Friday, April 24, 2015

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कां होतात ?

शेतकऱ्यांच्या आत्महत्या कां होतात ? – त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात......
डॉ स्वामिनाथन ह्यांच्या अध्यक्षतेखाली एक राष्ट्रीय समिती (National Commission of Farmers –NCF) नेमण्यात आली होती. ह्या समितीचा अहवाल २००७ साली संसदेला सादर करण्यात आला होता. २०१४ सालापर्यंत यूपीए सरकार राज्यावर होते. ह्या समितीच्या ज्या शिफारशी होत्या त्यापैकी एकही शिफारस त्या काळात अंमलात आणली गेली नाही. आणि तो अहवाल तसाच पडून राहिला.  
दरवर्षी शेतकऱ्यांच्या आत्मह्त्तेचे प्रमाण वाढत आहे. अवकाळी पाऊस आणि दुष्काळी परिस्थिती ह्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे आणि त्यांची  जिद्द्द संपल्यामुळे ते आत्महत्तेचा मार्ग निवडत आहेत ही दुर्दैवी बाब आहे.
हे असे कां घडते आहे ? ह्याचा उहापोह डॉ स्वामीनाथन ह्यांनी अनेक वेळा केला आहे. त्यांनी लिहलेल्या एका लेखातून घेतलेले खालील महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे आवश्यक आहेत.
Dr M S Swaminathan 
१)    ४५ टक्के शेतकर्यांना शेती व्यवसाय सोडून द्यायचा आहे असे एका सरकारी पाहणीत लक्षात आले आहे.असे असेल तर कृषी पदवीधर आणि साक्षर तरुण शेती व्यवसायात जातीलच कसे ? हा एक प्रमुख प्रश्न आहे. मुळात शेती पदवीधर शेती न करता नोकरीच्या मागे लागला आहे.
२)    अल्प भूधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ती वाढतच जाणार. उदाहरणार्थ ५० वर्षापूर्वी एका शेतकर्याकडे १०० एकर जमीन होती. त्याला ६ मुली आणि ३ मुले होती. प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी त्याने काही एकर जमीन विकली. उरलेल्या जमिनीचे वाटप ३ मुलात झाले. प्रत्येकाला २ किंवा ३ मुले-मुली आहेत. त्यांच्यात पुन्हा जमिनीचे वाटप झाले. म्हणजे सध्या प्रत्येकाकडे १० -१५ एकर किंवा त्याहून कमी जमीन आहे . अजून १० वर्षाने बहुधा त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या वाट्याला एकही एकर जमीन येणार नाही. आजच जे अल्प भूधारक आहेत त्यांची परिस्थिती ह्याहून वाईट असणार आहे. म्हणजे अल्प भूधारक दिवसेंदिवस वाढतच जाणार.
३)    जर अल्प भूधारकांची संख्या अधिक आहे तर शेतीतून फायदा होण्याची शक्यता फारच कमी होत जाणार. शेतकरी कर्जबाजारी होत जाणार आणि त्याला आत्महत्तेशिवाय पर्याय नसणार . त्याकरिता शेती आणि शेती व्यतिरिक्त पण शेतीला पूरक असे उत्पन्नाचे साधन शेतकऱ्याला उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
४)    प्रत्येक शेतकऱ्याला ( स्त्री- पुरुष) कमी व्याजाचे (म्हणजे ४ %)  कर्ज उपलब्ध होऊन देणे आवश्यक आहे. जमीन पुरुषाच्या नावावर असल्यामुळे स्त्रीला कर्ज मिळू शकत नाही. स्त्रीला किसान क्रेडीट कार्डही मिळत नाही.  हे ही लक्षात घेतले पाहिजे . ते चुकीचे आहे. विदर्भात हे आढळून आले आहे,
५)    हंगाम संपल्यानंतर धान्याचे काय करायचे हा मोठा प्रश्न उभा राहतो. डेअरीच्या क्षेत्रात तशी बर्यापैकी उत्तम व्यवस्था आहे. अन्नधान्य साठ्याची सोय आणि योग्य ते बाजार मूल्य मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे.
६)    अन्नधान्यासाठी संपूर्ण भारतासाठी एकच बाजारपेठ ( Indian Single Market ) असणे आवश्यक आहे. त्यामुळे देशाच्या कोणत्याही भागात धान्य विकण्याची मुभा असली पाहिजे. फक्त त्याच प्रांतात शेती माल विकण्याची सक्ती नको.
७)    धान्याला योग्य तो बाजारभाव मिळालाच पाहिजे. खर्च वजा जाता ५० टक्के अधिक फायदा होईल असा भाव मिळणे आवश्यक आहे. तशी शिफारस करण्यात आली होती. त्या बाबतीत काहीच झाले नाही. ऊसाला खूप जास्त भाव वाढवून मिळाले आणि ऊस cकारखाने तोट्यात गेले हे ही लक्षात ठेवले पाहिजे.    
८)    जो पर्यंत अन्नधान्याला योग्य ते विक्री मूल्य मिळत नाही तो पर्यंत तरुण मंडळी शेतीकडे आकर्षित होणार नाही व हे लोक शहराकडे धाव घेतील आणि बेकारांचा तांडा वाढत जाइल.
९)         शेती व्यवसायातून फायदा होण्यासाठी अनेक उपायांची गरज आहे. त्यासाठी अनेक मार्ग दाखविण्यात आले आहेत. प्रत्येक धान्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत.
१०)                       जो पर्यंत शेती आणि शेती व्यतिरिक्त उत्पन्नाची साधने वाढत नाहीत तो पर्यंत शेती करणे कठीणच होत जाणार.
११)                       शेती व्यवसायाकडे तरुण कसा आकर्षित होईल ह्यासाठी अनेक उपाय समितीने सुचविले आहेत. कृषी महाविद्यालये , कृषी विद्यापीठे आणि भारत सरकारच्या अनेक कृषी विकास संस्थांच्या( ICRI, IARI, ETC.,) माध्यमातून हे काम  करणे सहज शक्य आहे.
१२)                       शेती व्यवसायातून फायदा आणि बौद्धिक आनंद जर मिळत असेल तरच तरुण मंडळी शेतीकडे वळतील. शेतकऱ्यांची मुले शेतीत रमली तरच चांगली शेती शक्य आहे.
१३)                       कृषी उत्पादन करताना नवीन तंत्रशास्त्राचा उपयोग अत्यंत  महत्वाचा आहे. शेतीचे आधुनिकीकरन अत्यंत महत्वाचे आहे. बायोटेक्नोलॉजी आणि माहिती तंत्रज्ञान ह्याचा उपयोग फार महत्वाचा आहे. शेती करणाऱ्या तरुण शेतकऱ्याला तसे प्रशिक्षण असणे आवश्यक आहे. हवामान शास्त्र, बाजारपेठ आणि व्यापार क्षेत्र ह्यासाठी तरुण शेतकरी ज्ञानी असणे आवश्यक आहे.
१४)                       तरुण शेतकरी हा आधुनिक झाला , शिक्षित झाला आणि शेती हा एक फायदा मिळवून देणारा व्यवसाय आहे असे समजून हा व्यवसाय करू लागला तरच तो यशस्वी होईल. उत्तम शेती , मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी अशी म्हण होती. आज अल्प भूधारकाची शेती उत्तम असू शकत नाही. मध्यम धंदा उभारण्याची मानसिकता तरुणांमध्ये नाही आणि कनिष्ठ नोकर्या उपलब्ध नाहीत. Skilled and trained Labour उपलब्ध नाहीत.
१५)                       आज जमीन थोडी व त्यावर अवलंबून असलेली माणसे  खूप अधिक आहेत व ती वाढतच आहे. पण शेतकऱ्यांच्या जवळ असलेली जमीन मात्र कमी होत आहे त्यामुळे  अल्प भूधारकांची संख्या वाढतच राहणार . कारण कुटुंबामध्ये जमिनीचे विभाजन होतच राहणार. हे जसजसे होत जाते तसतसे आपल्याजवळ असलेली जमीन विकण्यासाठी शेतकरी पुढे येत जातात आणि शेत जमीन इतर व्यवसायासाठी विकतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ४५ टक्के शेतकरी जमीन विकण्याच्या विचारात आहेत. शेतीत त्यांना फायदा होत नाही. ते कर्जबाजारी आहेत आणि शेतीला लागणारे भांडवल ते उभे करू शकत नाहीत.
१६)                       शेती करताना इतर उद्योग करीत पैसा मिळविता आला तरच तरुण शेतकरी आपल्या गावात राहण्याची शक्यता आहे आणि हा प्रश्न सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. त्यावरच शेतीचे भविष्य अवलंबून आहे.
१७)                       अल्प भूधारक शेतकर्यांना शेती पासून फायदा जो पर्यंत होणार नाही व त्यासाठी योग्य ती साधने , शिक्षण आणि तंत्र त्याला उपलब्ध नसेल तो पर्यंत परिस्थिती सुधारणे कठीण आहे. शेतकर्याला बाजार मूल्य मिळणे महत्वाचे आहेच. Conservation – Cultivation – Consumption – Commerce ह्या चार गोष्टीचा विचार करून शेतीकडे पाहणे आवश्यक आहे.
१८)                       शेतीला पूरक उद्योगाची उभारणी करणे अत्यंत महत्वाचे आहे. हे छोटे उद्योग गावाच्या परिसरातच असणे आवश्यक आहे. ‘ शेतातून घराकडे – Farm to Home ही साखळी निर्माण झाली पाहिजे .
१९)                       सर्विस सेक्टर शेताच्या जवळ आला पाहिजे तरच शेतीची अर्थ व्यवस्था आणि शेतीचे आधुनिकीकरन होणे शक्य आहे.
२०)                       पाणी उपलब्धता आणि बाजार हमी हे दोन प्रमुख अडथळे दूर होण्यासाठी यंत्रणा निर्माण करणे हे शासकीय लक्ष हवे. More CROP per DROP ही घोषणा न राहता त्यासाठी यंत्रणा उभी करणे महत्वाचे आहे.
भारतीय शेती कठीण काळातून जात आहे. हरित क्रांती झाली . आज अल्प भूधारक शेतकऱ्यांची मोठी संख्या हीच एक मोठी समस्या आहे. त्यांना शेती किफायतशीर नाही. म्हणूनच आत्महत्या प्रमाण वाढत आहे. त्यासाठी वर उल्लेख केलेले उपाय योजने अवश्य आहे. Right to Food योजना आली हे खरे आहे . पण शेती उत्पादन कमी झाले तर पुन्हा देशाला PL४८० चे दिवस येणे दूर असणार नाही. ही धोक्याची घंटा आहे.

( मी शहरातला माणूस . शेतीचे काय माहित ? असा प्रश्न विचारला जाईल . आमची शेती कुळ कायद्यात गेली. ते बरेच झाले म्हणायचे . शिक्षण मिळाले हे नशीब. M.Sc. Physics झाल्यानंतर मी सर्वात प्रथम मराठवाड्यातील शेतकी कॉलेजमध्ये  Soil Physics हा विषय काही महिने शिकवीत होतो. त्यामुळे शेतीविषयी माहिती झाली. पुढे Ph.D. करीत असताना शिष्यवृत्ती संपल्यामुळे माटुंग्याच्या Cotton Technological Research Laboratory मध्ये Senior Scientific Assistant (Information)  म्हणून काम करताना कापूस संशोधनाची भारतातील सर्व संस्थांची माहिती एकत्रित करण्याचे काम माझ्याकडे होते. ही माहिती ICAR आणि भारत सरकारकडे जात असे. त्यामुळे कापूस आणि इतर शेती विषयाची भरपूर माहिती मिळत असे . त्यामुळे शेती संबंधी सर्व बाजूनी विचार होत असे. तो अनुभव पाठीशी होता. पुढे मी दुसर्या क्षेत्रात गेलो. पण हा विषय मला बर्यापैकी माहित असल्यामुळे मी ह्या विषयावर लिहिण्याचे ठरविले  गेल्या काही वर्षापासून हा विषय खूप चर्चिला जात असून त्याचेच राजकारण केले जात आहे. वरील मूळ प्रश्नांना उत्तरे शोधली जात नाहीत व राजकीय सोय पहिली जाते त्यामुळे हा प्रश्न आहे त्या ठिकाणीच राहतो आहे. ) p

1 comment:

  1. आत्महत्त्या !!

    संकटे ही येती जाती !
    परवा त्याची कारू नाका !
    तुम्ही जगाचे पोशींदे हो !
    आत्महत्त्या तुम्ही कारू नाका !. . तुम्ही जगाचे ..!.!! ध्रू !!

    सरकारे ही येती जाती !
    त्यांच्या भरोसे राहू नाका !
    नशीबही तुमचे हातही तुमचे !
    बळीराजा तुम्ही थांबू नका !. . . . . .तुम्ही जगाचे . . .!!1 !!

    तुझ्या कृपेने होळी दिवाळी !
    जीवन आनंदी जगी असे !
    तूच राहिला नाही जगी तर !
    हे आनंद $$ जगी कसे !.. . . . . . . तुम्ही जगाचे . . .!! 2!!

    जीवनाची ही कटू सत्यता !
    करते त्याला मिळत नसे !
    करणार्‍या ने करतच राहावे !
    शिकवण तुजला दिली असे !. . तुम्ही जगाचे . . . . . .!! 3 !!

    तुझ्या भरोसे जग हे सारे !
    तुझ्या कृपेने जगत असे !
    तू जगला तर जग ही जगेल !
    पशूधन सारे तुझे सखा ! .. . तुम्ही जगाचे . . . . . !! 4 !!

    हजारोंचे पोट तुला भरणे !
    आहे लाखांचा $ तू पोशींदा !
    धरूनी घे ध्यानी आणि मनी रे !
    नाही संकटे सदा सदा !.. . तुम्ही जगाचे . . . . . . .!! 5 !!

    आमच्या साठी जगने तुम्हा !
    कोण मित्र आम्हा कोण सखा !
    बळीराजा तुम्हा करतो विनंती !
    आत्महत्त्या तुम्ही कारू नका !
    आत्महत्त्या तुम्ही कारू नका !

    मानव
    9423442349

    ReplyDelete