Thursday, May 19, 2022

‘थेरॅनॉस’ ‘सिलिकॉन व्हॅलीतील साहसी फसवणूक’

‘थेरॅनॉस’ ‘सिलिकॉन व्हॅलीतील साहसी फसवणूक’ - अतुल कहाते सिलिकॉन व्हॅली म्हणजे जगाला डिजिटल वर्ल्ड बनविणारी एक अनोखी वसाहत. अॅडम फिशर ह्यांचे Valley of Genius हे पुस्तक मी वाचले होते. त्या पुस्तकामुळे सिलिकॉन व्हॅलीत नवे उद्योजक कसे निर्माण होतात ह्याची माहिती झाली होती. अतुल कहाते ह्यांचेी ‘थेरॅनॉस’ हे पुस्तक वाचनालयात चाळत होतो. ‘सिलिकॉन व्हॅलीतील साहसी फसवणूक’ अशी पुस्तकाच्या मथळ्याखालील ओळ वाचली आणि हे पुस्तक वाचण्यासाठी निवडले. हा कादंबरीकार आय.टी.तज्ञ. १७ वर्षाचा अनुभव. अनेक आय.टी. कंपन्यात विविध पदावर काम केलेला. ४०००पेक्षा अधिक ब्लॉगचे लेखन केलेला. अतिशय जवळून ह्या क्षेत्रातील उद्योजकाना भेटलेला. त्याचे पुस्तक म्हणजे भन्नाट असणार अशी खात्री होती. हे पुस्तक एका दमात वाचून टाकले आणि आय.टी. क्षेत्रातील म्हणजे सिलिकॉन व्हॅलीतील फसवणूक करणाऱ्या उद्योजकाचे एक वेगळे विश्व समोर दिसले. जिनिअस माणसे ही सुद्धा फसवणूक करणारे उद्योजक कशी होतात?, ह्याची कहाणी म्हणजे हे पुस्तक. स्टीव्ह जॉब्स आणि बील गेट्स हे दोघे आय.टी. मधील तंत्रज्ञ मंडळींचे आदर्श. त्यांच्यासारखे आपणही उद्योजक व्हावे असे अनेक तंत्रज्ञ आणि इंजिनीअर लोकाना वाटणे साहजिक आहे. रोल मॉडेल असलेली ही मंडळी. एलिझाबेथ अॅन होम्स ही वॉशिंग्टन डीसीत ९ ते ५ नोकरी करणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाची एक हुशार मुलगी. स्टीव्ह जॉब्सच्या कर्तृत्वामुळे खूप प्रभावित झालेली. ‘इनोव्हेशन’चा ध्यास असलेली. नवे तंत्रज्ञान निर्मितीसाठी प्रयत्नशील असलेली. उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणारी. अशी ही एलिझाबेथ. तिला निर्मिती करावयाची असते रक्त चाचण्याशी संबंधित एक छोटे यंत्र बनविण्याची. त्यासाठी ती सिलिकॉन व्हॅलीतील अतिशय हुशार तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांची नेमणूक करते. त्यासाठी सिलिकॉन व्हॅलीतील छोट्यामोठ्या गुंतवणूकदारांना गाठते. नावाजलेल्या डॉक्टरांची आणि औषधकंपन्यांशी संपर्क साधते. अशी ही अतिशय हुशार तरुणी फसवणूक करणारी अट्टल गुन्हेगार कशी होते, त्याची कथा म्हणजे ‘थेरॅनॉस’ ही कादंबरी. हाताच्या बोटाला हलके सुई टोचून क्रेडिट कार्डाच्या आकाराच्या पांढऱ्या डबी सारख्या वस्तूवर रक्ताचे थेंब गोल करायचे. ती छोटी डबी प्रिंटर कार्टेज सारखी यंत्राच्या खाचेत बसवून रक्ताच्या विविध चाचण्याचे निष्कर्ष काढायचे. ते यंत्र संगणकाला जोडायचे आणि रिपोर्ट डॉक्टरपर्यन्त सहज पोहोचवायचे. असे यंत्र बनविण्यासाठी प्रयत्नशील असणारी एलिझाबेथ. ती स्टँफर्ड विद्यापीठाची प्रेसिडेंट स्कॉलर. थेरपी आणि डायग्नोसिस पासून तयार झालेला शब्द म्हणजे ‘थेरॅनॉस’. अशा रक्तचाचणी यंत्र निर्मितीतून औषधक्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचे स्वप्न पाहणारी एक उद्योजिका. कार्टेज आणि रीडर ह्यावर एडिसन हे यंत्र निर्मिती करण्याचा उद्योग उभारण्याचा प्रयत्न करणारी एलिझाबेथ. हे उभे करताना ती अनेक हुशार तंत्रज्ञाना आपल्या कंपनीत खेचून आणते. त्यांना आकर्षित करते. तिला सनी बलवानी सारखा मोठमोठ्या गप्पा मारणारा एक सहकारी मिळतो तसेच चेलसीसारखे गुणवंत सहकारी मिळतात. विचारवंत आणि कृतीशील माणसेच नवनिर्मिती करू शकतात हे खरे आहे; पण हे मोहमयी जग तितके सरळ नाही. आणि माणूस नकळत बदलतो आणि तो फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारी विश्वात कधी प्रवेश करतो हेच लक्षात येत नाही. मग तो निर्माण करतो एक Evil Empire. एलिझाबेथ असे विश्व निर्माण करते. एलिझाबेथला सहकारी तर चांगले मिळतात. पण तिच्या विचित्र स्वभावामुळे कोणीही तिच्या कंपनीत २-३ वर्षापेक्षा अधिक टिकत नाही. नव्याचा ध्यास असलेले हे सहकारी येतात आणि निघून जातात. ते तर सिलिकॉन व्हॅलीचे वैशिष्ट्य आहे. अशा छोट्या कंपनीसाठी हवे असतात भांडवल पूरविणारे गुंतवणूकदार. सिलिकॉन व्हॅलीत असंख्य असे असंख्य गुंतवणूकदार आहेत. अल कॉर्न ह्या भांडवल पूरविणाऱ्या उद्योजकाने स्टीव्ह जॉब्सला नव्वद दिवसाची मुदत असलेला करार करून क्रेडिट अकाऊंट काढून दिले होते. त्याप्रमाणेच गूगलचे निर्माते पेज आणि ब्रिन ह्याना Andy Bechtolsheim सारखा पैसे गुंतवणारा भांडवलदार मिळाला आणि त्याने आस्तित्वात नसलेल्या “Google Inc,” अशा कंपनीच्या नावाने मोठ्या रकमेचा चेक देऊन नवी कंपनीच चालू करून दिली. एलिझाबेथला गुंतवणूकदार कसे मिळवायचे हे चांगलेच अवगत होते. तिने अनेक गुंतवणूकदाराकडून असेच पैसे उभे केले. Fast – Faster – Fastestचे वेड असणारे हे तंत्रज्ञ. त्यांना उभे करावयाचे असते आपले साम्राज्य. शौनक रॉय आणि मोझलीसारखे तिचे सहकारी एलिझाबेथ ही फसवणूक करून उद्योग उभा करते आहे, हे लक्षात आल्यावर तिला सोडून जातात. एलिझाबेथ वॉलग्रीन सारख्या औषधकंपनीला सहज गुंडाळते. राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध ठेवण्यातही ती चांगलीच तरबेज असते. फसवे गिरी कशी करावयाची, संचालक मंडळात अधिकारी कसे निवडायचे, मोठमोठ्या कंपन्याना कसे आकर्षित करावयाचे, मार्केटिंग आणि सेल्समध्ये तज्ञ असले की गंडा कसा घालायचा हे तिला चांगलेच माहीत होते. अशी ही एलिझाबेथ. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’चा शोधपत्रकारिता करणारा जॉन क्यारिरू हा पत्रकार कुप मोठा धोका पत्करून फसवणूक करणाऱ्या एलिझाबेथच्या मागे लागतो आणि तिच्या उद्योगाचे भांडं कसं फोडतो हे वाचताना आपण एक थरारपट पहात आहोत असे वाटते. त्यामुळे ही कादंबरी आगळीवेगळी झाली आहे. एलिझाबेथ आणि सनी बलवानी ह्यांच्या दिवास्वप्नामुळे निर्माण झालेला फसवणुकीचा डाव उघडकीला आणला तो क्यारिरू ह्या पत्रकाराने. सिलिकॉन व्हॅलीचा आपल्याला माहीत नसलेला हा एक दूसरा चेहरा. एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारी ही कादंबरी. आय,टी./ तंत्रज्ञान क्षेत्रात पैशाच्या मागे लागून फसवणूक करणारे अनेक लोक आहेत हे पाहिले म्हणजे सिलिकॉन व्हॅलीचा हा पैलू आपला भ्रमनिरास करतो. ही कादंबरी अवश्य वाचा आणि हे जग ओळखून घ्या,

No comments:

Post a Comment