Thursday, June 6, 2019

अस्तु


अस्तु : म्हातारपणची शोकांतिका
काही दिवसापूर्वीच Being Mortal हे अतुल गवांडे ह्यांचे ‘म्हरातारपणाचं  जगणं’ ह्या विषयावरचं पुस्तक वाचलं आणि गेले कित्येक दिवस म्हातारपण आणि वृद्धाश्रम  ह्या विषयाचा भुंगा पाठीमागे लागला. काल “ अस्तु “ हा ह्याच विषयावरचा मराठी चित्रपट पाहिला. डिसेंबर २०१३ चा हा चित्रपट . दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक पुरस्कार प्राप्त झालेला . मुंबईत आतां चित्रपटगृह मिळाले. फारच थोड्या ठिकाणी चालू आहे .मुद्दाम जिथे चालू आहे तेथे जाऊन पहावा लागतोय. तिकडे सलमान खानचा चित्रपट ५०० कोटीचा गल्ला मिळवतोय आणि इकडे ह्या सुंदर चित्रपटाला १०० म्हातारी डोकी काठी टेकवत येत आहेत . कोण पहाणार? शरीराने जिवंत पण मनाने मेलेल्या असलेल्या (स्मृतीभंश झालेल्या )  एका म्हाताऱ्याची शोकांतिका ?
म्हातारे होणं ( Ageing ) मोठं कठीण असतं .परावलंबी असलेलं म्हातारपण अधिक कठीण असतं . आपण धडधाकड राहून निवृत्तीनंतरचं शांतपणे सुखाने जगणं वेगळं आणि स्मृतीभंश होऊन म्हातारपण जगणं अधिक कठीण . ती एक शोकांतिकाच असते. आपल्या मुला-मुलीनी ह्या शोकांतिकेला बरोबर घेऊन आणि स्वीकारून कसं जगायचं ? हा खरा प्रश्न आहे . त्यांच्याकरिता हे महाकठीण काम आहे . संवेदनशील मुलामुलींना ते अधिक त्रास देणारं आहे.
एक बुध्दिमान संशोधक प्राध्यापक . संपूर्ण जीवन रसरसून जगलेला . दोन मुलीना जेवढे देता येईल तेवढे देऊन सुखी शांत जगणारा हा म्हातारा. अल्झायमरसारख्या रोगामुळे लहान मुल झालेला . शरीराने जिवंत पण मनाने मेलेला . अशा ह्या मुलाला सांभाळणारी त्याची मुलगी आणि तिचा डॉक्टर जावई. आपण असताना आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात कशाला ठेवायचे ? असा विचार करून वडिलांचीच आई झालेली ही मुलगी संवेदनशील मनाची असल्यामुळे खूप काही सहन करीत वडिलांचे सर्व काही करीत असते आणि एक दिवस तिचे हे म्हातारे वडील नाहीसे होतात . त्यावेळी तिची जी अवस्था झाली आहे त्याची  गोष्ट सांगणारा हा चित्रपट. माणूस संवेदनशील असला की त्याची जी फरफट होते ते आपण अनेक कुटुंबातून पहात असतोच. तिची धाकटी बहिण. दूर राहणारी . Intimacy at a distance असा Rational विचार करणारी आणि स्वतःच्या करिअरमध्येच रमलेली . दूर असलेल्या मुलीला मात्र असे वाटत असते की बाबांचे प्रेम जवळ असलेल्या मुलीवरच अधिक आहे . अनेक कुटुंबात असे प्रकर्षाने जाणवते . ते कौटुंबिक ताणतणाव सर्वत्रच दिसून येतात.
म्हाताऱ्या मंडळीकडे सुखाने जगण्यासाठी पैसा आहे , घर आहे. तरीपण अधिक म्हातारे होणं आणि कसल्याही प्रकारचे पंगुत्व येणे हे आपल्या अपत्यासाठी त्रासदायक आहेच. आपल्याला लहान मुलासारखं जपताना त्यांना बरेच काही सहन करावे लागते. ती मुलं अधिक संवेदनशील असतील तर त्यांचा अधिक कोंडमारा होत असतो. त्यांच्या जगण्याच्या वेगात आपण एक अडथळाच असतो. असे होणे फार क्लेशकारक असते. आपल्याकडे वृद्धाश्रम इतके चांगले नाहीत. Assisted Living हा प्रकार फारसा उपलब्ध नाही.
आपण ज्या वडिलावर प्रेम करतो आणि त्यांना सांभाळतो ते वडील ( अप्पा) आपल्याला साधे ओळखत नाहीत हे दु:ख फार मोठं आहे . त्या मुलीची ( इराची) भूमिका  इरावती हर्षे ह्यांनी फार सुंदर केली आहे . मनाला चटका लावून देणारी ही भूमिका पहाण्यासाठी तरी हा चित्रपट एकदा पहावा. वडिलांची भूमिका करणारे मोहन आगाशे म्हणजे डॉ लागू नंतरचे नटसम्राट . अतिशय सुंदर भूमिका करणारे . त्यांची ही भूमिका पाहिल्यानंतर असे म्हातारपण आपल्या वाटेला येऊ नये असा विचार अनेकदा डोक्यात येतो आणि मग आपल्या डोक्यातून जातच नाही. अर्थात हे आपल्या हातात नसते. जावई ( मिलिंद सोमण ) आणि धाकटी मुलगी ( देविका दप्तरदार ) ह्यांच्या भूमिका उल्लेखनीय आहेत. अमृता सुभाष पारितोषिक विजेती आहेच. तिच्या भूमिकेतील 'माणूसपण' कायम लक्षात राहतं. चित्रपट अस्वस्थ करणारा आहे .

ओळख सियाचेनची
ग्रंथालीने प्रकाशित केलेले अनुराधा गोरे ह्यांचे ' ओळख सियाचेनची ' हे पुस्तक हाती आले . थोडेसे चाळले आणि लक्षात आले की हे पुस्तक वाचायलाच हवे .
१९४७ साली पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर पाकिस्तानच्या सैनिकांनी ब्रिटिश सेनाधिकारी ह्यांच्या सहकार्याने गिलगिट - कारगिल ह्या सिंधू नदीच्या आजूबाजूने दौड करीत लेह काबीज केले होते . त्यावेळी आपले दिल्लीश्वर गाफीलच राहिले होते आणि जीनांच्या आक्रमक लष्करी कारवाया चालूच होत्या . काश्मीरचा हिंदू राजा हरिसिंग जेव्हा हतबल झाला तेव्हा मदतीसाठी धावला पण शेख अब्दुल्ला स्वतंत्र काश्मीरचे स्वप्न बघत दोन्ही डग्र्यावर पाय रोवित होते .ह्या पुस्तकातील एका प्रकरणात काश्मीरचा सर्व इतिहास संक्षेपाने लिहिला आहे . तो वाचणे आणि समजून घेणे फार महत्वाचे आहे . हा इतिहास जितका महत्वाचा आहे तितकाच ह्या भागाचा भूगोल . काश्मीर - सियाचेन - लेह लडाख - अकसाई चीन ह्या भूभागाची पूर्ण माहिती समजून घेतल्याशिवाय तेथील लष्करी कारवाई समजणे अवघड आहे . हा ह्या पुस्तकाचा मुख्य विषय आहे . अतिशय अभ्यासपूर्ण माहिती असलेले हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला आपल्या संरक्षण प्रश्नाविषयी अधिक जाण होते . वेळ काढून अवश्य वाचावे असे हे पुस्तक .

Tuesday, June 4, 2019

भाई

'भाई ' चा उत्तरार्ध आज संध्याकाळी ६ चा शो-  बिग  सिनेमा  संगम , अंधेरी  येथे पाहिला . मोजून १६ प्रेक्षक होते . पहिल्या भागावर लोकसत्तेतील लेखामुळे परिणाम झाला  होता . टीव्ही चॅनेल्सवर उलटसुलट चर्चा झाली . दुसऱ्या भागाकडे प्रेक्षक वळलेच नाही असे दिसते . मिडीयाचा असा परिणाम होतो आणि चित्रपट डब्यात जातो . मीडियावर फारसा विश्वास ठेऊ नका .
हा चित्रपट मला तर आवडला . ज्यांनी पुलंना पाहिले आहेत ,त्यांना ऐकले आहे ,त्यांचे साहित्य वाचले आहे, त्यांना  ह्या चित्रपटातून पुलं सतत भेटत राहतात , त्यांचे संवाद  आपल्या कानांत घुमत राहतात , त्यांचे गाजलेले विनोद  आपल्याला हसवत राहतात .  ' आहे मनोहर तरी ' ह्या त्यांच्या पुस्तकातील सुनीताबाई  आणि पुलं सतत भेटत राहतात . पुलं आणि त्यांचे गायक मित्र - कुमार गंधर्व ,वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी  चित्रपटातील संगीत मैफलीतून भेटतात आणि त्या सर्वांच्या  अजरामर गाण्यामुळे आपण मंत्रमुग्ध होतो . आपण ती गाणी असंख्य वेळा ऐकलेली असली तरी ह्या मंडळींच्या एकत्र मैफलीची आपल्याला नुसती ऐकीव माहिती असते . त्यांच्या ऋणानुबंधाच्या गाठी ह्या संगीतामुळेच पडल्या  होत्या .त्यांचे  ते  विलक्षण मैत्री असलेले लोभस चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसते . ह्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम खूप काही सांगून जाते . बाबा आमटे ह्यांच्या आनंदवनात  रमणारे  पुलं बघताना  आपल्याला त्यांचे मोठेपण जाणवत राहते.  पुलं हा  नुसता विनोदाचा बादशहा नाही  तर 'देणार्याने देत जावे ' हे  सांगणारा  महामानव आहे . मध्यांतर होण्यापूर्वी असलेले  ते प्रसंग  नकळत  आपल्या डोळ्यात पाणी आणतात. आणीबाणीतील पुलं आपल्याला माहित आहेतच.   पहिला ' महाराष्ट्र भूषण ' हा राज्य पुरस्कार ज्यांनी त्यांना दिला त्यांचे  त्या मागचे नंतरचे राजकारण आपल्यात विलक्षण  चीड निर्माण करते . पण  पुलं ह्या माणसाची मान कशी ताठ होती ह्याचे दर्शन आपल्याला अधिक आनंद देते .
हा चित्रपट अवश्य पहा . हा एक सुंदर चित्रपट आहे . उत्तरार्ध मला अधिक आवडला . सर्वच कलाकारांचे काम अप्रतिम .पुलंसाठी  पहा  पण ह्या  सर्व कलाकारासाठी  अवश्य पहा . पुलं च्या चित्रपटासाठी   रिकाम्या खुर्च्या  पाहतांना मला थोडं वाईटच वाटलं .

'आहे मनोहर तरी' मधील पु ल आणि आपण पाहिलेले , ऐकलेले आणि आपल्याला समारंभातून दिसलेले पु ल थोडेसे वेगळे आहेत. तसेच मांजरेकर दिग्दर्शित 'भाई 'मधील पु ल अनेक बाबतीत वेगळे आहेत . 'भाई 'मधील संवाद रत्नाकर मतकरी ह्यांचे आहेत .त्यांनी पु ल ना जवळून बघितले असेलच .म्हणूनच पटकथाकार गणेश मतकरी ह्यांनी मांजरेकर ह्यांना रत्नाकर मतकरी ह्यांच्याकडून संवाद लिहून घेण्यास  सांगितले असावे. मांजरेकर ह्यांनी त्यांचे स्वातंत्र्य वापरले असेलच. शेवटी सिनेमाच्या गुणदोषात सर्वच थोडेबहूत जबाबदार आहेत. शेवटी हा सिनेमा त्या सर्वानी मिळून तयार केला आहे. प्रेक्षकांनी ज्याचेत्याचे पु ल शोधावेत .

मुकुंद संगोराम हे चांगले कला समीक्षा करणारे लेखक आहेत. आजचा लोकसत्तेतील त्यांचा ' भाई : पुलंचे भंपक चित्रण ' हा लेख वाचला. त्यांची टीका मला तरी चुकीची वाटते. सिनेमा भंपक नाही. तो बघण्यासारखा आहे. असामान्य माणसेही रोजच्या जीवनात तशी सामान्यच असतात.पुलंचं  ' आहे मनोहर तरी ' असं जे वर्णन सुनीताबाईनी  केलं आहे ते खरं असलं तरी त्यामुळे पुलंचे मोठेपण कमी होत नाही. पु लं च्या जीवनाची विविध रूपे पहायला मिळतात. त्यांच्या आयुष्यातील दु:खद घटना मनाला चटका लावून जातात. हा सिनेमा भंपक मुळीच नाही. असे हेडींग देउन सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न वाटतो.

बायोपिक चित्रपटात असे होत रहाणारच.
आत्मचरित्रात तरी सगळे कुठे खरे असते.

खरं म्हणजे अनेक नावाजलेले कलाकार हे दारू पिल्यानंतर अधिक खुलतात . त्यांच्या संगीत मैफिली त्यानंतर अधिक रंगतात. ह्याची अनेक उदाहरणे माहितीची आहेत. बायोपिक सिनेमात ह्याचा खुबीने वापर करणारे दिग्दर्शक गल्ला भरण्यासाठी ह्याचा उपयोग करून घेतात असे म्हणणे तसे चूकच आहे.

गिर्यारोहक

गिर्यारोहक मंडळी भन्नाट जीवन जगत असतात . त्यांच्या  जगण्यात  एक थ्रिल असतं . किती विविधता अनुभवतात ! निसर्गाशी नातं जुळलेलं असतंच . निसर्ग साथ देतो असं नाहीच . किती तयारी करावी लागते ? प्रवास , व्हिसा , प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम , इतर देशातील वकिलातीतील  माणसं , वाटाडे , कुक , बांधून घ्यायचं सामान , होणारी चिडचिड , बरोबर घ्यावी लागणारी औषधं , सहप्रवासी असलेल्या लोकांचे स्वभाव , निराश होणारं मन , अत्युच्च आनंदाचे क्षण , निसर्गाची विविध रूपं . एक ना अनेक .
एरीक न्युबीचं हिंदुकुश पर्वतावरील शिखरं गाठण्याचं प्रवास वर्णन वाचत असताना मीच त्या गिर्यारोहणाचा अनुभव घेत होतो .
विशेष म्हणजे भौगोलिक परिसराचे वर्णन करताना जुना  इतिहासही तितकाच महत्वाचा . ग्रेट अलेक्सझांडर ह्याने हिंदुकुश पर्वताच्या बाजूने प्रवास करीत हिंदुस्थान कसा गाठला ?न्यूरिस्तान / काफिरीस्तान ओलांडून बाबर भारतात कसा आला ? लॉर्ड कर्झन ह्यांनी ह्या भागाला भेट कशी दिली ? युरोपियन लोकांनी अनेकदा स्वाऱ्या करून ह्या भागातील सुंदर स्त्रियांशी संग साधून युरोपियन रंगाची संतती कशी निर्माण झाली ? अशी आणि विविध माहिती ह्या पुस्तकातून मिळते . बाबरनामा इंग्रजीतून अनुवादित झाला आहे . इंग्रजांनी त्याचा अभ्यास करून हा भाग पादांक्रत केला आहे . तो जणू रोड मॅप टू इंडिया . इतिहास आणि भूगोल एकत्रच वाचले पाहिजेत . हा ऐतिहासिक भाग वाचायचा नसेल तर सरळ पुढच्या प्रकरणाकडे जा , अशी नोट दिली आहे .
ह्या भागातून निघालेल्या नद्या पुढे सिंधू नदीला कशा मिळतात ह्या संबंधीचे वर्णन सुंदर आहे . आपण लेहला सिंधू नदी पहातो . त्यानंतर ती पाकिस्तानात जाते . नुब्रा व्हॅलीला आपण काराकोरम पर्वतांच्या रांगा पहातो . सियाचेनचा पुढील भाग लष्करी परवानगीशिवाय आपण पाहू शकत नाही . हिंदुकुश पर्वतांच्या रांगा विलोभनीय आहेत . हे लक्षात येते . बाबर किंवा अलेक्झांडर त्या मार्गाने भारतात कसे आले असतील  ?, आणि इंग्रजांनी हा भाग कसा पालथा घातला असेल, ह्याचे चित्र ह्या पुस्तकातून समोर उभे राहते . हे नुसते गिर्यारोहणाचे प्रवास वर्णन नाही . ह्यातून ह्या भागाचा इतिहास - भूगोल डोळ्यासमोर उभा राहतो . एक अप्रतिम प्रवासवर्णन .

गुजरातचा विकास


खरं म्हणजे गुजरातचा विकास गेल्या २० - २२ वर्षात झाला का ? असा प्रश्न काही जणांना पडतो . मी १९८० ते २००० ह्या वर्षात अनेक वेळा - महिन्यातून चारदा - व्यवसायानिमित्त गेलो होतो . वापी - अंकलेश्वर - भरूच - बडोदा - सुरत -  अहमदाबाद - जामनगर ह्या भागात संचार होता . दत्ता सामंत ह्यांच्या गिरणी कामगार संपानंतर गुजरातमधील कापड गिरण्या भरभराटीस आल्या होत्या . रासायनिक उद्योगात वेग आला होता . शहरे बकाल झाली होती . सर्वत्र घाणीचेच राज्य होते . साबरमती गचाळ नाला झाली होती . अनेक छोटे उद्योग पुढे येत होते . त्यानंतरच्या काळात खूप काही बदलले . एका नव्या उत्साहाने उद्योग निर्मिती झाली . जागतिक बाजारपेठ गुजरातला मिळाली . आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात गुजरात चमकू लागला . नवीन शिक्षित गुजराती  पिढी सर्वत्र दिसू लागले . नवी पिढी शिक्षित व्यावसायिक मंडळी म्हणून जगा समोर आली . उद्योगात' घरना माणूस' कन्सेप्ट संपला . इतर प्रांतातले लोक गुजरातमध्ये स्थायिक होऊ लागले . हा बदल गेल्या २० वर्षातला . गुजरात मॉडेल म्हणजे काय ? हे समजून घ्यायचे असेल तर आधीचा गुजरात आणि आजचा  गुजरात समजून घ्यावा लागेल .
तोच अनुभव मध्यप्रदेशचा . एका बिमारू राज्याचा . आज मध्यप्रदेश अधिक पुढे आहे .
अंबानी आणि अदानी म्हणजे गुजरात नव्हे . तेथे छोट्या मोठ्या उद्योगात अनेक लहान मोठे अंबानी आहेत .
अंबानी ह्यांचे नाव जगातील श्रीमंत लोकात गणले जाते . पण ह्याच अंबानीमुळे अनेक जण खूप श्रीमंत झाले , हे लोकांच्या लक्षात येत नाही . साध्या माणसांनी रिलायन्स मध्ये पैसे गुंतवून खूप पैसे कमविले . फ्लॅट घेतले .गाड्या घेतल्या . छोटे उद्योग सुरु केले . पैशातून पैसे कमविले . हे इतरांना जमले नाही . पैसे कमविणे हे काही पाप नसते . गरिबीला गोंजारत जगणे पाप असते .
ह्या लोकांना हे यंत्र सापडले आहे .
Aisi machine lagaunga, iss side se aaloo ghusega, uss side se sona niklega. हे शक्य आहे . ते तर  ह्या गुजराती समाजाला चांगले जमते .


सौदी अरेबियात भेटलेला मराठी माणूस

मी एकदा सौदी अरेबियात एका कंपनीत ट्रेनिंग देण्यासाठी गेलो होतो . त्या कंपनीत अनेक मराठी लोक कामाला होते . माझी येण्या - जाण्याची सोय करण्यासाठी एक कार होती . त्याचा ड्रायव्हर कोकणातील मराठी मुलगा होता . ८ वर्षांपासून तेथे आहे . कारखान्यात मराठी तंत्रज्ञ होते . एक आर अँड डी मॅनेजर होता .पुण्याचा .वय ४५  .बायको आणि मुले पुण्यात. १२ वर्षांपासून तेथे . २ - ३ वर्षाला पुण्याला येऊन जातो . प्रत्येक वेळी त्याला परत जायचे नसते . त्याची बायको आणि मुलगी त्याला म्हणते , ' तुम्ही येथे परत येऊ नका . तुमच्या पैशाची सवय झाली आहे . आमचे कसे होणार ? येथे फारसे पैसे मिळणार नाही .मग आमचे कसे होईल? ' . अतिशय निराश चेहरा करून तो हे मला सांगत होता .'  माझ्या बायको - मुलीला मी येथेच राहून त्यांना पैसे पाठवावे असे वाटते .मी त्यांना नकोच आहे ' , असे म्हणताना त्याच्या डोळ्यात पाणी आले .
अतिशय हुशार , उच्च विद्याविभूषित तंत्रज्ञ पुणेकरांची ही अवस्था . मन हेलावले 

प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातून ......


प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातील पुस्तकात ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या आहे त्या प्रांतात राजकारणाची वळणं वेगळी असतात ह्याचा परामर्श त्यांनी घेतला . बंगाल , आसाम आणि पंजाब ह्या तीन प्रांताचा विशेष उल्लेख त्यांनी केला  आहे . इंग्रजी राजवटीत प्रांतिक निवडणुका घेतल्या त्यावेळपासून त्यांनी आढावा घेतला . त्यावेळी मुस्लिम लिगचे  जे राजकारण चालले होते त्या  पुढे काँग्रेस back  फुटवरच होती . काँग्रेसला हिंदूंचा पक्षच मानले जात असे .
काँग्रेस मुस्लिम नेत्यांना पुढे करून इंग्रजांना आपण खरे प्रतिनिधी असे दाखविते म्हणून जिना त्यांच्या मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी मंडळात एक दलित वर्गाचा प्रतिनिधी घेत असत .
त्या वेळच्या बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळेच पु .पाकिस्तानची निर्मिती झाली . एव्हढेच नव्हे तर कलकत्ता हे शहर पु .पाकिस्तानची राजधानी व्हावी ह्यासाठी मुस्लिम नेते प्रयत्नशील होते . सरतचंद्र बोस सारखे काँग्रेस नेते फझहूल गटाच्या जवळचे होते. सरदार पटेल ह्यांनी त्यांना चांगलेच फटकारले .नाहीतर कलकत्ता पु .पाकिस्तानची राजधानी झाली असती .
बंगालची फाळणी व्हावी ह्यासाठी डॉ शामा प्रसाद मुखर्जी अनुकूल होते .कारण मुस्लिम बहुसंखेमुळे हिंदूंना सुरक्षीत वाटत नव्हते .
आजही मुस्लिम लोकसंखेमुळेच काँग्रेस किंवा ममताची टीएमसी ह्यांना मुस्लिम अनुनयामुळेच निवडणूक जिंकणे शक्य झाले आहे .सीपीएमची भूमिका तशीच आहे .
मुस्लिम अनुनय ह्यावरच तेथील राजकारण चालते .
शेख मुजिबर रहमान आणि बंगला देश निर्मिती ह्याचा आढावा घेताना बंगाली भाषिकांचा सबनॅशनलइझम कसा जन्माला आला ह्याचा इतिहास खूप काही सांगून जातो .
काश्मीरचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आहे , ते तेथील ९८ टक्के मुस्लिम संखेमुळेच .
बंगला देशाची निर्मिती हा बंगला भाषा हीच आमची मातृभाषा ह्या चळवळीतून झाली आणि त्यांना उर्दू भाषेसारखाच दर्जा हवा होता .
अवामी लीगला १९७१ साली पाकिस्तान नॅशनल असेम्ब्लीत सर्वात अधिक जागा मिळाल्या होत्या आणि पश्चिम पाकिस्तानवर त्यांनी राज्य केले असते .
जीनांनी बंगाली भाषेला उर्दूसारखा दर्जा कधीच देणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगितले होते त्यामुळेच पूर्व बंगालचे मुसलमान विरुद्ध गेले .
पूर्व बंगालच्या मुसलमानांना कलकत्ता शहर त्यांच्याकडेच हवे होते .
अनेक हिंदू आणि बौद्ध लोकांची शहरे पूर्व बंगालमध्ये गेली होती .
इंग्रजांनी बंगाल आणि पंजाब ह्या प्रदेशांची फाळणी करण्यासाठीच कमिशन नेमले होते .
फोडा आणि झोडा हीच इंग्रजांची नीती होती .
कलकत्ता आणि नौखालीच्या दंगली त्यामुळेच झाल्या . गांधीजी ही फाळणी थांबवू शकले नाहीत .
पश्चिम पाकिस्तान विरुद्धचा लढा जेव्हा शेख मुजाबर  रहमान ह्यांनी सुरु केला त्यावेळी १ कोटी बंगला देशी भारतात आले . त्यावेळी ते प बंगाल , आसाम आणि त्रिपुरात ते आले . ते परत गेलेच नाहीत . आणि त्यामुळेच इंदिरा गांधी ह्यांनी बंगला देशाला पाठिंबा दिला . तो दिला नसता तर अधिकांश बंगला देशी भारतातच घुसले असते .
All these points are mentioned in Autobiography of Pranav Mukherjee .

मुसाफिर

'मुसाफिर' अच्युत गोडबोले ह्यांचे ४७४ पानाचे ( आवृत्ती ४५ ) आत्मचरित्र वाचायला घेतलं. आज वाचून संपवलं. हा इन्फोटेकमधला दादा माणूस. नारायण मूर्ती ह्यांनी पटणी कॉम्पुटर सोडली तेंव्हा त्या खुर्चीवर जाऊन बसलेला हा गृहस्थ. पुढे अनेक मोठ्या आय टी  कंपन्यात सीइओ. हे माहित असल्यामुळे पुस्तकातील त्या भागापासून वाचायला सुरुवात केली. मी गणकयंत्राशी त्यावेळपासून संबंधित असल्यामुळे मला विशेष उत्सुकता होती. अर्थात मी बिझिनेस Application मध्ये कधीच नव्हतो. पण technical application मध्ये सर्व जनरेशनचे कॉम्पुटर वापरले होते. त्यामुळे हा भाग मी प्रथम वाचला. हा तर भारतीय आय टी व्यवसायाचा इतिहास. प्रत्येक आयटीवाल्याने अवश्य वाचावा. सुंदर. अच्युत गोडबोले ह्यांच्या करिअरचा ग्राफ.
सोलापूरच्या मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबातील एक हुशार विद्यार्थी. मुंबईला आय आय टीत प्रवेश घेतो. अभ्यासाव्यतिरिक्त अनेक विषयात रस. चौफेर वाचन. त्याच्यासारखेच त्याचे अनेक मित्र. डाव्या विचारसरणीकडे झुकलेले. वेगळं काहीतरी करू पाहणारे. बीटेक झाल्यावर नोकरीचा विचार सोडून आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी चळवळ उभारणारे.
दहा दिवसाची तुरुंगाची हवा खाल्यानंतर अच्युतच्या लक्षात येते की हे आपलं काम नाही. मुंबईला परतल्यानंतर असेच भटकणे. वाचत राहणे. बेकारीचे दु:ख सोसणे. नाटक , साहित्य , तत्वज्ञान , चित्रकला . अर्थशास्त्र , कामगार  चळवळी दलित चळवळी, ह्या सर्वच क्षेत्रात रस. केमिकल  इंजिनीअरिंग विसरून जाणे. आणि मग नुकत्याच नव्याने सुरु झालेल्या आयटी क्षेत्रात नोकरी. तेथे मन लागतच नाही. Jack of All - Master of  None अशी अवस्था. विलक्षण जिद्दीने प्रोग्रामिंग मध्ये तज्ञ होणे. हा प्रवास उल्लेखनीय. मग वाटचाल व्यवस्थापकीय पदाकडे. यशामागून यश. आर्थिक सुबत्ता. एक देखणे यश. हा प्रवास म्हणजे हे आत्मवृत्त. वाचण्यासारखे.
ह्या आत्मचरित्राचा मन हेलावून सोडणारा भाग म्हणजे अच्युत आणि त्याच्या पत्नीने सोसलेले दु:ख . त्यांच्या मुलाला ऑटीझमचे दुखणे आहे. कोणताही माणूस कोलमडून पडेल. पण अच्युत त्यातून कसा उभा राहतो हे वाचताना आपण त्याच्या जिद्दीने प्रभावित होतो.
असा हा चौफेर व्यक्तिमत्वाचा माणूस समजून घेतला तर आपलेही जीवन समृद्ध होते. एक विलक्षण व्यक्तिमत्व.