Monday, September 16, 2013

" आहे रे" आणि "नाही रे "

" आहे रे" आणि "नाही रे "
समाजात प्रामुख्याने हे दोन वर्ग दिसून येतात. त्यांची मानसिकता ही भिन्न असते. काहीं व्यक्तीमध्ये दोन प्रकारची व्यक्तिमत्वे असतात.कामगार किंवा कष्टकरी वर्गाची मानसिकता ( Working Class ) किंवा शिक्षित माणसांची ( Educated Class ). कामगार मानसिकता म्हणजे शाळा / कॉलेज अर्धवट सोडून काहींतरी नोकरी/व्यवसाय करून पोट भरणार्या माणसांची मानसिकता. शिक्षित मानसिकता म्हणजे उच्च विद्याविभुषित पदवीधर माणसांची मानसिकता .ह्या दोन मानसिकतेमध्ये जमीन-अस्मानचा फरक असतो.
चांगल्या कुटुंबातील वातावरणातून शिक्षित झालेल्या माणसाला "मी समाजाचे काहींतरी देणे लागतो" असे सारखे वाटत असते.त्याच्यामध्ये नेतृत्व गुण ( Leadership) असतात. " नेतृत्व म्हणजे काय ?" तर "बदल घडवून आणणे( Make a difference )" अशी त्याची धारणा असते." मी जर काही वेगळा फरक घडवून आणू शकलो तर माझे जीवन अधिक सार्थकी लागेल", अशी भावना असणे म्हणजे नेतृत्व करणे. "आयुष्याला अधिक काय अर्थ आहे ?" असे त्यांना वाटत असते." नुसतेच खोट्या मोठेपणाला काहींच अर्थ नसतो", असे त्यांना वाटते. ही मंडळी स्वतः:ला सामाजिक कार्यात गुंतवून घेतात किंवा स्व:ता:च्या संस्था काढतात. चळवली उभ्या करतात.असा हा शिक्षित माणूस आपल्या जीवनाचा हेतू समाजाला आपण किती उपयोगी पडतो ह्याचाच विचार करीत असतो.अर्थात सगळीच शिक्षित मंडळी असा विचार करतात असे नाही. ह्या उलट कामगार आणि कष्टकरी असलेला माणूस त्याचाच विचार करतो. कारण,तो परिस्थितीने वेढला गेलेला असतो.त्याची वृत्ती काहींशी संकुचित झालेली असते. ह्या वर्गातील माणसे नेहमीच असे बोलतात की ," तुम्ही चांगल्या कौटुंबिक ,आर्थिक वातावरणात राहून खूप शिकला आहात , तुम्हाला सगळे काहीं सहज मिळाले आहे , तुमची गोष्टच वेगळी.तुम्ही काय ,आनंदीच असणार. आमच्यासारखे दु:ख तुम्ही भोगले नाही .... वैगरे वैगरे .." शिक्षित माणसाजवळ त्यासाठी प्रत्युत्तर नसते.त्याला त्यामुळे विनाकारण अपराधी वाटू लागते व आपणच अन्याय तर केला नाहीं ना? अशी मानसिक बोच वाटू लागते.म्हणजे " नाही रे " वर्ग हा नेहमीच " आहे रे " वर्गाकडे अशा संशयाने पहात असतो आणि "आहे रे "वर्गाला नं कळत आपणच अपराधी आहोत असे वाटू लागते.
तेंव्हा हे द्वंद्व समजून घेणे आवश्यक आहे. " आहे रे " वर्गाने ' नाही रे " वर्गासाठी काम करतांना जपून पावले उचलली पाहिजेत.
सामाजिक ताण- तणाव , पराकोटीची गरिबी,वाढती लोकसंख्या , कर्जबाजारीपणा , लांचलुचपत,बेकारी ,नैराश्य, वैद्यकीय सुविधांची नसलेली उपलब्धता ह्या सर्वांच्यामुळे " नाही रे "वर्ग , "आहे रे " वर्गाकडे द्वेशाने पहात असतो. ही एक सर्वसामान्य समस्या आहे. लोक स्वतःलाच दोष देतात कारण ते कोणत्याही प्रश्नाला विलक्षण गंभीरपणे घेतात असे दिसत नाही.
गरीब लोकांना निवड करण्याची संधीच मिळत नाही. तरीही ते बर्यापैकी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. आपण बर्याचवेळा गरीब लोकांची ही आनंदी वृत्ती अंगात बाणवली पाहिजे." कां ?", असे विचाराल तर त्याची कारणे अशी .......
गरिबांना गरिबीत राहावयाचे नसते. त्यांना बहुसंख्य अडचणीना सामोरे जावे लागते. प्रत्येक वेळी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.त्यामुळेच स्वतःचा विकास करणे शक्य नसते. त्यांना आपले जीवन अधिक सुखकर करण्याची आंस असते.त्यासाठी त्यांची सतत धडपड चालू असते.त्यामुळे पैसा कमविण्यासाठी कोणताही नवा मार्ग दिसला की  ते त्या मार्गाने जातांना दिसतात.अर्थात सर्व गरीब लोक असे करतातच असे नाही. काहीं जण असे प्रयत्न करतांना दिसतात. अगदी मनापासून गरिबी नाहीशी करण्यासाठी ते प्रयत्न करतांना दिसतात.
रोटरीच्या माध्यमातून समाजकार्य करतांना मला आलेला एक अनुभव सांगण्यासारखा आहे. मी क्लबचा अध्यक्ष होतो. विक्रमगढ ह्या ठाणे जिल्ह्यातील गावी आम्ही एक वैद्यकीय शिबीर घेतले. Cataract Operation ची आवश्यकता असलेले अनेक लोक आढळून आले. नुसते वैद्यकीय शिबीर घेऊन उपयोग नव्हता म्हणून वैद्यकीय शस्त्रक्रिया शिबीर घेण्याचे ठरविले. मुंबईच्या एका रुग्णालयात अशी व्यवस्था करावयाची, असे ठरले. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करावयाची त्यांच्या करिता येण्याजाण्यासाठी वाहन व्यवस्था केली. राहण्यासाठी एका धर्मशाळेची व्यवस्था केली. खाण्यापिण्याची ,जेवणाची व्यवस्था केली. सोबत एक नातेवाईकही असावा म्हणून त्याचीही व्यवस्था केली. त्याप्रमाणे नोंदणी झाली. पहिली १० ची तुकडी ठरली. आम्ही त्यांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी गावात पोहोचलो. आमचे वाहन उभे होते. सर्व मंडळी वाहनात चढण्यासाठी तयार झाली आणि चढण्यापूर्वीच त्यातील काही लोकांनी आम्हाला  घेराव घातला. एक जण म्हणाला ," आम्ही शस्त्रक्रिया करून घेतो , आम्हाला किती पैसे देणार? ". ह्या अनपेक्षित प्रश्नामुळे मी तर चाटच पडलो. आम्ही सर्व विना मोबदला करणार होतो. आणि ही मंडळी त्यासाठी आमच्याकडूनच पैसे मागत होती. आम्ही त्यांना सर्व समजून सांगितले. त्यांचा आमच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. त्यांना असे वाटत होते की आम्हाला सरकारकडून खूप पैसे मिळतात आणि त्यातील काही हिस्सा आम्ही त्यांना द्यावा. मला हे त्यांचे तर्कशास्त्र समजले नाही. त्यानंतर मला असे कळलेकी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमात असे पैसे दिले जात असत. त्यामुळे त्यानाही हा तसाच कार्यक्रम आहे असे वाटले. शेवटी फक्त ५ जण आमच्या बस मध्ये चढले. आम्ही त्यांना मुंबईला आणले. शस्त्रक्रिया झाल्या. त्यांची राहण्याची आणि इतर व्यवस्था केलीच होती. चार दिवसांनी त्यांना घरी घेऊन गेलो. दहा  दिवसांनी गावात परत गेलो तेंव्हा गावकरी आमच्या मागे लागले आणि विचारू लागले ,आम्हाला शस्त्रक्रिया करून घ्यावयाची आहे, पुढील कार्यक्रम कधी आहे. ज्यांनी शत्रक्रिया करून घेतल्या होत्या ती मंडळीच आम्ही केलेल्या कामाबद्दल तोंड भरून स्तुती करत होती. अक्षरशः
 आमच्या पाया पडत होती. नवे डोळे मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अशी असते गरीब लोकांची मानसिकता.
सामाजिक कार्य करणे तसे फार कठीण असते. ज्या गरीब लोकांच्यासाठी तुम्ही सामाजिक काम  करतात त्यांना नेहमी तुमच्याबद्दल एक अविश्वास वाटत असतो. त्याचे कारण आपली राजकीय आणि सामाजिक व्यवस्था. सर्वत्र जो लांचखोरपणा दिसतो त्यामुळे एक अविश्वास निर्माण झालेला असतो. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. अर्थात आपणच  हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर आपण कशाला हे सारे करावयाचे ? असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो.
सामाजिक कार्य करतांना अनेक वेळा आपला आत्मा राजकीय पुढार्यांना विकावा लागतो असे काही लोकांचे अनुभव आहेत हे दुर्दैव. तुम्हाला तुमच्या कामाकरिता जो पैसा उभा करावा लागतो तेंव्हा अनेक अडचणीना तोंड द्यावे लागते. कोणीतरी तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारा असतोच. त्यांना लोकांची पर्वा नसतेच. Keeping them poor is their business. गरिबांना गरिबीत ठेवणे हाच त्यांचा व्यवसाय असतो. त्यातच त्यांचे यश सामावलेले असते. लोकांना गरिबीत ठेवण्यासाठीच त्यांना नव्या नव्या शासकीय योजना समोर करून पैसे कमवायचे असतात. त्यातूनच ते  नवी अनुदाने मिळवितात.त्यासाठीच त्यांची कार्यकर्त्याची फौज असते. ते कार्यकर्त्याला सांगतात की,"तुम्हाला माझी गरज आहे. मला तुमची गरज आहे.मी चांगला आहे. तुमच्या उपयोगाचा आहे.तुम्हाला मी काहीतरी मिळवून देऊ शकतो".आणि देणाराच घेणाऱ्याकडून सर्व वसूल करतो. हे गरिबांनी समजून घेतले पाहिजे. प्रत्येक वेळी सरकारी मदतीवर अवलंबून नं राहता प्रयत्न केले पाहिजेत. कारण राजकीय पुढाऱ्यांचा मिंधेपणा तुमची गरिबी दूर करू शकत नाही. सत्तेचे जे केंद्रस्थान आहे त्या ठिकाणी चकरा मारून किंवा सरकारी अनुदाने मिळवून गरीबीचे प्रश्न सुटू शकणार नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे.
प्रत्येक गरीब माणसाला स्वाभिमानाने व सन्मानाने जगता आले पाहिजे.मिंधेपणा आला तर ते स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील? स्वतःमध्ये बघावयास शिकले पाहिजे. "ASSETS AND RESOURCES ARE MORE WITH POOR PEOPLE", हे त्यांच्या लक्षात आणून देणे महत्वाचे आहे. " नाही रे " लोकांचा हाच एक मोठा प्रश्न आहे. "आहे रे " असलेल्या सामाजिक कार्यकर्त्याची हीच एक वेदना आहे.

डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com

No comments:

Post a Comment