Thursday, October 5, 2023

“आठवणीच्या जावे गावा” - दीपक पत्की


आमच्या ऑफिसच्या सोसायटीची एजीम मीटिंग होती. त्यावेळी आमचे मित्र दीपक पत्की भेटले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि बोलताना त्यांनी मला एक आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी पिशवीतून एक गिफ्ट काढले आणि मला दिले. मी घरी आल्यावर ते उघडून बघितले आणि त्यात त्यांनी लिहिलेले पुस्तक निघाले. “आठवणीच्या जावे गावा” हे त्यांचे पुस्तक. ते लेखक आहेत हे पहिल्यांदा समजले आणि थोडेसे आश्चर्यच वाटले. मी त्यांना १५/२० वर्षापासून ओळखतो. एक आर्किटेक्ट/इंटेरियर डिझायनर म्हणून. त्यांचे कार्यालय आमच्या संकुलातच आहे. येताजाता भेट होत असते. आमच्या गप्पा होत असतात. पण ते लिहितात हे माहीत नव्हते. त्यांनी लिहिलेले हे पुस्तक चाळले आणि एक दोन लेख वाचले. एक लेख होता बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीचा आणि दूसरा लेख होता प्रसिद्ध चित्रकार श्याम जोशी यांचा. माझी श्याम जोशीशी ओळख झाली होती. मी त्यांच्या घरीही गेलो होतो. मी हौस म्हणून प्रकाशक झालो होतो. त्यावेळी मी प्रसिद्ध पत्रमहर्षी अनंत भालेराव यांचे “कावड” हे पुस्तक प्रसिद्ध केले होते. त्या पुस्तकाचे कव्हर शाम जोशी यांनी केले होते. त्यावेळी त्यांची ओळख झाली होती. आमच्या गप्पा झाल्या होत्या. पत्की यांनी या पुस्तकात त्यांच्यावर “श्या” हा फार सुंदर लेख लिहिला आणि मला ते व्यक्तिमत्व माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. पत्की हे त्यांचे खास मित्र. त्या मित्रावरचा लेख खूप आवडला. मी लगेच त्यांना फोन केला आणि त्यांना ते दोन्ही लेख आवडल्याचे सांगितले. नंतर एक दमात ते पुस्तक वाचून काढले.

दीपक या मित्राने त्यांच्या व्यवसायात कितीतरी माणसं बघितली आहेत. त्यांना खूप मजेशीर अनुभव आले आहेत. त्यांची आयुष्याकडे बघण्याची जीवनदृष्टी खूप वेगळी आहे. गंमत म्हणजे या आठवणी शब्दबद्ध करताना हा लेखकू आपल्याला गुदगुल्या करून हसवीत असतो. त्यांना काही भेटलेल्या माणसांच्या आठवणी मात्र आपल्याला फार गंभीर करून टाकतात. काही माणसं आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला कुठे कुठे भेटत असतात.

खरं म्हणजे पत्की सारखी व्यावसायिक माणसं तशी रोजच असंख्य माणसं बघत असतात. पण ते लेखक नसतात. आणि जी लेखक माणसं प्रसिद्धीस येतात त्यांना अशा माणसांची आणि त्यांच्या जगण्याची फारशी माहिती नसते. कारण त्यांनी त्यांचे जीवन आणि समस्या ह्या जवळून बघितलेल्या नसतात. म्हणून दीपक पत्की यांचे हे लिखाण खूप वेगळं आहे. सुंदर आहे.

या पुस्तकात “परदेशवारी” हा एक भग आहे. त्यांनी आफ्रिकेतील काही देशात व्यावसायिक कामासाठी अनेक वेळा भेटी दिल्या आणि आफ्रिकेतील जीवन आणि माणसं खूप जवळून बघितली. त्यांच्या आठवणी आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला आफ्रिकन जीवनाची माहिती तर होतेच पण या अविकसित देशात व्यवसाय करणे किती कठीण आहे याची जाणीव होते. मी स्वत: ७० देश बघितले आहेत. अमेरिका, युरोप आणि इंग्लंडमध्ये व्यवसायासाठी अनेकदा गेलो आहे. तेथील लेखकांची पुस्तके आणि प्रवासवर्णनेही वाचली आहेत. पण आफ्रिकेत जाण्याची संधी मला मिळाली नाही आणि पर्यटनासाठीही मी गेलो नाही. दीपक पत्की यांनी व्यवसायासनिमित्त आफ्रिका खूपच जवळून बघितला आहे. त्यांच्या त्या आठवणी वाचताना आपल्याला आफ्रिकन जीवन समजत जाते व वेगळा अनुभव गाठी पडतो.

त्यांचे हे ललित लेख हे ३-४ पानाचेच असतात पण त्यांची लेखनशैली आपल्याला समृद्ध करते. त्यांची विनोदी शैली आपल्याला हसवत राहते.

वर मी त्यांनी लिहिलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखावरचा उल्लेख केला आहे. पत्की हे चित्रकार आहेत तसेच ते व्यंगचित्रकारही आहेत. त्यांची काही व्यंगचित्रे ही मार्मिक मध्ये प्रसिद्ध झाली होती. हंस, मोहिनी, मनोहर आणि किर्लोस्कर या मासिकातून त्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली होती. पुढे स्वत:च्या व्यवसायामुळे त्यांनी ते काम बंद केले असावे असे दिसते.

श्याम जोशी त्यांचे खास मित्र. त्यांनी श्याम जोशीना चित्रकलेचा व्यवसाय परदेशात मिळवून दिला आणि अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या हॉटेलातून त्यांची भिंतीचित्रे लावली. पत्की श्याम जोशीचे फॅन होते. खूप जवळचे मित्र होते. त्यांचे व्यक्तीचित्र आपल्याला खूप काही सांगून जाते. श्याम जोशी एकदा त्यांना म्हणाले, “दोन दोन पत्की डबल पैसे घेऊन आले”. हे त्यांचे बोल आपल्याला त्यांच्या मैत्रीबद्दल तर सांगतात पण व्यावसायिक मैत्रीबद्दलही सांगतात.

त्यांच्या प्रवासातील असंख्य आठवणी आणि त्यांनी पाहिलेली माणसं आपल्या मनात घर करून बसतात. आफ्रिकेतील एक हॉटेल मधील टेबल पुसणारा पोरगा त्यांनी दिलेली टीप सांभाळून ठेवतो व जेव्हा तो स्वत: हॉटेल मालक होतो तेव्हा त्यांना एका ट्रीपमध्ये भेटतो तेव्हा ती अमूल्य टीप त्यांना दाखवतो आणि त्यांचे शब्द त्यांना कसे कमी आले हे मोठ्या अभिमानाने सांगतो.

दारी चालून आलेल्या लक्ष्मीकडेही पाठ फिरवून केवळ मनाच्या शांततेसाठी तपश्चर्या करणारा असाच एक ‘योगी’ माणूस त्यांना भेटतो.

‘पागल’ म्हणून कामाला आलेला सुतार हा तर एक खरा इंटेरियर डिझायनर निघतो. त्याची गोष्ट मजेशीर आहे.

“प्राण गेला तरी चालेल पण कोणाला लाच देणार नाही’ या तत्वाला चिकटून राहणारा त्यांचा मामा आपल्याला खूप काही सांगून जातो.

त्यांना एक भिकारी भेटतो आणि म्हणतो, ‘मुझे तो भगवानने बहोत दिया है!’. त्यातून ते आपल्याला सांगतात, ‘शेवटी समाधान हे मिळवण्यावर नव्हे तर मानण्यावर असते’. हेच खरे.

लोकानी त्यांना “बुवा” कसे केलं ही गोष्ट असेच खूप काही सांगून जाते.

दैवी चमत्काराच्या घडलेल्या तीन घटना ते सांगतात आणि आपण आश्चर्यचकित होतो.

असाच एक माणूस त्यांना भेटतो. तो त्यांच्या व्यवसायातील नसतो. तो त्यांना Detailingचे महत्व नीट समजावून सांगतो तेव्हा ते म्हणतात आपल्याला ‘गुरु’ कुठेही भेटतात आणि शिकवून जातात.

आफ्रिकेतील व्यवसायाची पहिली संधी त्यांना दैवयोगाने मिळाली खरी पण त्यांच्या कामातील कौशल्य, प्रामाणिकपणा व वैयक्तिक संबंध' या तीन गोष्टीमुळे त्यांचा व्यवसाय टिकून तर राहीला पण त्यांच्या जीवनाचे सोने झाले, असे ते मानतात. त्यांचे परदेशवारीचे अनुभव खूप वेगळे आहेत. निराळे आहेत. गंमतीदार आहेत. ‘हकुम मटाटा’ आणि ‘मोकांबो कुशवा’ हे लेख वाचून आपण खुश होतो.

असे हे पुस्तक खूप काही सांगून जाते. आपले मन प्रसन्न करते. असा व्यावसायिक माणूस अनुभवाचे बोल बोलू लागला की आपल्याला त्याच्यातील लेखक भावतो. आवडतो. 

(आठवणींच्या जावे गावा – दीपक पत्की, अश्वमेध प्रकाशन, १२४३, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०)

 

 

No comments:

Post a Comment