Tuesday, August 9, 2022

कमला मार्कंडेय: Nectar in a Sieve

पार्थ हा माझा नातू. अलीकडेच आम्हाला भेटण्यासाठी दिल्लीहून बंगलोरला जाताना मुंबईला आमच्याकडे आला. तो दिल्लीला एस.आर.सी.सी.मध्ये पदवी शिक्षणासाठी होता. त्याचे वाचन तूफान. लिहितोही खूप छान. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व. गप्पा मारताना त्याला सहज विचारले, ‘अलीकडे कोणती पुस्तके वाचली आहेस?’. त्याने लगेच बॅगेतून काही पुस्तके काढून माझ्यासमोर ठेवली आणि मी ती पुस्तके चाळू लागलो. त्यात इंग्रजी कथा-कादंबऱ्या होत्या. मी फार थोड्याच गाजलेल्या इंग्रजी कादंबऱ्या वाचल्या असतील. माझे जे काही वाचन झाले आहे ते शाळा-महाविद्यालयात असतानाच. नंतरच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात मला दीर्घ कादंबऱ्या वाचने वेळे अभावी तसे कठीणच होते . गेल्या दहा वर्षात वाचन हाच माझा विरंगुळा आहे. पार्थची पुस्तके चाळताना Nectar in a Sieve हे कमला मार्कंडेय ह्यांचे पुस्तक वाचायला घेतले आणि एका बैठकीत वाचून टाकले. पुस्तकाच्या मलपृष्ठावर शशी थरूर ह्यांनी ह्या लेखिकेविषयी जे लिहिले आहे ते विशेष लक्षवेधी होते. ते लिहितात, ‘कल्पना मार्कंडेय ह्या ब्रिटिश भारतीय लेखिकेने भारतीय लेखकांना इंग्रजी कथा-कादंबऱ्या लिहिण्यास प्रोत्साहित केलं’. Nectar in a Sieve ही कादंबरी त्यांनी १९५४ लिहिली. भारतीय ग्रामीण जीवनावर इंग्रजीत लिहिलेली ही कादंबरी जगभर लोकप्रिय व्हावी, हे ह्या लेखिकेचे मोठेच कर्तृत्व आहे आणि त्यामुळे इतर भारतीय लेखकांना इंग्रजीतून लिहिण्यासाठी स्फूर्ती मिळणे साहजिकच आहे. जगातील १७भाषेतून ही कादंबरी भाषांतरीत झालेली आहे आणि तिचा खप वीस लाखाहून अधिक झालेला आहे. अशी ही लोकप्रिय कादंबरी आहे.
कल्पना मार्कंडेय (१९२४-२००४) ह्या म्हैसूरच्या एका मध्यमवर्गीय मध्व कुटुंबातील. त्यांनी मद्रासच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी मिळविली आणि पत्रकारीतेत काही वर्षे काम केलं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर म्हणजे १९४८साली त्या इंग्लंडला गेल्या आणि तेथेच स्थाईक झाल्या. Taylor ह्या लेखक/ पत्रकाराशी त्यांचा विवाह झाला. १९५३साली त्यांनी ही पहिलीच कादंबरी लिहिली आणि त्यांना भरपूर प्रसिद्धी आणि यश मिळाले. त्यांच्या दहा कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या कथाही खूप गाजल्या. एक Indian Novelist in English असा American Library Association Notable Book in 1955 सन्मान त्यांना मिळाला. म्हैसूर जवळील एका खेड्यात नाथन हा भातशेती करणारा एक शेतकरी. त्याच्या कुटुंबाची ही दर्दभरी कहाणी. १९४८-५१चा तो काळ. एका गरीब दरिद्री कुटुंबाचे ते हलाखीचे ते दिवस. नाथन, त्याची बायको रुक्मिणी, तिची मुलगी इरा आणि पाच भाऊ. ह्यांची ही कहाणी. त्याकाळचे ते ग्रामीण जीवन. मी ही कादंबरी वाचू लागलो तेव्हा मला आठवली ती व्यंकटेश माडगूळकरांची ‘बनगरवाडी’ ही कादंबरी. दक्षिण महाराष्ट्रातील ती मानदेशी माणसं. भातशेती करणारा नाथन जेव्हा वाचू लागलो तेव्हा मला आठवले ती श्री. ना. पेंडसे ह्यांची ‘तुंबाडचे खोत’ ही कादंबरी आणि कोकणातील ती माणसं. बनगरवाडी हे पुस्तक आम्हाला अकरावीला नॉनडिटेल म्हणून अभ्यासक्रमात होते. त्यामुळे त्याचा खूप बारकाईने अभ्यास केला होता. हे दोन्हीही लेखक आणि कल्पना मार्कंडेय हे एकाच काळातले. (१९२०-२००९). कमला मार्कंडेय म्हैसूरच्या तर व्यंकटेश माडगूळकर दक्षिण महाराष्ट्रातील. पेंडसे कोकणचे. ह्या तीनही कादंबऱ्यातील पात्रे आणि जनजीवन हयात खूपच साम्य आहे. गरीबी तर सर्वत्रच तशीच होती आणि आजही आहेच. कोकणातला खोत असो का म्हैसूर जवळच्या खेड्यातला नाथन असो. दोघांचेही जगणे सारखेच. प्रश्न ही तसेच. माणसंही तशीच. दारिद्र्य आपण नेहमीच सर्वत्र बघतो. सर्वच भारतीय कुटुंबाचे जगणे तसे सारखेच. ही माणसं आपल्या रोजच्या जीवनात आपण जवळून पहात असतोच. असं असूनही कमला मार्कंडेय ह्यांची ही कादंबरी पुढे वाचवीशी वाटते. अशा विषयावर अशी कादंबरी लिहून जगातील वीस लाखाहून अधिक वाचकांना आकर्षित करणे तसे सोपे नाही. ते एक आश्चर्यच आहे. अशा कादंबरीकडे लक्ष वेधून घेणे सोपे नाही. हे त्यांना कसे जमले असेल असा मी विचार करतो तेव्हा माझ्या लक्षात आलं ते ह्या लेखिकेचे भाषासामर्थ्य! तशी ही कादंबरी ही प्रेमकहाणी नाही किंवा तरुणांचे मनोरंजन करणारी एखादी गोष्टही नाही. आपण ही कादंबरी वाचत राहतो ह्याचे प्रमुख कारण म्हणजे ह्या लेखिकेचे भाषावैशिष्ट्य. साधीसोपी भाषा असली तरी इंग्रजी भाषेतील शब्दांचे वेगळे सौन्दर्य. व्यक्त करण्यासाठी वापरलेले असंख्य इंग्रजी शब्द. ते आपल्याला अपरिचित असले तरी वाक्यरचनाच इतकी सुरेख आणि बोलकी की आपण ही कादंबरी पुढे वाचत जातो. ह्या कादंबरीतील नाथन, रुक्मिणी, इरा ही आपण पाहिलेली आपल्या आजूबाजूचीच माणसं. आपल्याच जीवनातील. त्यांच्या भावभवना ह्या आपल्याच असतात. आपल्याच जवळच्या माणसांच्या असतात. विशेष म्हणजे जगातील वीस लाख वाचकाना ही माणसं आणि त्यांची दु:खे आपली वाटावीत हेच खूप काही सांगून जातं. Nectar in Sieve हे कादंबरीचे नाव कमला मार्कंडेय हयानी घेतले आहे ते Samuel Taylor Coleridge ह्यांच्या १८८५ च्या “World Without Hope” ह्या एका कवितेतून. तसं हे नाव खूपच बोलकं आहे आणि खूप काही सांगून जातं. ह्या मथळ्याचा अर्थ असा.. “Hope or Sweetness in Life (Nectar म्हणजे अमृत). It is difficult to hold on to almost like trying to carry in Sieve(Strainer). Nectar म्हणजे मध, मधुरस, मकरंद – मधमाश्या फुलातून गोळा करतात तो मध. Sieve म्हणजे चाळणी / गाळणी. ह्याचा थोडक्यात अर्थ असा की आपल्या ह्या दरिद्री जीवनातील मध (म्हणजे आनंद) गोळा करून जगणे. हेच नाथन- रुक्मिणी आपल्याला सांगत असतात. खरं म्हणजे रुक्मिणीच आपल्याशी बोलत असते. कमला मार्कंडेय आपल्याशी बोलत असतात ते रुक्मिणीच्या संवादातून. त्या एके ठिकाणी म्हणतात, “Change I had known before, and it had been gradual. But the change that now came into our life, into all our lives, blasting its way into our village, seemed wrought in the twinkling of an eye”. असे हे खूप समर्पक शब्द. अशी शब्दाची उधळण त्यांच्या भाषेतील सौंदऱ्यातून जागोजागी दिसून येते. ह्या कादंबरीत नाथन कुटुंबाच्या दारिद्र्याचे भयानक दर्शन उभे केले असले तरी आशेच्या पाठीमागे जाऊन नवा मार्ग शोधणारी रुक्मिणी लक्षात राहते कारण समोर येणाऱ्या नव्या निराशेचे ढग बघून पुनः निराश होण्याची वेळ आली तरी न डगमगणारी ती वेगळी स्त्री आहे. आहे नाही ते गमावल्यानंतर काहीच हाताशी नसताना जगायचे कसे हे सांगणारी रुक्मिणी- नाथन आणि त्यांच्या कुटुंबाची ही कहाणी दर्दभरी आहे तशीच खूप काही सांगणारी आहे.
*****  

No comments:

Post a Comment