“What Should I Do With My Life?” हे P O Bronson ह्या लेखकाचे पुस्तक सहज हातात आले. थोडेसं चाळले. आणि वाचण्यात मन रमून गेले. मग पुस्तक खाली ठेवावे असे वाटलेच नाही. “
आयुष्यावर बोलू काही “ हा संदीप खरे आणि सलील कुलकर्णी ह्यांचा काव्यगायनाचा सुंदर
कार्यक्रम काही वर्षापूर्वी पाहिला होता.तसाच विषय. आपण आपल्या आयुष्याच्या यशापयशावर
बोलत असतो. कधीकधी स्वतःशीच. आपल्याला काय मिळाले किंवा काय मिळाले नाही ह्याचा
विचार करीत असतो. परंतु नुसता विचार करणे नव्हे तर आपले जगणे किती आनंदी करू शकतो
ह्यावर बोलणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण करण्यासाठी आपण सारेच जण झटत
असतो. जगण्याचा अर्थ शोधत असतो. रोजच्या जगण्याला अधिक सुंदर करण्याचा व आनंद
निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असतो. वरील पुस्तक वाचू लागलो. हे पुस्तक म्हणजे
तुमच्या माझ्यासारख्या सर्व"सामान्य माणसाच्या धडपडण्याचा शोध घेणारे सुंदर
पुस्तक. आयुष्यात काय हवे? ते कसं मिळवायचे ? कसं आनंदी व्हायचे?" त्यासाठी कसा
प्रयत्न करायचा. हे सारं ९०० निवडक व्यक्तींच्या जीवनाचा शोध घेणारे पुस्तक. ह्या
व्यक्तींचे आयुष्य कसं सुंदर होत गेले आणि त्यानीं आयुष्यात आनंद कसा मिळविला. त्यांनी काय
मिळविले आणि काय गमावलं. हे खूप काहीं सांगणारे अप्रतिम पुस्तक. हा लेखक माणूस कसा
शोधतो ह्याचा प्रत्यय येतो.तुम्ही-आम्ही अशी माणसे रोजच पहात असतो पण असा शोध घेत
नाही. ह्या पुस्तकातून दिसणारी ही इंद्रधनुष्याचे विविध रंग असणारी मानवी आयुष्ये
समजून घेतली तर आपण नक्कीच म्हणू .. “ ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे ...”
ह्या पुस्तकात काय आहे? सामान्य माणसातील असामान्य माणसे आहेत . नियतीचे भान
असलेली माणसे आहेत तसेच जे ठरविले ते दुर्लक्ष करणारी माणसे आहेत. कठीण काळापासून
खूप काहीं शिकणारी व धडपडणारी माणसे आहेत. आत्मविश्वासाला अर्थ प्राप्त करून
देणारी माणसे आहे. असणे आणि करून दाखविणारी माणसे आहेत.विचारातील पारदर्शिकता असलेली
पण त्यासाठी थांबणारी आणि धडपडणारी माणसे आहेत." मी कुणाचा आहे ?" असा प्रश्न पडलेली
पण मला जे हवय त्या आनंदासाठीच मी जगणार ,धडपडणार असा विचार असलेली माणसे आहेत.
मेंदूला उत्तेजित करणारी स्त्री- पुरुष मंडळी आहेत." प्यारासाईट उद्योगशीलता" असलेली माणसे आहेत. जगण्यासाठी
माणसाजवळ एक " off switch" असावे असे सांगणारा माणूस आहे." स्वतंत्रतेची छत्री असावी" असे म्हणणारी
माणसे आहेत. कर्तव्य विसरणारी माणसे आहेत. कामगार वर्ग विरुद्ध सुशिक्षित मध्यमवर्ग
ह्यांच्यातील भांडण पेटवणारी माणसे आहेत. त्यांचे जगणे आहे. शिक्षणाची आंस असलेला सामान्य
ड्रायव्हर आहे तर स्वप्न पाहणारा आणि चर्च बांधणारा वेगळा माणूस आहे. क्यासिनोचे अर्थशास्त्र समजून घेणारा माणूस आहे. बातमी देणारी स्त्री बातमीदार आहे. पैसे नं
स्वीकारणारी माणसे आहेत. मानसिक व्यंगावर मात करणारा माणूस आहे." श्रीमंती" माणसाला
कशी बदलुन टाकत असते, असे सांगणारा माणूस आहे." हे नंतर , ते आधी", असे म्हणून स्वतःवर
प्रयोग करणारी माणसे आहेत." आई होणे" हे भरवण्यापेक्षा अधिक काही आहे हे समजावून सांगणारी स्त्री आहे.
उपदेश , मार्गदर्शन आणि अधिकार ह्याचे महत्त्व सांगणारी माणसे आहेत." बदल" हाच आपल्याला जिवंत ठेवतो, असे सांगणारी प्रभावी माणसे आहेत. "स्वतःला ऐकून घेत
चला , स्वतःच स्वतःचे श्रोते व्हा. वास्तव समजून घ्या. पूर्वानुभव आड येऊ देऊ नका", असा नं कळत सल्ला देणारी माणसे आहेत." मी आणि बदलणारा मी" ह्याचा शोध घेत चला असं
सांगणारा माणूस आहे. यशाच्या नव्या गाथा लिहिणारी ध्येयवेडी माणसे आहेत." प्रश्नाचे उत्तर नं देता प्रश्नाचे
महत्वच कसे कमी करावे", असे सांगणारा वेगळा विचार करणारा माणूस आहे. समविचारी लोकांच्या सहवासात आनंद शोधणारी माणसे
आहेत. यशाचा पिच्छा नं सोडणारी विलक्षण धडपडणारी माणसे आहेत . परदेशात अनुभवासाठी जाणारी
माणसे आहेत. एकाचवेळी अनेक करिअरचा विचार करणारी आणि धडपडणारी विलक्षण यशस्वी माणसे आहेत.
असा हा माणसांचा शोध घेणारे हे पुस्तक.
स्वप्नें, भीती , आत्मविश्वास, अपयश ,अनुभव असणे आणि नसणे , प्याशन, जगण्याचे
प्रयोजन, नोकरी आणि वळणावरच्या वाटा ,
पैसा मिळवणे , स्वप्नातील नोकरी , आयुष्याचा हेतू, विवाह ,मुलं आणि आयुष्य .
स्वातंत्र्य ,ध्येयपूर्ती, बदल ,जगण्याचे नाट्य,आपला आतला आवाज ,जिद्द, “स्व “चा शोध,
आपल्या गरजांची भूक ,व्यवसाय आणि त्यांत मिळवायचा आनंद, शहरी जीवनशैली, निसर्ग आणि विज्ञान ,निराशा आणि
अलिप्तता, ठेविले अनंते वृत्ती, वेगळेपणाचा ठसा, न्यूनगंड, डोके आणि हृदय,इत्यादी.. इत्यादी.....ह्या सर्वावर प्रत्येकाचे वेगळे वेगळे बघणे ...
असा हा माणूस शोध खूप काही सांगून
जातो. ही माणसे मनापासून आवडतात आणि खूप काहीं शिकवून जातात.
डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com
No comments:
Post a Comment