Friday, June 9, 2023

ज्ञानोबांची ज्ञानदेवी, सोपानाची सोपानदेवी, विनोबांची गीताई

ज्ञानोबांची ज्ञानदेवी
सोपानाची सोपानदेवी
विनोबांची गीताई
मंजुश्री गोखले यांचे 'ज्ञानसूर्याची सावली' ही सुंदर कादंबरी वाचायला घेतली. सोपानदेवांच्या 'सोपानदेवी'चा शोध लागला. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी अनेकदा वाचायला घेतली पण प्राकृत भाषेमुळे मला ती फारशी समजली नाही. संस्कृतमधील भगवदगीता समजणे कठीणच होते; कारण संस्कृत ही भाषा मला येतच नसल्यामुळे ती समजणे शक्य नव्हते. विज्ञान तंत्रज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे इंग्रजी भाषा येत होती, त्यामुळे स्वामी चिन्मयानंद यांची गीतेवरील प्रवचने ऐकली असल्यामुळे त्यांची गीतेवरची पुस्तके वाचली आणि माझी गीतेशी ओळख झाली. महाविद्यालयात असतांना विनोबा भूदान चळवळीच्या पदयात्रा करीता औरंगाबादला आले होते तेंव्हा त्यांना एकदा पहावे म्हणून त्यांच्या भाषणाला गेलो होतो. त्यावेळी बुकस्टॉलवर 'गीताई' चे पुस्तक हाती पडले आणि 'गीताई' वाचल्यामुळे गीतेचा अर्थ समजू लागला. विनोबांच्या आईला संस्कृतमधील गीता माहित होती पण समजत नव्हती. त्या विनोबांना म्हणाल्या ,' विनू , तूच गीता मराठीमध्ये लिही म्हणजे मला आणि इतरांना ती समजण्यास मदत होईल'. त्यांची आई असेपर्यंत विनोबा गीतेचे मराठी रूपांतर करू शकले नाहीत. आई गेल्यानंतर पंधरा वर्षांनी विनोबांनी 'गीताई' लिहिली. अनेकांना त्यामुळे गीतेची ओळख झाली. गीताईचे मी जेंव्हा जेंव्हा वाचन करतो तेंव्हा तेंव्हा मला गीतेचा अर्थ अधिक स्पष्ट होत जातो.
ज्ञानेश्वरांची ज्ञानदेवी म्हणजे भगवदगीतेवरील प्राकृतात केलेले भाष्य आहे.
'माझी मराठीची ये बोल कौतुके I
परी अमृताते ही पैजा जिंके I
ऐसी अक्षरे रसिके मेळवीन I I ,
असे ज्ञानदेव म्हणाले आणि अमृताची अवीट गोडी असलेला ज्ञानेश्वरी हा ग्रंथ त्यांनी लिहिला. ती प्राकृत भाषा आज कोणालाही फारशी समजत नाही. त्यावेळी सुद्धा ही प्राकृत समजणे अवघडच होते. त्यावेळच्या बहुजन समाजाला ज्ञानेश्वरी समजत नव्हती. सोपानदेव ज्ञानेश्वरीतील काही ओव्यांचा अर्थ भक्तजनांना समजावून सांगत होते. चोखोबा सोपानदेवांना म्हणाले, "सोपानदेवा, ज्ञानेसरी तुम्ही वाचताय आणि आम्हाला अर्थ समजावून देताय म्हणून आम्हाला थोडं थोडं समजतंय; पण ज्ञानोबा माउलीची भाषा निसती वाचुन कोणालाच समजत नाही. त्या भाषेचे वैभव मोठं आहे. माउली बोलू लागते आणि आमचे डोळे दिपून जातात; पण आम्हाला समजत न्हायी काही". त्यावेळी शेजारी बसलेले सावता माळी म्हणाले, " सोपाना , आमचे जाऊ दे, अनंतभट पण हेच म्हणत होता". सोपानाच्या हे लक्षात आलं . निवृत्ती दादाबरोबर बोलताना त्यांनी हा विषय काढला. निवृत्ती दादाला हा मुद्दा पटला आणि त्यांनी सोपानदेवांना साध्या सोप्या नागर मराठी भाषेत गीतेवर लिहिण्याचे सुचविले. ते त्यांच्या मागेच लागले व त्यांनी 'सोपानदेवी' हा ग्रंथ लिहून घेतला व गीतेचे ओवीबद्ध भाषांतर करून घेतले. आणि गंमत म्हणजे 'सोपानदेवी' हा ओवीबद्ध ग्रंथ हा सोपानदेवांनी लिहिला आहे का नाही?, या बद्दल मतभेद आहेत. नवव्या , दहाव्या आणि पंधराव्या अध्यायातील ओव्यात 'सोपान म्हणे' असा उल्लेख आढळतो. मग हा सोपान कोण ?
मंजुश्री गोखले यांच्या ललित लेखन असलेल्या "ज्ञानसूर्याची सावली" ह्या कादंबरीत १८ अध्यायातील अनेक ओव्या दिल्या आहेत. त्या वाचताना मी आश्चर्यचकित झालो. हा १८ अध्याय असलेला गीतेचा मराठी अनुवाद आहे. तो खूप साधा, सोपा आणि सर्वांना सहज समजणारा तर आहेच. ही ओवीबद्ध सुंदर आणि देखणी रचना आहे . ती समश्लोकी गीता आहे.
सोपानदेवीची प्रत आळंदीला दत्त बुक डेपोकडे मिळते असे मला समजले. मी त्यांच्याकडून पुस्तक मागविले आहे. नंतर इंटरनेटवर शोध घेतला असता ई साहित्य प्रतिष्ठान ह्यांच्या वेबवर हे पुस्तक सहज उपलब्ध झाले. गंमत म्हणजे माझ्याकडे विनोबांची 'गीताई' आहे. मी गीताईतील श्लोक आणि सोपानदेवीतील ओवीबद्ध गीता यांची तुलना करू लागलो. दोन्हीही अतिशय साधे, सहज समजणारे सुंदर लिखाण वाचून मी खूप आनंदून गेलो. मी माहितीसाठी दोघांची एक ओवीबद्ध / श्लोक रचना देत आहे.
सोपानदेवी (अध्याय दुसरा ओवी २२)
जैशी वस्त्रे जीर्ण जालीयावरी I
पुरुष नवी वस्त्रे परिधान I I
तैसे देहभोग त्यजूनि दुरी I
आत्मा आणिक देहि व्रतें करी I I
गीताई (अध्याय दुसरा ओवी २२)
सांडूनियां जर्जर जीर्ण वस्त्रे I
मनुष्य घेतो दुसरी नविन I I
तशीच टाकुनि जुनी शरीरे I
आत्मा हि घेतो दुसरी निराळी I I
हे उदाहरण म्हणून दिले आहे. मी अनेक श्लोक आणि ओव्या पहात गेलो. सर्वच ओव्या /श्लोक साधे, सोपे व अर्थपूर्ण गीतेचे भाषांतर आहेत.
मंजुश्री गोखले यांचे पुस्तक माझ्या हाती पडलं आणि वाचताना इतका आनंद देत होतं की 'सोपानदेवी'चा आनंद घेताना मला एक वेगळाच अध्यात्मिक आनंद मिळत होता.

*****

No comments:

Post a Comment