Friday, September 20, 2013

यशस्वी होण्यासाठी......

शाळा - महाविद्यालयातील मुलांच्या बरोबर आणि महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांच्या बरोबर संवाद  साधताना "यशस्वी होण्यासाठी काय करावयास हवे? " असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. तेंव्हा झालेल्या चर्चेवर आधारित हे चिंतन.
 यशस्वी होण्यासाठी नुसते कष्ट करू नका. आपण आपले काम  चांगले करतो आहोत हे लोकांना दिसू द्या. Working hard is not important, working smart is important. आपण जे काम करतो आहोत ते आपल्या वरिष्ठांना आणि सहकार्यांना समजले पाहिजे.
आपण कोण आहोत? आपले साध्य काय आहे ? आपल्याला काय मिळवायचे आहे ? हे आपण निश्चित केले पाहिजे. हे एकदा आपण नक्की ठरवले पाहिजे. आपल्या विचारात दोलायमानता नसावी. विचारांचा पक्केपणा हवा.धरसोड वृत्ती नको. आपल्याकरिता कोणीतरी प्रयत्न करावेत असे काहींजणांना वाटत असते ,ते चुकीचे आहे. आपण आपल्याकरिता काय करू इच्छितो हेच सर्वात महत्वाचे आहे.आपण कोणाकडून काहीं अपेक्षा ठेवणे योग्य नाही.
 " मी माझ्या क्षेत्रातील तज्ञ / नामवंत आहे " असा विचार करूनच काम  केले तर आपण उच्च पदावर जाऊ शकतो. म्हणजे स्वतःत न्यूनगंड नसावा.आपण स्वतःला कमी लेखता कामा नये. आपली क्षमता काय आहे हे जाणून घेताना जे शक्य आहे त्याकडे दुर्लक्ष करतां कामा नये,विचारांची स्वच्छता असेल तर आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अनेक गोष्टी सहज शक्य होतात,हे लक्षात ठेवणे  आवश्यक आहे .
आपण जे काम करतो ,ते करतांना आपल्याला गंमत वाटली पाहिजे .आनंद वाटला पाहिजे . त्या कामात आपले मन रमले पाहिजे.आपले काम  हे आपल्या आयुष्यासारखे असायला पाहिजे. कधी गमंत असलेले ,कधी वेगवान तर कधी महत्वपूर्ण घटनांनी व्यापलेले.
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो किंवा आपल्याला दिलेले जे काम आहे  ते आपण परिपूर्णतेनेच केले पाहिजे. Perfection and Excellence in your work is most important. परिपूर्णतेकडे जातांना काहीं चुका होणारच.परंतु संपूर्ण यश तेंव्हाच मिळेल जेंव्हा आपले काम  परिपूर्ण असेल.
जी व्यक्ती महत्वाकांक्षी असते , ती व्यक्ती घोड्यावर स्वार होण्यासाठी स्वतःचा घोडा शोधून काढते.कोणीतरी आपणास घोडा आणून देईल आणि मग आपण घोड्यावर स्वार होऊन विजयाचा झेंडा फडकवत पुढे जाऊ असे म्हणणे म्हणजे यशापासून दूर जाणे आहे. आपण आपले काम  इतरापेक्षा अधिक चांगले करू शकतो हा आत्मविश्वास हवा.जिद्द हवी.प्रयत्नांची पराकाष्ठा हवी.आपण बर्याच वेळा आपल्या कर्तृत्वशक्तीवर अनभिज्ञ असतो.आपल्याला त्याची पूर्ण जाणीवच नसते.तेंव्हा आपण आपल्या आत्मविश्वासावर अवलंबून राहिले पाहिजे .तरच यश आणि नांव दोन्हीही धावत सामोरे येतील.जेंव्हा तुम्ही आत्मविश्वासाने एखादी  गोष्ट करतात तेंव्हाच यश धावून येते. पण जेंव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेंव्हा तुम्हीच स्वतःला मागे खेचत असतात व त्यामुळे अयशस्वी होतात.आपण प्रयत्नवादी  असलेच पाहिजे व ध्येयाला घट्ट धरून वाटचाल केली पाहिजे . नुसते कष्ट करून काहीही साध्य होत नाही.एकत्रित प्रयत्न करणे महत्वाचे आहे.
आपली पात्रता ,गुणवत्ता व प्रयत्न हे महत्वाचे आहेतच.परंतु आपण पात्र आहोत , गुणवान आहोत व प्रयत्नशील आहोत हे इतरांना समजले पाहिजे. तरच आपल्या यशाला खरी मान्यता मिळेल.
जर तुम्हाला खरेच यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःलाच  स्वतःचा घोडा शोधावा लागणार आहे. आपण आपल्यासाठी काय करू शकतो हे अधिक महत्वाचे आहे. लोक आपल्यासाठी काय करतात हे डोळे लावून बघणे व मग कामाला लागणे योग्य नाही.आपणच आपल्या यशाचे खरे सूत्रधार आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे.आपल्याला योग्य वेळी मोबदला / यश मिळतच असते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे
अपयश ही आपल्याला अजून एक नवी संधी प्राप्त करून देते हे ही लक्षात असणे आवश्यक आहे.आपण कितीही बुद्धिमान असलो आणि खूप परिश्रम घेतले तरी यश नुसते बुद्धीवर व श्रमावर अवलंबून नसते. आपणच आपली दिशा ठरवली पाहिजे आणि बदलली पाहिजे.एकाच ठिकाणी जाण्यासाठी अनेक मार्ग असतात व मार्ग निवडताना सर्व मार्गांचा विचार करून योग्य ते वळण निवडले पाहिजे .फारच थोड्या लोकांना काही गोष्टी अगदी सहजपणे प्राप्त होतात. पण ते अपवाद असतात.त्यालाच काहीजण नशीब असे नांव देतात.सामान्य बुद्धी, मोजकेच कष्ट व सहज उपलब्ध झालेली संधी ह्याच्या जोरावर फार थोडे लोक यश मिळवतात पण ते दैदिप्यमान यश नसते. यशाचे सुमधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांचा चंद्र तेजोमय ठेवला पाहिजे , हे खांडेकरी विचार डोक्यात बसले पाहिजेत. अपयश पचविणे फार कठीण असते .परंतु अयोग्य वेळी मिळालेले यश ही फारसे चांगले नसते.ह्यामुळेच आयुष्यावर विपरीत परिणाम होतात.
आपली वृत्ती आपले यश ठरविते. एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. बांधकाम करणारे तीन गवंडी होते.त्यांना प्रश्न विचारण्यात आला. " तुम्ही हे बांधकाम कशासाठी करता आहात?" पहिला गवंडी उत्तरला, " मी माझ्या रोटी-रोजीसाठी करतो आहे '. दुसरा गवंडी म्हणाला, 'मी माझ्या कुटुंबाला मदत व्हावी म्हणून करतो आहे ". तर तिसरा गवंडी अगदी सहजपणे म्हणाला, ' मी एक सुंदर देऊळ बांधण्यासाठी माझा हातभार लावतो आहे . मी आयुष्यात पहिल्यांदाच एक सुंदर देऊळ बांधण्याचे काम  करतो आहे त्यामुळे मी फार आनंदी आहे' ही वृत्ती महत्वाची आहे.
आपल्या आयुष्याचे यश हे आपल्याला काय हवे ह्यावर अवलंबून असते आणि ते मिळवण्यासाठी आपण काय करतो ह्यावर ते महत्वाचे असते.त्याला Desire Management असे म्हणतात.Desire आपलीच असते. ती नेहमीच बदलत जाते. वाढत जाते. आपण आणखी आणखीच्या मागे लागतो. त्याची परिपूर्णता करण्यासाठी चाललेले प्रयत्न किती यशस्वी होतात त्यावर  आपले अंतिम यश अवलंबून असते. यश हे आपल्यावरच अवलंबून असते .दुसर्या व्यक्तीच्या भरवशावर आपण यश गाठू शकत नाही.. मर्यादित उंचीवर भरभक्कम पावले टाकून आपण यशाचा गड जिंकला पाहिजे.आपणास काही संधी मिळतात. आपल्या हातातून काहीं संधी निघून जातात किंवा आपण त्या संधीचा उपयोग करून घेत नाही.Opportunity lost is lost for ever. They do not come again . मिळालेल्या संधीचे सोने करणे आपल्या हातात असते.
One must work smartly.One must be smart enough and you  must sale yourself. आजूबाजूच्या लोकांना आपली गुणवत्ता , आपले ज्ञान ,आपली क्षमता , आपले कौश्यल्य आणि किमंत माहित असली पाहिजे.अनुभव खूप काहीं शिकवून जातो.त्याकडे डोळस दृष्टीने बघायला शिकले पाहिजे. अनुभवात विविधता हवी. त्यामुळेच व्यक्ती विकास होतो. जगण्याचे प्रयोजन डोक्यात नसते. ते हृदयात असते. आपल्या जगण्याचा हेतू मानेवरती नसतो.म्हणजे डोक्यात नसतो. तर हृदयात असतो.मन आणि हृदय दोन्ही महत्वाचे आहेत. विचार मेंदू करतो पण समरसता हृदयात असते. जेंव्हा हृदयाशी संवाद चालू होतो तेंव्हा डोकेदुखी थांबते आणि इतर वेदना बंद होतात .हृदयाला कशात तरी गुंतवून ठेवणे महत्वाचे आहे . मेंदू हा हृदयाचा शिपाई असायला हवा.त्यामुळेच  आपली असलेली दुर्बलता सबलतेत बदलून जाते .
व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्याला एखादा God Father असावा लागतो. आपण कोणाचे तरी Blue Eyed Boy असणे आवश्यक असते.हे आपल्याला जमले तर काहीं संधी निश्चितच चालून येतात आणि त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. स्वतःला म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाला विकता आले पाहिजे. हे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे. "We must have good qualities of a salesman ." जो विक्रेता एस्किमोलाही फ्रीज विकू शकतो तो चांगला विक्रेता" हे लक्षात आले तर आपण सहज यशस्वी होऊ शकतो . ज्ञान व विकण्याची कला ह्यांचा सुंदर संगम हवा. त्यामुळे लोकांचा विश्वास प्राप्त होतो. आपणच आपल्या आयुष्याचे ( चरित्राचे) लेखक असावयास हवे, हे मी माझ्या व्यावसायिक अनुभवातून सांगतो आहे. बघा पटते  का?

डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com

No comments:

Post a Comment