Like / Comment
मला पुस्तक वाचून
काय वाटले हे लिहून काढायची सवय होती. कधी कधी लेखकाला पत्र लिहून कळवावे असेही
वाटत असे. काहीजणांना अशी पत्रे मी लिहिली होती. आज सहज जून्या फायली चाळत होतो.
आणि माझी अशीच काही पत्रे सापडली. त्याला आलेली लेखकांची उत्तरेही त्या बरोबर
होती. आज तो पत्र व्यवहार वाचताना थोडीशी गंमत वाटली.
शिरीष पै ह्यांचे “वडिलांच्या
सेवेशी” आणि सुनिता देशपांडे ह्यांचे “ आहे मनोहर तरी” ही दोन पुस्तके वाचली होती.
मी मला त्यावेळी जे वाटले ते लिहून त्यांना कळविले होते आणि त्या दोघींनी माझ्या पत्राला
उत्तर दिले होते . त्यावेळी इ-मेल / इंटरनेट / फेसबूक नव्हते. Like / Comment चा
प्रकार नव्हता. लेखक वाचकाच्या पत्रांना आवर्जून उत्तर देत असत. पोस्ट कार्ड येत असे.अशी काहीं पोस्ट कार्ड सापडली. त्यासंबंधी हा ब्लॉग.
दिनांक २१ मे,१९९२
प्रिय शिरीष पै,
स. न .
“वडिलांच्या सेवेशी”
हे पुस्तक वाचण्यात रमलो होतो. ह्या पुस्तकाविषयी औत्सुक्य होते. थोडेसे उशीराच
वाचण्यात आले. ह्यातील काहीं भाग कुठेतरी प्रसिद्ध झाला होता आणि तो वाचण्यात आला
होता. व्यंकटेश पै ह्यांचे व्यक्तिमत्व "मनोहर” होते म्हणूनच तुम्ही त्यांच्या
प्रेमात पडला असाव्यात. परंतू तुम्हा उभयतांच्या जीवनास “ आहे मनोहर तरी” म्हणता
येणार नाही. प्रेमात पडलेल्या व्यक्तीकरता “नाच ग घुमा” ची भूमिका घेऊन ही
बरेचसे नैराश्य पदरी पडत असावे . ह्या मानवी गुंतागुंतीचा अर्थ लागत नाही. जीवन इतके
फरफटणारे नसावे. असे कां घडते ?आपल्या हातात काहींच नसते कां ? आपल्याला पाहिजे
असलेले आखीव–रेखीव जगणं प्रयत्न करूनही जगता येत नाही कां? कां कुणीतरी कळसूत्री
बाहुल्याप्रमाणे सारे घडवीत असतो ?असे अनेक प्रश्न डोक्यात येत राहतात. “पपा
– आई – व्यंकटेश आणि मी” अशी जी मालिका तुम्ही गुंफली आहे ती वाचताना पुस्तक खाली
न ठेवता पुढे वाचत जावे असेच वाटते. थोडीशी पुनरोक्ती होऊनही पुस्तक खूपच वाचनीय
झाले आहे. खूप आवडले. बऱ्याच वेळा मन सुन्न झाले.
कदाचित माणूस
जेव्हा सुखदु:ख भोगतो तेव्हाच त्याचे वेगळे असे विलोभनीय व्यक्तिमत्व
घडत असावे. एक कवी मन त्यातूनच उमलत गेलेले असते. एका सकस कवितेचा जन्म
होण्यासाठी ही अनुभूती हवी असावी. नाहीतर शिरीष पैंच्या “हायकू” जन्माला आल्या
नसत्या. कवी मन आणि कविता होण्याची प्रक्रिया झाल्याच नसत्या. सुखदु:ख भोगलेल्या
व्यक्तीकडूनच हे घडू शकते.
पुस्तकातील “मी” हा
भाग. “मी” काही घडत गेले. “मी”वर कशा कशा सावल्या पडत गेल्या. “मी” घडण्यासाठी कोण
कोण जबाबदार आहेत. कळत नकळत कुणी कुणी influence केला. साहित्याचा आस्वाद घेता घेता नव्या दिशा कशा मिळत गेल्या. हे आत्मचिंतन सुरेख.
विजय तेंडुलकरांच्या व्यक्तिमत्वाचा आणि साहित्याचा कसा प्रभाव पडला हे सांगताना तुम्ही तेंडुलकरांच्या साहित्यासंबंधी खूप सुंदर निरीक्षण केले आहे. इतर ही साहित्यीकाबद्द्ल अशीच
पोच-पावती दिलेली दिसते. फार थोडी साहित्यिक मंडळी असे मोकळेपणाने लिहितात.
काहीं वर्षापूर्वी
शाम जोशी ह्यांनी तुमच्या “हायकू" करिता सुंदर चित्रे काढली होती. मी ते चित्र
प्रदर्शन पाहिले होते. एका चित्रकाराने कवितेला विलक्षण सामर्थ्याने चित्रित केले
होते. तुमच्या कविता मी वाचल्या आहेत. माझ्या वहीत मी आवडलेल्या अशा अनेक कविता
लिहून काढल्या होत्या. त्यात तुमच्या “हायकू” होत्या. एकटेपणी कविता वाचून आस्वाद
घेणारा मी वाचक आहे. तुमचे पपा म्हणजे आचार्य अत्रे ह्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही “दुर्गा भागवत” किंवा "इरावती कर्वे" झाला नाहीत हे एका दृष्टीने चांगलेच झाले.
नाहीतर मराठी साहित्यात “हायकू" लिहिणारी कवियत्री झाली नसती.
विजय तेंडुलकरांना अत्र्यांचा सहवास लाभला होता. त्यांनी “माणूस" मध्ये “प्रचंड" ह्या शिर्षकाचा एक लेख
आचार्य अत्रे ह्यांच्यावर लिहिला होता. मला आवडलेला तो लेख आजही आठवतो.
तेंडुलकराच्या विलेपार्ल्यातील सत्कार समारंभात तुम्ही फार सुंदर भाषण केलं होते. छोटसं
भाषण.खूप काही सांगून गेलं. आचार्य अत्र्यांनी लिहिलेला “मी जिंकलो , मी हरलो’ हा
अग्रलेख आठवला. “ शांतता कोर्ट चालू आहे” ह्या नाटकात तुमचीच कविता होती हे नंतर
कळले. तुमच्या त्या कवितेच चांगलं कौतुक झालं असंच म्हणावे लागेल. सुलभा देशपांडे ते
“स्वगत काव्य” फार सुंदर सादर करीत असत. त्यामुळेच त्या कार्यक्रमात सत्काराला
उत्तर देताना विजय तेंडूलकर म्हणाले,“नवा जन्म मिळाल्यास कवी होईन,कविता करीन”. हा तुमचा सन्मान. मासिकात कविता न छापणाऱ्या संपादकाकडून. म्हणजेच विजय
तेंडुलकराकडून.
पुस्तक वाचल्यानंतर
जे सुचलं ते लिहावसं वाटलं म्हणून हा पत्र प्रपंच.
आपला
डॉ नरेंद्र
गंगाखेडकर
ह्या पत्राला लगेच
उत्तर मिळालं. ते असं.
दिनांक २७ ५ १९९२
सप्रेम नमस्कार ,
आपले पत्र पोचले. “वडिलांच्या सेवेशी” आवडले. रसग्रहणात्मक पत्र पाठवून आस्थेने,आत्मीयतेने कळवले
ह्या बद्दल फार आनंद झाला . आपले कोणत्या शब्दात आभार मानू?
आपली
शिरीष पै
No comments:
Post a Comment