परदेशी प्रवासात आपल्याला माणसं भेटत राहतात . काही दिवसांनी ती आपल्याला आठवत राहतात. त्याचे कारण आपण त्यांच्याकडून नकळत काहीतरी शिकत असतो. कामानिमित्त एकत्र येतो तेंव्हा आपल्याला ती माणसं कामाव्यतिरिक्त वेळात अधिक समजू लागतात . त्यांच्यातील खरा 'माणूस' हा कामाच्या १० ते ५ ह्या वेळात असणाऱ्या त्यांच्यातील 'माणसा'पेक्षा खूप वेगळा वाटतो . त्यांनाही आपल्याबाबत असेच वाटत असणार. नाहीतरी आपण माणसं मुखवटे घालूनच फिरत असतो .
|
एका परिषदेत हार्टमनच्या बरोबर मी गप्पा मारताना ...... |
मी जर्मन कंपनीशी अनेक वर्षे संबंधित होतो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे विली कॉर्नेलिअस . त्याच्याबद्दल मी ह्यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये खूप विस्ताराने लिहिले आहे. मी पाहिलेला हा एक भन्नाट माणूस .त्याचे आणि माझे वैयक्तिक मित्रत्वाचे संबंध होते. त्याच्या कार्यालयातील त्याचे इतर सहकारी ह्यांच्याशीही माझा जवळून संबंध आला . मी तसे त्यांच्याबरोबर ८-१० वर्षे काम केलं . त्यात दोन जर्मन आणि एक युगोस्लाव्हीयन सहकारी होते .माझी त्यांच्याशी वैयक्तिक मैत्री झाली होती . हे तिघेही भारतात कामानिमित्त येत असत . ते सपोर्ट इंजिनिअर होते. रंगविज्ञानात तज्ज्ञ होते. सिस्टीम इंस्टॉलेशन , ट्रेनिंग , यंत्र दुरुस्ती करणे, ही त्यांची नेहमीची कामे होती . माझे इंजिनिअर ह्या विषयात शिकले की त्यांना भारतात येण्याचे काम पडत नसे
|
उजवीकडून हार्टमन . त्याच्यासोबत हॉलंडचा प्रतिनिधी . |
हार्टमन हा जर्मन इंजिनिअर भारतात प्रथम आला आणि मी त्याच्याकडून हे तंत्रज्ञान शिकून घेतले. हार्टमन तसा अबोल .कामापुरतेच बोलणारा . ह्या जर्मन लोकांना इंग्रजी भरभर बोलता येत नाही. ते आधी जर्मन भाषेतून विचार करतात आणि नंतर इंग्रजीत भाषांतरित करून बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना इंग्रजी शब्द सहजासहजी सुचत नाहीत. मग ते हातवारे करून व्यक्त होतात .तसे जर्मन असो व इतर युरोपियन. त्या लोकांना इंग्रजीचे फारसे प्रेम नसते . कारण युरोपमध्ये जर्मन भाषा अनेक ठिकाणच्या लोकांना बऱ्यापैकी माहित असते. त्यांनाही युरोपमधील इतर भाषा बऱ्यापैकी अवगत असतात. इंग्रजीमुळे युरोपात तसे फारसे अडत नाही. मी स्वतःच जर्मनीत स्थायिक झालो असतो. पण युरोपातील जर्मन , इटालियन आणि फ्रेंच ह्या भाषांचे ज्ञान मला नव्हते आणि ते व्यवसायासाठी असणे अत्यंत आवश्यक होते. हा हार्टमन तसा युरोपियन . तो चार भाषा चांगल्यापैकी बोलणारा होता . त्याने इंजिनिअरिंग डिप्लोमा मिळवलेला होता . जर्मनीत पदवी इतकेच डिप्लोमाला महत्व असते. तो डिप्लोमाधारक इंजिनिअर असला तरी त्याचा १०-१२ वर्षाचा प्रात्यक्षिक अनुभव होता . त्याने निरनिराळ्या यंत्रावर / संगणकावर काम केलेले होते . तो कामाला एकदम वाघ. मी त्याला युरोपमधील सर्व औद्योगिक प्रदर्शनात भाग घेताना बघितले आहे . तो त्याच्या कारला ट्रेलर जोडून एका शहरातुन दुसऱ्या शहरात सहज फिरायचा .त्याच्या कार्यालयातील कॉम्पुटर कलर सिस्टीम आणि त्याला लागणारी सर्व यंत्रसामुग्री ट्रेलरमध्ये ठेऊन हा कार्यालयातून निघत असे .कधी प्रदर्शन मिलानमध्ये असे तर कधी झ्युरिकमध्ये . कधी तो पॅरिसमध्ये असे तर कधी रोममध्ये . तो सारखा एका प्रदर्शनानंतर दुसऱ्या प्रदर्शनाला स्टॉल उभा करण्यासाठी जात असे .हा एकटाच एक दिवस आधी स्टॉलवर पोहोचतो. सर्व यंत्रे इंस्टॉल करतो.ती चालू करतो. स्टॉलची सर्व व्यवस्था त्याच्याकडेच असते . आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातील देखावा महत्वाचा तर असतोच पण जेंव्हा लोक प्रत्यक्ष यंत्रसामुग्री चालू असताना बघतात तेंव्हा ते त्या स्टॉलवर आधी खुश होतात. असा हा प्रदर्शनाच्या कामात रमलेला हार्टमन. युरोपात मजूर किंवा मदतनीस मिळत नाही. स्टॉलवर पडेल ती सर्व कामे इंजिनिअरला स्वतःच करावी लागतात . कोणतेही काम करण्यास जर्मन माणसाला कसलीही लाज वाटत नाही किंवा 'हे माझे काम नाही ', असे ते म्हणत नाहीत. कचरा काढणे असो का यंत्र पुसणे असो , त्याचा त्यांना कमीपणा वाटत नाही. मी हे त्याच्याकडून शिकलो.अनेकवेळा मी त्याच्याबरोबरच होतो. त्यामुळे मला ह्या वर्ककल्चरची चांगली ओळख झाली . एकदा प्रदर्शनातील स्टॉलची सर्व व्यवस्था झाली की तो टाय घालून सेल्समनच्या भूमिकेत जात असे आणि त्याचे मिठ्ठास बोलणे सुरु होई . मग आपण ऐकावे ते त्याचे विविध अनुभव . स्टॉलवर आलेल्या कोणीही प्रश्न विचारले की हा होत असे त्या विषयातील एक तज्ज्ञ . तो समजावून सांगताना एखादा प्रोफेसर शिकवितो आहे , असेच वाटत राहत असे .He was 'All in One' . असे हे व्यक्तिमत्व. बहुतेक जर्मन लोक हे असेच असतात. अमेरिकन लोकांचे मात्र तसे नसते. त्यांच्यात ज्ञानाची विभागणी असते. सेल्समन ह्याचे तंत्रज्ञान फारच मर्यादित असते. तो स्क्रू ड्रायव्हरला हातांत घेऊन काहीही करणार नाही. त्याला त्यातील काहीही माहित नसते व जमतही नाही. तेथे २-३ वेगवेगळे सहकारी इंजिनिअरला मदत करायला असतात . ज्याचे काम तोच ते काम करेल आणि निघून जाईल . ह्याऊलट सर्वच जर्मन इंजिनिअर. कोणतेही काम करतात . ते. Jack of All and Master of the Subject असे असतात . हार्टमन हा असा इंजिनिअर होता . अशी माणसं आपल्या सहवासात असली की आपण त्यांच्यापासून खूप काही शिकत असतो आणि लवकरच तसे तज्ज्ञ होतो. आपण त्या विषयात सहज पारंगत होतो. तंत्रज्ञान हे असे अवगत करावे लागते. असा हा हार्टमन . तसा दिलखुलास माणूस. त्याच्या व्यक्तिमत्वाला एक दुःखी छटा होती . त्याचा डायव्हर्स झालेला होता . त्याची मैत्रीण त्याला सोडून निघून गेली. पुन्हा लग्न करायचा त्याचा विचारच नव्हता . तसे जर्मनीत डायव्हर्सचे प्रमाण बरेच आहे. तेथील कुटुंब व्यवस्था ढासळते आहे असे म्हणतात . तरीही इतर युरोपपेक्षा परिस्थिती अधिक बरी आहे. ही माणसं अशी एकांडी होतात आणि त्यांचे जगणे अवघड होत जाते . अर्थात हे मला समजले जेंव्हा आम्ही चांगले मित्र झालो होतो . असा हा तंत्रज्ञ हार्टमन . हा माझा एक मित्र. मी त्याला कधीच विसरणार नाही.
|
माझा सहकारी अवसरे , बावडेकर , मी नरेंद्र गंगाखेडकर , श्रीनिवासन ( इडीपी मॅनेजर ) आणि र्हाइनहार्ड |
ऱ्हाईनहार्ड हा अतिशय तरुण इंजिनिअर माझ्या सहवासात आला. २-३ कलर सिस्टीम इन्स्टॉल करण्यासाठी तो भारतात आला होता . नुकताच इंजिनिअर झाला होता. अतिशय तरुण मुलगा . फारसा अनुभव पाठीशी नसलेला . पण अतिशय प्रयत्नवादी , लॉजिकल विचार करणारा. थोडासा रागीट . एकदम चिडणारा .मूळ जर्मन . फारसा मैत्री न करणारा . आपण आणि आपल्या कामात रमलेला . त्याच्याबरोबर काम करणे थोडेसे अवघड होते . युरोपमधील इतर देशातही त्याच्याबद्दल तक्रारी ऐकलेल्या होत्या , असे ऐकले होते .शेवटी तो नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत निघून गेला . त्यावेळी कुमाशियाह ह्या युगोस्लाव्हियाच्या इंजिनिअरने त्याची जागा घेतली आणि एका भारतभेटीत ह्याची आणि माझी भेट झाली . तो भारतात कलर सिस्टीम इंस्टाल करण्यासाठी दोन तीन वेळा आला होता .अतिशय शांत स्वभावाचा . पूर्व युरोपातून हा पश्चिम जर्मनीत शिकायला आलेला. त्यानंतर जर्मनीतच नोकरीला लागलेला . मी त्याला पहिल्यांदा त्याच्या पूर्वयुरोपातील जीवनाबद्दल सहज विचारले. त्याने तेथील अनेक कटू अनुभव सांगितले . पण जर्मनीतही त्यांना दुय्यम स्थान मिळत होते असे त्याचे मत होते . तो कामात प्रवीण होता . काम मन लावून करीत असे. त्याचे लग्न झाले होते. त्याची बायको जर्मन होती. तिचा स्वतःचा छोटासा व्यवसाय होता. ती ब्रिटनला कपड्याच्या वस्तू विकत असे. तो तंत्रज्ञ होता . दिलेल्या कामात चोख असे. माझ्या बरोबरचे इंजिनिअर त्याच्याकडून खूप शिकले. त्यावेळी भारतीयांना पूर्व युरोपमध्ये प्रवास करणे कठीण होते. व्हिसा मिळणे तर फारच कठीण.कुमशीयाह नंतर कधी भेटला नाही . पूर्व युरोपिअन माणूस जवळून समजला तो त्याच्यामुळेच.
|
सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि ट्रेनर कुमशियाह , युगोस्लाव्हीयन |
आयव्हॅन गॅरट टेक्सटाईल केमिस्ट असलेला व मला भेटलेला एक अमेरिकन तंत्रज्ञ .तो एकदा अहमदाबादच्या टेक्स्टाईल कम्पनीच्या कलर सिस्टीमसाठी भारतात आला होता . तो टिपिकल अमेरिकन होता . अमेरिकेशिवाय दुसरे काही जग आहे , हे त्याला माहीतच नव्हते. त्याला केवळ अमेरिकन व्यवस्था माहित होती .भारत आणि त्यातही अहमदाबादचा प्रवास त्याच्यासाठी पहिल्यांदाच होता. त्याच्यासाठी हे सर्व अगदी नवीन आणि मनोरंजक होते. त्याचे नशीब बघा. त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते . जोरदार पाऊस होता . अहमदाबादची धावपट्टी दिसत नव्हती . ढग खाली उतरले होते . मुंबई - अहमदाबाद हे आमचे विमान ३ वेळा उडाले आणि तीन वेळा अहमदाबादला न उतरताच मुंबईला परत आले. तो ह्या प्रवासाने घाबरून गेला . शेवटी आम्ही एक दिवस मुंबईत राहून अहमदाबादला कसे तरी पोहोचलो. आमचा तेथे दोन दिवस मुक्काम होता. टेक्स्टाईल कम्पनी मोठी होती. काम करणारे लोक तज्ज्ञ होते. त्यांनी तंत्र खूप लवकर शिकून घेतले. आम्ही मुंबईला परत आलो आणि तो अमेरिकेला निघून गेला. जाताना मला म्हणाला , ' I love India . I like Mumbai and people from Ahemedabad . I would certainly like to visit India again .' त्यानंतर त्याला भारतात येण्याची संधी मिळाली नाही. असा हा एक हुशार अमेरिकन तंत्रज्ञ.
अशी ही परदेशी माणसं . मला कामामुळे भेटत गेली. एकदा तुम्ही जगाशी जोडत गेला की नवी नवी माणसं भेटत राहतात. काही लोकांशी व्यावहारिक संबंध संपला की आपण त्यांना विसरून जातो. त्यातील काही लोक आठवणीत राहतात कारण आपण त्यांच्याकडून नकळत काहीतरी शिकत राहतो आणि जगाशी जोडले जातो. देशी असो का परदेशी , माणसं सगळी सारखीच .प्रत्येकाच्या स्वभावाच्या छटा वेगवेगळ्या .त्यांच्यातील देशी बदल सहज दिसून येतातच . एकमात्र खरे , आपण त्यांच्या सहवासामुळे हळूहळू थोडे बदलू लागतो . तेही आपल्यामुळे बदलतात . अशी काही बदललेली परदेशी माणसं मी पाहीली आहेत . त्याबद्दल लिहिणार आहे .
हार्टमनच्या व्यक्तिमत्त्वाचे तुम्ही केलेले वर्णन विशेष प्रभावी वाटले. प्रदर्शनातील त्याच्या कार्यशैलीबद्दल आपण लिहिता - ‘युरोपात मजूर किंवा मदतनीस मिळत नाही. स्टॉलवर पडेल ती सर्व कामे इंजिनिअरला स्वतःच करावी लागतात . कोणतेही काम करण्यास जर्मन माणसाला कसलीही लाज वाटत नाही किंवा 'हे माझे काम नाही ', असे ते म्हणत नाहीत. कचरा काढणे असो का यंत्र पुसणे असो , त्याचा त्यांना कमीपणा वाटत नाही. मी हे त्याच्याकडून शिकलो.अनेकवेळा मी त्याच्याबरोबरच होतो. त्यामुळे मला ह्या वर्ककल्चरची चांगली ओळख झाली . एकदा प्रदर्शनातील स्टॉलची सर्व व्यवस्था झाली की तो टाय घालून सेल्समनच्या भूमिकेत जात असे आणि त्याचे मिठ्ठास बोलणे सुरु होई . मग आपण ऐकावे ते त्याचे विविध अनुभव. स्टॉलवर आलेल्या कोणीही प्रश्न विचारले की हा होत असे त्या विषयातील एक तज्ज्ञ . तो समजावून सांगताना एखादा प्रोफेसर शिकवितो आहे , असेच वाटत राहत असे .He was 'All in One' . असे हे व्यक्तिमत्व.’
ReplyDeleteसर, तुमचा हा परिच्छेद आम्ही प्रत्येक भारतीयाने वाचावा आणि आचरणात उतरवावा असा आहे. तुम्ही माणसांना भेटलात, माणसं वाचलीत, त्यांच्याकडून शिकत राहिलात आणि माणसं जोडत राहिलात.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे - ‘देशी असो का परदेशी , माणसं सगळी सारखीच .प्रत्येकाच्या स्वभावाच्या छटा वेगवेगळ्या .त्यांच्यातील देशी बदल सहज दिसून येतातच . एकमात्र खरे , आपण त्यांच्या सहवासामुळे हळूहळू थोडे बदलू लागतो . तेही आपल्यामुळे बदलतात.’ खूप सुन्दर लिहिलं आहे.