रेवासागर / गरुडेश्वर
परिक्रमेचा पहिला दिवस नागर घाटावरील संकल्प पूजेनंतर संपला. भाग्यश्री टुरने सोबत स्वयंपाकी घेतले होते. त्यामुळे रस्त्यात निरनिराळ्या हॉटेलमध्ये वेगवेगळे पदार्थ खाऊन यात्रेकरुचे पोट बिघडू नये याची चांगली दक्षता घेतली होती. स्वयंपाकी रुचकर आणि छान स्वयंपाक करीत असत. कोणतीही तक्रार नसायची. अतिशय थोड्या वेळात त्यांचा स्वयंपाक तयार होत असे.
सकाळी सहा वाजता उठल्यावर चहा, सात वाजता नाश्ता आणि आठ वाजता आम्ही बाहेर निघत असू. सकाळचा कार्यक्रम त्या ठिकाणी असलेली नर्मदाकाठावरील मंदिरे, नर्मदेवरील घाट आणि आजूबाजूचा परिसर बघणे हा असे. त्यानंतर दुपारचे जेवण. जेवणानंतर म्हणजे दुपारी १/२ नंतर आमचा पुढील प्रवास बसने सुरू होत असे. रोज २०० ते २५० किलोमीटर प्रवास झाल्यानंतर पुढील ठिकाणी हॉटेलमध्ये मुक्काम असे. तेथे रात्रीचे जेवण आणि विश्रांती. सकाळी उठले की पुनः तसेच. ओंकारेश्वर सोडले आणि शहादाकडे निघालो. मी सोबत नर्मदेचे दोन नकाशे जोडले आहेत. एक आहे पायी परिक्रमा करताना येणारी गावे व पथमार्ग तर दूसरा आहे नर्मदेच्या दोन्ही बाजूचे रस्ते व बस/कारचा मार्ग (बघा नर्मदा परिक्रमा मार्ग)
मध्यप्रदेशमधील रस्ते चांगले आहेत. शहादा हा महाराष्ट्रातील आदिवासी भाग. नंदुरबार जिल्हा. महाराष्ट्र सुरू झाला आणि बस अनेक खडद्यातून हेलकावे खात पुढे जाऊ लागली. आता प्रवास कठीण वाटू लागला. असा आपला महाराष्ट्र! काय रस्ते? हाडांचा हिशोब जुळवू लागलो. शहादाहून गुजरातमधील अंकलेश्वरकडे बस धाऊ लागली. शहादाला सियाराम बाबाचा मठ आहे. जे यात्रेकरू पायी यात्रा करतात ते सहसा मठात मुक्काम करतात. तेथे राहण्यासाठी खोली मिळते. जेवणाची व्यवस्था असते. मठ छान आहेत. तेथील वातावरण धार्मिक/अध्यात्मिक असते. पूजा/आरती कथा/कीर्तने चालू असतात. शहादाजवळ एकमुखी दत्ताचे मंदिर बघण्यासारखे आहे. येथून जवळच प्रकाशा हे ठिकाण आहे. तेथील काशी विश्वेश्वराचे मंदिर सुंदर आहे. हे बघून आम्ही निघालो ते गरुडेश्वराकडे. शुपनेश्वर आणि कुंभेश्वर ही दोन मंदिरे बघून भरूचला मुक्काम करावयाचा होता.
गुजरातमधील रस्ते महाराष्ट्रातील रस्त्यापेक्षा बरे पण मध्यप्रदेशसारखे चांगले नव्हते. काय अवस्था झाली आहे आपल्या महाराष्ट्राची? माझा अंकलेश्वरशी संबंध आला तो ३०/४० वर्षापूर्वी. मुंबईतील कारखाने बंद होऊ लागले होते. गुजरात राज्यात वीज, पाणी आणि जमीन स्वस्त मिळू लागली होती. मुंबईतील कारखानदार दहिसर नंतर वापी, बलसाड, भरूच आणि अंकलेश्वरला आपले मुंबईतील कारखाने बंद करून नवे कारखाने आणि उद्योग सुरू करू लागले. मुंबईत जागा महाग. मजूर महाग. सोयी – सुविधा तोकड्या. माझा व्यवसाय उद्योगाशी निगडीत होता. त्यामुळे मुंबई – भरूच – अंकलेश्वर हा माझा प्रवास सुरू झाला. सकाळी ट्रेन पकडायची व रात्री मुंबईत परतायचे. तेंव्हा ट्रेनमध्ये भरूचजवळ नर्मदेचे दर्शन होत असे.
ह्या नर्मदेच्या परिक्रमेत अंकलेश्वरचे महत्व मला माहीत नव्हते. अंकलेश्वर – भरूच अंतर थोडेच आहे. नर्मदा तटपरिवर्तन भरूचला करायचे असल्यामुळे हा प्रवास चालू होता. अंकलेश्वरजवळ केदारेश्वर, विश्वेश्वर आणि पुष्पमंडलेश्वर ही तीन सुंदर मंदिरे आहेत. ती बघण्यासाठीच येथे मुक्काम होता. तसे अंकलेश्वर हे फारसे विकसित शहर नाहीच. उद्योग असल्यामुळे वस्ती वाढली आहे एवढेच. येथून जवळ असलेल्या रावेरखेडीला गेलो. प्रवास सुरू होता तो काटपोरकडे. नर्मदा न ओलांडता म्हणजे अरबी समुद्रात मिळाल्यानंतर दुसऱ्या तटाकडे जायचे. काटपोर म्हणजे आपल्या माहीम खाडीसारखा दलदलीत प्रदेश. त्यामुळे प्रवास करायचा तो बोटीने. जेंव्हा समुद्राला भरती येते तेंव्हाच बोटी सुरू करता येतात. या बोटी म्हणजे आनंद! समुद्रातील मिठीतलाईनंतर नर्मदा समुद्राला पूर्णपणे मिळते. त्यानंतर बोटी या नर्मदेच्या दुसऱ्या तटावर जातात. तेथे आमची बस उभी होती. ही बस नर्मदेवरील एका छोट्या गोल्डन ब्रीजवरुन पलीकडे जाते. नर्मदा जेथे अरबी समुद्राला मिळते त्याला रेवासागर असे म्हणतात. तेथे नदीचे पात्र विस्तीर्ण होते आणि नदी आणि समुद्र यातील फरकच लक्षात येत नाही. पाण्याच्या रंगावरून फरक जाणवू लागतो. अर्थात खारट पाणी सांगते की आपण आता समुद्रातच आहोत. आपण नर्मदा जल भरून घेतलेली अर्धी बाटली समुद्रात ओततो व पुन्हा अर्धे समुद्राचे पाणी बाटलीत भरतो. ओंकारेश्वरला जलाभिषेक करताना हेच जल वापरावयाचे असते.
मिठीतलाईला आपण बोटीने जातो. तेथेच नर्मदा समुद्रात विलीन होते. हा प्रवास बोटीचा. ह्या बोटी आणि तेथील नावाडे हे अगदी बेभरवशाचे आहेत. एका बोटीत ४०/५० माणसे कोंबलेली असतात. दाटीवाटीने एकमेकाला चिकटून बसायचे. थोडे सुद्धा हलायला जागा नसते. कसलीही सुविधा नसते. हा अतिशय कठीण समुद्र प्रवास. ३-४ तासाच्या ह्या प्रवासात ‘नर्मदे हर! नर्मदे हर!’ असा गजर करीत पुढे जायचे. शेवटी नर्मदा मैय्याच आपल्याला तारते.
(छायाचित्रातील आमचे फोटो पहा)
काय ही सरकारी यंत्रणा? काय ही लोकांची गैरसोय? कोण हे कंत्राडदार नेमतात? कसला धंदा करतात? असे हे यात्रेकरूचे हाल? ज्या यात्रेकरुमुळे ह्या कंत्राटदारांची पोटे भरतात त्यांचे हाल बघा. त्यांच्या सुरक्षेची शून्य काळजी घेणारे हे सरकार! एक प्रवासी आणि यात्रेकरू म्हणून मी हे मुद्दाम लिहीत आहे. हे चांगले शासन नव्हे.
रेवासागर/ रत्नासागर सुंदर आहे. विशाल आहे. ते निसर्ग सौन्दर्य
डोळयानी टिपले. नर्मदेच्या दुसऱ्या तटाकी जाण्यात यात्रेकरुला आनंद आहे; पण नको हा
प्रवास असेच वाटत होते. यात्रेतील यातना आणि त्रास हे दोन्ही अनुभवले ते ह्या प्रवासात.
यातना देणारा हा प्रवास! त्याला मूळ कारण आहे ती येथील शासकीय यंत्रणा आणि बोट चालविणारे
हे कंत्राटदार! रेवासागरची यात्रा मनात आनंदतरंग उमटविणारी असली तरी हा कठीणतम प्रवास
नकोसा वाटणारा आहे! तो अधिक सुखकर करणे हे सरकारच्या हातातच आहे. चांगल्या बोटी हव्यात. प्रत्येकाला बसण्याची सोय हवी. आजूबाजूचे निसर्गसौन्दर्य टिपता आले पाहिजे. मनावर आनंदतरंग तर अशाच प्रवासात उमटत असतात.
पुष्पपंडतेश्वर मंदिर
केदारेश्वर मंदिर
येथील दुसरे आकर्षण होते ते Statue of Unity !
पंतप्रधान मोदीनी उभारलेले हे सरदार पटेल यांचे नर्मदातिरी असलेले हे स्मारक म्हणजे शिल्पकला आणि इंजिनिअरिंग मधील एक आश्चर्यच आहे. ते प्रत्यक्ष बघितले तरच समजू शकते. ते एक नवे आश्चर्यच आहे. मी ज्या दिवशी हे स्मारक बघितले त्याच दिवशी माझ्या फेसबुक पेजवर फोटोसह सविस्तर लिहिले होते. त्यामुळे पुन्हा येथे लिहीत नाही.
No comments:
Post a Comment