१३, श्रीकुंज , सन्मित्र कॉलनी म्हणजे श्री केशवराव देशपांडे, माझे सासरे , त्यांचे घर .आमच्या अनेक आठवणी ह्या घराशी निगडीत आहेत |
केशवराव देशपांडे माझे सासरे . ते दै .मराठवाड्याचे सरव्यवस्थापक , इल्नाचे अध्यक्ष , मराठवाडा विद्यापीठात त्यावेळी नुकत्याच सुरु झालेल्या वृत्तपत्रविद्या विभागाचे अतिथी प्राध्यापक , अनंत भालेराव ह्यांचे अगदी जवळचे सहकारी. जयहिंद प्रेसच्या बर्दापूरकर आणि अनंतरावांनी त्यांना हैदराबादहून मराठवाडा वर्तमानपत्रासाठी बोलावून घेतले आणि ते ह्या वर्तमानपत्राचे व्यवस्थापन करू लागले. 'कावड' ह्या पुस्तकात अनंतरावांनी केशवराव 'दै मराठवाड्या' तून निवृत्त झाले त्या दिवशी जो लेख लिहिला (केशवराव देशपांडे : आमचे ब्रदर जॉन) तो त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती देतो. त्यात अनंतराव लिहितात ,' मला पत्रकारितेच्या क्षेत्रात जे काही थोडेफार यश मिळाले असेल त्यावर शंभर टक्क्यांचा अधिकार हा केशवरावांचा आहे . ते प्रत्येक प्रसंगी माझ्या पाठीशी राहिले व खर्या अर्थाने पाठीशी राहिले . प्रसिद्धीच्या झोतात मी सातत्याने राहिलो मात्र केशवराव त्या झोतापासून प्रयत्नपूर्वक दूर राहिले. त्यांच्या परिश्रमाचे , कौशल्याचे व गुणाचे श्रेय नकळत मला मिळत गेले. केशवरावांचा मोठेपणा असा की , ते सदैव उदार दात्याची व घरातल्या वडील माणसांची भूमिका मन:पूर्वक पाडीत राहिले . वयाने ते माझ्यापेक्षा लहान परंतु वृत्तीने जेष्ठ . त्यांचे हे जेष्ठत्व मला अखेरपर्यंत उपयोगी तर पडत गेलेच परंतु मराठवाडा दैनिकाच्या प्रगतीला ते अधिक उपयोगी ठरले. साप्ताहिकापासून दैनिकापर्यंतचा या वृत्तपत्राचा प्रवास प्रामुख्याने केशवरावांच्या नेतृत्वाखालीच होत गेला'. सेतू माधवराव ह्यांचे जसे ब्रदर जॉन होते तसेच केशवराव अनंतरावांचे 'ब्रदर जॉन ' होते . ह्यात अनंतराव ह्यांचा मोठेपणा दिसून येतो तसाच प्रसिद्धीच्या झोत्यात नसलेल्या केशवरावांचा मोठेपणा दिसून येतो. निवृत्त झाल्यानंतर गोविंदभाई श्रॉफ ह्यांनी केशवराव काकांना सभु शिक्षणसंस्थेसाठी बोलावून घेतले आणि ते शेवटपर्यंत गोविंदभाईचे अगदी जवळचे सहकारी होते.
मी केशवराव काकांच्याकडून खूप काही शिकलो. ते मुंबईला कामानिमित्त नेहमी येत असत. त्यांच्याबरोबर खूप गप्पा होत . तसे ते कमी बोलणारे. इल्नाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांचे येणे अधिक वाढले. व्यवसायातील अनेक अनुभव आणि गंमतीजमती त्यांनी सांगितल्या. ती पिढीच वेगळी होती. अशा माणसाकडून खूप कांही शिकण्यासारखे असते. त्यांना बोलते करणे मात्र अवघड असतं. तीच गोष्ट त्यांची पत्नी कुमुदिनी देशपांडे ह्यांची. शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्यानंतर स्वतःच्याच 'श्री कुंज' मध्ये किलबिल ही संस्था सुरु करणाऱ्या व त्यासाठी परिश्रम घेणाऱ्या स्त्रीचे कर्तृत्व खूप मोठे आहे .
स्वप्नातील शाळा - अनंत विद्या मंदिर
मातेच्या ममतेने ,असीम श्रद्धेने आणि अनंत उत्साहाने लावलेले विद्येचे रोपटे म्हणजे औरंगाबादेतील एक किलबिल बालक मंदिर . आज १५०० विद्यार्थी जेथे शिक्षण घेतात ते विद्यामंदिर .गेल्या ३० वर्षात ह्या ज्ञानपीठातून अनेक जण बाहेर पडले आणि सुजाण नागरिक झाले .संस्था अनेक असतात पण यासम अशी संस्था विरळीच .
२५ वर्षाच्या शैक्षणिक सेवेतून निवृत्त झाल्यानंतर
कुमुदिनी केशव देशपांडे ह्या आजीने हे' किलबिल '
सुरु केलं आणि अथक परिश्रम करून ही संस्था उभी केली . ' मराठवाडा ' कार अनंत भालेराव ह्यांचे प्रोत्साहन मिळाल्यामुळे ही संस्था उभी राहिली आणि शिक्षणक्षेत्रातील ' आनंदाचे झाड ' होऊन बसली .
'श्री कुंज' मधील 'किलबिल' मी अनेकदा पाहिलं आहे. आज हा शिक्षणवृक्ष मोठा डेरेदार झाला आहे .
केशवराव देशपांडे ह्यांच्या घरासमोरच बापू काळदाते आणि सुधाताई काळदाते ह्यांचे घर होते . तेथे ही इमारत आज उभी आहे . |
अनंत एनक्लेव्हच्या बाजूलाच आहे मराठवाडा साहित्य परिषद आहे . येथे अनंत भालेराव ह्यांचा पुतळा दर्शनी भागात दिसतो . |
मराठवाडा प्रेसची इमारत येथे होती. त्या भागात मोठे छपाई यंत्र होते . हजारो प्रती काही मिनिटात छापून होत असत . 'मराठवाडा; आधुनिक होत होता . दर्डांचा 'लोकमत' औरंगाबादेत सुरु झाला आणि तीव्र स्पर्धेला सुरुवात झाली. वितरण स्पर्धा वाढली. त्यापुढे टिकाव धरणे कठीण होत गेले. अनेक 'मराठवाड्या'तील उपसंपादक , पत्रकार , लेखक 'लोकमत' कडे गेले. दोन्ही वर्तमानपत्रांची स्पर्धा तीव्र होत गेली. दर्डानी आपला जम बसविला आणि एक दिवस 'मराठवाडा ' बंद झाला. |
या ठिकाणी शारदा मंदिर ही मुलींची पहिली शाळा सुरु झाली होती . आज त्या शाळेची नवी इमारत आहे आणि येथे मुलींची प्राथमिक शाळा भरते . असा हा परिसर . अनेक आठवणी जागा करणारा , |