Friday, August 19, 2022

घाचर घोचर: विवेक शानबाग

Ghacher Ghochar: Vivek Shanbhag
प्रसिद्ध कन्नड लेखक विवेक शानबाग यांची Ghacher Ghochar ही कादंबरी वाचायला घेतली. श्रीनाथ पेरूर यांनी ह्या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद केला आहे. विवेक शानभाग यांची आज पर्यन्त कथेची ५ पुस्तके, २ नाटके आणि ३ कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या असून त्या सर्व कन्नड लेखनाचे इंग्रजीत भाषांतर झालेले असल्यामुळे त्यांना जागतिक वाचक वर्ग लाभला आहे. ते स्वत: इंजिनियर आहेत आणि त्यांनी ‘देश काला’ हे कन्नड पाक्षिक ७ वर्षे संपादन केले आहे. घाचर घोचर ही ११५ पानाची सुटसुटीत असलेली एक छोटी कादंबरी अतिशय अर्थपूर्ण आणि खूप काही सांगून जाणारी उल्लेखनीय कादंबरी आहे. अनेक मोठे कादंबरीकार ५००/७०० पानाच्या कादंबऱ्या लिहितात. त्या वाचताना कंटाळा येतो आणि वेळही खूप जातो. कादंबरी अशीच सुटसुटीत असावी. विवेक शानभाग यांचा उल्लेख साहित्य जगतात Indian Chekov असा करतात हे एक विशेष. ह्या कादंबरीबद्दल जगभरच्या सर्व प्रसिद्ध वर्तमानपत्रातील कॉलम मधून समीक्षकानी तोंड भरून कौतुक केले आहे. ते वाचताना एक लक्षात आलं की एका कन्नड कुटुंबाची ही भारतीय देशी कथा जगातील विदेशी वाचकाना आवडली कशी? म्हणूनच मी ही कादंबरी वाचायला घेतली आणि मला ती खूप आवडली. ह्या कादंबरीत एक मध्यमवर्गीय छोटे कुटुंब आहे. सेल्समन असलेले पन्नाशीचे वडील, त्यांची बायको, त्यांचा एक मुलगा आणि एक मुलगी आणि एक फारसे काहीच न करणारा व अवलंबून असलेला त्यांचा एक भाऊ. अशी माणसं आपण आजूबाजूच्या कुटुंबात पहात असतो. त्यांचं जगणं हे तसे सर्व सामान्य माणसासारखे असते. आर्थिक विवंचना तर मागे असतातच. मध्यमवर्गीय कुटुंबाला भेडसावणारे आर्थिक प्रश्न नेहमीचेच असतात. त्यामुळे त्यांची तयार झालेली मानसिक वृत्ती.
पैसा कमविणे तर आलेच पण खर्च कसं भागवायचा हाच प्रमुख प्रश्न. त्यामुळे वैतागलेले कुटुंब. त्यांचा ध्यास असतो अधिक पैसे मिळवण्याचा. मध्यमवर्गीय जीवनातून जायचे असते उच्च मध्यमवर्गीय जीवनाकडे. व्हायचे असते Neo Rich. अशी ही भारतीय कुटुंबाची कथा विदेशी वाचकाना का बरे आवडली असावी? विवेक शानभाग ह्यांच्या कादंबरीला हे असंख्य वाचक कसे आकर्षित झाले असतील? ते त्यांना जमलं आहे ह्याचे कारण त्यांची सुरेख भाषाशैली. गोष्ट सांगण्याची त्यांची पद्धत. सामान्य माणसाच्या स्वभावातील उकलून दाखविलेले धागेदोरे. सामान्य माणसांच्या सुखदु:खातील प्रसंग वर्णने. वाचक नकळत कादंबरीतील पात्रात गुंतत जातो. त्याला ही आपल्या अवती भोवतीची ओळखीची माणसं वाटू लागतात. तो त्या पात्रातून आपल्या आजूबाजूच्या माणसाचा शोध घेऊ लागतो. ही माणसं जगभर तशीच असतात. त्यामुळे वाचकाला आपण ही त्यापैकी एक आहोत असे वाटू लागते, वाचक माणूसशोध करत कादंबरी वाचत जातो. वाचकाला कथेत कसे गुंतवायचे हे विवेक शानबाग यांना फार छान जमले आहे. ह्या कादंबरीत लेखकाने मांडल्या आहेत त्या कुटुंबाच्या आर्थिक समस्या. एके ठिकाणी ते लिहितात.. “It is true what they say – it is not who control money, it is the money that controls us. When there is only a little , it behaves meekly; when it grows, it becomes brash and has its way with us”. पैशाबद्दल मांडलेले हे एक सत्य. हे आपल्याला लक्षात येते. कनिष्ठ मध्यमवर्गातील माणसं जेव्हा उच्च मध्यमवर्गीय आयुष्य जगू लागतात तेव्हा त्यांना पैसा वेगळा दिसू लागतो. त्यांची खर्च करण्याची प्रवृत्ती बदलू लागते. पैसा आपले जीवन बदलून टाकतो आहे, हे लक्षात येऊ लागते. छोट्या चाळीच्या घरातून जेव्हा कुटुंब दोन मजली बंगल्यात राहायला जाते तेव्हा त्यांची Life Style बदललेली असते. माणसं बदललेली असतात. जगण्याचे नवे स्वातंत्र्य त्यांना बदलून टाकते. त्यांची मने बदललेली असतात. ह्या कादंबरीचा नायक म्हणजे त्या कुटुंबातील मुलगा आपल्याशी संवाद साधत असतो. त्याला माहीत असते की त्याने काहीही विशेष प्रयत्न न करता तो त्याच्या काकाच्या छोट्या उद्योगामुळे कंपनीचा संचालक झालेला आहे. आणि काहीही काम न करता कंपनीकडून भरपूर पगार घेत आहे. तसा तो एकाकी जीवन जगत असल्यामुळे तो रोज एका कॉफी हाऊसमध्ये जाऊन वेळ काढताना तेथील वेटर बरोबर गप्पा मारीत आपले मन मोकळे करीत असतो. बायको असूनही तो तिच्याबरोबर बोलू शकत नाही. त्याची घटस्फोट घेतलेली बहीण ही असेच दुर्दैवी एकटेपण भोगीत असते. अकाली नोकरी गेलेले वडील आपल्या भावाबरोबर छोटासा उद्योग उभा करण्यासाठी नोकरी गेल्यानंतर मिळालेला फंड भांडवल म्हणून भावाच्या व्यवसायात गुंतवतात आणि काहीच न करणाऱ्या मुलाच्या पोटापाण्याची व्यवस्था करतात. त्यांचा भाऊ मिळालेल्या भांडवलामुळे व्यवसाय सुरू करतो आणि त्याचा धंदा जोरात चालतो. त्यामुळे कुटुंबाकडे पैशाचा ओघ सुरू होतो. हा पैसाच त्यांचे जगणे बदलून टाकतो. अशी ही कौटुंबिक यशाची आणि अपयशाची सामान्य कहाणी. विवेक शानभाग हीच कहाणी नाट्यमय पद्धतीने आपल्याला सांगत असतात. तशी ही एक साधी कुटुंब कथा. कुटुंबातील माणसांच्या मनात चाललेले द्वंद. कादंबरीकार हे कुटुंबनाट्य आपल्यासमोर उभे करतो. आपण ह्या पात्रात नकळत गुंतत जातो. अशी ही कादंबरी तुमचीआमची. The New Yorker मध्ये ह्या कादंबरीवर लिहिताना समीक्षक लिहितो, “It is a classic tale of wealth and moral ruin and a parable about capitalism and Indian Society”. Kirkus Reviews writes,“A compact novel that crackles with tension.’ Suketu Mehta says, “ Vivek Shanbhag is an Indian Chekov”. *****

No comments:

Post a Comment