Saturday, March 15, 2014

स्मरणातील ‘गिधाडे’चा पहिला प्रयोग


मी मुंबई विद्यापीठाच्या माटुंग्यातील यु.डी.सी.टी मध्ये संशोधन करणारा विद्यार्थी होतो. पीएच.डी साठी औरंगाबादहून येथे आलो. विद्यार्थी जीवनातील एकटेपणा अनुभवत होतो. नाटक–सिनेमा पाहणे हा एक विरंगुळा होता."भुवन सोम", "सारा आकाश", "अपराजितो" असे सुंदर चित्रपट पाहत होतो. त्या वेळी नाटक/सिनेमा पाहण्यासाठी मी कुठेही प्रवास करीत असे. तो एक विरंगुळा होता. कधी कधी माझे मित्र मला शोधण्यासाठी 'शिवाजी मंदिर' किंवा ‘साहित्य संघात’ येत असत. बाळ कोल्हटकर, वसंत कानेटकर ह्यांची नाटके जोरांत चालत असत. मग श.ना.नवरे, सुरेश खरे, जयवंत दळवी, श्री. ना. पेंडसे ह्यांची नाटके गाजू लागली. प्रायोगिक रंगभूमीवर नवे नवे प्रयोग होत असत. खानोलकर-तेंडुलकरांची नाटके होऊ लागली. 

असाच एक रविवार असतो. सकाळची “कोवळी उन्हें” पडलेली होती. मध्येच कुठेतरी काळ्या ढगांचा पुंजका दिसतो. काळे ढग वाढू लागतात. पावसाची सर येऊन जाते. ५-६ मिनिटांनी परत ऊन पडते. 'मुंबईच्या पावसाचा आणि पोरींचा भरवसा नसतो', असे कोणी तरी म्हणाले होते. कालचा पेपर टेबलावर पडलेला असतो. त्यातील जाहिरातीवर सहज लक्ष जाते. विजय तेंडुलकरांची "गिधाडे" गवालिया Tank जवळच्या तेजपाल नाट्यगृहापाशी भिरभिरणारी असतात. ही "गिधाडे" साहित्य संघ किंवा शिवाजी मंदिराकडे उडत येणार नाहीत असे जाहिरातीत लिहिलेले असते. त्यामुळे गवालिया Tank पर्यंतचा प्रवास ही “गिधाडे” बघण्यासाठी करावा लागणार असे लक्षात येते. इतक्या लांब प्रवास करावयाचा कां नाही?, ह्या बद्दल मनात विचार चालू असतो.

विजय तेंडूलकर मटा मध्ये “कोवळी उन्हे” लिहित असत तेव्हापासून आवडत असत. " माणूस" मध्ये “रातराणी” हे त्यांचे सुंदर सदर मी आवर्जून वाचत असे. “शांतता कोर्ट चालू आहे”,ह्या नाटकाला बक्षीस मिळाले होते आणि हा नाटककार गाजू लागला होता . त्यांना एक वलय प्राप्त झाले होते. फार पूर्वी “मी जिंकलो, मी हरलो” ह्या त्यांच्या नाटकावर आचार्य अत्रे ह्यांनी अग्रलेख लिहिला होता, तो वाचला होता पण ते नाटक बघितले नव्हते. औरंगाबादकडे अशी नाटके कोण सादर करणार? पुणे – मुंबई बाहेर अशी नाटके फारशी होत नसत. तेंडुलकरांची नाटके गंभीर वळणाची आहेत. नाट्यगृहातून बाहेर पडल्यावर अस्वस्थ करणारी आहेत. ती मन सुन्न करणारी आहेत, अशी नाट्यसमीक्षा वाचली होती. अस्वस्थ करणारा नाटककार म्हणून माधव मनोहर ह्यांनी "पंचम" ह्या त्यांच्या सदरात उल्लेख केला होता. अर्थात अपवाद होता तो फक्त "अशी पाखरे येती" ह्या नाटकाचा. ते एक आनंद देणारे नाटक होते.
नाटक पाहायला तेजपालला गेलो. तो पहिलाच प्रयोग होता. त्यावेळी नाटकाचे पहिलेच प्रयोग पाहणे हा माझा छंद होता. नाटक पाहिल्यानंतर त्यावेळी जे वाटले ते डायरीत लिहिले होते. आज ती जूनी डायरी चाळताना ह्या नोंदी दिसल्या. त्यातील खालील भाग.

प्रेक्षकांचे मन पाखरूं पाखरूं असतं. पाखरासारखी मन असणारी माणसे त्यांना नाटक सिनेमातून आवडतात. तेंडूलकरांना मात्र समाज जीवनातील “गिधाडे" दिसतात. हे नाटक पाहून आल्यावर समजले. हा दोन तास करमणुकीचा प्रकार नव्हता. हा एक वेगळा नाट्यानुभव होता. जीवनामध्ये नाट्य नसावे , पण नाट्यामध्ये जीवन असणे आवश्यक आहे. स्वतःवरच प्रेम करणारी लंपट माणसे, दुसर्यांच्या जीवनानंदाचा लचका तोडून स्वतःला  सुखी करण्यासाठी गिधाडासारखी प्रयत्न करणारी आजूबाजूची माणसे असतात पण त्यांच्यावर नाटक लिहून वेगळा अनुभव देणारे तेंडूलकर हे त्या वेळी वेगळे नाटककार होते. फार नंतर छबिलदासची चळवळ आली.

पाश्चिमात्यिकरण, औद्योगिकरण, व आधुनिकीकरणाचे परिणाम आपल्या समाजावर झाल्यामुळे कसे निरनिराळे प्रश्न उभे राहतात व एका अधोगतीला गेलेल्या कुटुंबाचे उदाहरण घेऊन त्या कुटुंबातील पांच गिधाडे कशी वागतात ह्यावर आधारलेले हे नाटक वेगळे होते. ३५-४० वर्षापूर्वी असे नाटक लिहिणारा हा नाटककार वेगळाच आहे, हे लक्षात येत होते. 

दोन नमुनेदार भाऊ, एक इरसाल बहिण, त्यांचा बाप, अभागी वहिनी व एक अनौरस मुलगा अशी एकाच कुटुंबातील पांच गिधाडे. पैशासाठी बापालाच मारायला उठलेले दोन भाऊ व एक बहिण , पुढे बहिणीपासून पैसा मिळावा म्हणून कट रचणारे तेच दोन भाऊ, पुत्र होत नाही म्हणून अभागी असलेली वहिनी व  ठेवलेल्या बाईपासून झालेल्या दिराबरोबर भोग भोगणारी स्त्री, हे सारे कुटुंबच अध:पतनाला गेलेले असते.  स्वतःवर, पैशावर प्रेम करणारी ही माणसे व गिधाड्यासारखी लचका तोडणारी त्यांची वृत्ती मानवी स्वभावाचे वेगळे रूप होते. अशी गिधाडे समाजात खूप दिसून येतात हे नाटकातून दाखवल्यामुळे ते वास्तववादी नाटक झाले आहे.

ताई-माई ची नाटके पाहणाऱ्या प्रेक्षकासाठी हे फार अवघड होते. चि.त्र्यं. खानोलकर ( अवध्य ) आणि तेंडुलकरांचे (गिधाडे) ही दोन नाटके वेगळ्या वळणाची प्रभावी नाटके होती. त्यावेळी बाळ कोल्हटकर आणि वसंत कानेटकरांची नाटके पाहणारा प्रेक्षक भांबावून गेला होता. ही नाटके निखळ करमणूक नव्हती. पु.ल.चा हसविण्याचा धंदा असलेली ही रंगभूमी नव्हती. जीवनामध्ये अनेक प्रश्न असतात आणि अनेक समस्या उभ्या राहतात. चार घटका करमणूक म्हणून नाटक –सिनेमाला जाणारा प्रेक्षक पैसे देऊन हा ताप कशाला विकत घेईल. त्यात मनोरंजन नव्हते.  नाटक पाहून गंभीर होण्याचा तो अनुभव होता. त्यामुळे एकंदर जीवनाबद्दल अधिकच विचार करावा लागत असे. 

नाटककाराने "गिधाडे" हे प्रतीक वापरून नाटकाचे नांव आकर्षित केले व वेगळा परिणाम साधला. वेगळ्या समस्या मांडल्या. निराशावादी सूर लावला. त्यामुळे हे नाटक मनाला आनंद देत नाही. उदास करते. खिन्न करते. उत्तर आपल्याला शोधायला लावते. त्यामुळे आपण अस्वस्थ होतो. 

आपण आजूबाजूची परिस्थिती पाहिली की अधिक अस्वस्थ होऊ लागतो. नाटककाराने ते त्यावेळी पाहिले, अनुभवले आणि आपल्यापुढे नाटक म्हणून उभे केले. कधी कधी किळसवाणे वाटणारे हे नाटक आपल्यावर वेगळा परिणाम करून जाते. त्यात नाटककार मात्र  यशस्वी झाला असे वाटते. थिएटर युनिटने सादर केलेला तो प्रयोग अप्रतिम होता. परिणामकारक होता. कसलेले नट-नट्या होत्या. त्यांचा अभिनय अप्रतिम होता. वातावरण निर्मितीसाठी आवश्यक असलेले नेपथ्य, प्रभावी संगीत, परिणामकारक प्रकाश योजना हे सारे सुरेख होते. आजही तो नाट्यानुभव स्मरणात आहे. नाट्यानंद न मिळताही खूप काही देऊन जाणारे हे नाटक तसे विलक्षण नाट्यानुभव देणारे होते हे नक्की.

खरं म्हणजे अशी नाटके म्हणजे एक वैताग होता. जीवनातील उभे राहणाऱ्या प्रश्नाचा विसर पडावा म्हणून विरंगुळ्यासाठी येणारा प्रेक्षक अधिक वैताग घेऊन जात असे. तरीही मोजका प्रेक्षक वर्ग तेंडूलकरांच्या – खानोलकरांच्या नाटकाकडे वळला. जीवनाची काळीकुट्ट बाजू प्रभावीपणे  मांडण्यात तेंडूलकर – खानोलकर यशस्वी झाले होते. “आतां मुक्ती नाही, आता मुक्ती नाही”, असे काहींसे निराशावादी विचार त्या नाटकातून ते देऊन जात होते. त्याच वेळी गिरीश कर्नाड, बादल सरकार ह्यांची नाटके हिंदीतून होऊ लागली होती. "आधे अधुरे" आणि "स्टील फ्रेम" ह्या दोन नाटकांचे प्रयोग गाजू लागले होते. त्यासाठी प्रायोगिक रंगभूमीवर होणारी नाटके पहाण्यासाठी प्रेक्षकांना तेजपाल सभागृहाकडे जावे लागत असे.

तेजपालच्या ह्या प्रयोगाला तेंडुलकराना पहिल्यांदा पाहिले. ते शेवटच्या रांगेत बसले होते. त्यावेळी त्यांनी दाढी ठेवली नव्हती. दिसायला सुंदर असलेले त्यांचे उमदे व्यक्तिमत्व. "कोवळी उन्हे" लिहिणारा हा माणूस “गिधाडे” नाटक लिहिणारा आहे, हे खरे वाटत नव्हते. 

खूप वर्षांनी त्यांची प्रत्यक्ष ओळख झाली आणि थोडीशी मैत्री झाली. त्यांच्याबरोबर प्रवास ही केला. अनेक विषयावर गप्पा मारल्या.त्यांना जवळून बघितले. 

आजही मला “ कोवळी उन्हे” , “रातराणी” आणि “ अशी पाखरे येती” लिहिणारे तेंडुलकरच जास्त आवडतात. "राम प्रहर"चा प्रकाशक तर मीच होतो. "पेशा लेखकाचा" हे त्यांचे  सुंदर सदर मटा मध्ये होते. ते त्यांनी बंद केले. ते पुस्तक मी काढायचे ठरविले होते.  

No comments:

Post a Comment