Wednesday, August 28, 2024

शेगांव: गजानन महाराज समाधी स्थळ

 


आळंदी, पैठण, देहू,आष्टी, तेर

तैसा तो साचार सज्जनगड

अरण, मंगळवेढे, संताची ही गावे

तैसेच लेखावे शेगावला

कोणत्याही अंशी फरक नाही यांत

शेगांव साक्षात संतभूमी

संतकवी दासगणू महाराज  यांनी अतिशय साध्या, सुंदर आणि काव्यमय शब्दात श्री गजानन विजय ग्रंथ लिहून संतपुरुष गजानन महाराजांचे चरित्र लिहिले. ती काव्यमय भाषा इतकी साधी आणि सोपी आहे की त्याच ओवी वापरुन मी हा लेख लिहिला आहे. मी शेगांवला समाधी स्थळ बघितले आणि आजूबाजूचा सुंदर परिसर बघितला आणि थक्क झालो. सिटी बँकेचे माजी चेअरमन विक्रम पंडित यांचे नांव ऐकले होते. त्यांनी शेगांवच्या गजानन महाराज समाधी मंदिर विकासासाठी ३५० कोटी रुपयांची भरघोस देणगी दिली होती. त्या वेळच्या ट्रस्टच्या संचालकांनी केवळ १७ कोटी रुपयांची देणगी स्वीकारली व बाकीचे पैसे पंडितांना परत केले. हे भव्य आणि सुंदर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर हा गजानन भक्तांच्या पैशातून उभा राहिला आहे, हे विशेष.  येथील भव्य प्रसादलयात रोज ४५००/ ५००० गजानन भक्तांना प्रसाद म्हणून जेवण दिले जाते. हे वैशिष्ठ्य. ही व्यवस्था आणि तेथील सेवेकरी बघून आपल्याला आश्चर्यच वाटते. येथे देशाच्या कानाकोपर्‍यातून भक्तगण येतात , त्यांच्यासाठी सुंदर निवास संकुले बांधली आहेत. हे संस्थान विदर्भातील सर्वात मोठे मंदिर ट्रस्ट आहे.

जें जें काही ब्रम्हांडात|
तें तें तुझें रुप सत्य|
तुझ्यापुढे नाही खचित|
कोणाचीही प्रतिष्ठा|

गजानन महाराज वयाच्या 30व्या वर्षी १८७८च्या फेब्रुवारी महिन्यात २३ तारखेला शेगावला दिसले. हा दिन प्रकट दिन म्हणून पाळतात. ते महान संत होते. भक्तिमार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश त्यांनी दिला.


तूंच काशी विश्वेश्वर|
सोमनाथ बद्रिकेदार|
महांकाल तेवि ओंकार|
तूंच की रे त्र्यंबकेश्वरा|

भीमाशंकर मल्लिकार्जुन|
नागनाथ पार्वतीरमणI
श्री घृष्णेश्वर म्हणून|
वेरुळगावी तुंच कीं |
तूंच परळी वैजनाथ|
निधीतटाला तूंच स्थित|
रामेश्वर पार्वतीकांत|
सर्व संकट निवारता|

गजानन महाराजांनी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग आत्मज्ञान देणारे मार्ग आहेत हे भक्तांना संगितले. ते शुद्ध ब्रम्ह होते. एक परमहंस सन्यासी होते. ते पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते दिगंबर अवस्थेत असत.

तुला काय करणे यासी|

चिलीम भरावी वेगेसी|

नसत्या गोष्टीसी|

महत्व न द्यावे |

पादुका, पादत्राणे त्यांनी कधीच वापरली नाहीत.  क्वचित ते चिलीम ओढत त्या चिलीमीवरून ते ओळखळे जात असत.

ते फेब्रुवारी १८७८मध्ये शेगाव मध्ये अचानक प्रकट झाले आणि त्यानंतर ते शेगावचे संत झाले. गजानन महाराज हे गांजा आणि चरस यांचे प्रमुख वापरकरते  होते. त्यांच्या अनेक प्रतिमा मधून हे दिसून येते. काही भक्त त्यांना समर्थ रामदासचे रूप मानतात. काही भक्त त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थांचे जवळचे शिष्य मानतात. दोघेही परमहंस आणि अजानबाहू होते. ते एकाच स्त्रोतापासून घेतलेल्या वेगवेगळ्या रूपांचे प्रतिनिधित्व करतात असे म्हणतात.

गजानन महाराज म्हणजे कर्म, भक्ती आणि ज्ञान योगाचे खरे प्रतिपादक.


तूं वृंदावनी श्रीहरी|
तूं पांडुरंग पंढै|
व्यंकटेश तूं गिरीवरी|
पुरीमाजी जगन्नाथ|
द्वारकेसी नंदनंदन|
नाम देती तुजकारण|
जैसे भक्तांचे इच्छील मन|
तैसे तुज ठरविती|

ते दरवर्षी भक्तांच्या बरोबर पंढरपूरला जात असत. त्र्यंबकेश्वरला ही जात असत. ब्रम्हगिरी पर्वतावर अनेकदा जाने असे. हरी पाटील यांच्याबरोबर बरोबर ते पंढरपूर ला गेले तेंव्हाच त्यांचा पंढरपूरला समाधी घेण्याचा विचार होता. परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेंगावला समाधी घेतली.

 


गजानन जें स्वरूप कांही|
तें तुझ्याविण वेगळें नाहीं|
दत्त भैरव मार्तंड तेही|
रुपे तुझीच अधोक्षजा|
माघमासी सप्तमीस|
वद्यपक्षीं शेगांवांत|
तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष|
पंथाचिया माझारी|
उष्ट्या पत्रावळी शोधन|
तुम्हीं केल्या म्हणून|
मिळालें कीं नामाभिधान|
पिसा पिसा ऐंसे तुम्हा|

बंकटलाल अग्रवाल या  सावकाराने २३ फेब्रुवारी १८७८ रोजी गजानन महाराजांना अचेतन अवस्थेत रस्त्यावर फेकलेले अन्न खातांना पाहिले. तो सामान्य माणूस नव्हे, हे त्यांच्या लक्षांत आले व त्यांनी त्याला आपल्या घरी रहण्यास संगितले. त्याच वेळी गजाननाने चमत्कार केला आणि जानराव देशमुखांना जीवदान दिले. तो त्यांचा पहिला दैवी चमत्कार
बंकटलालाचे सदनास|
तुम्ही राहिला कांही दिवस|
तेथे जानराव देशमुखास|
मरत असतां वांचविले|

तुंबा बुडेल ऐसें पाणी|
नव्हतें नाल्यालागुनी|
विश्वास ठेवोनिया वचनीं|
ऐसे केलें पितांबरे|

कोरडी विहीर पाण्याने भरणे, हाताने उसांचा काढणे, कुष्ठरोग बरा करणे, असे अनेक चमत्कार करणारे गजानन महाराज शेगांवचे झाले.

तुझें स्वरुप यथातथ्य|
मानवासी नाही कळत|
म्हणून पडती भ्रमांत|
मायावश होऊनी|


जानकीराम सोनार
द्यावयास कुरकुर|
करूं लागला असे कीं|
स़ोनार विस्तव देण्याला |
नाही ऐसे वदला|
म्हणूनिया येता झाला|
राग भगवंताकारणे|
चिलीम विस्तवांवाचून|
पेटूनिया दाविली|
चिंचवणें तें सोनाराचें|
नासले अक्षय तृतीयेंचें|
प्राणघातक किड्यांचे|
झाले त्यांत साम्राज्य|
अवघे टकामका पाहती|
एकमेका सांगती|
हे चिंचवणे खाऊं नका!.....
हे बघून चरण धरीलें
सोनाराने
तुम्ही चिंचवण्यासी लाविले करा..
चिंचवणे तेची झाला झरा|
अमृताचा विबुधह़ो|
जानकी शरण आला
बंकटलाले आपणासी
नेले खावया मक्यासी
मोहळे होती मळ्यांत
मधमाश्यांची भव्य सत्य
लोक करिती पलायन
तुम्ही मात्र निर्धास्त
कांही वेळ  गेल्यावरी
तुम्हीच आज्ञा केली खरी|
मधमाशांस जाया दुरी|
आपल्या आज्ञेनुसार|
मधमाशा झाल्या दूर|
क्षेत्र ओंकारेश्वरी
महानदी नर्मदेत
नौका फुटली अकस्मात
पाणी येऊं लागले आंत
नाव बुडू लागली
त्या नौकेत आपण होता
ऐसा प्रभाव आपला  हो
नौका कांठांसी लावली
नर्मदेनें आणूनी भली
आपणां वंदून गुप्त झाली

 लोकमान्य टिळकांनी खापर्डे यांनी त्यांना अमरावतीला भेट देण्यासाठी आमंत्रित केले होते त्यावेळी गजानन महाराजांचा आशीर्वाद घेतला. त्यावेळी गजानन महाराजांनी त्यांना संगितले की इंग्रज त्यांना कठोर शिक्षा देतील. पण तुम्ही खूप मोठे कार्य करणार आहात. त्यावेळी इंग्रजांनी टिळकांना मंडालेच्या  तुरुंगात पाठविले आणि टिळकानी त्याच तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. हाच गजानन महाराज यांचा आशीर्वाद होता.  बाळ गंगाधर टिळकाला.

तुम्हीच कृपा केलीत|

संतकृपा असून

त्यांना शिक्षा झाली दारुण

ब्रम्हदेशी नेऊन|

मंडाल्याशीं ठेविले त्या

गीतारहस्य केला ग्रंथ|

मान्य झाला सार्यांना|

या शेगांवाचे भाग्य मोठे|

जरी आपण देह ठेविला|

तरी पावतसे भाविकाला|

याचा अनुभव आला सार्यांना|




शेगांवचा योगीराणा|
सर्वदा पावो तुम्हातें|
गजाननाशी मुळीं न विसरा|
त्याच्या चरणी भाव धरा|
म्हणजे जन्म सफल होई|

महाप्रसादालय


अतिशय सुंदर असा परिसर. गजानन महाराज तेथील संस्थान कार्यकर्त्यांच्या समवेत असताना सहज म्हणू गेले या जगी राहील रे. त्या पवित्र स्थळी १२ विश्वस्थ मंडळाची स्थापना झाली आणि त्यांनी हे समाधी स्थळ तर उभे केलेच पण हे भव्य संकुल उभे केले. भक्तांनी भरघोस देणग्या दिल्या. अनेक शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. आनंद सागर प्रकल्प उभा राहिला.    

गजानन महाराज ट्रस्टतर्फे होणारी ४२समाजसेवी सेवाकार्ये



संदर्भ : श्री दासगणू विरचित – II श्री गजानन विजय सार II संक्षेपकर्ता – कै. ना.श्री.आगाशे

*****

No comments:

Post a Comment