Wednesday, March 22, 2023

नर्मदा परिक्रमा

त्वदीयपादपंकंजं नमामि देवि नर्मदे !



 मी तसा जगभर प्रवास केला आहे. दरवर्षी कुठे जायचे हे ठरवित असतो. वर्षातून एकदा देशांत आणि एकदा परदेशांत दौरा करायचा असे ठरलेलं असते. शालेय जीवनात असतांना गो. नी. दांडेकरांची “कुणा एकाची भ्रमण गाथा” हे पुस्तक वाचले होते. खूप प्रभावित करणारे ते लिखाण. त्यांनी त्यावेळी केलेली नर्मदा परिक्रमा आठवली. आपणही अशीच नर्मदा परिक्रमा करावी असे त्यावेळपासून मनात येत असे. वयाच्या 76व्या वर्षी आपल्याला नर्मदा परिक्रमा पायी करणे शक्य नाही, हे माहीतच होते. कैलास मानसरोवर यात्रा करून १५ वर्षे झाली होती. त्याची आठवण झाली. काठमांडू ते मानसरोवर हा १८०० किलोमीटर येण्याजण्याचा तो प्रवास आठवला. त्यावेळी ब्रम्हपुत्रेच्या काठाकाठाने केलेला तो प्रवास आठवला. कैलासाच्या अगदी समोर आमचा तंबू टाकला होता. कैलासाचे ते विलोभनीय दर्शन आजही आठवते. कैलास म्हणजे भगवान शंकराचे निवासस्थान. तेथे कुठलेही मंदिर नव्हते. 
‘कैलासाच्या वृद्ध पतीने वरिले, त्रिजटेवरी धरिले’, ही कविता आठवली. कैलास पर्वत तर समोरच उभा होता पण शंकर दिसले नाहीत. एक मात्र विशेष जाणवले. मी कैलासाला स्पर्श केला आणि देवालाच स्पर्श केला अशी मला अनुभूति मिळाली. I had a feeling of touching a God. 

नर्मदा ही तर शंकराची मुलगी. मग लक्षात आले ते आद्य शंकराचार्य यांनी लिहिलेले नर्मदाअष्टक. त्यातील ती ओळ .
त्वदीयपाद पंकंजं नमामि देवि नर्मदे ! मनाने निश्चय केला की नर्मदा परिक्रमा करायलाच पाहिजे. काही दिवस भौतिक जगापासून सुटका करून घ्यायची. वादविवाद, कागाळी, निंदा-स्तुति यापासून दूर जायचे व चिंतामुक्तीचा अनुभव घ्यायचा. स्वभाव तसा बदलत तर नसतोच. भौतिक जगापासून सुटका तर हवी. आपण वानप्रस्थाश्रम तर स्विकारणारे नाहीत. आपल्याजवळ  वैराग्यवृत्ती तर नाही. आपल्याला भारतीय संस्कृती आणि निसर्गविषयी खूप  प्रेम  तर आहेच. नदी – सागर – पर्वत या निसर्गाविषयी एक श्रद्धायुक्त कृतज्ञता आहे. निसर्ग हीच खरी देवता, हे वेदपूर्व काळापासून आपण मानतो. नदी म्हणजे जीवनदायिनी. नदीच्या काठीच जीवन प्रारंभ होते. 
आपल्या नद्या तर जीवनदायिनी. 



गंगा ज्ञान देते, यमुनेत भक्तिरस सांपडतो, ब्रम्हपुत्रा तेज वाढविते, गोदावरी ऐश्वर्य देते, सरस्वती विवेक जागा करते, नर्मदेला कधीच न आटण्याचे वरदान लाभले आहे. भारतीय संस्कृतीत या नद्यांना अनन्य साधारण महत्व आहे.  

 विंदय-सातपुडा या पर्वत रांगातून खळखळत वहाणारी ही नर्मदा एका अवखळ मुलीसारखी आहे. ती अन्नपूर्णा आहे, नर्मदेचा आजूबाजूचा परिसर ही  ऋषीमुनींची तपोभूमी आहे. तिच्या बाजूने प्रवास केला तर उमटणारे आनंदतरंग अनुभवणे  विलक्षण आहे. मार्कंडेय ऋषिनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली आणि मार्कंडेयपुराण लिहिले. नर्मदेच्या तटाकी त्यांनी  खडतर तपस्या केली. अशी ही नर्मदा अध्यात्मिक, धार्मिक आणि भौगोलिक दृष्ट्या तितकीच महत्वाची आहे. 

कैलास परिक्रमा, अयोध्या परिक्रमा, चारध्याम यात्रा जशा महत्वाच्या आहेत तशीच नर्मदा परिक्रमा मानसिक स्थैर्य देणारी आहे. म्हणूनच पांडव आणि कौरवही या परिक्रमेला गेले होते. पापक्षालन करण्याचा मार्ग ह्या नर्मदा मातेने त्यांना दाखविला. परिक्रमा करायचे तर ठरले होते. माझा मित्र आणि साडू असलेल्या डॉ.मधुकर दंडारे यांच्याबरोबर चर्चा चालू झाली. अनेक टुर कंपन्याकडून माहिती मिळविली. परिक्रमेचे चित्र स्पष्ट होऊ लागले. सुरुवातीला छोटा ग्रुप करून निघावे असे वाटत होते. शेवटी पुण्याच्या भाग्यश्री टूर्स ह्या कंपनीची १५ दिवसाची टुर करायचे ठरविले. 
त्या कंपनीचा एक टुर गाईड सहज बोलून गेला. “नर्मदा परिक्रमा ही एक ‘यात्रा’ आहे. यात्रा म्हणजे ‘यातना’ आणि ‘त्रास’ असतो. तेंव्हा ही काही सहल नाही”. आम्ही १५-१६ यात्रेकरू होतो. त्यात आम्ही दोनच पुरुष होतो. बाकी सर्व स्त्रीयाच होत्या. आम्ही सहा नातलग होतो. आम्ही तसे धार्मिक नव्हतो. अनेक कथा-दंतकथा यावर आमचा फारसा विश्वास नव्हता. अर्थात ही परिक्रमा तशी धार्मिक/अध्यात्मिक होती.

धर्म हा तसा महत्वाचा असतोच. आपल्या सनातन धर्माची अनेक वैशिष्ट्ये आहेतच. त्यातील अनेक संकल्पना नीट समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. आपल्या देशात अनेक नद्या आहेत. पर्वत रांगा आहेत. समुद्र किनारे आहेत. आपला भौगोलिक इतिहास आहे. आपल्या भारतीय संस्कृतीची खास वैशिष्ट्ये आहेत. नर्मदा ही नदी तर वैराग्याची अधिष्टात्री आहे, असे म्हणतात. हा सत्संग कथा-कीर्तनातून घडतो. रोज नर्मदेत स्नान करायचे, नवा संकल्प सोडायचा, नर्मदेच्या दक्षिणतटाला ओलांडून उत्तरतटाकडे जायचे नाही. ओंकारेश्वर किंवा अमरकंटक पासून प्रवास सुरू करायचा व तेथेच संपवायचा. हा एक धार्मिक नियम आहे. हे नियम यात्रेत पाळणे आवश्यक आहेच. ते आम्ही पाळले. 

ओंकारेश्वर हे इंदूरपासून ८० किलोमीटर दूर आहे. तेथून ही यात्रा सुरू झाली. ओंकारेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक. ममलेश्वर हे त्यापैकीच एक पण ते दुसऱ्या तटावर आहे. तसे ते अर्धे ज्योतिर्लिंग. ज्या नागर घाटावर आपण सुरवातीची संकल्प पूजा करतो त्याच बाजूला ममलेश्वर मंदिर आहे. तर ओंकारेश्वर दुसऱ्या तटावर आहे. तेथे एक जूना पूल आहे. तो ओलांडून जायचा नाही. परिक्रमा संपल्यानंतर नर्मदेचा जलाभिषेक ओंकारेश्वरला महादेवाच्या पिंडीवर करावयाचा असतो. तेंव्हाच आपली परिक्रमा पूर्ण होते. अशी ही नर्मदा परिक्रमा म्हणजे आपले जीवन बदलून टाकणारा एक आगळावेगळा अनुभव आहे. खरं म्हणजे ही परिक्रमा पायीच करावयास हवी. त्यासाठी ३ वर्षे, ३ महीने आणि १० दिवस (१०८ दिवस) लागतात. हा प्रवास २६२४ किलोमीटर आहे. नागर घाटावर मी सपत्नीक संकल्प पूजा केली. तो अनुभव वेगळाच होता. हा घाट फारच सुंदर आहे. संकल्प आणि सिद्धी ह्या दोन्ही पूजा याच घाटावर केल्या. ही संकल्प पूजा झाल्यानंतर घाट उतरून नर्मदेचे पाणी एका बाटलीत भरून घ्यायचे. त्या नर्मदा जलाची रोज पूजा करावयाची व संध्याकाळी सर्वानी जेवणापूर्वी  सामूहिक नर्मदा आरती करावयाची. ही नर्मदा आरती नर्मदेचे फारच सुंदर वर्णन करते. ही एक निसर्ग कविता आहे. 

आद्यगुरु शंकराचार्यानी एक नर्मदाषट्क लिहिले आहे. ते ह्या नदीचे महत्व सांगते.
अलक्षलक्ष – लक्षपाप – लक्ष – सार – सायुधं,
ततस्तु जीव – जंतुतंतु – भुक्तिमुक्ति दायकम !
 
दुरंत – पाप – ताप – हयरि – सर्व जंतु – शर्म दे ! 
त्वदीयपादपंकंजं नमामि देवि नर्मदे !! 

सुलभ्य देहदुर्लभं  महेषधाम  गौरवं ! 
पुनर्भवा नरा न वै विलोकयंति रौरवं !!
 
 ह्याच घाटावर ५ कुमारिकांचे पूजन करतात व त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतात. ही तशी धार्मिक कल्पना असली तरी माणसाच्या आयुष्यात स्त्रीचा गौरव करण्याची ही संकल्पना किती सुंदर आहे! आपण ह्या संकल्पनेकडे या दृष्टीने बघायला हवे. त्या घाटावर पाच कुमारिका भेटल्या. त्यांची गरीबी तर दिसून येत होतीच. पण दान देणं हा विचार खूप महत्वाचा आहे. तशी कृती परिक्रमेत करणे हे उत्तम. 
“देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे”, असे म्हणणाऱ्या विं. दा. करंदीकर यांची मला आठवण झाली. खरं आहे, एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत. या वाक्याची आठवण झाली. 

 एका हिन्दी कवीच्या शब्दात नर्मदा मैयाचे वर्णन असे आहे .. 
 हम रेवा मा के बालक है, 
 मैया दूध पिलावत है!

 मैया अमरकंठवाली 
 कि तुम हो भोली भाली 
 तेरे गुण गावत है, 
 निर्धनिया को धन देती हो, 
 अज्ञानी को ज्ञान I 
 अभिमानी का मान घटाती, 
 खोती नाम निशान II 
 मैया की गलिया आडी – तेडी, 
 हम से चलो न जाय I 
 घर बैठे ही दर्शन दिखादो 
 जीवन सफल हो जाय II 

नर्मदा संकल्प पूजा 




 नर्मदा – जगदानंदी 
 मैया जय आनंदकरणी II 
 मैया सुरमंडल रमती 
 अमरकंटक से विराजत, घाटन घाट विराजत
 नमामी देवी नर्मदे I

अमरकंठ निज धाम  तुम्हारा दो धारा के बीच I
जहां  शिवशंकर करे तपस्या उच्य शिखर कैलाश II 







No comments:

Post a Comment