Friday, September 6, 2013

आपण आणि आपला आतला आवाज


आपला असा एक आतला आवाज ( calling) असतो. गांधीजींना  असा आतला आवाज खर्या अर्थाने समजला. प्रत्येकालाच असा एक आतला आवाज असतो.तो समजला पाहिजे. त्याचे ऐकले पाहिजे. आपल्याला आपली ओळख झाली पाहिजे. आपला आतला आवाज आपल्याला आपली ओळख करून देत असतो. आपल्याला आपल्या स्वतःचीच प्रचीती होणं फार महत्वाचे आहे.
आपण सामान्य माणसं अगदी साधं आणि नगण्य जीवन जगत असतो. आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपापल्यापरीने  प्रयत्न करीत असतो. आपलं आयुष्य नं कळत बदलत असतं. कठीण काळ संपून आपण पुढच्या टप्प्यावर येतो. अगदीच नाईलाज असतो तेंव्हा नं कळत आयुष्य थांबलेले असतं. अज्ञान , रोगराई , भ्रष्टाचार ,बेकारी ह्या रोजच्या समस्यांना तोंड देताना आपला जीव मेटाकुटीला आलेला असतो. वैयक्तिक सुख-दु:खे ,आप्तस्वकीयांचा अकाली मृत्यू ह्यांच्यामुळे आपले आयुष्य काहींसे थांबते.आपल्या चुका होतात. आपल्याजवळ धैर्य नसते. कोणते चांगले ह्याचे मोजमाप आपल्याला करता येत नाहीं.अशावेळी आपला आतला आवज आपल्याला  साथ देत असतो. ज्यांना हा आवाज समजतो तेच पुढे जातात. हा आतला आवाज ओळखता आला पाहिजे. आपण त्याचेच ऐकले पाहिजे.
आपल्या प्रत्येकाला काहीना काही नैसर्गिक देणगी असतेच. आपला आतला आवाज आपल्याला ती समजावून सांगत  असतो. आपण त्याकडे दुर्लक्ष करावयाचे नसते. त्यातच आपले यश असते.
मी समजून घ्या
आयुष्यात आपण काय कमावले ह्याचाच आपण जास्त विचार करतो. त्यामुळे जगण्याचा खरा आनंद घालवून बसतो. आपण काय मिळविले ह्याकडे जगाचेच लक्ष असते. परंतु त्यामुळे आपण आपला आनंद हरवून बसतो. आपल्याला काय मिळवायचे ह्याच्या विचारात आपण आपल्या जगण्याचा खरा आनंद घालवून बसतो. आपल्या जगण्याला एक हेतू असतो. आपली काहीं ध्येये असतात. त्यासाठी आपली धडपड चालू असते. त्या जगण्याच्या हेतूसाठी प्रयत्न करतांना आनंद मिळविणे आवश्यक आहे. आपण आपल्या आयुष्याची आखणी करतांना काहीं छोटी छोटी ध्येयं समोर ठेवली पाहिजेत. त्यांना तुम्ही ध्येयं म्हणा, उद्दिष्टे म्हणा किंवा प्रयोजन म्हणा.
जेंव्हा आपल्या जीवनात कठीण समय असतो, दिवस त्रासदायक असतात तेंव्हा आपण जगण्याच्या नव्या वाटा शोधू लागतो. जेंव्हा चांगले दिवस असतात तेंव्हा आपण फक्त "बदला"बद्दल बोलत असतो.
आपले आयुष्य फार गंमतीदार असते.आपण जेंव्हा आपल्या आयुष्यावर विचार करतो तेंव्हा खालील गोष्टींचाच प्रामुख्याने विचार करीत असतो.
       माझे भविष्य काय आहे ? कधी कधी ज्योतिष्यशास्त्राचा आधार घ्यावा असेही आपल्याला वाटत
       राहते.
       मी माझ्या ambition चा विचार गोठवावा कां ?त्यातून तणाव कमी होईल कां?
       मी प्रथम पैसा कमवावा व नंतरच मला जे आवडते ते करावे कां?
       माझी आवड (Passion ) महत्वाची आहे कां? तिचाच विचार करून मार्ग निवडावा कां?
       बाह्य परिस्थितीचा विचार करूनच  माझे मार्ग बदलावेत कां?
       मी मला असलेला बदल केंव्हा घडवून आणावा ?
माझे आई-वडील किंवा आप्तस्वकीय माझ्याबाबतीत चिंतेत असतात तेंव्हा मी त्यांना केंव्हा आणि काय सांगावे ? माझा मार्ग मी बदलणार आहे ह्याबद्दल सल्ला घ्यावा कां?
मला नैराश्य येते , ते मी कसे टाळावे ?
मी मला हवे असलेले मिळविल्यानंतर कसा असेल? खरचं आनंदी असेल कां?
ह्या आणि अशा अनेक प्रश्नाची उत्तरे शोधताना माझ्या हातात काहीं पडणार आहे कां? ही निष्फळ चर्चाच नसेल ना ? ह्या सेवामुळे मी माझ्या उद्दिष्टापासून दूर जाईल कां?
मला जे हवे आहे ते मिळविताना मला पडणारे कष्ट , यश-अपयश ,निराशा ह्यांचा माझ्यावर कसा परिणाम होईल हे ही लक्षात घ्र्तले पाहिजे. बाह्य परिस्थिती स्वतःच्या हातात नसल्यामुळे घडणारे बदल माझ्या हातात नसतात, तेंव्हा मी काय करीन हे लक्षात आले पाहिजे.
मी मला समजून घेतले पाहिजे. माझा प्रवास मीच केला पाहिजे.त्यातून मार्ग काढणे माझ्याच हातात आहे. मीच मला समजून घेतले पाहिजे.
आपण अयशस्वी कां होतो?
आपण यशस्वी कां होत नाही ह्यांची प्रमुख कारणे अनेक असू शकतात. योग्य तो अनुभव पाठीशी नसल्यामुळे योग्य तो निर्णय आपण घेत नसतो. आपण आपल्याला नीट ओळखलेले नसते त्यामुळे गुंता निर्माण केलेला असतो. नव्या आर्थिक रचनेमध्ये व हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी जमावण्याच्या नादामुळे आपण मेटाकुटीला येऊन दु:खी होत असतो. परस्पर विरोधी वातावरणामुळे जीवन कठीण झालेले असते. आपण त्यातून योग्य तो मार्ग शोधत असतो. त्यावेळी आपल्या मनातील स्वतःचे स्वतःशी असलेले भांडण पहिल्यांदा दूर केले पाहिजे. आपले मिशन नीट निवडले पाहिजे. त्यांत आपले मन रमले पाहिजे.आपल्या आजूबाजूला अनेक प्रलोभणे असतात त्यांना बाजूला सारले पाहिजे. आपण आपल्याला कोणत्या परिस्थितीत तग धरता येईल तेच वातावरण निर्मीले पाहिजे. आपण आपल्या आवडीनिवडी आई-वडील किंवा आप्तस्वकीय ह्यांच्या मतावर आधारित केल्या असतील तर अनेक वेळा चूक होतेच. आपली आवडनिवड नं बघतां घेतलेला निर्णय फार महाग पडतो. आपण संयम आणि सतत काम करण्याची तयारी ठेवीत नसतो. त्यामुळे अपयश मागे लागते. सातत्य फार महत्वाचे असते, धरसोड वृत्तीच आपले नुकसान करते. जवळचा मार्ग शोधताना अनेक वेळा मुलभूत चुका होतात व पुढे यश मिळणे कठीण होऊन बसते.
“ मी माझ्या आयुष्यात काय करू “ ह्याचा अर्थ म्हणजे मी कोणता व्यवसाय- नोकरी-धंदा करू असा नाही तर मी माझ्या आयुष्यात आनंदी होण्यासाठी काय केले पाहिजे ह्याचाच सर्वांगीण विचार करणे व स्वतःला समजून घेणे महत्वाचे आहे. आपण काय करावे ?
·         कोणते चांगले , कोणते वाईट ह्याचा अंदाज घेणे
·         आपल्या ऊर्मी . महत्वाकांक्षा , जीवनेच्छा कोणत्या ?
·         आपला प्रवास कसा असेल ह्याची आखणी
·         आपण स्वतःला ओळखणे
·         बदल घडणे / घडवून आणणे /बदलणे
·         आपले कुटुंबीय ,आप्तस्वकीय ह्यांचा आपल्या जीवनाशी असणारा संबंध , त्यांचे महत्त्व आणि आपले कर्तव्य
·         वेळेत सर्व घडवून आणणे
आपण काय करतो हे फारसे महत्वाचे नसतं.आपण कोण आहोत हे अधिक महत्वाचे असते. आपण कसला व्यवसाय करतो , काय नोकरी करतो ह्याचाच अधिक विचार केला तर आपण आपल्याला विसरतो आणि दु’खी कष्टी होतो. ९ ते ५ नोकरी करणार्यांची मानसिकता वेगळीच असते. काहीतरी नोकरी करायची म्हणून नोकरी करायची , आवश्यक असलेला पैसा कमावणे एवढेच मर्यादित ध्येय असणारी मंडळी आनंदापासून दूर जातात. त्यांचे मन कशातच रमत नसते. आपण कसे जगतो हे त्यांनी तपासून बघितले पाहिजे. “ स्वप्नातील नोकरी “ अशी कधी नसतेच हे लक्षात असू द्यावे. Who are you is more important than what you do. हे लक्षात आले पाहिजे. तीच आनंदाची गुरुकिल्ली.

डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com   


No comments:

Post a Comment