Thursday, August 13, 2020

माणसं : सोल्जर सिस्टीम

माणसं : देशी - विदेशी
मी १९७८ नंतर माझ्या कामानिमित्त युरोप - अमेरिकेचा खूप प्रवास केला. मी सुरुवातीला एका अमेरिकन कंपनीचा  प्रतिनिधी होतो. त्यानंतर इटालियन , ब्रिटिश , तैवानी , स्विस , जर्मन ह्या लोकांच्या बरोबर व्यवसायामुळे संबंध आले. अनेक सेल्स परिषदांमध्ये जसा भाग घेतला तसाच तांत्रिक आणि वैज्ञानिक परिषदांमधून नुसता भागच घेतला नाही तर संशोधन केलेल्या विषयावर पेपर्स वाचले आणि अनेक  चर्चासत्रात विशेष भाग घेतला. काही परिषदांमध्ये मला माझे अनुभव सांगण्यासाठी बोलावण्यात आले होते . दर दोन तीन वर्षाने मी परदेशात जातच असे. त्यावेळी परदेशी जाणे तसे कठीणच होते .पासपोर्ट-व्हिसा मिळवणे म्हणजे महाकठीण काम असे . त्यासाठी बरेच पेपरवर्क करावे  लागत असे . आपल्याला आलेली निमंत्रणे दाखवावी लागत. अडचण असे ती  रिझर्व्ह बँकेकडून परकीय चलन मिळविण्याची .त्यासाठी अनेक कागदपत्राची पूर्णता करावी लागे . ती केल्यानंतर ऐन निघण्याच्या दिवशी परकीय चलन हातात पडत असे. ते तसे मोजकेच असे व फार सांभाळून खर्च करावे लागत असे. असाच  एक अनुभव सांगतो. मी सुरुवातीला ज्या कंपनीत काम करीत असे त्या कंपनीच्या मालकाबरोबरच अमेरिकेला गेलो होतो. त्यावेळी कंपनीतर्फे माझी सर्व व्यवस्था केली जात असे , त्यामुळे मला स्वतःला परदेश प्रवासासाठी कसलाही पत्रव्यवहार करायचे काम नव्हते .मी प्रोफेसर बिलमेअर ह्यांच्या रंगतंत्रज्ञान विषयाच्या 3 अभ्यासक्रमासाठी जात होतो व त्यानंतर माझ्या कंपनीचे मालक - डायरेक्टर आणि मी काही कंपन्यांना भेटी देऊन तेथील टेक्नॉलॉजी बघून आपल्यासाठी काही उपयुक्त आहेत  का ?, ह्याची चौकशी करणार होतो. आम्ही दोघे न्यूयॉर्कला भेटलो. एकाच हॉटेलमध्ये राहिलो. तेथून प्रिन्स्टनला रेल्वेने गेलो. दिवसभर दोन कंपन्यांना भेटी दिल्या. रात्री हॉटेलवर परत आलो आणि जेवायला बाहेर पडलो. अशाच एका हॉटेलमध्ये जेवण केलं . आणि नंतर रूमवर पोहोचलो.त्यापूर्वी आम्ही खाली गप्पा मारीत असताना त्यांनी दिवसभराचा आमच्या दोघांच्या खाण्यापिण्याचा आणि प्रवासाचा खर्च लिहिला आणि मला अर्धे पैसे देण्यासाठी सांगितले. मला त्यांचा मनातून राग आला. आपण एका उद्योगप्रमुखाबरोबर जात आहोत आणि हा गृहस्थ आपल्याला खर्च विभागून मागतो आहे. नंतर काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की परदेशात जाताना प्रत्येकाला  त्याच्यापुरतेच परकीय चलन मिळत असते .ज्याचे त्याने स्वतःचे चलन खर्च करायचे असते. मग हा मालक आपल्यासाठी असा कसा खर्च करील ? नंतर अमेरिकेत आणि युरोपमध्ये 'सोल्जर सिस्टीम' प्रमाणेच ज्याचे त्याला  पैसे खर्च करावे लागत असत,  ह्याचा खूपदा अनुभव घेतला. परिषदांमधून एखाद्या ग्रुपबरोबर असे काही केले की लगेच सगळ्यांनी सारखे खर्चाचे पैसे वाटून घेणे चालूच असे.
डाव्या बाजूला मी , नरेंद्र गंगाखेडकर. टेरी  डाऊन  ह्यांच्या बाजूला .
विली  कॉर्नेलियसच्या बाजूला डॉन  हॉल  , कंपनीचे अध्यक्ष 

असाच एक अनुभव मला स्विट्झरलँडमध्ये आला .अशीच एक सेल्स कॉन्फरन्स होती. सर्व युरोपातील प्रतिनिधी आले होते . अमेरिकन कंपनीचा डायरेक्टर ही एक मोठी श्रीमंत असामी होती   . त्याचे नांव डॉन हॉल . ते  आमच्या बरोबरच फिरत होते .आम्ही अर्धा दिवस  होता म्हणून बाहेर फेरफटका मारायला निघालो होतो . तेही आमच्याबरोबर निघाले होते . त्यांना काय  ?कोणत्याही गाडीतून कुठेही फिरणे सहज शक्य होते. आम्ही  रात्री हॉटेलवर परत आलो तर त्यांनी सर्वांचा दिवसभरचा  खर्च विचारला ?   तो आपण सगळेजण  सारखा वाटून घेऊ यात , असे ते म्हणाले .कोणाएकाला त्रास नको. असे त्यांनी सर्वांना सांगितले .अशी ही 'सोल्जर सिस्टीम' पाळणारी मोठी श्रीमंत माणसे. ही वृत्ती आपणही  जपायला पाहिजे. आपले नातेवाईक / मित्रमंडळी हे हीच गोष्ट टाळत असतात म्हणून माझ्या हे  अधिक लक्षात येते.
परदेशात अनेक माणसं भेटली. त्यांचा कळत नकळत प्रभाव पडत गेला. खूप काही शिकयला मिळालं . त्यांचे असे अनेक किस्से मला सांगता येतील.
एका परिषदेत सेमिनार घेताना टेरी  डाऊन . जगातील अनेक देशाचे प्रतिनिधी नवे तंत्रज्ञान समजून घेताना 

असाच एक माणूस . टेरी डाऊन . मी त्यांना १०-१२ वर्षे ओळखतो आहे. सुरुवातीला भेटलो तेंव्हा ते सॉफ्टवेअर मॅनेजर होते . खूप हुशार तंत्रज्ञ. संगणकात दर २-३ वर्षात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बदलत असतात. रंगतंत्रज्ञानात असेच बदल होतात. गणिती समीकरणेही  वेगळी मांडली  जातात. त्यामुळे रंगतंत्रज्ञान म्हणजे कम्प्युटर कलर सिस्टीम दर २-३ वर्षाने बदलत जाते. नवे तंत्रज्ञान नेहमी पुढे येते. टेरी डाऊन ह्यांनी  हे सर्व जवळून बघितले होते  आणि तसे बदल  त्यांनी घडवून आणले होते. टेरी पुढे कम्पनीचे व्हाईस प्रेसिडेंट आणि  प्रेसीडेन्ट झाले . ह्याची माझी दर दोन- तीन वर्षाने भेट होत असे . त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं . तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अशा दोन्ही गोष्टी मी त्यांच्या कडून शिकलो .तसे ते पक्के सेल्समन होते .नुसते गोडबोले नव्हते .  ते तंत्रज्ञान विक्रेते होते . अगदी सोप्या भाषेत ते विषय समजावून  सांगत असत . सेमिनार कसा घ्यायचा?, हे त्यांना चांगले  अवगत होते. तंत्रज्ञान विक्रेत्याने निरनिराळ्या पातळ्यांवर असलेल्या लोकांशी कसा संवाद साधायचा ,हे मी त्यांच्याकडून शिकलो . टेक्स्टाईल कंपनीचा मालक असो की लॅब मधला केमिस्ट असो , त्यांना आपला विषय नीट समजला पाहिजे .तरच ते हे तंत्रज्ञान आपल्याकडून विकत घेतील किंवा त्याची नीट माहिती करून घेतील. मग हेच ते  लोक ह्या तंत्रज्ञानाचे आपले विक्रेते होतील असे ते म्हणाले .हे मी प्रथम त्याच्याकडून शिकलो. ते फार अतिशय हजरजबाबी होते . ते निखळ विनोद सहज करीत असत . ते अगदी सौम्य स्वभावी  होते. लोकांच्यामध्ये मिसळणारे होते  . गर्व नसणारे होते .पुढे  बऱ्याच वर्षांनी त्यांची  एका परिषदेत भेट झाली. लहानखोर दिसणारा हा माणूस आतां  थोडा वयस्कर दिसू लागला होता .मी त्यांना सहज  चेष्टेने म्हणालो , ' You are looking very old '. ते माझ्याकडे बघून हसले  आणि मला पटकन म्हणाले ," This is  not really true. I am looking old because my daughter is making  me old'. मग  माझ्या पटकन लक्षात आलं की मीही असाच वयस्कर दिसू लागलो आहे . त्याचे कारण माझ्या मुली मोठ्या होऊ लागल्या आहेत. त्यानंतर मी मुलींना नेहमी  म्हणत असेकी   ' मी म्हातारा होतो आहे त्याचे कारण तुम्ही मुली   मोठ्या  होत आहेत  व मला  म्हाताऱ्या  करीत आहात  '. तसे पाहीले  तर हे एक सत्य असते .टेरी  हे अगदी सहज बोलून गेले . ते वाक्य कायमचे माझ्या लक्षांत  राहिले . आपली मुले आपल्याला म्हातारी करीत असतात  तर आपली नातवंडे आपल्याला लहान मूल बनवितात. जगात सर्वानाच हा अनुभव येत असतो . तो अमेरिकन असो वा  भारतीय. टेरी डाऊन ह्यांनी मात्र हे माझ्या लक्षांत अगदी सहज आणून दिले. आपण जगतांना  असेच शिकत असतो दुसऱ्यांच्याकडून .
मी डॉ नरेंद्र गंगाखेडकर आणि कंपनीचे सीईओ  बोरिस मोमीरॉफ 

बोरिस मोमीरॉफ आणि त्याची पत्नी असेच ओळखीचे झाले .बोरिस हा कम्पनीचा प्रमुख होता. तरुण आणि खूप उत्साही माणूस .आक्रमक आणि सडेतोड. त्यांची पहिल्यांदा  ओळख झाली ती त्यांनी  केलेल्या प्रेझेंटेशनमुळे. चर्चासत्रात सर्वच तसे धीरगंभीर असतात  . ही मंडळी खुलतात ती संध्याकाळच्या डिनर कार्यक्रमाला. बोरीसची बायको संध्याकाळच्या डिनर कार्यक्रमाला आली होती. अमेरिकेत डिनर संध्याकाळी ६ वाजता सुरु करतात. पिण्याचा  कार्यक्रम हा तसा डिनर नंतरच  सुरु होतो. तेथे गप्पाष्टक अधिक रंगतात . माझा होस्ट होता बोरिस आणि त्याची पत्नी. मी एकटा भारतीय. बाकीचे अमेरिकन .

 बोरीसची पत्नी  एक पुढारलेली अमेरिकन स्त्री .नव्या वळणाची , स्त्रीमुक्ती चळवळीतून  पुढे आलेली अमेरिकन स्त्री  . आमच्या अशाच गप्पा चालल्या होत्या . मी पडलो भारतीय .म्हणजे तसा मागासलेलाच . माझी बायको फारशी शिकलेली नसणार असे तिला वाटले असणार . कदाचित ती अशिक्षित असेल असे तिला वाटलेले असणार .  तिला आपल्या देशातील  स्त्रिया कशा सुधारलेल्या असतील असे वाटले असणार ?  तसे पाहीले  तर त्यांच्यासाठी भारत म्हणजे एक मागासलेला देश . तिचा तसाच समज झालेला होता .म्हणून तिने माझ्या स्वतःविषयी माहिती विचारण्यास सुरुवात केली. आणि दोन मिनिटात तिचा आवाज बसला . माझी बायको ही एक उच्च पदवीधर स्त्री आहे . ती  महाविद्यालयात पदार्थविज्ञान हा विषय शिकविते. हे ऐकल्यावर तिला नुसते  आश्चर्यच वाटले नाही तर भारतातील स्त्रिया इतके शिकलेल्या आहेत हेच खरे वाटत नव्हते.  तसे अमेरिकन असूनही तिचे स्वतःचे शिक्षण फारसे झालेले नव्हते .अमेरिकेतील स्त्रीमुक्ती आंदोलन हाच तिचा बोलण्याचा मुख्य विषय होता . विषय बदलण्यासाठी बोरिस  तिला म्हणाला, ' आतां  तुला माझ्याबरोबर भारतात यावे लागेल आणि डॉक्टरच्या बायकोकडून  काही नवे शिकावे लागेल'. त्यानंतर मात्र आमच्या जेवणात स्त्रीमुक्तीचा विषय पुन्हा निघाला नाही. आजही अमेरिकेतील  तेथील लोकांचे वैवाहिक जीवन तसे भरकटलेलेच दिसते आणि तुलनेने तेथील  स्त्रिया फार मोठ्या प्रमाणावर खूप शिकलेल्या दिसत नाहीत. माझी बायको आणि माझ्या दोन मुली उच्च विद्याविभाषित तर आहेतच पण त्या मोठ्या अधिकारावर नोकऱ्याही करतात , पैसेही कमवितात . त्यांना स्त्रीमुक्तीच्या  चळवळीचा  झेंडा हाती घेऊन काम करावे लागले नाही. अर्थात असे सर्व भारतीय स्त्रियांसाठी असते असे नाही. प्रवासात  अशी माणसं  भेटतात आणि तेथील समाजातील अंतरंग आपल्याला  दिसू लागते . अर्थात आपणही आपल्या समाजाचे छोटेसे अंग असतोच . 

1 comment:

  1. जीवनाच्या प्रवासात अनेक माणसं भेटतात, आपल्या कळत नकळत त्यांचा प्रभावही आपल्यावर पडतो. त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही असतं, पण आपली शिकण्याची तयारी हवी, हा महत्त्वाचा मुद्दा या लेखात जाणवला.
    आपण परदेशप्रवासात आपणास आलेल्या 'सोल्जर सिस्टीम' या सर्वांनी मिळून खर्च वाटून घेण्याच्या पद्धतीचा उल्लेख केला आहे. काहीही फुकट न घेता आणि कुणा एकावर भार न टाकता सर्वांनी मिळून खर्च उचलण्याची ही पद्धत भारतीयांसाठी नक्कीच अनुकरणीय आहे. इतर कुणी माझा खर्च का करावा, आपण आपला खर्च उचलावा हेच उचित आहे.
    आपण अमेरिकनांच्या मनात भारताबद्दल, भारतीय स्त्रियांबद्दल असणारे गैरसमज दूर करण्याची केलेली कामगिरीसुद्धा नक्कीच महत्त्वाची आहे. परदेशात गेलेला प्रत्येक नागरिक हा तेथे वावरताना त्याच्या देशाबद्दलचे मत तेथील जनमानसात तयार करत असतो, याचे भान आपण राखले पाहिजे.
    आणि सर, आपल्या लेखातील मला सर्वांत आवडलेली आणि हृदयाला भिडलेली सुन्दर वाक्ये म्हणजे - ‘आपली मुले आपल्याला म्हातारी करीत असतात, तर आपली नातवंडे आपल्याला लहान मूल बनवितात. जगात सर्वानाच हा अनुभव येत असतो, मग तो अमेरिकन असो वा भारतीय.’
    सर, आपण खूप छान लिहिता. लिहीत रहा.

    ReplyDelete