Thursday, October 3, 2024

Crossing to Talikota: Girish Karnad

विजयनगरचे साम्राज्य 

गिरीश कर्नाड यांचे खिळवून ठेवणारे इंग्रजी नाटक “Crossing to Talikota” – हे पुस्तक हाती पडले आणि एका दमात वाचून काढले. माझा नातू पार्थ कुलकर्णी याने ते पुस्तक वाचायला दिले. “ आजोबा, तुम्हाला हे नाटक आवडेल. मी त्या नाटकाचा प्रयोग नुकताच पाहिला आहे. मला तो आवडला म्हणून मी हे पुस्तक विकत घेतले. तुम्हाला आवडेल. अवश्य वाचा.”, असे त्याने जोरात संगितले व पुस्तक देऊन गेला. मी पूर्वी त्याच्याशी बोलतांना विजय तेंडुलकर आणि गिरीश कर्नाड यांच्या नाटकासंबंधी  अनेकदा बोललो होतो. ते त्याच्या लक्षात असावे. मागच्या वर्षीच तो इंग्लंड मध्ये LSE ला शिक्षणासाठी गेला होता तेव्हा त्याने  तेथून जवळच असलेल्या नाट्यगृहातील अनेक नाटके पाहिली होती. त्यामुळे त्याची नाट्यजगताची जाण खूप वाढली होती. त्याने त्यामुळे हे नाट्य पुस्तक वाचायला दिले.

गिरीश कर्नाड हे माझे आवडते नाटककार. हयवदन हे त्यांचे गाजलेले नाटक मी पाहिले होते. मुंबईच्या प्रयोगिक रंगभूमीवर तेंडुलकर आणि कर्नाड यांची नाटके खूप गाजत होती. त्यावेळी तेंडुलकर-कर्नाड या दोन नाटककारांनी  राष्ट्रीय नाट्यक्षेत्रात एक क्रांती घडवून आणली होती.

धारवाडच्या विद्यापीठातून कर्नाड हे गणित विषयात पदवीधर झाले. त्यांना Rhodes Scholarship मिळाली व ते Oxford ला पदव्युत्तर शिक्षणासाठी गेले. तत्वज्ञान, अर्थशास्त्र व राजकारण हे त्यांचे आवडते विषय. ते पुढे जर नाटककार झाले नसते तर एक गणितज्ञ किंवा अर्थशात्रज्ञ झाले असते. त्यांना त्याचवेळी होमी भाभा शिष्यवृत्ती मिळाली व त्याच वेळी त्यांनी प्रकल्प संशोधनासाठी हयवदन हे नाटक लिहून काढले. ते प्रसिद्ध नाटककार म्हणून कन्नड रंगभूमीवर गाजू लागले. ते नुसते नाटककार नव्हते तर चांगले नट होते. ते प्रसिद्ध चित्रपट निर्माते होते. त्यांनी कानडी भाषेला व रंगभूमीला समृद्ध केले. त्याचमुळे Film and Television Institute of India आणि संगीत नाटक अकादमी या संस्था त्यांच्या अधिकाराखाली आल्या व त्यांनी आपला राष्ट्रीय ठसा उमटविला. लंडनच्या भारतीय वकिलातीच्या नेहरू सेंटर मधील त्यांचे कार्य लक्षवेधी होते. अमेरिकेतील शिकागो विद्यापीठात ते नाट्यशास्त्राचे प्राध्यापक होते. त्याच वेळी नागमंडल हे त्यांचे नाटक खूप प्रसिद्ध झाले. त्या नाटकाच सुंदर प्रयोग मी मुंबईत पाहिला होता. The Dream of Tipu Sultan  हे नाटक ही खूप गाजले.

तालिकोटाची लढाई म्हणजे विजयनगरचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी यवनांनी केलेले महायुद्ध. ज्यांनी हम्पी बघितले आहे त्यांना ह्या युद्धाची कल्पना येईल. कृष्णदेवरायाच्या काळात हम्पी ही विजयनगरची राजधानी होती. आज आपण हम्पीला भेट देतो तेंव्हा आपल्याला कल्पना येते की विजयनगरची राजधानी असलेले हे शहर खूप सुंदर शहर होते. चालुक्क्यांनी दक्षिण भारतात आपले प्रस्थ निर्माण केले होते. विजयनगरचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे यवनांनी रचले होते. आदिलशाही, कुतुबशाही व निझामशाहीच्या राज्यकर्त्यांनी विजयनगरचे साम्राज्य धुळीला मिळवण्यासाठी एकी केली होती. त्यासाठीच तालिकोटाची लढाई झाली. ह्यावर लिहिलेले हे नाटक. तसं हे नाटकाचे पुस्तक ७६ पानाचे आहे. कर्नाड यांनी हे अतिशय सोप्या व सुंदर भाषेत लिहिलेले नाटक वाचतांना आपण विजयनगरचे साम्राज्य यवनांनी कसे धुळीस मिळविले हे समजून घेतो.

नाटक बघणे आणि वाचणे यात खूप फरक आहे. मी हे पुस्तक वाचायला घेतलं आणि समोर हम्पीचा तो परिसर आठवू लागलो. मी हम्पीला दोन वेळा भेट दिली असल्यामुळे मला विजयनगरच्या साम्राज्याची व त्या इतिहासाची थोडीशी माहिती आहे. हे पुस्तक वाचत गेलो आणि हे नाट्यवाचन  करीत असताना त्या काळात रमत गेलो. ते एक युद्धं होते व त्या काळातील विजयनगरची लढाई कशी झाली असेल व हम्पी आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर त्या वेळी कसा असेल? तो उज्वल इतिहास कसा नष्ट झाला असेल हे चित्र समोर उभे रहात होते. आज हम्पीचे जे अवशेष दिसतात त्यावरुन त्या सुंदर राजधानी असलेल्या शहराची कल्पना येते. मन उद्विग्न होते व विजयनगरच्या त्या काळातील वैभवाची कल्पना येते.

गिरीष कर्नाड यांनी नाटकातील संवादातून उभे केलेले चित्र त्यावेळच्या राजकारणाची माहिती देत असते व ती व्यक्तिचित्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.

विजापूरचा अली आदिल शहा, अहमदनगरचा हुसेन निझाम शहा, बिदरचा अली बरीद शहा आणि गोलकोंड्याचा इब्राहीम कुतुबशहा या चार यवनी सत्ता एकत्र येवून विजयनगरचे साम्राज्य कसे उद्ध्वस्त करतात आणि विजयनगरचा आलिया रामराया कसा मारला जातो हे दृश्य डोळ्यासमोर उभे राहते. त्यावेळी सेनापति असलेले वेंकटाद्री आणि तिरूमला राया हे राजाचे धाकटे बंधू युद्ध कसे हरतात ते दिसून येते. मुख्य म्हणजे विजयनगरचा सम्राट सदाशिव राया हा एक काठपुतळी राजा (पपेट सम्राट) असतो. रामरायाची आई तिरूमलांबा आणि पत्नी सत्यभामा ह्या दोघी स्त्रिया त्यावेळच्या राजकारणात प्रमुख भूमिका बजावताना दिसतात. यवनी सत्तेतही हुसेन निझाम शहाची पत्नी बेगम हुमायून सुलताना ही राजकारणात तरबेज असते व प्रमुख भूमिका बजावत असते. ह्या नाटकात वरील पात्रामध्ये होणारे संवाद आपल्याला त्यावेळच्या युद्ध परिस्थितीची ओळख करून देतात. कर्नाड यांनी या पात्रांच्या होणार्‍या संवादातून आपल्यापुढे त्यावेळचे युद्ध उभे केले आहे. त्यात त्यांचे यश दिसून येते. चित्रपटात तसे करणे सहज शक्य असते. रंगभूमीवर युद्ध कसे सादर करणार ?

ह्या नाटकातील संवाद लक्षवेधी तर आहेतच. या संवादातूनच आपणास त्यावेळच्या यवनी सत्तेची कारस्थाने आणि हिंदू राजांच्या मनोवृत्तीचे दर्शन होत जाते. तेथे कर्नाड यशस्वी झाले आहेत.

ह्या नाटकाचा पहिला प्रवेश थोडासा कंटाळवाणा वाटतो व नाटक पुढे  वाचावे की नाही असा प्रश्न मला पडला. ह्या प्रवेशात आपणा समोर येतात ते दोन शिपाई आणि युद्धमुळे गर्भगळीत झालेले दोन सामान्य लोक. त्याच वेळी घरात लपून बसलेली एक स्त्री रणरागिणी होते व त्या दोन शिपायांचे मुंडके उडविते.

विजापूरच्या अली आदिल शहाला हिंदू राजांच्या बरोबर युद्ध नको असते. व तो प्रत्यक्ष युद्धात भाग ही घेत नाही. शेवटी नाईलाजाने अहमद नगरच्या निझाम शहा, बिदरचा बरीद शहा व गोळकोंड्याचा कुतुबशहा यांच्या युतीत तो सामील होतो. विजयनगरच्या राम रायाची विजापूरच्या अली आदिल शहा बरोबर चांगली मैत्री असते. राम रायाला फारसे अधिकार नसतात. कारण तो विजयनगरचा वंशज नसतो. ती एक शोकांतिका असते.

तिरूमला राया आणि सत्यभामा यांच्यातील संवाद विजयनगरच्या राजघराण्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करतात. सदाशिव राया हा पपेट सम्राट असतो तर राम राया वंशज नसल्यामुळे राजा होऊ शकत नाही. सत्यभामा ही वंशज असली तरी मुलगी असल्यामुळे राज सिंहासनावर हक्क सांगू शकत नाही व तिचा नवरा राम राया राजा होऊ शकत नाही. आदिल शहा व राम राया यांच्यातील संवाद अनेक गोषतीचा उलगडा करतात पण सत्यभामाला राजकारणाची जी जाण आहे ती राम रायाला नाही. ती त्याला पटवून देण्यात मात्र यशस्वी होते. अहमदनगरच्या निझामाची बेगम ही सूदधा राजकारणात  पारंगत असते. पण निझाम शहा तिच्या शब्दाला किंमत देत नाही. स्त्रियांना राजकारणातील काय कळते ? असा त्याचा विचार असतो. असे असून सूदधा विजापूरच्या अली आदिल शहाला जवळ करण्यासाठी निझाम शहाची बेगम आपली मुलगी चांदबिबी हिला आदिल शहा ला देण्याचा विचार मांडते व तिची खेळी यशस्वी होते व आदिल शहा हा शहा गटात सामील होतो. ती राजकीय खेळी यशस्वी होते.

एका प्रवेशात राम राया, वेंकटाद्री आणि तिरूमला राया यांची बोलणी चालू असतात. तो संवाद कृष्णदेव रायाच्या शत्रूंची माहिती देत असतो. परंतु राजाने राम रायालाच कसे दू:खी केले याची चर्चा करतो. चालुक्य युगात बदल घडवून आणण्यासाठी राम राया त्याच्या हालचाली सुरू करून स्वता:कडे साम्राज्याच्या किल्ल्या कशा राहतील याचीच कारस्थाने करताना  

दिसतो. एका प्रवेशात बरीद शहा, निझाम शहा, आदिल शहा आणि कुतुब शहा यांच्यातील संवाद खूप महत्वाचे आहेत. तेथेच विजयनगरच्या साम्राज्याला खाली खेचण्यासाठी युद्धनीती तयार होते. हा नाट्यप्रवेश अतिशय महत्वाचा आहे. राजकारणाची कूटनीती कशी असते वा असावी हे आपल्यासमोर येते.

आदिल शहा कॅम्प व निझाम शहा कॅम्प मध्ये काय ठरते हे संवडातून उभे करताना विजय नगरचे साम्राज्य लवकरच नष्ट होणार याची जाणीव आपल्याला होते. नाटककाराने हे चांगले उभे केले आहे.

शेवटच्या प्रवेशात रूमी खान राम रायाचे मुंडके कसे उडवितो व विजयनगरचे साम्राज्य यवनाच्याकडे कसे जाते हे चित्रित केले आहे.

विजयनगरचा अस्त कसा होतो यावर आधारलेले हे नाटक म्हणजे तालिकोटची लढाई. Ruthless Ambition, Cast and Religious Conflict, Family Intrigue and Betrayal  म्हणजेच तालिकोटची लढाई – विजयनगर साम्राज्याचा अस्त. कृष्ण देव रायाचा जावई  असलेला राम राया हा विजयनगरचा सम्राट होऊ शकला नाही. तो खरा राजकारण धुरंधर होता. त्याने विजयनगर वर आपली सत्ता गाजवली पण तो लोकांचा राजा झाला नाही. तो अप्रियच होता कारण त्याच्या रक्तात राजघराण्याचे रक्त नव्हते.

या नाटकात गिरीश कर्नाड यांनी उभी केलेली ही व्यक्तीचित्रे सुंदर आहेत. विजयनगर साम्राज्याचा तो वैभवकालीन इतिहास त्यांनी सुंदर पद्धतीने सादर केला आहे. त्यामुळे हे नाटक प्रभावी झाले आहे. त्या वैभवशाली इतिहासाला त्यांनी रंगभूमीवर त्यांच्या शब्द सामर्थ्याने उभे केले आहे. असेहे प्रभावी नाटक. नाट्यप्रयोग देखणा झाला असेलच.

*****


No comments:

Post a Comment