Tuesday, April 18, 2017

प्रवास असा आणि तसा ....


एक जीवनप्रवास ....... सुखाचा .........दु:खाचा .........वेदनेचा........निखळ आनंदाचा........... सुखद सहवासाचा.......... हव्या हव्याशा वाटणाऱ्या कोमल तरल भावनांचा ....... नको असणाऱ्या आठवणींचा ......... यशाच्या ध्येयत्ताऱ्याकडे झेपावणारा ......कधी कधी अगतिकतेचा ......अनेकदा विलक्षण नको असणारा ......सर्व संपवणारा ..... कधी अंतर्मुखतेकडून अध्यात्माकडे नेणारा .......तर कधी भौतिक सुखाची उधळण करणारा ...... कधी स्वतःला विसरणारा .......तर कधी कधी फक्त स्वतःचाच विचार करणारा ...... मनस्वी ......
आपल्याला सूर्य उर्जा देतो. नं चुकता ,नियमितपणे तो त्याचे काम बिनभोबाट खंडही न होऊ देता अविरतपणे चालू ठेवतो. तो रोज सकाळी आपल्याला जागा करतो व जगण्याची नवी आशा निर्माण करून जगण्याचे नवे सामर्थ्य देतो. संध्याकाळी तो मावळल्यानंतर एक उदास अंधार निर्माण करतो. त्या रात्रीच्या गर्भात असतो म्हणे उद्याचा उष:काल.
आपलं आयुष्य वाहत राहते ...एखाद्या नदीसारखे – अखंड – नं संपणारं ... आपण अनेक अडचणींना तोंड देत पुढे जात असतो . यश-अपयश सामोरे येत असते. नैराश्य आणि आशावाद ह्यांच्या दोन टोकावर आपण झोके घेत असतो. आनंद – सुख , आशा – निराशा ह्यांच्या हिंदोळ्यावर आपण रमतो , दमतो आणि विसावतो.
अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपले मन आपला आनंद गमावून बसते . त्याचा शोध घेणे तसे कठीणच असते. साधं बघा . आपला शेजारी , मित्र किंवा नातेवाईक जर आनंदी असेल तर आपणही त्याच्या आनंदात सामील व्हावयास हवं . त्यावेळी आपल्याला दु:ख का बरे वाटावे ? आपण कोणताही पाश न स्वीकारता इतरांच्या सुखदु:खात सामील कां होऊ शकत नाही ?
कोणत्याही दु:खाच्या क्षणी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की “ हे ही दिवस जातील “. तसेच सुखाचे दिवस येतात नि जातात. ते ही असेच येतील आणि जातील.
हे जग बदलतंय . बदलणारच. बदलत राहणं ( Change ) हा एक स्थायीभाव आहे, हे आपल्या लक्षात असावयास हवं .
आपण आणि आपले जीवन इतक्या विविध गोष्टीवर अवलंबून असतं. अनेक बाह्य घडामोडीमुळे आपल्या जीवनावर सतत परिणाम होत असतो. ‘Expect the Unexpected’, हेच आपल्या लक्षात येत नाही.
आपण आपल्या स्वतःला घडवीत गेले पाहिजे. आपला ‘ आत्मानंद ‘ हेच खरे आनंदाचे स्वरूप आहे . मन:शांती ( Inward Peace ) फार महत्वाची असते. आपल्याला जर खरा आत्मिक आनंद हवा असेल तर आपल्याला जे हवे ( श्रेयस किंवा प्रेयस ) त्याचा आपण त्याग करावयास हवा. आपण आपल्याला विसरायला हवं .चित्रकाराला चित्रातून मिळणारा आनंद , शिल्पकाराला शिल्पकृती पूर्ण झाल्याचा आनंद, हे आनंदाचे खरे रूप. तेच आपण शोधले पाहिजे.
प्रत्येकाला आनंदी असावे असेच वाटत असते. कोणालाही दु:ख नकोच असते. दु:ख हे आयुष्याच्या जगण्याच्या अवस्थेशी निगडीत आहे. दु:ख आणि त्रास हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे . आशा – आकांक्षा हे दु:खाचे मूळ आहे असे गौतम बुद्धाला जाणवले म्हणून तो हिमालयात निघून गेला. जगातला कोणताही माणूस मरेपर्यंत आनंदी राहू शकत नाही. माणूस हा आनंद त्याच्या स्मशान यात्रेलाच घेऊन जातो. जगनं म्हणजे जन्मल्यापासून वेदनेला घेऊन राहणं. आपण म्हणूनच निवृत्त होण्याचा प्रयत्न करावयास हवा. आशेपासून दूर जावयास हवे. निवृत्त होणं व राजीनामा देऊन अलिप्त राहणे म्हणजेच जगण्याच्या हव्यासातून बाहेर पडणे . ते जमलं पाहिजे.
जीवनपूर्तता कशी प्राप्त होईल ? मन खरे कसे समाधानी असेल? ज्याच्याजवळ आपल्यापेक्षा खूप काही आहे ,त्याच्याकडे न बघता आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे खूप काही नाही व आपल्याकडे इतरांच्यापेक्षा खूप जास्त आहे , असा विचार केला तरच आपण समाधानी होऊ शकू.
एका ख्रिस्त धर्मगुरुनी म्हंटले आहे की , ‘ मी लहान असताना पायातल्या बुटासाठी रडत होतो पण जेव्हा एका व्यक्तीला पायच नाहीत  हे दिसले तेंव्हा मी बुटासाठी रडणे सोडून दिले ‘. आपल्याला अनेक गोष्टी हव्या हव्याशा वाटतात व त्या मिळवण्यासाठी आपण जीवापाड कष्ट करून मिळवतो. परंतु ह्या मिळवलेल्या गोष्टीच अनेक दु:खे निर्माण करीत असतात. अशा मिळवलेल्या वस्तूतून आनंदाच्याऐवजी अनेक दु:खे निर्माण होताना दिसतात आणि आपला भ्रमनिरास होतो. कित्येक लोकांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गरजा उपलब्ध नसतात . तरीही ही मंडळी सुखी-समाधानी कशी असतात ? आनंद ही मनाची एक अवस्था आहे . ही अवस्था आपण कशी प्राप्त करून घ्यायची हे आपण ठरविले पाहिजे .
आपण आत्मकेंद्रित असावयास नको. आपण आत्मप्रौढीपासून दूर असावयास हवे. आपण हे जर करू शकलो तर छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपले मन दुभंगणार नाही. आपण बौद्धिक आणि आत्मिक  आनंद मिळवू शकू. भौतिक सुखे व पारमार्थिक सुखे ह्याच्याबरोबर आत्मिक सुख ही फारच महत्वाचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
भौतिक सुखे मिळाली तरी मन पूर्णपणे समाधानी होईल ह्याची शक्यता नाही. आपण फार छोट्या छोट्या कारणामुळे आनंद गमावून बसत असतो. जर एखाद्याने आपणास जेवणाचे आमंत्रण दिले नाही म्हणून आपण त्याच्यावर राग धरतो. एखाद्या सहकार्याला जास्त पगाराची बढती मिळाली म्हणून आपण चिडतो. आपला सहकारी परदेश प्रवासाला गेला म्हणून आपण जळफळतो. आपल्या मनात नकळत अशा असूया निर्माण होत असतात. त्यामुळे आपण दुसर्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाहीत.
जगातली सगळीच माणसे खूप छान किंवा खूप वाईट असू शकत नाहीत. अशी एका टोकाची माणसे असू शकत नाहीत. आज चांगली असलेली माणसे उद्याही चांगली असतीलच असे नाही. ती बदलत असतात. जर आपला मित्र किंवा शेजारी त्याला मिळालेल्या यशामुळे आनंदी झाला असेल तर आपणही त्याच्या आनंदात सहभागी व्हावयास हवे.
आपण आपल्या जवळच्या माणसात गुंतणे स्वाभाविक आहे .परंतु न गुंतता गुंतले पाहिजे. आपण एकरूप असून वेगळे असावयास हवे ( Detached Attachment ). कोणत्याही सुखदु:खाच्या क्षणी हे लक्षात ठेवावयास हवे की ‘ हे ही दिवस जातील ‘. नेहमीच सुखाचे किंवा दु:खाचे दिवस नसतात. ते येतात आणि जातात. सुख हे दिवसासारखे असते. रात्र त्या नंतर येतेच. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उष:काल असतो. ‘ होता होता काळ रात्र झाली ..... ‘ हे लक्षात घेतले पाहिजे. आनंद शोधला पाहिजे . आनंदाच्या झाडाखाली विसावले पाहिजे.


No comments:

Post a Comment