महेश्वर – नेमावर – जबलपूर
आमचा परिक्रमेचा मार्ग होता तो असा – ओंकारेश्वर-
ममलेश्वर, शूलपाणी जंगल, विमलेश्वर, काटेश्वर, रेवसागर जेथे नर्मदा अरबी समुद्राला
मिळते ते भरूच जवळील भृगुतीर्थ, जवळच गोल्डन ब्रिज लागतो तेथे नर्मदा न ओलांडता
रेवासागर पार करून नर्मदेच्या दुसऱ्या तटावर जायचे – गरुदेशवर, सरदार सरोवर, Statue
of Unity, शूलपाणी परिसर, महेश्वर, मंडलेश्वर, इंदूर, ओंकारेश्वर, नर्मदासागर,
नेमावर, भेदघाट जवळून जबलपूर मार्गे नर्मदा कुंड म्हणजे आमरकंटंक, मैय्या की
बगिया, दिंडोरी, त्रिवेणी संगम, बरनीगाव, बरमान घाट, नर्मदापूर (होशंगाबाद), खंडवा
मार्गे ओंकारेश्वर-ममलेश्वर, नागरघाट आणि शेवटी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर.
गरुडेश्वर नंतर निघालो महेश्वर- नेमावरकडे. उज्जैन मार्गे महेश्वरला पोहोचलो. २५० किलोमीटर अंतर. रात्रीचा मुक्काम महेश्वरलाच होता. महेश्वर म्हणजे राणी अहिल्याबाई होळकर यांची त्यावेळची राजधानी. जगतगुरू शंकराचार्य यांच्यानंतर हिंदू सनातन धर्माची पताका उंच फडकवली ती राणी अहिल्याबाई होळकरांनी. मुगल सम्राट औरंगजेब आणि त्यापूर्वीच्या यवनांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी अनेक मंदिरांना उद्ध्वस्त केले होते. काशी विश्वेश्वर, रामेश्वर आणि भारतातील अनेक मंदिरांना राणी अहिल्याबाई होळकरांनी पुन्हा नव्याने बांधून काढले. महेश्वर आजही खूप छान अवस्थेत आहे. तेथील नर्मदा घाट फार सुंदर आहे. राजराजेश्वर मंदिराच्या परिसरातील हा प्रसिद्ध घाट. आदीगुरु शंकराचार्य यांचे येथे वास्तव्य होते. महेश्वर या शहराचा इतिहास खूप प्राचीन आहे. हैवानशी राजा सहसत्रार्जुन याची ही राजधानी होती. त्याने रावणाचा पराभव केला होता. हेच ते ठिकाण. ऋषि जमदग्नी येथीलच. त्यांचे पुत्र भगवान परशुराम यांनी वध केला होता सहस्त्ररंग यांचा.
महेश्वरचे फोटो दिले आहेत ते त्यावेळच्या राजधानीचे
शहर किती सुंदर असेल याची कल्पना देईल. राणी अहिल्यादेवींचा अतिभव्य राजवाडा सुरेख
आहे. त्यावेळचा राजदरबार कसा भरत होता याची कल्पना येईल. अहिल्याबाईंनी किल्ला आणि
राजवाडा फार सुंदर बांधला होता. त्यांचा काळ होता १७६५ ते १७९६. बाजूचा नर्मदा घाट
देखणा तर आहेच. विशेष लक्ष वेधते ते अहिल्याबाईनीं बांधलेले देऊळ. त्या स्वत: रोज
पूजा करीत असत ते ह्या मंदिरात. त्या रोज १००० शिवलिंगाची पूजा करीत असत असे गाईड सांगत
होता.
सुलभ्य देह दुर्लभं
महेश धाम गौरवं
येथील प्रसिद्ध महेश्वरी साडी खूप प्रसिद्ध आहे. राणी अहिल्याबाई होळकरांनी स्त्रीयांच्या हाताला काम असावे. त्यांनी स्वावलंबी असावे. त्यासाठी हँडलुम साडीचा प्रयोग सुरू केला. तो खूप यशस्वी झाला. अहिल्याबाईंनी बांधलेले राजराजेशवर मंदिर वास्तूकलेचा अप्रतिम नमूना आहे.
महेश्वरहून निघालो ते देवास जिल्ह्यातील नेमावरकडे.
सिद्धनाथ नेमावर हे आहे सुप्रसिद्ध तीर्थस्थान. नर्मदेचे हे बेंबीस्थान. जमदग्नी
ऋषींचे हे राहण्याचे ठिकाण. परशूरामांचा जन्म येथेच जानापाव गांवी झाला. जवळ ग्वाल
टेकडी आहे. त्याला मणिगिरि असेही म्हणतात. सिद्धनाथाचे प्राचीन मंदिर म्हणजे पाषाण कारगिरिचा अद्भुत नमूना आहे. पांडवानी ह्या मंदिराची निर्मिती केली होती. ते
त्यांना पूर्ण करता आले नाही म्हणून कौरवानी ते पूर्ण केले असे सांगतात. सध्या
जीर्णशीर्ण अवस्थेतील हे तसे सर्वात जूने मंदिर आहे.
नेमावरचे सिद्धार्थ महादेव मंदिर आणि नर्मदा मैया दर्शन मन प्रसन्न करते.
सिद्धेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि लक्षात आले
ते कितीतरी टन वजन असलेले ते भव्य शिवलिंग. ही एक अद्भुत मूर्तीकला! या शिवलिंगाची
स्थापना चार सिद्ध ऋषि – सनक, सननंदन, सनातन, सनतकुमार यांनी केली. तेथील
ब्रम्हानंद घाट बघण्यासारखा आहे. नेमावर सोडले आणि भोपाळमार्गे ३५० किलोमीटरवर
असलेल्या जबलपूरला पोहोचलो. रस्ते चांगले आहेत म्हणून बरे! मान-पाठ आकसून जातात पण प्रवासतील गप्पा
मनोरंजन करतात म्हणून मजा येते. जबलपूरच्या सरस्वती घाटावर नर्मदेचे छान दर्शन
झाले आणि सारा थकवा निघून गेला.
तेथील ग्वारी घाटावरील नर्मदा आरती बघण्यासारखी आहे. आठवण झाली ती काशीच्या गंगा आरतीची.
No comments:
Post a Comment