Thursday, April 20, 2017

म्हातारपणची शोकांतिका


काही दिवसापूर्वीच Being Mortal हे अतुल गवांडे ह्यांचे ‘म्हरातारपणाचं  जगणं’ ह्या विषयावरचं पुस्तक वाचलं आणि गेले कित्येक दिवस म्हातारपण , वृद्धाश्रम , उत्तरायण ह्या विषयाचा भुंगा पाठीमागे लागला.
प्रसिद्ध कादंबरीकार पावलो कोएलहो ( Paulo Coelho ) ह्यांनी लिहिलेले आठवले ....
When I was young, I was dazzled by all things life could offer me. I thought I was capable of achieving all of them. When I got married, I had to choose just one path, because I needed to support the woman I love and my children. When I was 55 and a highly successful executive, I saw my children grown-up and leave home and I thought that from then on , everything would be a mere repetition of what I already experienced. That was when my spiritual search began. 
WHAT A TRUE PICTURE ! That is the old age . 
काही दिवसापूर्वी म्हातारपण ह्याच विषयावरचा  “ अस्तू “ हा मराठी चित्रपट पाहिला. डिसेंबर २०१३ चा हा चित्रपट . दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक पुरस्कार प्राप्त झालेला . मुंबईत फार उशिरा चित्रपटगृह मिळाले. फारच थोड्या ठिकाणी चालू होता .मुद्दाम जिथे चालू आहे तेथे जाऊन पहावा लागला . तिकडे सलमान खानचा चित्रपट ५०० कोटीचा गल्ला मिळवतोय आणि इकडे ह्या सुंदर चित्रपटाला १०० म्हातारी डोकी काठी टेकवत येत आहेत . कोण पहाणार? शरीराने जिवंत पण मनाने मेलेल्या असलेल्या एका म्हाताऱ्याची शोकांतिका ?
म्हातारे होणं ( Ageing ) मोठं कठीण असतं .परावलंबी असलेलं म्हातारपण अधिक कठीण असतं . आपण धडधाकड राहून निवृत्तीनंतरचं शांतपणे सुखाने जगणं वेगळं आणि स्मृतीभंश होऊन म्हातारपण जगणं अधिक कठीण . ती एक शोकांतिकाच असते. आपल्या मुला-मुलीनी ह्या शोकांतिकेला बरोबर घेऊन आणि स्विकारून कसं जगायचं ? हा खरा प्रश्न आहे . त्यांच्याकरिता हे महाकठीण काम आहे . संवेदनशील मुलामुलींना ते अधिक त्रास देणारं आहे.
एक बुध्दिमान संशोधक प्राध्यापक . संपूर्ण जीवन रसरसून जगलेला . दोन मुलीना जेवढे देता येईल तेवढे देऊन सुखी शांत जगणारा हा म्हातारा. अल्झायमरसारख्या रोगामुळे लहान मुल झालेला . शरीराने जिवंत पण मनाने मेलेला . अशा ह्या मुलाला सांभाळणारी त्याची मुलगी आणि तिचा डॉक्टर जावई. आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात कशाला ठेवायचे ? असा विचार करून वडिलांचीच आई झालेली ही मुलगी संवेदनशील मनाची असल्यामुळे खूप काही सहन करीत वडिलांचे सर्व काही करीत असते आणि एक दिवस तिचे हे म्हातारे वडील नाहीसे होतात . त्यावेळी तिची जी अवस्था झाली आहे त्याची  गोष्ट सांगणारा हा चित्रपट. माणूस संवेदनशील असला की त्याची जी फरफट होते ते आपण अनेक कुटुंबातून पहात असतोच. तिची धाकटी बहिण. दूर राहणारी . Intimacy at a distance असा Rational विचार करणारी आणि स्वतःच्या करिअरमध्येच रमलेली . दूर असलेल्या मुलीला मात्र असे वाटत असते की बाबांचे प्रेम जवळ असलेल्या मुलीवरच अधिक आहे . अनेक कुटुंबात असे प्रकर्षाने जाणवते . ते कौटुंबिक ताणतणाव सर्वत्रच दिसून येतात.
म्हाताऱ्या मंडळीकडे सुखाने जगण्यासाठी पैसा आहे , घर आहे. तरीपण अधिक म्हातारे होणं आणि कसल्याही प्रकारचे पंगुत्व येणे हे आपल्या अपत्यासाठी त्रासदायक आहेच. आपल्याला लहान मुलासारखं जपताना त्यांना बरेच काही सहन करावे लागते. ती मुलं अधिक संवेदनशील असतील तर त्यांचा अधिक कोंडमारा होत असतो. त्यांच्या जगण्याच्या वेगात आपण एक अडथळाच असतो. असे होणे फार क्लेशकारक असते. आपल्याकडे वृद्धाश्रम इतके चांगले नाहीत. Assisted Living हा प्रकार फारसा उपलब्ध नाही.

आपण ज्या वडिलावर प्रेम करतो आणि त्यांना सांभाळतो ते वडील ( अप्पा) आपल्याला साधे ओळखत नाहीत हे दु:ख फार मोठं आहे . त्या मुलीची ( इराची) भूमिका  इरावती हर्षे ह्यांनी फार सुंदर केली आहे . मनाला चटका लावून देणारी ही भूमिका पहाण्यासाठी तरी हा चित्रपट एकदा पहावा. वडिलांची भूमिका करणारे मोहन आगाशे म्हणजे नटसम्राट . अतिशय सुंदर भूमिका . त्यांची ही भूमिका पाहिल्यानंतर असे म्हातारपण आपल्या वाटेला येऊ नये असा विचार अनेकदा डोक्यात येतो आणि मग आपल्या डोक्यातून जातच नाही. अर्थात हे आपल्या हातात नसते. जावई ( मिलिंद सोमण ) आणि धाकटी मुलगी ( देविका दप्तरदार ) ह्यांच्या भूमिका उल्लेखनीय आहेत. अमृता सुभाष पारितोषिक विजेती आहेच. तिच्या भूमिकेतील माणूसपण कायम लक्षात राहतं. चित्रपट अस्वस्थ करणारा आहे . 

म्हातारपण म्हंटलंकी आपल्याला संवाद आठवतात ते 'नटसम्राट' आणि ' संध्याछाया' ह्या 

नाटकातले. अंतर्मुख करणारे.

माणसाला म्हातारपणी जे रडू येतं ते एका विशिष्ट गोष्टीचं नसतं . त्याच्या हातात काही उरलेलं नसतं . तो दु:ख कुरवाळीत बसतो. पुन्हा पुन्हा जिगसा पझल सारखं तो ते वेगवेगळ्या पद्धतीने लावून बघतो . त्याच्या लक्षात येतं  की आपण चुकलो . मग तो दुसरं काय करेल . तो रडतो? 
म्हणूनच तुम्ही तरुण मुलांनी म्हातार्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करावे. चुका केल्या म्हणून भोग आले. तुम्ही चुका कराल तर तुम्हीही भोगाल . तसं गंभीरपणे काहीही घ्यायचं नाही. रडण्यासाठी सगळं म्हातारपण पडलय. म्हातारपण  येणारच  पण  अवलंबून जगनं  महा  कठीण . आपल्यापेक्षा  आपल्या  आप्तस्वकीयांसाठी .   






3 comments:

  1. लेख आवडला. मराठीतल्या तुमच्या वेब साईटला www.smartdost.in च्या शुभेच्छा.


    ReplyDelete
  2. मनोरंजक पण सत्य माहितीचा खजिना असलेली मराठी साईट तुम्हाला नक्की आवडेल. सर्वांना उपयोगी पडतील, आनंदी ठेवतील आणि इतरांपेक्षा स्मार्ट करतील अशा निवडक आर्टिकल्सचा मेवा नित्यपणे शेअर करणारा मराठमोळा दोस्त “स्मार्टदोस्त”. www.smartdost.in मराठीतली ही हटकी साईट तुम्हाला वेगळ्या विश्वात नेईल असा विश्वास.

    ReplyDelete