Sunday, May 22, 2022

त्रिपर्ण - मोनिका गजेंद्रगडकर

देशी – विदेशी – अदेशी कथासंग्रह
खूप मोठ्या म्हणजे ४०-५० पानाच्या दीर्घकथा वाचायचा मला फार कंटाळा आहे. फार मोठ्या कादंबऱ्या वाचण्याइतकेच ते अवघड काम आहे. मला लघुकथा आवडतात. थोडक्यात लिहिणारे काही लेखक तसे खूप काही सांगून जातात. मोनिका गजेंद्रगडकर ह्यांच्या काही कथा मी दिवाळी अंकातून वाचल्या होत्या. त्या एक आघाडीच्या कथाकार आहेत, हे मला माहीत आहे. त्यांचे ‘त्रिपर्ण’ हे कथेचे पुस्तक माझ्या हाती आलं. तीनच कथा असलेले हे पुस्तक. त्यातील २४ पानांची त्यामानाने छोटी असलेली ‘फ्लेमिंगो’ ही कथा प्रथम वाचावयास घेतली. ती आवडली. देशी-विदेशी माणसांची ही कथा. एका एन.आर.आय. असलेल्या माणसाची आणि त्याच्या छोट्या कुटुंबाची ही दर्दभरी कहाणी. ४०-५० वर्षापूर्वी परदेशी स्थलांतरीत झालेल्या अनेक भारतीय कुटुंबातील ५-१० कुटुंबात तरी अशा कथा ऐकावयास मिळतात. अशा एन.आर.आय.चे वृद्ध मातापिता आपल्या आजूबाजूलाच रहात असतात. त्यांच्या दु:खाची आपल्याला थोडीशी कल्पना असते. सुरवातीला शिक्षणासाठी गेलेले हे भारतीय तेथे पैसा आणि प्रतिष्ठा मिळविल्यानंतर तेथील विदेशी मुलीबरोबर संसार थाटतात. पहिली काही वर्षे ते भारतात आई-वडिलांना भेटायला येतात. आई-वडिलही एक-दोनवेळा त्यांच्याकडे जाऊन येतात व आपल्या मुलाच्या कर्तृत्वावर खूश होतात. तेथील संसारात रमलेला हा मुलगा नंतर वृद्ध आई-वडिलांच्याकडे फारसे लक्ष देत नाही. हे तर आपण आजूबाजूला पहात असतोच. ह्या कथेतील असाच एक भारतीय मुलगा. त्याचे दुर्दैव;आणि तो तरुण वयातच जातो. त्याला सॅम नावाचा एक मुलगा असतो. त्याची आई तिकडलीच असते. आणि अचानक सॅम् आणि त्याची आई सॅमच्या आजोबा-आजीला भेटायला भारतात येतात. तो आजोबा-आजीला एक सुखद धक्काच असतो. सॅमसारखा परक्या भूमीत रुजलेला हा मुलगा फ्लेमिंगोसारखा स्थलांतर करून आजोबा-आजीला भेटायला भारतात येतो. आपल्या वडिलांचे मूळ शोधायला तो येतो खरा; पण ते शोधताशोधता त्याला स्वत:चे स्वत्व गवसते. त्याचीच ही आपल्या मनाला चटका लावणारी कहाणी. ही कथा मला आवडली म्हणून पुस्तकातील इतर दोन कथा मी वाचल्या. मोनिका गजेंद्रगडकर ह्या आपल्या कथातून डोरोथी, इसाबेला, जेसी, केटी ह्या परदेशी स्त्रियांच्या व्यक्तिरेखा छान रेखाटतात. मानवी नात्यातील गुंतागुंत शोधताना तेथील मूल्यांचा त्या शोध घेताना दिसतात. एन.आर.आय. जेव्हा तेथील जीवनात स्थिरस्थावर होत असतात तेव्हा नकळत त्यांच्या जीवनात तेथील विदेशी स्त्रियांचा प्रवेश होतो आणि तेथील भिन्न संस्कृतीमुळे त्यांच्यात जगण्याचे नवे ताणतणाव निर्माण होतात. त्यामुळेच त्यांच्या नातेसंबंधात अनेक अडचणी निर्माण होतात. रंग आणि वंश यांच्यातील भेदामुळे जगण्याचे नवे प्रश्न निर्माण होतात. जगातील वर्णभेद फक्त जातीभेदाच्या पोटातून जातात असे नाही. त्याचे उच्चाटन हे होऊ नं शकणाऱ्या एखाद्या रक्तपिपासू, जिवट रोगासारखे असते. ‘वंश’ ह्या कथेतून हेच विदारक सत्य लेखिकेने मांडलं आहे. हे मांडताना कथेतील पात्रांच्या जीवनावर झालेले असंख्य चरे आपल्याला सहज दिसून येतात. ही परदेशी स्थाईक झालेली मुलं आणि त्यांचे इकडे स्वदेशात मदतीशिवाय वृद्धापकाळात जगणारे आई-बाप. हे आजच्या कुटुंब व्यवस्थेतील दु:ख. ह्या भोवतीच ही कथा फिरते. हे दु:ख माणसाचं वयही झटकन पिकवते! वृद्धापकाळातील शारीरिक दुखण्याची नस त्यांना पकडता येते; पण त्यांना झालेल्या मानसिक आजारांची नस आपल्याला पहायला मिळत नाही. मोनिका गजेंद्रगडकर ह्यांनी तीच नस पकडून सुंदर कथा निर्मिती केली आहे. ‘रिलेशनशिप’ हा विषय समजून घेताना त्या एक कथा सांगत जातात. आयुष्यभरासाठी असणाऱ्या रिलेशनशिपला ती संपताक्षणी तिच्या जागी दुसरी रिलेशनशिप उभी करणे हा काही मानवाच्या दु:खावरचा पर्याय नसतो. हेच सांगण्यासाठी त्यांनी ‘सारांश’ ही कथा लिहिली आहे. ही कथा खूप मोठी असली तरी आपण वाचत जातो आणि आपल्या लक्षात येतं की ह्या कथेतील आईला आठवणीवर जगताना असं वाटते की आठवणीनाही असतो एक मूर्त चेहर असतो! त्यालाच चिकटून आहे आपलं जगणं! ह्याच कथेत मोनिका गजेंद्रगडकर कृष्ण आणि जीझस ह्या दोन देवतामधील फरक सांगताना लिहितात.. कृष्ण आणि जीझस दोन्ही गॉड, बट लॉट ऑफ डीफरन्सेस. कृष्ण हसरा, प्रसन्न. त्याचा मुकुटही प्रेशीअस. आणि जीझस ऑलवेज सॅड, ही लूक्स डाऊन आणि कृष्णाची नजर समोर .. तुमच्याकडे पाहणारी .. तरी जीझसच्या वाट्याला त्याच्या जन्मापासून एक काटेरी मुकुट आला .. दु:खवेदनेचा.. दूतच होता ना तो देवाचा! .. जगातल्या सगळ्यांच्या वाटच्या यातना ओळखून त्याने आपल्या मुकूटात त्या एकेका काट्याच्या रूपात खोवून घेतल्या असतील कृष्णाच्या मोरपिसासारख्या! किती सुंदर व्यक्त झाली आहे ही लेखिका! तरीही ती म्हणून जाते .....नाही सापडत माणूस आपल्याला .. माणूस शोध आपण घेत जातो. ह्या तीन दीर्घ कथातून ,,, त्यातील पात्रातून.. कारण ती पात्रे आपल्या आजूबाजूचीच असतात.. ती तुमची-माझी जवळची माणसं असतात .. ही लेखिका ‘सारांश’ ह्या कथेत म्हणते .. आपला जन्म म्हणजे माणूस असण्याचा सुरू झालेला प्रवास .. नि मृत्यू म्हणजे प्रवासाचा अंत नाही, तर मोक्ष! देहमुक्ती .. सगळ्यांच्या पलीकडे पोहोचणे .. स्पर्शापलीकडे, जाणिवापलीकडे आणि ‘स्व’पलीकडे. माणसं गमावण्याचा शाप आपल्याला मिळाला आहे .. हे सांगताना मोनिका गजेंद्रगडकर आपल्याला गीतेचा ‘सारांश’ सांगतात .. गीता म्हणजे .. एक संवाद आहे. कृष्णाने केलेला .. माणसाच्या आयुष्याबद्दलचा, माणसाच्या वाटेला आलेल्या दु:खशोक – यातनांचा, त्याच्या कर्माचा – धर्माचा, भक्तीचा आणि जन्म-मृत्युचाही. गीता तत्व आहे, संगती आहे आणि आत्मशोधाच्या वाटेने घेऊन जाणारा दीपस्तंभही .. गीतेचे हे सार.... ‘सारांश’ ह्या कथेला एक ऊंची देते. मला ह्या तीन कथातून दिसणारी ही देशी-विदेशी-अदेशी माणसं .. खूप काही सांगून जातात आणि मी समजून घेतो जगण्याचा नवा अर्थ. ( मौज प्रकाशन - मार्च २०२१)

No comments:

Post a Comment