकरांच्या कवितेवरून . त्या  कवितेच्या ओळी  आजही मला पाठ आहेत. त्या अशा ..
 "ज्वालांच्या पंखांनी गगनाला भिडत रहा ,
 प्राणांच्या दिप्तीतून क्षितिजाचे स्वप्न पहा". 
ह्यातील 'क्षितिजा' मला खुणावीत होती. माझ्या दुसर्या मुलीचे नांव “ ऋतुगंधा”. हे ही नांव मी मला कोणाच्या तरी कवितेवरून असेच सुचले आहे. 
                
अनेक कविता मला मोहित करून गेल्या. कविता हा प्रकार मला एकट्याला एकांतात आनंद देणारा साहित्य प्रकार वाटतो. गाणे आवडते ते त्यातील शब्द माधुर्यामुळेच. कवितेमुळे मला जीवनाचे तत्वज्ञान समजू लागते. ज्ञानेश्वर आवडतात ते त्यांच्या काव्यप्रतीभेमुळेच. तुकोबा तर खूप सोपा. सहज समजणारा कवी. रामदास ही आवडतात ते जीवन तत्त्वज्ञानामुळे. बहिणाबाईची गाणी पुन्हापुन्हा ऐकावीशी वाटतात. मी लहानपणी माझा आजींची जात्यावरची गाणी ऐकत असे .इतक्या सहजपणे ती आमची नांवे ओव्यात गोवून गात असे व ते अर्थपूर्ण शब्द आम्हाला खूप मोहित करीत असत. सरोजिनी बाबर ह्यांनी ह्या लोकगीतांचा प्रचंड अभ्यास केला . शांताबाई शेळके ह्यांनी त्यावर खूप छान लिहिले होते. माझे शाळेतील शिक्षक प्रभाकर मांडे आम्हां मुलांना 'आजीकडून जात्यावरची गाणी लिहून आणा' असे सांगत असत. आम्ही ती गाणी लिहून आणून त्यांना देत असू. त्यांनी त्याविषयावर अनेक वर्षे संशोधन केले. त्या जात्यावरच्या गाण्यांत गेयता होती. त्यात मराठी स्त्री जीवनाचे सुंदर चित्रण होते. त्या गाण्यात स्त्रियांची वेदना व्यथित केलेली असे. त्या गाण्यातून माहेरी आलेल्या मुलींचा ओसंडून वाहणारा आनंद दिसत असे. तिचा सासूने केलेला छळ व्यक्त होत असे. ती जात्यावरची गाणी त्या स्त्रिया गात असतांना त्या स्त्रियांना  दळण दळण्याचे शारीरिक कष्ट जाणवत नसावेत कारण ते दु:ख विसरण्यासाठीच त्या ती जात्यावरची गाणी गात असाव्यात. बहिणाबाईचाची गाणी त्यामुळेच आवडत असत.अशा  असंख्य बहिणाबाई लिहिता येत नसल्यामुळे त्यांची असंख्य गाणी शब्दांकित झाली नाही आणि आपण ह्या साहित्याला मुकलो असे मला वाटते .
       
महाविद्यालयात असतानाच माझे चौफेर वाचन चालू असे. त्यावेळचे फडके – खांडेकर विलक्षण आवडणारे लेखक होते . मला फडके फारसे आवडत नसत पण खांडेकरांची सुभाषिते माझ्या वह्यांच्या पहिल्या पानावर लिहिलेली असत. फडके हे तारुण्यसुलभ भावना व्यक्त करणारे लेखक. हिंदी सिनेमा नंतर आला. प्रेमी युगुलांच्या गोष्टी फडक्यांनी हिंदी चित्रपटासारख्याच रंगविल्या. त्यांचे हिरो देवानंद सारखेच आकर्षक व्यक्तिमत्वाचे होते. त्यांच्या कादंबर्या खूप वाचल्या. त्यांची शैली बहारदार होती. वाचताना वाचक Romantic अवस्थेत जात असे. 

त्याचवेळी मी विवेकानंद आणि सावरकर ह्यांचे वाचन केले. सावरकरांची ‘ माझी जन्मठेप ‘ ३-४ वेळा वाचली असेल. '१८५७ चे बंड नव्हे युद्ध' ह्या विषयावरचे  पुस्तक देशप्रेमाचे स्फुलिंग फुलवीत असत. सावरकरांची विज्ञानवादी भूमिका तर्कावर आधारलेली होती. ते खरे समाजसुधारक होते. त्यामुळे मला नवा विचार आणि दृष्टी मिळाली. धर्माचे अवडंबर मनाने झिडकारून दिले. धार्मिक चालीरीतीवरचा विश्वास उडाला. त्यावेळी गांधी विशेष समजले नव्हते. ते फार उशिरा लक्षात आले. मी नेहरूच्या प्रेमात पडलो ते ‘आनंदभुवन ‘ हे गोपीनाथ तळवलकरांचे पुस्तक अभ्यासक्रमात अभ्यासिले म्हणून. विज्ञानवादी नेहरू आजही मला नव्या भारताचे खरे शिल्पकार वाटतात. आज सगळेच संदर्भ बदलले आहेत. त्यावेळी नेहरू – गांधी – सरदार – सावरकर हे सारेच वंदनीय होते आणि आजही आहेत. गांधी – नेहरू – सरदार ह्यांच्यातील फरक मला अलीकडे जाणवला तो विजय तेंडूलकर ह्यांचे  ‘ सरदार ‘ हे पुस्तक वाचल्यानंतर .
       
माझ्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात माझे चौफेर वाचन चालू असे. मी सर्व वर्तमान पत्रे आवर्जून वाचत असे रविवारच्या पुरवण्या वाचल्याच पाहिजेत असे मला वाटत असे. बळवंत मोफत वाचनालयात माझे रोज २-३ तास तरी जात असत.
        
औरंगाबादेत राजकीय आणि सामाजिक नेते मंडळी आली की त्यांची व्याख्याने होत असत. एस एम जोशी , आचार्य अत्रे , तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी , नाथ पै , अनंत काणेकर , श्रीपाद अमृत डांगे ,हमीद दलवाई , नरहर कुरुंदकर , जगन्नाथराव जोशी , गोळवलकर गुरुजी , बाबासाहेब पुरंदरे , पु ल देशपांडे अशा कर्तृत्ववान व्यक्तींची भाषणे ऐकली. मिरासदार अभाविपचे अध्यक्ष होते. बाबासाहेब पुरंदरे ह्यांची शिवाजीवरची व्याख्याने त्यांनी दरवर्षी आयोजित केली होती. त्यांनी एकेवर्षी वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात एक विद्यार्थी शिबीर आयोजित केले होते. त्या शिबिराला ३ दिवस आमच्याबरोबर सुधीर फडके , बाबासाहेब पुरंदरे आणि द मा मिरासदार उपस्थित होते. तो एक अनोखा अनुभव होता .   मी विज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे डॉ होमी भाभा , मेघनाद सहा ह्या शास्त्रज्ञांचे विचार समजावून घेतले.

मी वादविवाद स्पर्धेत भाग घेत असे. रानडे वादविवाद स्पर्धेत मला दुसरे पारितोषिक मिळाले होते. वादविवादाचा विषय होता ' केंद्र सरकारने सूचित केलेल्या त्रि-भाषिक सूत्राने सांप्रतच्या परिस्थितीत देशाचा भाषिक प्रश्न सुटू शकेल?'. 
        त्यावेळी नियतकालिकांचा जमाना होता. ‘ माणूस ‘ , ‘सोबत’ , ‘ साधना ‘ , ‘मनोहर’, ‘किर्लोस्कर ‘, ‘ ‘किस्त्रीम ‘ह्यांचे वाचन म्हणजे  हा बौद्धिक आनंद असे. ‘माणूस’ मधील विजय तेंडुलकराचे ‘ रातराणी ‘  तर ‘सोबत ‘  मधील माधव मनोहर ह्यांची नाट्यपरीक्षणे  ही माझी आवडीची सदरे होती. रवींद्र पिंगे हे सुद्धा ‘माणूस ‘ मधून सुंदर लिहित असत. 

द्वा भ कर्णिक ह्यांचे महाराष्ट्र टाईम्समधील 'काय सांगू तुम्हाला' हे सदर छान होते. त्यानंतर गोविंद तळवलकरांच्या चौफेर विचारांची ओळख झाली. लोकसत्तेतील ह रा महाजनी ह्यांची ‘ रविवारची चिंतनिका’ आवडत असे. ‘ मराठा’ आणि ‘ नवयुग ‘ चा मी नियमित वाचक होतो. आचार्य अत्रे ह्यांचा fan होतो. अत्रे – फडके वाद जसा आठवतो तसाच प्रबोधनकर ठाकरे आणि अत्रे वाद खूप गाजला होता .अत्रे – मोरारजी देसाई , अत्रे – स का पाटील ह्या राजकीय लढाया रंगल्या होत्या.  साम्यवादी विचारांचे ‘ब्लिट्झ’ चे करंजिया आवर्जून वाचत असे. नेहमीच लक्षात राहते ती अनंत भालेराव ह्यांची निर्भय पत्रकारिता. त्यांचा ‘मराठवाडा’ प्रादेशिक असला तरी म टा – लोकसत्तेपेक्षा अधिक धारदार होता. कारण ते 'पत्र नव्हते तर शस्त्र' होते. अनंतराव ह्यांचे संपादकीय हे लोकमान्य टिळकांची आठवण करून देणारे असे. त्यांच्या लेखणीची धार तीक्ष्ण असे. अनंतराव ह्यांच्या ‘ मराठवाड्या ‘ने आम्हाला वैचारिकता दिली. समृद्ध केले.

       मी त्याकाळात अनेक साहित्य संमेलनाला गेलो. औरंगाबाद , जालना , हैद्राबाद , भोपाळ येथील मराठी साहित्य संमेलने पाहिली . साहित्याचा आस्वाद घेतला. नंतर मात्र माझा उत्साह कमी झाला व इतर महत्वाच्या कामामुळे जाणे सोडून दिले. ह्या संमेलनावर मी वार्तापत्रे लिहिली होती.

मला आठवते ते  जालन्याला झालेले मराठी विज्ञान संमेलन. अध्यक्ष होते जयंत नारळीकर. त्यांनी मराठीतून विज्ञानावर केलेले इतके सुंदर भाषण मी पहिल्यांदाच ऐकले होते. त्या भाषणात त्यांनी एकही इंग्रजी शब्द वापरला नव्हता. ते भाषण आजही माझ्या लक्षात  आहे.
       मी नाटकवेडा होतो. मुंबईत शिक्षणासाठी गेल्यानंतर मी खूप नाटके बघितली . त्याबद्दल मी पूर्वीच्या ब्लॉगमध्ये सविस्तर लिहिले आहे. 

3 comments:

  1. Sir super writing ple be prepared for writing autobiography wish u all the best

    ReplyDelete
  2. खूप छान...वाचताना 1973 ते 1976 चा माझ्याही विद्यार्थी दशेतील काळात मला घेऊन गेला...

    ReplyDelete