Tuesday, April 18, 2017

तदा आईचे हृदय असेही असते .....


आई म्हंटलं की आपल्याला कवी यशवंतांची “आई” ही कविता आठवते. कोणाचीही आई तशीच असते. पण मी बापाचे हृदय असणारी कणखर आई पाहिली आहे.
माझा एक सहकारी मित्र . खूप हुशार. मुंबई विद्यापीठात एम.एससी.( पदार्थविज्ञान ) विषयात पहिला आलेला. टाटा फंडामेंटल रिसर्च मध्ये निवड झालेला. ते न स्विकारता युडीसीटी मध्ये माझ्या गाईड बरोबरच संशोधन करणारा. शिष्यवृत्ती ३०० रुपये मिळालेली. घरी बेताचीच परिस्थिती. भाऊ-बहिण शिकणारे. वडिलांच्या पगारात घर कसे चालवणार? घरचा आर्थिक व्यवहार आईच्याच हातात. आई हिशोबी. घर तीच चालवीत असे. तिने आपल्या मुलाला म्हणजे माझ्या मित्राला पहिल्याच महिन्यात सांगितले की घर खर्चासाठी रु २०० दरमहा द्यायचे. माझा मित्र नेहमी पैसे मिळाले की आईच्या हातात पैसे देत असे. त्यामुळे त्याला थोडी कडकीच असे. सर्वच कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात परिस्थिती अशीच असते. 
पदार्थविज्ञान विषयात ३ वर्षात पीएच.डी. मिळणे तसे कठीण. मित्राची शिष्यवृत्ती संपली . थोडे काम राहिले होते . करणार कसे ? आई म्हणाली , ‘ नोकरी कर . पुरे शिक्षण. ‘. त्याला कॉलेजमध्ये Demonstrator ची नोकरी मिळाली. पगार ५०० रुपये . आईला ४०० रुपये द्यावे लागत असत. नोकरी करून संशोधनाचे काम करणे जमत नसे. वेळ आणि पैसा . दोन्हीचा प्रश्न . त्याच महाविद्यालयात त्याला नोकरी मिळाली. पगार वाढला . पैसे आईच्या हातात द्यावे लागत असत . आईची आर्थिक शिस्त. सिनेमा पहावा असे वाटले तरी आईला पैसे मागावे लागत असत. त्यावेळी मला वाटत असे ,' अशी कशी आई ?', सर्व तिच्या मनाप्रमाणे . मुलाने पैसे तिच्याच हातात द्यायचे व लागल्यास मागायचे . ती ठरवणार मुलाला द्यायचे किंवा नाही. पै आणि पै चा हिशोब द्यावा लागे. त्याला संशोधन मध्येच सोडून द्यावे लागले. पगार पुरत नाही म्हणून शिकवण्या घ्याव्या लागत असत. त्याने नंतर शिकवण्यात खूप पैसा मिळवला . संशोधन मात्र सोडावे लागले.
खूप वर्षांनी हे लक्षात आलं की त्याच्या आईचे बरोबर होतं. त्यावेळी मला त्याच्या आईचा राग आला होता. . एका संशोधकाला संशोधन सोडून द्यावे लागले. व नोकरी आणि शिकवण्या करत बसावे लागले. घर चालवायचे तर पैसा हवाच. मुलांना शिकवलं . पण किती पैसे त्यांच्या शिकवण्यावर खर्च करणार ? त्या आईचा दृष्टीकोन practical होता. तिचा मुलांच्यावर अधिकार होता. घरातील इतर सदस्यांचा विचार होता.
आज अनेक आई-वडील आपले सर्व जमा केलेले पैसे मुलाला – मुलीला अमेरिका – युरोपमध्ये शिक्षण घेण्यासाठी खर्च करतात. मुलं त्या पैशाचा जोरावर अमेरिकेत जातात. आई-वडील कर्जाचे हप्ते भरत राहतात. मुलगा तिकडेच स्थाईक होतो. आतातर H1B व्हिसा मिळण्याचे वांदे. कर्ज फेडणार कसे ? , हा प्रश्न . वयोवृद्ध आई-वडील काय करणार ? आर्थिक हाल . शारीरिक त्रास. पैसे तर देऊन टाकलेले. अनेकांची परिस्थिती वाईट. अनेक कनिष्ठ आणि मध्यम वर्गीय घरामध्ये ह्या समस्या दिसून येतात . सर्व पैसा मुलांच्याकरिता खर्च केला की असा त्रास होणारच.
मग मला माझ्या मित्राच्या आईची आठवण होते . आई-वडिलांनी नुसते भावूक असणे योग्य नव्हे. आपला विचार करूनच  मुलांच्यावर खर्च करावा. त्यांच्यावर हक्क गाजवावा. त्यांनी मुलांना कुटुंबाची जबाबदारी घेतलीच पाहिजे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. आई-वडिलांनी थोडे खमके असणे आवश्यक आहे .आर्थिक व्यवहार महत्वाचा आहे. त्याचा विचार करून घर चालविले पाहिजे. नाहीतर घर चालविणार कसे ? काही वडील असे व्यवहारी नसतात . आईला अशी जबाबदारी अधिक चांगली उचलता येते , असे दिसून येते. आई ही आई असतेच . तिने असेही कणखर असणे आवश्यक असते .  



1 comment: