Sunday, April 12, 2015

इंटरनेट सुरु होण्यापूर्वी ......


युरोपमधील सर्व विद्यापीठातील संगणक एकमेकांना जोडले गेले होते व संशोधक माहितीची आदानप्रदान करीत होते. त्याच वेळी (१९७५- १९७६ )TIFR मधील महासंगणक प्रायोगिक म्हणून युरोपमधील मुख्य संगणकाला जोडला गेला होता. VJTI मध्ये त्या संगणकाचे एक टर्मिनल होते. संशोधकांना एका क्षणात जगातील संशोधनाची माहिती उपलब्ध होत होती. 
भारतातील सर्व संशोधन प्रयोगशाळा , IIT, आणि विद्यापीठे ह्यांच्यातील संगणक एकमेकांना जोडावे आणि TIFR च्या संगणकाच्या साह्याने जगातील इतर संशोधन संस्थांशी संबंध जोडला जावा असे प्रयत्न चालू होते.
BARC , INSDOC , DRTC , आणि DST ह्या संस्था एकत्र येउन Information Science and Technolgy प्रकल्प राबवीत होत्या.
ह्या सर्व संस्थांनी एकत्र येउन Information Scientist साठी नवा अभ्यासक्रम सुरु केला होता व तसा शिक्षणक्रम आखला होता. मी माटुंग्याच्या CTRL ह्या संस्थेतर्फे ह्या उपक्रमात सहभागी झालो होतो. तेव्हा शिक्षणक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही इतर वैज्ञानिकांना डेमो देण्याचे काम करीत असू.
मी TIFR मध्ये असाच डेमो देत होतो. त्या दिवशी डॉ जयंत नारळीकर ते बघण्यासाठी आले होते . मला त्यांच्याबद्दल माहिती होतीच. मी संगणकामध्ये त्यांचे नाव टाकले आणि काही क्षणातच त्यांचे सर्व रिसर्च पेपर असलेली यादी छापून बाहेर आली . मी ती यादी जपून ठेवली होती . माझा संगणकाशी विज्ञान माहिती अधिकारी म्हणून आलेला हा अनोखा संबंध . त्यावेळी IE किंवा गुगल नव्हते .
इंटरनेट येण्यापूर्वीचा हा अनुभव खूप मजेशीर होता. संशोधकाला तासच्या तास वाचनालयात अनेक ग्रंथात व जर्नलमध्ये शोधत बसावे लागत असे , ते लगेच सापडत नसे. हा संगणकाचा उपयोग क्रांतिकारी होता. Current Awareness Abstract काही मिनिटात उपलब्ध करून देण्याचे काम सहाय्यक विज्ञान अधिकारी करून देत असत.
भारतात ही यंत्रणा असावी म्हणून प्रयत्न चालू होते पण त्यावेळी कोणीही ह्या तंत्रज्ञानाकडे तेवढे लक्ष दिले नव्हते .
आज गुगलने जग पादाक्रांत केले आहे. माझा ६ वर्षाचा नातू मला म्हणतो , ' आजोबा , कशाला शोधत बसतां ? गुगल करा , पाहिजे ती माहिती लगेच मिळते ' .

No comments:

Post a Comment