Saturday, September 14, 2024

गीतारहस्य

 लोकमान्य टिळकांचे “गीतारहस्य”

गजानन महाराजांचा आशीर्वाद


गणेशदादा खापर्डे हे अमरावतीचे बडे गृहस्थ. त्यांना लोक अनभिषिक्त राजाच समजत असत. त्यांची इंग्रजांच्या काळातील भारताच्या स्वातंत्र्याची व नव्या राष्ट्रनिर्मितीची तळमळ भारतीय लोकांनी ओळखली होती. त्यांच्यावर लोकांचे अलोट प्रेम होते. लोकांचा खूप लोभ होता. ह्या खापर्डे साहेबावर संत गजानन महाराजांचा वर्दहस्त होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यात अपयश कधीच आले नव्हते. खापर्डे ह्यांचे अगदी जवळचे मित्र म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. खापर्डे यांच्यामुळेच टिळक आणि गजानन महाराज यांची नुसती ओळखच झाली नाही तर त्यांनी टिळकावर कृपाप्रसाद केला. त्यांना आशीर्वाद दिला. ज्या प्रमाणे भगवंत श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवदगीतेचा उपदेश केला व त्या गीतेमुळे जगाला थक्क करून सोडले, तसेच कार्य टिळकांच्या हातून होणार हे गजानन महाराजांच्या लक्षात आले होते. पार्थ जरी देवाचा भक्त होता तरी त्यालाही वनवास सहन करावा लागला होता. भगवंताचे प्रेम असूनही अर्जुनाचा वनवास चुकला नाही. अगदी तसेच टिळकांचे झाले. इंग्रजांच्या राजवटीत लोकमान्य टिळकांना स्वातंत्र्यलढ्यासाठी मंडालेच्या तुरुंगात जावे लागले. त्या मंडालेच्या कोठडीतच राहून टिळकानी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला आणि तो आबालवृद्धानी मान्य केला. त्यावेळी लोकमान्य टिळकांना गजानन महाराजांनी कोल्हटकरांच्या हस्ते भाकरीचा प्रसाद पाठविला. तो प्रसाद टिळकांना मुंबईत मिळाला खरा. लोकमान्य टिळकांनी गीतेवर लिहिलेले हे सहावे भाष्य होते. त्यातील पहिले भाष्यकार होते आद्य शंकराचार्य. दुसरे भाष्यकार होते रामानुजाचार्य. मध्वस्वामी होते तिसरे भाष्यकार तर वल्लभ गुरु होते चौथे भाष्यकार. पांचवे भाष्यकार होते ज्ञानेश्वर माऊली. त्यांनी नंतर भावार्थदीपिका हा टीकाग्रंथ ही लिहिला. त्यानंतर दोन-तीन जणांनी टीकाग्रंथ लिहिले खरे! पण त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची सर कसली येणार!


ज्ञानेश्वरानंतर गीतेचा खरा अर्थ – कर्मज्ञान – सांगीतले ते लोकमान्य टिळकांनी. गीतारहस्य हा सहावा महान ग्रंथ. गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वाद असल्यामुळे लोकमान्य टिळकांनी तो ग्रंथ पूर्ण केला, असे म्हणतात ते खरे आहे.   

संदर्भ : संतकवी श्री दसगणू विरचित श्री गजानन प्रार्थना स्त्रोत्र श्लोक १३ ते २९

 *****

No comments:

Post a Comment