सुनिता देशपांडे
ह्यांचे “आहे मनोहर तरी” वाचल्यानंतर त्या वेळी जे वाटलं ते त्यांना पत्र लिहून
कळविले होते. त्या पत्रास त्यांचे उत्तर ही मिळालं. आज ते वाचताना थोडीशी गंमत
वाटते.
दिनांक १८ ०१ १९९२
सुनिता देशपांडे
सप्रेम नमस्कार ,
दिनांक १४ जानेवारी. माझ्या बायकोचा वाढदिवस. ह्यावर्षी तिच्या वाढदिवसानिमित्त तुमचे गाजत
असलेले “आहे मनोहर तरी” हे पुस्तक भेट म्हणून दिले. पुस्तक भेट दिल्यानंतर मी ते पुस्तक चार
दिवसात वाचून काढले. तसं पुस्तक प्रसिद्ध होऊन बरेच दिवस झाले होते. महाराष्ट्र
टाइम्समध्ये काही भाग पूर्वी प्रसिद्ध झालेला वाचला होता. त्यामुळे पुस्तकाबद्दल
थोडेसे औत्सुक्य होतेच. प्रसिद्ध झाल्यानंतर थोड्याच दिवसात पुरस्कारही मिळाला.
काहीं परीक्षणे वाचण्यात आली आणि पुस्तक गाजू लागले.
साऱ्या महाराष्ट्राला
पुलकित करणाऱ्या पु.ल.च्या बायकोने लिहिलेले पुस्तक आत्मचरित्रात्मक असल्यामुळे
गाजणार होतेच. बाई पु.ल.च्या बद्दल काय लिहितात हेच लोकांना हवे असणार. सर्व प्रथम
दुकानात पुस्तक बघितले आणि त्या अनाकर्षक मुखपृष्ठामुळे थोडासा नाराज झालो. साधेपणात सौंदर्य असते हे खरे आहे पण मौज प्रकाशन आणि श्री. पु .भागवतांनी काटकसर
कशासाठी केली हे समजले नाही. खर्च न करताही पुस्तक अधिक सुंदर करता आले असते. रा.
ज. देशमुखांशी पु.ल.च्या पहिल्या पुस्तकानिमित्त बोलणी करताना वाद घालणाऱ्या
व्यक्तीने ‘मौज’लाही हे सांगावयास हवे होते. चांगल्या मुखपृष्ठाचा आग्रह धरावयास
हवा होता. एवढ्या चांगल्या पुस्तकाला इतके अनाकर्षक मुखपृष्ठ नको होते. असो.
पुस्तक
वाचावयास घेतले आणि पुस्तकात रमलो. खूप मनमोकळेपणाने लिहिलेले हे स्वैर मुक्त
चिंतन. आत्मपरीक्षणाचे (Self Analysis) उत्तम उदाहरण आहे. पु.ल.च्या बद्दल साऱ्या महाराष्ट्राला
आकर्षण आहे. त्यांनी महाराष्ट्राला हसवून हसवून खूष केले आहे. अशा एका थोर लेखकाची/कलावंताची
बायको आत्मचरित्रात्मक लिखाण करते तेव्हा तिचेही व्यक्तिमत्व असामान्य आणि प्रभावी
आहे हे पुस्तक वाचताना जाणवते.
खरं म्हणजे तुमच्या
प्रभावी व्यक्तिमत्वाची ओळख झाली ती तुम्ही उभयतांनी बोरकरांच्या कवितांचे काव्यवाचन सुरु केले तेंव्हा.कवितेत
रमणारी ही व्यक्ती निराळीच आहे हे तेव्हाच जाणवले. ही व्यक्ती तत्वनिष्ठ आहे , शिस्तशीर
आहे हे ही जाणवत होते.
पुस्तकातील काही भाग
हा तर एखाद्या कवितेसारखाच आहे. मुक्त काव्यासारखा. तुमचे आत्मचिंतन हे एक तत्व चिंतन आहे. एक वेगळी जीवन दृष्टी आहे. एक गंभीर (Serious) स्वरूपाचे लिखाण आहे. पु.ल.च्या लिखाणात ही
काव्यमयता आणि चिंतनशीलता जाणवत नाही. तो त्यांचा पिंडच नाही. पण आम्हा वाचकांना "हसविण्याचा धंदा" करणारे पु.ल.ही हवे हवेसे असतात आणि तुम्ही जे लिहिले आहे ते काव्यमय, गंभीर वळणाचे मुक्त
चिंतन ही आवडते. हे लिखाण एक नवी दृष्टी देते.
पुस्तकास थोडासा पसरटपणा आला आहे. श्री.पु भागवत आणि विजया राजाध्यक्ष ह्यांनी छापण्यापूर्वी वाचन
केले होते असे तुम्ही लिहिले आहे. मग त्यांनी तशा सूचना करावयास हव्या होत्या.
थोडेसे संपादन (Editing) हवे होते. गप्पा मारल्यासारखे स्वैर चिंतन वाटते.घटनांचा क्रम बदलत गेला. तो
पसारा थोडासा व्यवस्थित लावावयास हवा होता.
एक गोष्ट विशेष
खटकली. पुस्तकात सर्वत्र तुमचा तक्रारीचा सूर जाणवला. त्यामुळेच लिखाणात तोच तोपणा आला असावा.
भाईंचे व्यक्तीदोष दाखविताना पुन्हा पुन्हा तेच ते लिहिले गेले आहे. ते संपादित
केले असते तर अधिक बरे झाले असते.
साहित्य
निर्मितीच्या वेळचे पु.ल. सोडले तर ते सामान्य मध्यम माणसासारखे एक “माणूस” आहेत
म्हणूनच ते सामान्य माणसाना जवळचे वाटतात. तुमच्या व्यक्तिमत्वातील 'असामान्यत्व’
पु.ल.नी सुरुवातीलाच ओळखले असणार.
पु.ल. आणि सुनिता ही
दोन व्यक्तिमत्वे गणिताच्या भाषेत वर्णन करावयाची असतील तर दिसतात “३६” सारखी. परंतू
असे भिन्न व्यक्तिमत्व असलेले हे जोडपे राहते मात्र “६३” सारखे. हेच तुमच्या
दोघांच्या सहजीवनाचे यश आहे.
पुस्तक खूप आवडले.
मनापासून अभिनंदन.असेच लिहीत रहा .पुस्तक वाचून थोडासा भारावून गेलो. एका वेगळ्या
व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले. म्हणून हा लेखन प्रपंच.
पु.ल.ना सप्रेम
नमस्कार.
आपला,
डॉ. नरेंद्र गंगाखेडकर
ह्या पत्राला पोच
पावती म्हणून पोस्ट कार्ड मिळाले. त्यात लिहिले होते ....
दिनांक २९ १ १९९२
सप्रेम नमस्कार,
माझे पुस्तक वाचून
मुद्दाम अगत्यपूर्वक पाठवलेले पत्र मिळाले. आभारी आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ
तुम्हाला आवडले नाही. मला स्वतःला चित्रांतले फारसे कळत नाही. पण काही चित्रे एकदम मनात भरतात हे खरे. माझ्या
पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यापैकी नाही. पण मला स्वतःला त्यात काही उणीव आहे असे वाटले
नाही. उलट , साधेसेच म्हणून चांगले वाटले. असो.
माझ्या लिखाणाला
समजदार दाद देताना त्यात तुम्हाला ज्या उणिवा वाटल्या त्या बद्दल तुम्ही
मोकळेपणाने लिहिले आहे , त्याचा आनंद झाला.मी तुमचे पत्र श्री.पु. भागवताना जरूर
दाखवीन.पत्राबद्दल पुनश्च आभार.
आपली ,
सुनिता देशपांडे
No comments:
Post a Comment