इंडियन नॅशनल थिएटर, रंगायन, आविष्कार, पुण्याचे पीडीए यांच्यापेक्षा दुबेचें 'थिएटर युनिट' अधिक प्रसिद्ध होते. मला आठवतो तो १९६८चा सत्यदेव दुबे दिग्दर्शित 'आधे अधुरे' हा प्रयोग. मोहन राकेश हे नाटककार त्या नाटकामुळे खूप गाजले. अमरीश पुरी, ज्योत्स्ना कार्येकर, भक्ती बर्वे, दीपा बसरूर आणि अमोल पालेकर हे कलाकार त्या नाटकात होते. अमरीश पुरी ह्या कलाकाराची भूमिका मला 'अप्रतिम नाट्याभिनय' म्हणून आजही आठवते. अमोल पालेकर यांचे बादल सरकार यांच्या 'पगला घोडा' तील काम मला आजही आठवते. १९७०चा तो प्रयोग उल्लेखनीय होता. अमोल पालेकर नंतर दिग्दर्शक म्हणून नावाजला तो मोहन राकेश आणि बादल सरकार यांच्या नाटकांच्या मुळे. १९७६मध्ये अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेले उल्लेखनीय नाटक होतं महेश एलकुंचवार यांचे 'पार्टी' हे नाटक. महेश एलकुंचवार हे माझे आवडते नाटककार. विजय तेंडुलकर ह्या ख्यातनाम नाटककाराची नंतर माझी छान ओळख झाली. पार्ल्याच्या माझ्या कार्यालयात ते अनेकदा आले. मी ही त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारल्या. नागपूरला मी गेलो होतो तेंव्हा महेश एलकुंचवार यांना मुद्दाम भेटलो होतो. त्यांच्याशी गप्पा मारल्या होत्या. चि त्र्यं खानोलकर यांचे 'अवध्य' हे सुंदर नाटक. पण आरती प्रभूंच्या हळूवार कविता मला अधिक आवडत असत. तेजपाल मध्ये 'अवध्य'च्या प्रयोगाला त्यांना जवळून बघितलं. छबिलदास मध्ये त्यांना काही वेळा बघितल्याचे आठवते.
डॉ. लागू यांची प्रमुख भूमिका असलेलं 'काचेचा चंद्र' हे नाटक शिवाजी मंदिर मध्ये बघितल़ेलं आठवतं. व्यावसायिक रंगभूमीवर गाजलेलं ते प्रायोगिक वळणाचं नाटक.
अमोल पालेकर हा नट, दिग्दर्शक म्हणून गाजत होता तो प्रायोगिक रंगभूमीवर. तेंडुलकर, खानोलकर, गिरीश कर्नाड, सई परांजपे हे नाटककार, डॉ लागू, अरविंद आणि सुलभा देशपांडे, दीना पाठक, तरला मेहता, पर्ल पदमसी या कलाकारांच्या सहवासात तो समांतर चळवळीत पुढे आला आणि चमकला. ,'ऐवज' मध्ये त्याने ह्या सर्वांच्या बद्दल खूप मनमोकळेपणाने लिहिले आहे.
रंगभूमीवर काम करणारा अमोल पालेकर रुपेरी पडद्यावर गाजू लागला तो त्याच्या साध्या दिसण्यामुळे. 'बॉय नेक्स्ट डोअर' असणारा हा साधा, लोभस, अडखळणारा मुलगा चित्रपट जगतात गाजू लागला. १९७८-७९ मध्ये त्यांचे रजनीगंधा, छोटीसी बात, चित्तचोर हे चित्रपट हिट झाले. १९९०मध्ये संध्या गोखले ही चुणचुणीत मुलगी त्याच्या आयुष्यात आली. वकीली करणारी ही मुलगी त्याच्या आयुष्यात आली. त्यावेळी तो चित्रपट दिग्दर्शित करीत होता. 'कैरी' ची कथा तिला आवडली होती. तो दिग्दर्शक झाला तेंव्हा तिने त्याला एक वकीली सल्ला दिला होता तो असा.' दिग्दर्शक म्हणून काम स्वीकारताना एकतर्फी अटी मान्य करू नका'. अमोल पालेकर तिच्यात भावनिक गूंतत गेला आणि एक दिवस संध्याने चित्राची जागा घेतली. हे 'ऐवज' मध्ये त्याने विस्ताराने लिहिले आहे.
चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या पुस्तकात फार छान लिहिले आहे. नाटककार आकृती देतो, दिग्दर्शक प्रकृती देतो, नट कृती देतो, तंत्रज्ञ अलंकृती देतो, तेंव्हा प्रेक्षक स्वीकृती देतो. अमोल पालेकर हा एक यशस्वी नट आणि दिग्दर्शक. त्याला प्रेक्षकांनी स्वीकृती तर दिली. 'आक्रीत' त्याने दिग्दर्शित केला. तो यशस्वी झाला. त्याची पटकथा लिहिली होती विजय तेंडुलकर यांनी . मानवत खून खटल्यावर अमोल पालेकर यांनी चित्रपट काढला. ती पटकथा लिहिली होती तेंडुलकर यांनी. दुबे यांच्यामुळेच अमोल पालेकर पुढे आला. दुबे मुळेच त्याची ओळख झाली मराठी नाटककार तेंडुलकर, खानोलकर आणि चेतन दातार यांच्याशी. अमरीश पुरी हा कलाकार शोधून काढला होता तो दुबेनीच. अमोल पालेकरला नट बनविले ते सत्यदेव दुबे हयानीच. 'Boy next door',असलेला अमोल पालेकर मधील नट शोधला तो दुबेंनीच. सत्यदेव दुबे जेव्हा अंथरुणावर खिळून पडले होते तेंव्हा त्यांना भेटायला अमोल पालेकर गेला होता, तेंव्हा तो त्यांना म्हणाला, 'मी तुझ्या ऋणातून मुक्त होऊ शकणार नाही दुबे' .
अशा अमोल पालेकर यांचे आत्मचरित्रात्मक असलेलं 'ऐवज' हे पुस्तक वाचनीय तर आहेच. ते मराठी प्रायोगिक रंगभूमी व चित्रपट याचा इतिहास आहे. या पुस्तकाचे कुशल संपादन झाले असते व पुस्तकाची पृष्ठसंख्या कमी झाली असती तर ते अधिक वाचनीय झाले असते, असे मला वाटते. मी एकाच बैठकीत ते वाचू शकलो नाही. मला हे पुस्तक वाचायला ८-१० दिवस लागले.
*****
No comments:
Post a Comment