मी तसा विज्ञानाचा विद्यार्थी . मला मराठी साहित्याची आवड होती .औरंगाबादमध्ये मराठी साहित्य चळवळ जोरात होती. माझे मराठीवर प्रेम. त्यामुळे चौफेर वाचन चालू असे आणि मी थोडेबहुत वृत्तपत्रीय लिखाण करीत असे. मी सभा संमेलनाला आवर्जून जात असे. मी त्यावेळी हैद्राबादच्या मराठी साहित्य संमेलनाला आवर्जून गेलो होतो .
माझा मुक्काम भालचंद्र महाराज कहाळेकरांच्याकडे होता . त्यांचे सासरे माझ्या वडिलांचे मामा .माझ्या वडिलांचे बालपण त्यांची आई ते लहान असतानाच गेली होती म्हणून त्यांच्या मामांच्याकडेच झाले होते . ते आम्हाला आजोबासारखेच . ते म्हातारपणी भालचंद्र महाराज कहाळेकरांच्याकडेच रहात असत . आजोबाना भेटण्यासाठी आम्ही तेथेच उतरलो होतो . कहाळेकर उस्मानिया विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक होते आणि मोठे समीक्षक म्हणून प्रसिद्ध होते . ते संमेलनाचे आयोजनही करीत होते .नरहर कुरुंदकर कहाळेकरांचे शिष्य . त्यांचे गुरु - शिष्याचेच नाते होते .त्या दोन तीन दिवसात कुरुंदकर कहाळेकरांच्याकडे रोज येत असत . त्यांच्या विविध साहित्य विषयावर चर्चा होत असत . आम्हाला बाजूच्या खोलीत त्या सहज ऐकू येत असत . ते कुरुंदकर मला आजही आठवतात . त्या गुरुशिष्याचा संवाद आठवतो . त्यांच्या चर्चा . त्यांचे वादविवाद .त्यांची वादविवादातील खडाजंगी मी ऐकली आहे. तेथील मराठी साहित्य संमेलनात कुरुंदकरांचा सहभाग होता . ते संमेलन आचार्य अत्रे ह्यांनी त्यांच्या विनोदाने गाजविले होते .
वा ल कुलकर्णी संमेलनाचे अध्यक्ष होते .ते त्यावेळी मराठवाडा विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख होते . त्यांचा साहित्यिक दरारा होताच . कुरुंदकर त्यावेळी नांदेड गाजवीत होते तर वा ल कुलकर्णी औरंगाबाद .
वा ल मोठे नावाजलेले समीक्षक . कुरुंदकरही तसे समीक्षकच . दोघात खूपच फरक होता .वा ल मुंबईतून औरंगाबादला आलेले . महाराष्ट्रभर नावाजलेले . कुरुंदकर मराठवाड्याचे . तसे त्यावेळचे उदयोन्मुख मराठी साहित्यिक . त्यावेळी त्यांना महाराष्ट्रात फारशी प्रसिद्धी मिळालेली नव्हती .
कुरुंदकरांचे वेगळेपण तेव्हा जाणवू लागले होते . मराठी साहित्याव्यतिरिक्त इतिहास आणि राजकारणाचा अभ्यास हे
त्यांचे विशेष आवडीचे विषय . वा ल म्हणजे फक्त मराठी समीक्षक . कुरुंदकरांचा फेरफटका मात्र सर्वत्र . मराठी साहित्याव्यतिरिक्त , इतिहास संशोधन आणि समाजवादी चळवळीत ते आघाडीवर होते . त्यांनी सर्व विषयावर व्याख्याने देण्यास सुरुवात केली होती. त्यांनी मराठवाडाभर सर्वत्र दौरे केले . विविध विषयावर व्याख्याने दिली . दै मराठवाड्यात त्यांच्या व्याख्यानांचे रिपोर्ट्स येत असत. त्यामुळे नरहर कुरुंदकर रोजच्या चर्चेत असत .
कुरुंदकरांच्यामुळे राष्ट्रसेवादलाला एक वक्ता मिळाला होता . त्यांना ' साधना ' व्यासपीठ मिळालं . कुरुंदकर महाराष्ट्रभर व्याख्याने देत आणि राष्ट्रसेवादलाचे अभ्यासवर्ग घेऊ लागले . त्यांनी राष्ट्रसेवादलाच्या अभ्यासवर्गासाठी महाराष्ट्र पिंजून काढला असेल . त्यामुळे त्यांचे नांव महाराष्ट्रभर झाले.मराठवाडा साहित्य संमेलनात कुरुंदकर असतच .ते संमेलन गाजवून सोडत .मला जालन्याचे संमेलन आठवते . त्यांनी ते खूप गाजवले होते .
मी भोपाळच्या मराठी साहित्य संमेलनाला गेलो होतो . कुरुंदकर तेथे होतेच . मंडपात दत्तो वामन पोतदार ह्यांच्याशी त्यांची चर्चा चालू होती . चर्चा कसली ? दत्तो वामन पोतदार ह्यांची ते विकेटच घेत होते . त्यावेळी मला पोतदार एकदम शांत वाटले. ते ऐकून घेत होते .कुरुंदकर बोलत होते. आजही त्या दोघांच्या मूर्ती माझ्या डोळ्यासमोर तशाच उभ्या राहतात .
कुरुंदकर विचाराने समाजवादी .दै .मराठवाड्याचे अनंत भालेराव हे ही समाजवादी .दोघांचे अगदी जवळचे संबंध . नरहर कुरुंदकरांचे शंकरराव चव्हाणांच्या बरोबर चांगले संबंध होते . दोघे एकमेकांचे चाहते . ह्याउलट अनंतराव मात्र शंकररावांचे राजकीय विरोधक .
साहित्य , इतिहास आणि राजकारण ह्या सर्वच क्षेत्रात गाजलेला हा मराठवाड्याचा वक्ता शेवटी व्यासपीठावर भाषण देताना अखेरचा श्वास घेत होता तो प्रसंग आजही मनाला चटका लावून जातो . अनंतरावांनी कुरुंदकर गेल्यानंतर जो अग्रलेख लिहिला होता तो आजही आठवतो .
एक वादळ अकस्मात शांत झाले होते आणि मराठवाडा एका साहित्यिकाला आणि विचारवंताला पोरका झाला होता . तो दिवस आजही आठवतो .त्यांची असंख्य भाषणे आजही आठवतात आणि त्यांचा आवाज कानात घुमत असतो . त्यांच्या स्मृतीस अभिवादन .
एक वादळ अकस्मात शांत झाले होते आणि मराठवाडा एका साहित्यिकाला आणि विचारवंताला पोरका झाला होता . तो दिवस आजही आठवतो .त्यांची असंख्य भाषणे आजही आठवतात आणि त्यांचा आवाज कानात घुमत असतो . त्यांच्या स्मृतीस अभिवादन .
No comments:
Post a Comment