Monday, March 18, 2013


माणूस : एक अगम्य प्राणी

आयुष्य वाहत असते – नदीसारखे. –  अखंड – नं संपणारे
आपण अनेक अडचणींना तोंड देत पुढे वाटचाल करीत असतो. यश- अपयश सामोरे येत असते. नैराश्य आणि प्रचंड आशावाद ह्यांच्या दोन टोकावर आपण झोके घेत असतो. आनंद-दुःख आशा-निराशा , ह्यांच्या हिंदोळ्यावर आपण रमतो, दमतो आणि एकाकी होतो.
माणसं जवळ येतात. आणि दुरावतात. आपली सख्खी माणसे, रक्ताची माणसे दुरावतातही . ओलावा कमी होतो. आपली गुंतवणूक( Involvement ) कमी कमी होत जाते. नवी नाती निर्माण होतात . कधी कधी ती बळकट होतात. काहीं नाती फारशी वाढतच नाहीत. आपल्याला नको असतात. ओलावा नसतो. नाती- गोती आणि ऋणानुबंध वेगळे असतात. कालचे सख्खे मित्र आज थोडेसे दुरावलेले असतात. नाळ मात्र तुटलेली नसते. आपण बदलत जातो. व्यवसायात काहीं मित्र भेटतात. पण त्यात ओलेपणा नसतो.
माणूस मोठा गमतीदार प्राणी आहे. नं कळणारा. कधी आपल्याला खूप समजला असे वाटते .पण खऱ्या अर्थाने कळलेलाच नसतो. माणूस कधी कांद्याच्या एकानंतर एक असणार्या थरासारखा असतो. काही माणसे बिन-बियाच्या द्राक्षासारखी असतात. काही माणसे संत्र्यासारखी आंबट गोड असतात. काही माणसे कलमी आंब्यासारखी गोड. तर काही खरोखरच हापूस.
माणूस जाणून घेणं फार अवघड गोष्ट. व्यवसायात माणसं वाचता येतात असा माझा थोडाफार अनुभव. बेरकी माणसं .सरळ माणसं .समोर अतिशय गोड बोलणारी माणसं .दिखाऊ माणसं . कामापुरता मामा म्हणणारी माणसं .विनाकारण जवळीक साधू पाहणारी माणसं .पहिल्याच भेटीत नकोशी वाटणारी माणसं .प्रसन्न व्यक्तिमत्वाची माणसं . आपण कधीच ज्या पद्धतीने विचार करू शकत नाही त्या वेगळ्या विचारांची दिशा देणारी माणसं. तापट माणसं. रागावणारी माणसं. क्षणात बदलणारी माणसं . खोटी माणसं. नटसम्राट माणसं . नुसताच व्यावहारिक विचार करणारी माणसं. हवीहवीशी वाटणारी प्रेमळ माणसं. हसणारी माणसं. हसवणारी माणसं. तक्रारखोर माणसं. रडकी माणसं. दु:खी माणसं. सहनशील माणसं. हतबल माणसं. खरी प्रामाणिक ,निर्मळ मनाची माणसं. मदत करणारी माणसं. अर्थ व्यवहारात फसवणारी माणसं.
व्यवसायात अर्थकारणामुळे वैतागलेले कारखानदार, स्वतःत रमलेला कवी, विचारात मग्न असलेला शास्त्रज्ञ , विद्यार्थ्यांच्या कल्याणाचा विचार करणारा शिक्षक, कामगारांच्या हितासाठीच झगडणारा कामगार नेता, बेरकी राजकारणी, समाजात बदल घडवून आणण्यासाठी तळमळणारा समाजसेवक, मुलांच्या भवितव्यासाठी मरमर झटणारा बाप, स्वतःकडे दुर्लक्ष करून मुलासाठीच जगणारी आई, संपतीसाठी एकमेकांच्या उरावर बसणारे भाऊ, मुलींच्या लग्नाच्या काळजीत असलेले आई-बाप, अशी सारी माणसे.
आपण अशी खूप माणसं पाहत असतो. जग बदलून टाकणारी माणसं पाहतो. दुभंग व्यक्तिमत्वे पाहतो.
काही माणसांशी आपले वेगळेच ऋणानुबंध जुळतात. काहीं व्यक्तींशी आपण संपर्क तोडतो. काहीजण खरेच मित्र असतात. त्यांच्याशी आपण सुख-दुख्खाच्या गोष्टी करतो. काही माणसं खूप मोठी असतात. समाजात त्यांना विशिष्ट स्थान असते. प्रतिष्ठा असते. पण ती माणसं फार छोटी असतात असे लक्षात येते. मोठे लेखक, शास्त्रज्ञ , राजकारणी ह्यांची प्रतिमा उजळ असते. पण माणूस म्हणून ती छोटी असतात. आपण जेंव्हा त्यांच्या प्रतिभा आणि प्रतीमेमुळे प्रभावित होतो तेंव्हा प्रत्यक्ष भेटीत त्यांचे छोटेपण लक्षात येते. तेंव्हा आपला भ्रमनिरास होतो. काही मोठी माणसं – त्यांच्याबद्दल आपण फारसं चांगलं ऐकलेले नसते , ती माणसं चांगली असतात. माणसामाणसांचे संबंध वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे असतात. कधी कधी त्यांचा देवाणघेवाणाशी संबंध असतो. आपल्याकडून त्यांना काहीं तरी हवे असते.आपल्याला त्यांच्याकडून काहींच अपेक्षित नसते. ती चांगली वागतात. तात्पुरती . थोडा काळ. पुनः ओळखही दाखवत नाहीत. असा हा विविध मनोप्रवृत्तीचा माणूस. त्यात आपणही असतोच. आपणही बदलत असतो. नेहमी वेगळ्या पद्धतीने,नं कळत वागत असतो.
बाप आणि मुलगा. वय वाढतं. त्यांच्यातील बोलणं कमी कमी होत जातं. मोकळेपणा कमी झालेला असतो. तणाव वाढलेला असतो.” हे आपलेच आई-वडील का? किंवा” हा आपलाच मुलगा/मुलगी का?” असे प्रश्न पडू लागतात. मित्र किंवा बायको ह्यांच्या बरोबरही असेच प्रश्न निर्माण होतात. माणसातले हे दळणवळण नं समजणारे आहे. कथा-कादंबर्यातून, चित्रपटातून  किंवा टी वी सिरीयल मधून जी पात्रें आपल्याला दिसतात त्यांच्यातही आपण माणूस शोधू लागतो.
असा हा माणसांचा शोध चालूच असतो. माणूस अगम्य प्राणी आहे. पूर्ण कधीच कळत नाही. त्यामुळेच आपल्या जगण्याला वेगळा अर्थ प्राप्त होतो. एक मात्र खरे, माणूस पारखून व्यवहार केला पाहिजे. 

Thursday, March 14, 2013

नामंजूर


कवी संदीप खरे ह्यांची ही कविता त्यांच्याच कार्यक्रमात बहुतेकांनी ऐकलेली असणार. हा तरुण कवी अगदी मोजक्या शब्दात जे काही सांगून गेला आहे ते आपल्या सगळ्यांना मनापासून पटले आहे. कारण आपण ही कविता रोजच जगतो आहोत. ही खरी वस्तुस्थिती आहे. हे आपले कविता जगणे आहे. ती आपली हतबलता आहे. आपल्याला भोवताली जे घडते आहे,दिसते आहे ते नामंजूर आहे.
वेळ पाहून खेळ मांडणे नामंजूर ..
आपण साधी भोळी माणसे. राजकारण आपल्याला समजत नाही. मध्यमवर्गीय विचारसरणी. त्यात आपण जर नितीमत्तेला विशेष महत्व देणारे असलो तर आणि Non-compromising attitude असलेला असलो तर जगताना खूप त्रास सहन करतो .शासकीय नोकरीत आणि राजकारणात अशी माणसे कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत. राजकारणावर आपण बोलतो. आपल्याला त्याचा वीट येतो.आपली मूळ प्रवृत्ती तशी नसते. आपल्याभोवती वेळ पाहून खेळ मांडणारी अगणित माणसे असतात. ज्यांना हे सहज जमते त्यांच्या स्वभावात ती लवचिकता असते.
“आपला तुपला हिशोब आहे हा सगळा ......”
हे खरंच आहे. ज्याला हा हिशोब जमला नाही त्यामुळे तो स्वतःचेच नुकसानच करून घेतो.
“मी ठरवावी दिशा वाहत्या पाण्याची .....”. किती खंबीर विचाराने हा कवी बोलतो आहे.
जी माणसे dominating personality  ची असतात त्यांनाच वाहत्या पाण्याची दिशा ठरविता येते. मी म्हणतो तीच पूर्व दिशा आणि मी म्हणतो तेच खरे असा स्वतःवर असलेला पूर्ण विश्वास असेल तर व दुसऱ्या कोणाची मते जाणून घेण्याची क्षमता नसेल तर त्यामुळे माणूस एकटा होतो. त्याला एकटेच लढावे लागते , हे त्याच्या फार उशिरा लक्षात येते.
“लपत किनारा शीड सोडणे नामंजूर ....”
एकदा घेतलेला बरा वाईट निर्णय, मग त्याकरिता वादळातील बोट सोडून जाणे ज्याला माहित असते तो खरा निश्चयी असतो.
“डोंगर बघता उंची नाही, खोली आठवते ......”
हिमालयात किंवा सह्याद्रीच्या उंच टोकावर आपल्याला फक्त खोलीचीच जाणीव होते. फक्त चढताना आपण उंचीचा विचार करीत असतो. आणि एकदा उंची गाठली की आपल्याला आपल्या मर्यादित यशाची जाणीव होते व नव्या उंचीचे टोक दिसू लागते. प्रत्यक्ष जीवनातही एका मिळालेल्या यशानंतर आपण दुसऱ्या यशासाठी धडपडत असतो. आपण “आणखी,आणखी” च्या मागे लागतो.
आणि जेंव्हा आपली मानसिक वैफल्याची अवस्था असते तेंव्हा....
“ राखण करीत बसतो येथे कंटाळा.”  आणि “ मग “कंटाळ्याचाही येतो कंटाळा”. हा कंटाळा “Killing” असतो. तो सतत येणे थांबविणे आपल्याच हातात असते. Frustration येते. आणि तेच आपल्याला गारद करते. निराशा झटकली की कंटाळा जातो. आणि कंटाळा गेला की उत्साह आनंद निर्माण करतो.त्यासाठी जगण्याची त्रिज्या सतत वाढवीत गेले पाहिजे. इतर अनेक गोष्टीत रस घेतला पाहिजे. बहुविध विषयात रस असला पाहिजे. व्यक्तिमत्व बहुविध विद्यात पारंगत असायला पाहिजे.
आपण मध्यम वर्गीय माणसे नेहमीच हजार चिंतानी डोके खाजवीत बसतो. नको त्या गोष्टीवर विनाकारण चिंता करणे हा आपला स्वभावधर्मच असतो. ही चिंता आपल्याला खात असते. निराश करते. ह्या चिंतेपासून दूर होण्यासाठी आपण आपले मन रिझवले पाहिजे. एखाद्या माणसात गुंतवून घेतले पाहिजे. हुरहूर वाटली पाहिजे. डोळ्यात मोर नाचू लागले पाहिजेत. मेघ नसतानाही किंवा विजेचा कडकडत नसतांनाही जो मोर नाचतो तो जीवनावर खरा प्रेम करणारा मोर. अशा अवस्था असण्याकरिता कोणीतरी जवळची व्यक्ती सहवासात असावयास हवी. त्या अवस्थेत मग जीवनाचा भार वाटत नाही. हळवे मन सुंदर असते. संवेदनशील मन शहाणे असते. जीवनात अत्तराचा सुगंध पसरविण्याचे आपल्याच हातात असते. आपण सौंदर्याचा पुजारक असले पहिजे. “ सुंदरतेच्या सुमनावारचे दंव चिम्बुनी घ्यावे” अशी बालकवींची कविता जगता आली पाहिजे. आपण कोणासाठी तरी आहोत आणि कोणीतरी आपल्यासाठीच आहे असे आसुसलेपण म्हणजे प्रेम. आणि त्यातच जेंव्हा आपल्याला जीवनाचा अर्थ जाणवू लागतो. तोच खरा रम्य क्षण.
आपल्याला आलेली कळ जेंव्हा आपल्या आवडत्या व्यक्तीला कळते आणि तिला वाटलेल्या प्रेमामुळे आपल्याला नकळत बरे वाटू लागते, तेंव्हा मोर नाचू लागतात. रिमझिम पावसात आपण चिंब भिजून जातो. “मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मजला उलगडले” ,अशी भाव अवस्था असते.  आपल्याला मग तो व्याप वाटत नाही. त्यामुळे कुठलाही ताप होत नाही. आपली प्रश्नांची उत्तरे शोधण्यापासून सुटका होते. असे हे आपले जगणे सुंदर होते. जगणे एक गाणे होते. “माझे जीवन गाणे गाणे” असे आपण गाऊ लागतो. जगणे ही कविता होते. अर्थात हे सारे तरुण वयात खरे असते. कविता जगणे हे फक्त संवेदनशील व्यक्तीलाच शक्य असते.   
डॉ नरेंद्र गंगाखेडकर

Saturday, March 9, 2013

पांडुरंगाचे ऐसे बोलणे ...


पांडुरंगाचे ऐसे बोलणे ...

(माझा संवाद : भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कोसलाह्या कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकराबरोबर )
तुम्ही विचाराल , ’ कोण हा पांडुरंग ?
भालचंद्र नेमाडे ह्यांच्या कोसला " ह्या कादंबरीचा नायक. मी रिकामटेकडा होतो. फुकटचा वेळ होतात्यामुळे खूप नेटाने कोसला” ही कादंबरी वाचलीवाचल्यापासून हा पांडुरंग सारखा माझ्यामागे लागला आहेमी फिरायला जातो तेंव्हा हा माझ्याबरोबर असतो. त्याच्याशी सारखा संवाद चालू असतो. तोच संवाद म्हणजे हे लेखन.
पांडुरंगमी नेमाडे सरांचा मानसपुत्र . ५० वर्षापूर्वी त्यांनी मला जन्म दिला. अधूनमधून तुमच्यासारखे वाचक मला भेटतातत्यांना मी सोडत नाहीआज तुमच्या बरोबर सुसंवाद करावयाचा आहेतर सांगा चांगली कलाकृती म्हणजे काय चांगले पुस्तक कोणते?
मला प्रश्नच पडला.
मी : जी कलाकृती पाहिल्यावर घरी घेऊन जावीशी वाटते ती सुंदर कलाकृती असे विजय तेंडूलकर म्हणाले होते आणि पुस्तक म्हणाल तर पुस्तकाच्या दुकानात पुस्तके चाळताना आपण पाने चाळीत जातोत्यातील काही पाने आवडू लागतात. आपण आणखी काही पाने चाळून पाहतोतीही आवडू लागतात मग आपण ते पुस्तक विकत घेतो. आणि बहुधा ते चांगले निघते. माझा तसा अनुभव आहे.

पांडुरंग : कादंबरी लिहावी तर अशी. इतकी जाड आणि तितकीच पोकळ. कोसला ,पृष्ठ १९४)
मी: अगदी बरोबर. "हिंदू" बघा. ६०० पानांची. ही कादंबरी तशी पोकळच. तरीही नेमाड्याना ३० वर्षे लागली लिहायलात्यात विशेष काही सापडले नाहीपाल्हाळखरीदेशीपण नाही. नेमाडे ‘ देशी देशी’ करतात म्हणून .
पांडुरंगथोडेसे खरे बोललातमी म्हणालो होतो , " कादंबरी वाचायला मनुष्य एकतर बेकार पाहिजेकिंवा एकतर फार चिकाटीचा पाहिजे " ( कोसला , पृष्ठ २००)
मी : खरे आहे. मी सध्या अर्धा निवृत्त आहेफुकटचा वेळही आहे .धंदा बंद करतो आहेवाचनाची वाईट सवय आहेवाचत असतो. माझा छंद आहेमध्ये सोडून दिला होता. खरे म्हणजे वेळच मिळत नसेमोठ्ठाली पुस्तके वाचायला. एवढे नावाजलेले लेखकत्यामुळे गेल्या महिनाभरात "कोसला"आणि "हिंदूदोन्ही अगदी चिकाटीने वाचल्याम्हणुन तर आपली भेट झाली.
पांडुरंगबरे झाले. आपली भेट झालीकशी काय वाटली माझी पुण्याच्या कॉलेजमध्ये केलेली भंकसगिरीतसे म्हणजे भंकसगिरीवरच ‘कोसला’ ही कादंबरी लिहिली आहे.
मी: नेमाडे एवढे भंपक असतील असे वाटले नव्हतेमला ह्या भंकसगिरीचा वैताग आला.
पांडुरंग: आपणच गाढवनेमलेली पुस्तकं भंपक असेनात काही पुस्तके पाहिल्याबरोबर कंटाळा यायचाहे खरे आहे .पण लेखकाबद्दल प्रेम वाटले पाहिजे असे कुठे आहे? मराठीत आणि इंग्रजीत सगळी पुस्तके आम्हाला आवडतील अशी कुठून असायला गाढव. गाढव. गाढव. कोसला, पृष्ठ १९६)
मीमला वाटायला लागलं की मी खरोखरच गाढवनेमाड्यांची ही दोन्ही पुस्तके वाचायला घेतली आणी चिकाटीने वाचून काढलीखरच कंटाळा आलाअगदी कंटाळ्याचाही कंटाळा आला. मी वाचणारा गाढवगाढवआता लेखकाबद्दल प्रेम म्हणशील तर ते मात्र आहेनेमाड्यांचे विद्यार्थी त्यांचे खूप कौतुक करतातते इंग्रजी फार सुंदर शिकवतात असे ऐकले होते.
मला ही लेखक मंडळी खूप आवडतातविजय तेंडूलकर, चि .त्र्यं .खानोलकर,श्री.ना., तरुणपणी फडकेखांडेकरअत्रे , पु.., वा.., .., .पु,, श्री.पु., गो.पु., विंदा, कवी अनिल, कुसुमावती, इंदिरा संत ,विभावरी, जुने राम गणेश गडकरीखाडिलकर, य .दि., ग.दि., व दि.आणि हिंदूहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर सुद्धा. तसे नेमाडे शिक्षक म्हणून एकदम ग्रेट.
पांडुरंग: फडके - खांडेकर ?
मी : अरे , त्या ना सी फडक्यांनी पुण्यातल्या लोकांना प्रेम करायला शिकवले. सौंदर्याचा आस्वाद घ्यायला शिकवले. वि स खांडेकर मात्र खरे शाळा मास्तर. सुविचार दिले त्यांनी. " ध्येय म्हणजे पंख विना पाखरू", " यशाचे सुमधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांचा चंद्र तेजस्वी ठेवला पाहिजे." ध्येयवादी झालो आम्ही. आमचे शिक्षक मलाच फळ्यावर सुविचार लिहिण्यास सांगत असत. मी त्यामुळे खांडेकर वाचीत असे. 
नेमाड्यांचे हे कादंबरी लेखन. हे तर काय कोणीही लिहीनत्यात विशेष ते काय.कशाला लिहिली ही ६०० पानांची कादंबरी. बहुधा कागदाचा ताव स्वस्त मिळत असावा.
पांडुरंग: हे काय राव? तुम्ही माझीच वाक्ये बोलतातमाझा बराच परिणाम झालेला दिसतोय.
मी : अरे पांडुरंग मी तर लेखकाला मूर्खमूर्ख असे तर म्हणत नाहीतू किती वेळा किती जणांना मूर्ख म्हणालास. गाढव ही म्हणाला. मी मोजणेच सोडून दिले.
पांडुरंग कादंबरी वाचणे बंद केले पाहिजेवाट्टेल ते छापतात साले ! कोसला - डायरीची पाने, पृष्ठ १८१-१९७)
मी: मला ही  कोसला  वाचताना असेच वाटलेतसेच 'हिंदूम्हणजे नेमाड्यांचे मुक्त चिंतनह्या लेखकांच्या मनात काय वाट्टेल ते येतेतेच तर लिहून काढतातमी ही असे लिहून काढू शकतोपण ती 'प्रतिभा' आमच्यात आहे कुठे ? चला, एकदा ते 'प्रतिभा साधनवाचून बघतोएकदा मी मनात जे आले,ते लिहिले. बायकोने चुकून वाचले. 'डोकं बिघडल का?'  म्हणाली. सगळे कागद फाडून टाकले.
पांडुरंग: कविता म्हणजे काय हो ?
मी मान हलवली. त्याला वाटले मला काहीच कळत नसावे.
पांडुरंग: आता तुम्ही म्हणा कविता हे काय? इतराप्रमाणे लांब ओळी न लिहिता आखूड ओळीतून मांडलेली अक्षरे तीच कविता....पण हे उपदव्याप फारच थोडे लोक करीत. कारण एवढा वेळ कोणाला असतो ?  म्हणून शंभरातून एखादाही कवीचा उद्योग करीत नसे...... (पृष्ठ १३९)
मी : काय रे पांडुरंगकेशवसुत, गोविंदाग्रज, विंदा, मंगेश पाडगावकर ,बापटना .धो.महानोरआरती प्रभूअनिलहे सारे कवी रिकामटेकडे होते काकवितेच्या उद्योगातून त्यांना फारशी धनप्राप्ती झाली नाहीपरंतु त्यातील विंदा आणि कुसुमाग्रजांना मात्र ज्ञानपीठ पुरस्कार मिळालापाडगावकर तर "महाराष्ट्र भूषण ही झालेह्या कवीच्या नावाने सरकार 'मराठी दिवस'ही मोठ्या थाटात साजरा करतेतू काय हा अपमान करतोस, ह्या थोर कवींचा?
पांडुरंगतसे नाही. लायब्ररीत सगळा मराठी सेक्शन वाचला होता.
मी : ग्रेट
पांडुरंग: काही पुस्तकं अर्थात तशीच होती. म्हणून नुसती चाळली .पण प्रा.गुण्यानी ५० प्रसिद्ध व थोर पुस्तकांची यादी दिली होती. त्यातली ३० मी अगोदरच वाचली होतीबाकीची २० पुस्तकेही वाचली. गुणे 'शाब्बास म्हणाले.
मी:  छान. छान पांडुरंगतुझे वाचन दांडगेच आहेम्हणजे तुझ्या मानसपित्याने ही सारी पुस्तके वाचलेली असणारनाहीतर, हल्ली मराठी लेखक दुसर्या मराठी लेखकाचे काहीच वाचत नसतातफुकटचा वेळ नसतोइंग्रजी लेखक आवर्जून वाचतातत्याचा उपयोग होतो. लिहिण्यासाठी. 
पांडुरंग: साहित्यिक इतर सामान्य जनाहून थोर असतात.
मी: खरेच आहेपण खर सांगू का.हे मोठे मोठे साहित्यिक फार छोटी छोटी माणसे असतातआपल्याला वाटते ते खूप मोठे आहेततसे नसते.
पांडुरंग: अरे, हे लेखन म्हणजे " फुकट मेंदूत भंपक विचार "
मी: किती स्पष्ट बोलतोस रे पांडुरंगा मला ही तसेच वाटले,कोसलाआणि “ हिंदू वाचून.
पांडुरंग: प्रा गुणे मूर्ख आहेत. गोविंदा गाढव आहे.... (पृष्ठ १६४)
मी: काय रे पांडुरंगते एवढे मोठे मराठीचे प्राध्यापक आणि त्यांचा तो पीएच. डी. करणारा विद्यार्थी गाढवमग तूच कसा शहाणाहोतू तर नेमाड्यांचा मानसपुत्रत्यामुळे तू खरा शहाणा. विसरलोच मीतुझी ती नेमाडपंथी मंडळी ,सारेच शहाणे.
पांडुरंग: अरे तू तुकाराम वाचलास का ?
मी: अरे, किती सोपा आणि साधा. तुझे वडील तर वारकरी. 
पांडुरंगहो वाचला होता . ते ... तुझं बोलणं तुकारामाच्या भंपक मेणाहुनी मऊ ... वगैरे ( पृष्ठ २९)
मी : अरे तुझे एवढे वाचन झाले आहेतुकारामाचे अभंग तुला भंपक वाटतातपण खरे सांगू का नेमाड्यांचे हे लिखाणच फार भंपक आहेउगाच तुकारामापासून विन्दापर्यंत सर्वांच्यावर णसणाटी लिहितात.
पांडुरंग: चर्चा करावी ती डॉ गुणे ह्यांच्या बरोबरगुणे एकदा म्हणाले," कवी हा पिंडानेच लहरी माणूस. तो विंदा जरा स्त्रीचे नाव वाटते ,लोकांना सध्या कविता वाचण्याची गोडी प्राप्त करून द्यावी हे अशा नावाने साधतेआता पहा आरती ,ग्रेससरला....अशी नावें वाचून लोक कविता वाचतात. (पृष्ठ १५२)
मी : अगदी बरोबरम्हणूनच पर्वा कुसुमाग्रजांच्या नावाचा पुरस्कार घेताना नेमाडे म्हणाले, " आता कादंबरी पुरेमी कविताच करणारतसा मी मोठा कवी आहेमी कविता केल्या होत्या. खरेंचं. नेमाडे, आधी स्त्रीलिंगी नांव शोधा ज्ञानपीठ पुरस्कार तुमचाचतसा कविता करण्याचा उद्योग चांगला आहेतुम्ही तसे लहरीही आहात, असे वाटते. कारण कवीला तसे असावे लागते, असे तुमचा पांडुरंग म्हणाला होता. प्रा. गुणेही तसेच म्हणाले होते. 
पांडुरंग: आता थोडे लघुकथेसंबंधी ,गुणे सर म्हणाले, " गंगाधर गाडगीळ मराठीतले थोर लघुकथाकार ... इंग्रजी कथाकारांच्या तोडीचे .....
मी : पांडुरंगनेमाडे कधी कधी तुझ्यात प्रवेश करतात तर कधी कधी ते प्राडॉ .गुणे होतात.
पांडुरंग: ..... अगोदरच लघुकथा हा क्षुद्र साहित्य प्रकार आहे. लघुकथा म्हणजे फसलेली गोष्ट. लघुकथा म्हणजे मासिक चालविणारे लिखाण. लघुकथा नसल्यातर कोण वाचेल मासिक.
डॉ. गुणे म्हणाले होते “ असे नाही पांडुरंगलघुकथेत जी तीव्रताजी सूक्ष्मता असते ती दुसर्या कशात नसते”. तेंव्हा मी म्हणालो  लघुकथा म्हणजे मासिक चालविणारे लिखाण ..... ह्या पलीकडे विशेष कांही नाही.... 
पांडुरंग: लघुकथा नसल्यावर मासिक कोण वाचेल?
मी : आता तर मासिकेच बंद पडलीतकाहीजण कादंबरीही छापत होते मासिकातून. मी त्या सुभाष भेंड्यांची अदेशी” कादंबरी वाचली होती. आठवते. चांगली होती. लघुकथा ही फसलेली गोष्ट असते हे माहीत नव्हते, आम्हाला ते पाच लघुकथाकारांचे पुस्तक होते. वामन चोरघडे, अरविंद गोखले वगैरे. चांगले कथाकार होते. त्यामुळे थोडी आवड निर्माण झाली होती. आता फक्त दिवाळी अंक हातात पडला आणि गोष्ट लघु असली तर वाचत असतो. आपल्याला फुकटचा वेळ नसतो. काय करणार. उगीच फसलेल्या गोष्टी कोण वाचणार?
कथा हा क्षुद्र प्रकार असल्यामुळेच नेमाड्यांनी लघुकथेला हा घातला नसावा. मला निश्चित माहीत नाही. त्यांची कथा असलेले मासिक मी पाहिले नाही. पण त्यांच्या कादंबरीतही चांगल्या लघुकथेत असणारी तीव्रतासूक्ष्मता दिसून आली नाहीबहुधा त्यांच्या कवितेत दिसेल.
पांडुरंग: आता थोडे विडंबण कवितेसंबंधी....... .
"एक मुतारी देईन आणून फुंकिल जी ....."
"उंदीर ओल्या पिपात मेले ......"
मी: छान छान ! केशवसुत, मर्ढेकर ह्यांच्या ह्या कविता दिसतात . ते केशवकुमार म्हणजे आचार्य अत्रे. त्यांची आठवण झाली. परंतु केशवकुमारासारखं लिहायला पाहिजे. काय भन्नाट माणूस होता. नेमाड्याना चांगले जमेल. त्यांना सार्या लेखक,कवींची व्यंगे माहीत आहेत. त्यांना टवाळी ही चांगली करता येते.  
पांडुरंग: ज्ञानेश्वरांच्या मनाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल.....कारण, ज्ञानेश्वरीत कवीचे मन नाही.
मी : बरोबर आहेज्ञानेश्वरांनी कविताही लिहिल्या त्यांची गाणी झाली. लता मंगेशकरांनी किती छान सादर केल्या त्या कविता नव्हे गाणी, आपल्याला त्यामुळे ज्ञानेश्वरांचे मन थोडेसे तरी कळले. मी काही ज्ञानेश्वरी वाचली नाही. मला ती प्राकृत भाषा समजत नाही. बी.ए. , एम.ए. ला ज्ञानेश्वरी असते. मी मराठी बारावीलाच सोडले. तुकाराम, रामदास तेवढे चांगले समजतात. 
पांडुरंग: कवितेत मानवी मनाचे सूक्ष्मात सूक्ष्म तरंग असतात .
मी: फार छानएकदम पदार्थ विज्ञानसूक्ष्म म्हणजे बारिकाहून बारीक कण तरंग म्हणजे व्वेव्ह. वलय.
एकदा कण तर एकदा तरंग दोन्ही एकाच वेळीGod Particle. पांडुरंग एकाच वेळी दोन रूपेकिती छान संकल्पनाDual Nature. ड्यूअल नेचर .कवी , कादंबरीकार असाच असतो. त्याची कितीतरी रूपे असतात. कधी पांडुरंग. कधी डॉ गुणे. त्यांचे मन सारखे बदलत असते. शास्त्रज्ञ मात्र तसे नसतात. त्यांना मन नसते. ते तरंगकण ह्यांचाच शोध घेतात. पण, ह्या एकाच वाक्यात जिंकले नेमाडे सरानी. सुंदर. असं सुंदर लिहित रहाकंटाळा येणार नाही माझ्यासारख्या वाचणाऱ्याला.
पांडुरंगज्ञानेश्वरीत मन नाही
मी: ज्ञानदेवांनी, विनोबांनी गीतेचा साधा, सरळ, सोपा अर्थ समजावून सांगितला. त्यात मन आहे ते श्रीकृष्णअर्जुनाचे. आपले मन कसे असेल. आपण साधी माणसे. शरीर थकते म्हणून मनही थकते.पैसा कमवायचा ,म्हणजे काम करायचे. आपण कष्टाळू माणसे. मन घरी ठेऊन कामावर जातो. आपल्याला कुठे असते मन. ज्ञानेश्वरांचे मन कसे शोधणार? एवढा फुकटचा वेळ आहे कुणाला?
पांडुरंगजाऊ द्या. टिळकांनी इतकी वर्षे कैदेत राहून काय लिहीलं तर गीतारहस्यहे पुस्तक वाचू वाचू म्हणता एक वर्ष लागलं .हे म्हातारपणात वाचायचं ,हे मात्र खरे नाहीपण इतकी वर्षे तुरुंगात टिळकांनी काय लिहिलं तर  गीतारहस्य .तर आगरकरांनी शेक्स्पीअरचे नाटक भाषांतरीत केलं. विकारविलसित”.तुम्ही गीतारहस्य वाचलं नसेल पण विकारविलसित वाचले असेल म्हणून तुलना केली...... ( पृष्ठ ४०)
मी: नेमाडे सरतुमचा खूप वाचन करणारा हा पांडुरंग आणि त्याचे प्राडॉ  गुणे दोघेही फारच भंकस चर्चा करतातम्हणजे तुम्ही त्या लिहितात कारण तुमच्या मेंदूत त्या शिरलेल्या असतातटिळक गीतारहस्य लिहिण्यासाठी मंडालेच्या तुरुंगात गेले नव्हतेइंग्रजांशी भांडले म्हणून इंग्रजांनी त्यांना ही शिक्षा केली. गीतारहस्य त्यांनी पुण्यात बसूनही लिहिले असतेकेसरी-मराठा नव्हते कां चालवतमला असे वाटते की तुम्हाला इंदिरा गांधीनी आणीबाणीत तुरुंगात घातले असते तर तुम्ही हिंदू सहा महिन्यात लिहून काढली असती३० वर्षे लागली नसतीआगरकरांचे म्हणाल तर त्यांना इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा फार चांगल्या येत होत्या. त्यांनी अगदी सहज शेक्सपिअरच्या नाटकाचे भाषांतर केलं असणार. जाऊ द्या. तुम्ही असेच लिहीत राहा. आम्हाला फुकटचा वेळ मिळाला की आम्ही वाचत जाऊ. तसे आम्ही रिकामटेकडे.
अधिक सकस लिखाणासाठी मनापासून शुभेच्छा.
(संवादात पांडुरंगाची वाक्ये कोसलाकादंबरीतून घेतली आहेत. माझी प्रतिक्रिया पांडुरंगाची भाषा अवगत झाल्यामुळे तशीच झाली आहे. तो पांडुरंगाचा माझ्यावर पडलेला प्रभाव आहे. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व.)
डॉ नरेंद्र गंगाखेडकर