Sunday, August 18, 2013

निमीत्त देवकणाचे

सध्यां हिग्ज बोसान ह्या कणाचा शोध चालू आहे. सुरुवातीला ह्या कणाला देवकण ( God Particle ) असे संबोधले जात असे. आतां त्याला तसे म्हणू नये असे ठरले आहे. अजूनही हा कण दिसलेला नाही, तरीही त्याचे अस्तित्व मान्य झाले आहे.
देव कण म्हणजे कुठेतरी परमेश्वराची कल्पना मान्य करणे असा अर्थ होत असल्यामुळे शास्त्रज्ञांचा देव कण म्हणण्याला विरोध असावा.
परमेश्वर हा तसा दिसत नाही. परमेश्वराची संकल्पना गीतेमध्ये मांडण्यात आली आहे. आचार्य विनोबा भावे ह्यांनी "गीताई" मध्ये फार सुंदर शब्दात वर्णन केले आहे
"मी चि अव्यक्त रूपानें जग हे व्यापले असे 
माझ्यात राहती भुते मी नं भूतांत राहतो" 
पदार्थ विज्ञान शास्त्रात आपण उर्जा आणि अणु कण ह्यांच्या संकल्पना मान्य केल्या आहेत. परंतु हे अणु कण आणि उर्जा आपण डोळ्यांनी कधीच पाहू शकत नाही.न्यूटनच्या  गुरुत्वाकर्षणाची संकल्पना आपणास समजते पण आपण ती डोळ्यांनी पाहू शकत नाही. न्यूटनला झाडावरील फळ खालीच कां पडते ह्याचा शोध लागला पण गुरुत्वाकर्षणाची शक्ती मात्र दिसू शकली नाही.तसेच  विश्व किरणाचे ( Cosmic Rays ) परिणाम आपणास दिसतात पण विश्व किरणे दिसत नाहीत. म्हणजे अणु कण आणि उर्जा शक्ती अव्यक्त असूनही त्यांचे अस्तित्व आहे.आपणास परिणाम दिसतो पण अस्तित्व दिसत नाही.
 Cause and Effect ह्यावर विज्ञान आधारलेले आहे.Effect दिसतो म्हणून Cause शोधणे हे विज्ञानाचे काम. परमेश्वराचे ही तसेच आहे. तो असूनही दिसू शकत नाही.परमेश्वराने अव्यक्त रूपाने हे जग व्यापले आहे , हे मान्य करावयास हरकत नसावी.
" आकाशात महा-वायु सदा सर्वत्र राहतो " त्यामुळेच आपल्याला टी.व्ही.वर , इंटरनेटवर दृश्य चित्रे पाहता येतात. एका ठिकाणी घडत असलेल्या घटना दूरवर क्षणार्धात सहज दिसतात.  दूरध्वनीवर अगदी सहज बोलता येते. रेडिओवर प्रक्षेपण होऊ शकते. हे कसे शक्य आहे हे जर समजून घेतले तर ह्या अव्यक्त असणार्या गोष्टी समजू शकतात.
" साक्षी मी प्रकृति- द्वारा उभारी सचराचर 
त्यामुळे सर्व सृष्टीची ही घडामोड होतसे" 
प्रकृति आणि सृष्टीचा शोध हे विज्ञानाचे कार्य. म्हणजेच अप्रत्यक्षपणे विज्ञान ह्या अनाकलनीय , अदृश्य शक्तींचा शोध घेत असते. त्याला देव म्हणायचे कीं नाही हा ज्याच्या त्याच्या विचाराचा भाग आहे.
 "तापतो सूर्यरूपें मी सोडितो वृष्टि खेंचितो 
मृत्यू मी आणि मी मोक्ष असें  आणि नसें हि मी "
अव्यक्त रूपाने हे जग व्यापलेले आहे. असंख्य सूर्य अवकाशात तळपत असतात. विश्वाच्या पलिकडेही अनेक विश्वें आहेत. प्रकृति आणि सृष्टीत सतत अनाकलनिय घडामोडी घडत असतात. ह्या सर्व घडामोडीच्या मागे एक अदृष्य शक्ती / उर्जा आहे. अशाच एका उर्जेतून हिग्ज बोसान हा मुलभूत कण दिसून आला. असे १२ मुख्य मुलभूत कण आहेत आणि २०० च्या वर अणु कण सापडले आहेत. विश्वनिर्मितीची कारणे समजण्यासाठी ह्या नव्या उर्जेचा आणि कणांचा शोध महत्वाचा आहे.

परमेश्वराच्या अस्तित्वाचा शोध ही असाच महत्वाचा आहे. तो अव्यक्त आहे. त्याची विविध रूपे आपल्याला ह्या निसर्गात दिसून येतात हे मात्र खरे. त्याला परमेश्वर असे संबोधले नाही तरी चालेल.
विश्वाच्या पलीकडे विश्व 

No comments:

Post a Comment