Friday, August 21, 2020

डेव्हिड कोलियर - एक इंग्रज मित्र


एका विचारवंताने युरोपचे उदाहरण दिले आणि विशेष उल्लेख केला तो इंग्लंड आणि इंग्रजांचा. त्यांच्या मते पुरोगामी आणि सुधारणावादी विचार घ्यावा तो इंग्रजाकडून किंवा युरोपकडून. मला थोडेसे आश्चर्यच वाटले. व्यवसायानिमित्त माझा अनेक ब्रिटीश आणि युरोपियन लोकांशी संबंध आला. एकाच ब्रिटीश कंपनीतील चार वेगळ्या स्थरातील व्यक्तींशी मी  संपर्कात आलो तेव्हा त्यांच्यातील वेगळ्या प्रकारच्या जातीव्यवस्थेची कल्पना आली. त्या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष उमराव संस्कृतीचे प्रतिनिधीत्व  करणारे होते. स्वतःला श्रेष्ठ समजणारे आणि इतरांना तसे तुच्छ समजणारे. खास अशा उच्यभ्रू शाळेतून शिक्षण घेतलेले व त्याचे विशेष अभिमानी असलेले. मी त्या कंपनीचा प्रतिनिधी असल्यामुळे माझ्याशी खूप सन्मानाने वागणारे. म्हणजे हा इंग्लंड मधील उच्चवर्गीय  समाज प्रतिनिधी. हा वर्ग इग्लंड  सोडून कुठेच घर करून राहत नाही. त्याला इग्लंडच अधिक प्यारे. हुजूर आणि मजूर पक्ष हे अशाच दोन वेगळ्या स्तरांचे प्रतिनिधीत्व  करतात. त्याच कंपनीतील एक इंजिनिअर हा वेल्सचा . त्याचे पूर्वज मेंढ्या पाळणारे. म्हणजे आपल्याकडे जशी धनगर जमात आहे तसे. वेल्सच्या लोकांना इंग्लंड मध्ये थोडे कमीच महत्त्व देतात. अजून एक इंंग्रज मित्र .मार्केटिंग  म्यानेजर. तो Cobbler म्हणजे त्याचे पुर्वज चांभार. खूप मेहनत करून शिकलेला. ह्या लोकांना इंग्लंडमध्ये  विशेष मान मिळत नाही म्हणून हे इंग्रज लोक   इंग्लंडबाहेर म्हणजे दक्षिण आशिया किंवा पूर्व आशियात काम करण्यास तयार असतात. त्याचे  मुख्य  कारण, ह्या गोर्या कातडीच्या लोकांना आशिया देशात ब्रिटीश म्हणून खूप मान आणि प्रतिष्ठा मिळत असते . म्हणूनच त्यांना भारत , पाकिस्तान , थायलंड हे देश आवडत असत. त्यांना इंग्लंडमध्ये रहावे असे वाटत नसते. ते इकडे खुश असतात.  चौथा अधिकारी होता ऑस्ट्रेलियाचा . त्याचे पुर्वज  मुळचे ब्रिटीश. ब्रिटिशानी ज्या गुन्हेगारांना बोटीने तिकडे पाठविले त्यात त्याचे पूर्वज होते. ह्या लोकांना ब्रिटनमधील लोकाच्याब्द्द्ल फारसे  प्रेम नाही.एक प्रकारचा तिरस्कारच होता आणि आजही आहे.  ४-५ वर्षे ह्या मंडळीच्या बरोबर काम  केल्यावर हे त्यांच्यातील वर्णभेद  माझ्या  लक्षात आले. वरकरणी ते ब्रिटीश असले तरी त्यांच्यात भेदाभेद, जातीभेद  होते . ते प्रागतिक किंवा सुधारणावादी नव्हते.
सगळ्यांचा असा समज आहे  की ख्रिश्चन धर्म त्यांना एकत्र ठेवतो. पण तसेही  नाही. युरोपला ख्रिश्चन धर्म एकत्र ठेऊ शकला नाही. त्यांच्यात अनेक भेदाभेद आहेत. पंथ आहेत. चालीरीती आहेत. वेगवेगळ्या रूढी आहेत. भाषा , चालीरीती आणि संस्कृती भिन्न आहेत. त्यामुळेच युरोपमध्ये छोटे छोटे देश आहेत. अजूनही ह्या देशांचे तुकडे होण्याची शक्यता आहे.
सानेगुरुजी ह्यांनी पाश्चिमात्य तत्वज्ञ आणि त्यांच्या विचारसरणी संबंधी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे . त्यावरून आपल्यास युरोपियन संस्कृतीची चांगली कल्पना येते. हे देश खूप पुरोगामी आणि समाज सुधारणावादी आणि जातीभेद विरहीत आहेत असे म्हणणे फारसे बरोबर ठरणार नाही. मी जेंव्हा ह्या मंडळी बरोबर चर्चा केली तेंव्हा हे प्रकर्षाने जाणवले.
डेव्हिड कोलियर 
डेव्हिड कोलियर हा त्यापैकी एक. उंचापुरा, गोरा. आकर्षक व्यक्तीमत्वाचा. तसा लंडनचा. १०-१२ वर्षे हॉंगकॉंग, फिलीपीन्स ,थायलंड आणि भारत ,पाकिस्तान, श्रीलंका ह्या देशात व्यवसायानिमित्त फिरणारा आणि वास्तव्य  करणारा. त्याचा डायव्हर्स झालेला. इंग्लिश पत्नीने पोटगी वसूल केलेली. २० वर्षाच्या मुलाची लंडन मधील शिक्षणाची व्यवस्था त्यालाच करावयाची हे कोर्टाने सांगितलेले . त्यामुळे तो इंग्लंडला फारसा जातच नसे. तो मला म्हणे ,'इकडे आम्हाला गोर्या कातडीमुळे अधिक सन्मान मिळतो . तिकडे सगळेच गोरे'. त्यांत उमराव मंडळी उच्चभ्रू. आम्ही नोकरदार ,चाकरी करणारे ,दुय्यम. अशा दुय्यम ब्रिटीशांनाच  बाहेर देशांत तेथील कंपन्या  पाठवित असतात. तेच आजही चालू आहे. त्यामुळे हे  ब्रिटिश इतर देशात जाण्यास अधिक उत्सुक असतात.
मी डेव्हिड बरोबर ५-६ वर्षे काम केलं. तो रंगतंत्रज्ञान ह्या विषयात तज्ञ . बोलायला गोड. भारतीय उद्योजक गोरी कातडी म्हंटली की खूष होतात व  वेळात वेळ काढून गोर्या कातडीच्या मंडळींना  भेटणार. एरव्ही मला ते सहजासहजी वेळ देत नसत. पण मी गोर्या माणसाला घेवून येतो आहे असे सांगितले की आम्हाला भेटीची वेळ सहज मिळत असे. ते साहजिकच आहे. भारतीय मेंट्यालिटी. गोरे कातडे.
युडीसीटी मधील प्रोफेसर लोखंडे ह्यांच्या रंगविज्ञान  प्रयोगशाळेत डेव्हिड 

एकदा हे गोरे कातडे बरोबर असले की माझा भारतभर दौरा सुरू होत असे.  तंत्रज्ञान विकणे तसे अवघड असते. प्रत्येक कंपनीत ३-४ थरावर चर्चा कराव्या लागतात. खालच्या थरावर तांत्रिक चर्चा होते म्हणजे  नवे तंत्रज्ञान समजावून सांगणे. मधल्या थरावर त्या विभागाची गरज ओळखून चर्चा करणे  , उपाध्यक्ष / अध्यक्ष  ह्या थरावर हो  किंवा नाही असा निर्णय घेण्यासाठी चर्चा पुढे नेणे आणि शेवटी संचालक/ मालक ह्यांच्याकडे किंमतीत सूट देवून करार करणे. हे सर्व करण्यासाठी ४/६ महिने आणि तेवढ्याच मिटींग होतात. डेव्हिड सर्व थरावरील लोकांशी कशी चर्चा करायची हे चांगले जाणून होता. तो बोलण्यात तरबेज तर होताच पण आपला ठसा उमटविणारा होता. माझ्या २/३ मीटिंग्ज झाल्या की त्या पोटेनशिअल कस्टमरकडे मी ह्या गोर्या मंडळींना घेवुन जात असे. डेव्हिडला त्यामुळे चांगले यश मिळत असे .
डेव्हिड हा फार काटकसरीने रहात असे. त्याला 4 / 5 स्टार हॉटेलमध्ये रहाणे त्यांच्या कंपनीच्या नियमाप्रमाणे शक्य असे पण तो 3 स्टार हॉटेलमध्येच रहाणे पसंत करीत असे. त्याला भारतीय व्हेज आणि नॉन व्हेज खाणे फार आवडत असे. कांदाभजी आणि बियर ह्यावर हे  महाशय खूष असत . दोन्ही खाणे मात्र अमर्यादित.  हे चालू असताना  तासनतास गप्पा मात्र चालूच असत. चिकन ही त्याचे अत्यंत आवडीचे. त्याला तिखट आणि  झणझणीत आवडत असे. मी व्हेजवाला आणि मद्यपान न करणारा. तो मुंबईत आला की आम्ही नेहमी  कितीतरी छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये खाण्यासाठी जात असू. त्याच्याशी किती विषयावर गप्पा होत . त्याचे  विविध देशांचे अनुभव ऐकण्यासारखे असत . दक्षिण आणि पुर्व आशियात तर तो खूपच फिरलेला. त्यावेळी ह्या देशातून मी  फारसा फिरलेला नव्हतो. फार उशिरा मी हे देश पाहिले. तेही टूरिस्ट म्हणून.' माणूस ' बघायचा असेल तर कामानिमित्त फिरलं पाहिजे. विविध लोकांशी संपर्क झाला तर तेथील ' माणूस ' समजतो. प .युरोपपेक्षा दक्षिण आणि पूर्व आशिया अधिक बघण्यासारखा तर आहेच. तेथील  माणसं अधिक फ्रेंडली असतात. युरोप -अमेरिकेत माणसं खोटी वागतात आणि खोटी खोटी हसतात.
डेव्हिड हॉंगकॉंग आणि फिलीपीन्सला अधिक राहिला. त्यावेळी त्यांना हॉंगकॉंग म्हणजे लंडन सारखेच होते.  तेथे चिनी प्रभाव नव्हता.  आजही इंग्लंडपेक्षा  तेथील राहणीमान स्वस्त आणि मस्त आहे. इतर देश म्हणजे त्यांच्याकरिता स्वस्ताईच होती. मग कशाला इंग्लंडला जायचं ? म्हणूनच इंग्रजांना आपल्या देशात जावेसे वाटत नसावे. दूसरे कारण तेथील हवामान. वैतागतात ते  तेथील  हवामानाला ! आपण मात्र लंडन रिटर्न ची स्वप्ने पहाणारे.
डेव्हिडचा बॉस होता Alan . तोही मूळचा ब्रिटिश. तो रहात असे सिंगापूरला. नंतर स्थाईक झाला मलेशियात. इकडेच रमला. असे हे इंग्रज. म्हणजे गोरे. इंग्लंडमध्ये ज्यांना संधी मिळत नव्हती म्हणून  ते तो देश असा सोडून इतरत्र  गेले. आपल्याला मात्र ह्या गोर्या कातडीचे महत्व .
नंतर आमचा संपर्क तुटला. काही  वर्षांनी मला डेव्हिड गेल्याचे  समजले. तो चेन स्मोकर होता. मी त्याला अनेकदा सांगितले ,'Stop Smoking ' . तो कसला थांबवतो. त्याच्याबरोबर फिरत असतांना मीच सिगारेट पिल्यासारखा माझा वांस येत असे. मला नुसता वैताग येत असे . शेवटी तो  प्रवास करताना अचानक गेला. एक खरा सेल्समन . काटकसरीने राहणारा माणूस ,खूप धडपड्या , एक जॉली माणूस.

1 comment:

  1. सर, लेखाची सुरुवातीच्या आपल्या ओळी या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणार्‍या आहेत. एखादा देश दुसर्‍या देशाच्या पारतन्त्र्यातून मुक्त झाला तरीही त्या देशाच्या जनसमूहाची मानसिकता स्वतन्त्र होणे हेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे. आपण पुढे लिहिता की ‘भारतीय उद्योजक गोरी कातडी म्हंटली की खूष होतात व वेळात वेळ काढून गोर्या कातडीच्या मंडळींना भेटणार. एरव्ही मला ते सहजासहजी वेळ देत नसत. पण मी गोर्या माणसाला घेवून येतो आहे असे सांगितले की आम्हाला भेटीची वेळ सहज मिळत असे. ते साहजिकच आहे. भारतीय मेंट्यालिटी. गोरे कातडे.’ आजही या मानसिकतेत फारसा बदल झालेला नाही, हे कटु वास्तव आहे. खूप वाईट वाटले हे वाचताना. आपणास त्या काळात किती प्रचंड संघर्ष करावा लागला असेल आणि मुख्य म्हणजे आपल्याच देशातल्या लोकांची ही वागणूक पाहून प्रचंड मनस्तापही सहन करावा लागला असेल हे यातून जाणवते.
    डेव्हिडच्या काटकसरीबद्दल आपण जे लिहिलं आहे, तो गुण नक्कीच घेण्यासारखा आहे. आपण लिहिता की डेव्हिडला 4 / 5 स्टार हॉटेलमध्ये रहाणे त्यांच्या कंपनीच्या नियमाप्रमाणे शक्य असे पण तो 3 स्टार हॉटेलमध्येच रहाणे पसंत करीत असे. सर, या लोकांच्या प्राथमिकता (प्रायॉरिटीज) सुनिश्चित होत्या, स्वत:च्या गरजा भागतील अशा ३ स्टार हॉटेलमध्ये राहून संस्थेचा खर्च कमी करणे, स्वत:चीच संस्था असली तरीही अशा प्रकारचे नियम काटेकोरपणे पाळणे हा या मंडळींचा गुण शिकण्यासारखा आहे.
    सर, आपण आपल्या जीवनात ज्यांच्या संपर्कात आलात, त्यांच्याकडून जे जे शिकलात, ते खूप उत्तम रित्या मांडले आहेत. यशस्वी उद्योजक बनू इच्छिणार्‍यासाठी हे सर्व लेख अत्यंत वाचनीय आहेत. मी काही उद्योजकही नाही किंवा कुठला तज्ञही नाही. मी एक सामान्य वाचक आहे, उत्तम गुण आत्मसात करण्याची आवड असणारा एक भारतीय आहे आणि आपल्या लिखाणाचा चाहताही आहे.
    पर्यटक म्हणून विविध देशांमध्ये फिरणे नक्कीच आनंददायक आहे, पण एखादा देश, त्या देशाचे नागरिक यांना नीट समजून घ्यायचं असेल, तर त्यासाठी काय करायला हवं, हे आपण एका वाक्यात नमूद केलं आहे.
    लेखातील आपलं ते वाक्य मनात घर करून राहिलं आहे - ‘माणूस' बघायचा असेल, तर कामानिमित्त फिरलं पाहिजे. विविध लोकांशी संपर्क झाला तर तेथील 'माणूस' समजतो.
    सर, आपला अनुभव खरोखरच दांडगा आहे, आपल्याकडे अनुभवांचे भांडार आहे. आपले लेख वाचता वाचता आपल्याकडून हे अनुभव आणि मुख्य म्हणजे त्यांतील मौलिक शिकवण वाचकास सहजपणे प्राप्त होते. सहजसोप्या भाषेत लिहिलेले लेख तितक्याच सहजपणे वाचकाच्या मनावर अनुभव-बोधाचा ठसा उमटवतात.
    सर, आपण पदार्थ विज्ञानात पी.एच.डी. आहात, रंग विज्ञान आणि रंग तंत्रज्ञान ह्या विषयातले जागतिक कीर्तिचे तज्ञ आहात, हे आम्हां वाचकमित्रांना ठाऊक आहेच, पण या लेखांद्वारे मला आपल्याविषयी आणखी एक माहिती मिळाली. आपण रंगविज्ञानातील तज्ञ तर आहातच, पण त्याचबरोबर आपण माणसाच्या ‘अंतरंग-विज्ञाना’तीलही तज्ञ आहात.

    ReplyDelete