विज्ञान आणि कला :
काही भेद – काही साम्य
क्वचित आढळून येणारे
परिपूर्ण सौंदर्य, हे डोळे दिपविणारे ,आश्चर्यचकित करणारे व घायाळ करणारे असते.
ह्या सौंदर्याला एक अदृश्य अशी अपूर्व शक्ती असते.
विज्ञान ही तसेच आहे
.......
क्वचित आढळून
येणाऱ्या
परिपूर्ण सौंदर्यासारखे
आश्चर्यचकित करणारे
.....
डोळे दिपविणारे
......
अदृश्य – अपूर्व
.... शक्तीसारखे .
एक सुंदर पुस्तक
किंवा एखादी अप्रतिम कलाकृती एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचा कसा काय कायापालट करू
शकते , त्याची जीवन दृष्टी कशी बदलून टाकते , त्याचे बोलणे , त्याचे हसणे ,त्याचे
हाव-भाव , त्याचे भावनाविश्व , त्याची जीवनदृष्टी – सारे काही बदलून जाते. इतकी
परिणामकारकता कशामुळे निर्माण होते? मानवाच्या प्रतिभेमध्ये हळूहळू होणारे बदल कसे
होतात , हे सांगणे खरोखर कठीण आहे. अशी परिणामकारक अप्रतिम अशी कलाकृती ( साहित्य , शिल्प , चित्र
....इत्यादी ) जेव्हा बघावयास मिळते तेव्हा आपणास कलेचे श्रेष्ठत्व जाणवते, आणि
ज्या वेळेस कलेचे श्रेष्ठत्व जाणवते, तेव्हाच विज्ञानाच्या मर्यादा लक्षात येतात.
Picasso |
सतारीचे बोल आपणांस
मंत्रमुग्ध करतात. परंतु मंत्रमुग्ध करणाऱ्या या सतारीच्या ध्वनीचेही ‘विज्ञान’
आहे. ध्वनि-विज्ञान सतारीसंबंधी सर्व काही सांगू शकते. पदार्थविज्ञान
शास्त्रज्ञाने समजावून सांगितलेले ध्वनिविज्ञानातील सिद्धांत एक वेळ समजून घेणे
सहज शक्य आहे , परंतु एखादा कलावंत जेव्हा त्या सतारीच्या तारा झंकारून जो नादब्रम्ह
निर्माण करतो आणि एक प्रकारची ‘गानसमाधी”लागते ती अनाकलनीय आहे. आणि कलेचे गूढ
त्यात आहे. इथेच कलेचे श्रेष्ठत्व जाणवते.मग ती कलाकृती कोणतीही असू शकते. एखादे
सुंदर पुस्तक , एखादी चित्ररेखाकृती किंवा एखादे शिल्प सौंदर्य . ह्या साऱ्याच
कलाकृती मंत्रमुग्ध करणाऱ्या असू शकतात. परंतु इथेही हे लक्षात ठेवावयास हवे की ,
एखाद्या सौंदर्याचा आस्वाद घेणे तितकेसे सोपे नाही. जेव्हा सौंदर्यासंबंधी
चिकित्सा करणारा एखादा टीकालेख किंवा सौंदर्य समीक्षेचे जाडेजुडे पुस्तक , एखाद्या
कलाकृतीच्या सौंदर्याचे बारकाईने स्पष्टीकरण करून ‘सौंदर्यस्वाद-रस’ निर्माण करण्याचा
प्रयत्न करते तेव्हा सुद्धा कलेचा आस्वाद जाणून घेणे कठीण आहे.
केव्हा केव्हा
कलाकृतीमधील सौंदर्य पाहिल्याबरोबर लगेच जाणवते असेही नाही. तर कधी कधी एखाद्या
कलाकृतीचे सौंदर्य जाणून घेण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात. याची प्रचीती
बघावयाची असेल तर अजिंठा- वेरूळच्या लेण्या पुनः पुन्हा बघा. नित्य नवे सौंदर्य
जाणवेल. रामायण- महाभारत हे ग्रंथ तर अनेकांच्या सौंदर्यचिंतनाचे विषय होऊन बसले
आहेत. कालिदासाचे शाकुंतल अजूनही अनेकांना मोहित करते आहे.जर्मन ( आणि आता रशियन)
लोकही ह्या साहित्यकृतीवर प्रभावित होताना दिसतात.
Picasso - Paul-Frank Paintings |
इथेच कलेचे वेगळेपण
जाणवते. जाणवावयास हवे. कलेचे हे सौंदर्य आणि श्रेष्ठत्व विज्ञानाला हिरावून घेता
येणे शक्य नाही, ते यामुळेच.
कोणत्याही व्यक्तीला
, त्याला जर खरोखर आवड असेल, जाणून घेण्याची इच्छा असेल, विज्ञानाची ओढ असेल , तर
अणुभट्टीची रचना समजून घेणे फारसे अवघड नाही. विज्ञान हे समजून घेता येऊ शकते. पण
त्याउलट एखाद्या सुंदर कलाकृतीच्या सौंदर्याचा आस्वाद घेताना मिळणाऱ्या आनंदाचे
वर्णन करणे अवघड आहे. ते कसे करणार? तो सौन्दर्यानंद अनुभवावा लागतो. संगीताच्या
मैफलीचा आनंद उपभोगावा लागतो. तो सांगता येऊ शकत नाही. सांगून समजू शकत नाही. हेच
कलेचे वैशिष्ट्य आहे.
Newton and Prism Poetry in Science |
त्याउलट विज्ञानाची
श्रेष्ठता त्याच्या विश्वसमावेशकतेमध्ये ( Universality) आहे. विज्ञानाचे नियम
व्यक्ति-व्यक्तीवर अवलंबून नसतात. विज्ञानातील नियम किंवा सिद्धांत हे प्रयोगसिद्ध
सत्य असते. विज्ञानातील सिद्धांताना सामुहिक प्रयोगसिद्ध ‘सत्यता’ असते. हे
प्रयोगसिध्द सत्यतेचे प्रमुख अंग असते. विज्ञान हे कोणत्याही व्यक्तीच्या मर्जीवर ,
त्याच्या वयावर , त्याच्या देशावर किंवा त्याच्या मानसिक अवस्थेवर अवलंबून नसते.
याउलट कला किंवा कलावंताची श्रेष्ठ कलाकृती ही व्यक्तीसापेक्ष असते. कलेची परिणामकारकता
ही अनेक गोष्टीवर अवलंबून असते. कलेचा स्वाद घेणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक अवस्थेवर
, त्या व्यक्तीच्या पूर्व अनुभवावर , त्याच्या सांपत्तिक स्थितीशी संबंधित
,त्याच्या वैयक्तिक मूडवर , त्याच्या बघण्याच्या दृष्टिकोनावर , स्पर्शावर ,......
सारांश त्याच्या स्वतःच्या ‘जाणीवेवर’ हे सारे अवलंबून असते. कलेचा आस्वाद
वैयक्तिक ‘रसिक’तेशी संबंधित असतो. विज्ञानाच्या सिद्धांताना ह्या मर्यादा नसतात.
न्युटनचे गतीविषयक सिद्धांत हे विश्वसमावेशक ( Universal ) सत्य आहे. विज्ञानाचे
श्रेष्ठत्व इथे आहे.
How Newton planed his experiment on prism. ART OF SCIENTIFIC INVESTIGATION |
कोणत्याही
शास्त्रज्ञाने समोर ठेवलेला सिद्धांत प्रयोगाच्या साह्याने सिद्ध करता येतो तेव्हा
ते विश्वसमावेशक सत्य मान्यता पावते. शोध प्रक्रियेतील ‘प्रयोगसिद्ध सत्यता’ हा
एक अत्युच्च क्षण असतो. कोणताही शास्त्रीय शोध लागल्यानंतर तो पुनः
पुन्हा प्रयोगाच्या रूपाने सिद्ध होणे आवश्यक असते. रीपिटीशन ( पुनरनिर्मिती) हे
शास्त्रीय शोधात आवश्यक असते. तर याउलट पुनर्रावृत्ती हा कलेचा मृत्यू ठरतो. त्यामुळे
कलावंताला प्रत्येक कलाप्रयोगाच्या वेळी काही तरी नाविन्य प्रदर्शित करावे लागते.
विज्ञान हे ‘सत्य’
सिद्ध करण्यासाठी ‘प्रयोग’क्षम असते. गुढतेचे विवेचन करते. कला इंटरप्रीट करण्याचा
प्रयत्न करते. तर्कसंगततेचा ( Logical Reasoning ) आधार कलेला आवश्यक असतो. तर
विज्ञानाला तर्कसुसंगत आधार ( Logical Proof )आवश्यक असतो.
Einstein Creator : Image-Concept-Formula |
विज्ञान हे
सिद्धान्तासंबंधी विवेचन करणारे असते. एखादा सिद्धांत चांगला किंवा वाईट , सत्य
किंवा असत्य , हे स्पष्टपणे विषद करून सांगणे हे विज्ञानाला सहज शक्य असते.
कलेच्या बाबतीत असे नसते. कलाकृती भावानिकतेशी संबंधित असते. भावनिकता ( Involvement ) ही कलेची गरज आहे. विज्ञानामध्ये भावनिकतेला थारा नसतो.
हे जरी खरे असले तरी
एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती ही की ,निरनिराळ्या प्रायोगिक सत्यसिध्द माहितीच्या
आधारावर रचलेला शास्त्रीय सिद्धांत आणि अनेक दिवसाच्या चिंतनातून निर्माण झालेली
सुंदर कलाकृती ह्यामध्ये तसा फारसा फरक नाही. विलक्षण साम्य आहे. बारीक भेद आहे.
हे साम्य व भेद जाणून घेणे आवश्यक आहे.
POETRY OF THOUGHT |
विज्ञानाचे नियम
कधीच घाईघाईने मिळवलेल्या माहितीच्या आधारावर रचलेले नसतात. अनेक दिवसाच्या
परिश्रमाने मिळवलेले प्रयोगसिद्ध ज्ञान हा एक महत्वाचा आधार असतो. विज्ञानामध्ये
एखाद्या सिद्धांताचा अभ्यास वर्षानुवर्षे चालू असतो, कधी कधी तर एखादा सिद्धांत हा
पिढ्यानपिढ्या अभ्यासाचा विषय बनतो.याचे प्रमुख कारण म्हणजे विज्ञानाची पद्धती (
Scientific Method) . विज्ञानपद्धती ही कलेच्या अविष्कारासारखी नसते. कलेचा
चमत्कार आणि विज्ञानाचा चमंत्कार हे परस्पर विरोधी असतात.
होमरचे काव्य आजही
आपणास प्रभावित करते. कारण ह्या कलाकृतीचे वैशिष्ट्य असे आहे की 'Involvement' ची प्रक्रिया
लगेच सुरु होते. मानवी मन हेलावून सोडणारी कलाकृती म्हणूनच ‘अमर’ कलाकृती ठरते.
विज्ञानामध्ये कालचे
‘ज्ञान’ आजचे ‘अज्ञान’ ठरते. तीस-चाळीस वर्षापूर्वी लिहिलेले पदार्थविज्ञानशास्त्राचे
पुस्तक आज वाचणे किंवा अभ्यासणे शक्य नाही. कारण त्या पुस्तकातील विज्ञान-विचार आज
टाकाऊ झालेले असतात. विज्ञानातील शोध किती जुना आहे हे फारसे उपयोगाचे नाही. तर तो
आज किती बदलला आहे ,उपयुक्त आहे , यावर त्या शोधाची श्रेष्ठता ठरु शकते.
उदाहरणार्थ, पूर्वीचा रामन इफेक्ट समजून घेऊन नुसते भागणार नाही . तर आजचा
लेझर-रामन इफेक्ट समजून घेणे आवश्यक होऊन बसले आहे. न्युटनचा गति विषयक सिद्धांत मात्र आजही बदललेला नाही. ही ह्या शोधाची श्रेष्ठता.
अशा प्रकारे विज्ञान
आणि कला ह्यातील भेद शोधण्याचा बारकाईने प्रयत्न केला तर आपणास अनेक भेद आणि
बारकावे सहजपणे जाणवू शकतील. हा एक नं संपणारा प्रचंड विषय आहे.फक्त एक गोष्ट
प्रामुख्याने लक्षात ठेवणे आवश्यक आहे की कला आणि विज्ञान यांचा मूळ उद्देश असतो ‘ज्ञानसाधना’
. अर्थात मार्ग भिन्न असतात. पद्धती वेगळ्या असतात. Approach निराळा असतो. कलावंत
आणि वैज्ञानिक दोघेही विश्वाचा आणि मानवी मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न करताना
दिसतात. तसे पाहता ‘स्कील’ , ‘टेकनिक’ , ‘क्राफ्ट’ ,’आर्ट’, ‘ रिफाईनमेंट’,
हे सारे समानार्थी शब्द आहेत, हे लक्षात
ठेवावयास हवे.
अनेक शतकापासून
कविवर्ग शोधतो आहे ‘विचारातील काव्य’ ( Poetry of Thought ).त्यांना नुसते ट ला ट,
र ला री लावणारे काव्य अभिप्रेत नाही. नाद ,लय आणि अर्थ या त्रयींचा सूर जेथे
लागतो तेथे काव्य जाणवते. याउलट वैज्ञानिकांचा प्रयत्न आहे की , ‘विज्ञानातील
काव्यमय’तेची ( Poetry in Science ) जाणीव सर्वाना कशी करून देता येईल ? ‘मंगळा’चा
किंवा ‘चंद्रा’चा शोध घेणारे शास्त्रज्ञ ‘विज्ञानकाव्या’चे जनक नव्हेत काय ?
तेव्हा कला आणि विज्ञान ह्यातील भेद जाणून घेताना साम्यस्थळेही शोधली पाहिजेत.
आज ‘कले’चेही ‘विज्ञान’
झाले आहे. उदारणार्थ नाट्यकलावंताला नाट्य ‘शास्त्रा’चा पद्धतशीर अभ्यास करणे
आवश्यक होऊन बसले आहे.तेव्हा आज नाट्य-कलावंताला आवश्यक असलेले शास्त्र हे ‘नाट्य-विज्ञान’च
नव्हे काय?
त्याच प्रमाणे ‘विज्ञाना’चीही
‘कला’ झाली आहे. ‘Art of Scientific Investigation”. हा विचार आता पूर्णपणे मान्य
झाला आहे. केवळ सूत्र ( Formula )आणि तर्कशास्त्राचा आधार घेणारा पदार्थवैज्ञानिक
, त्यालाही कलेची समर्थकता आवश्यक वाटू लागली आहे.
सुंदर कलेचा उगम
विज्ञानाशिवाय शक्य नाही. त्याचप्रमाणे वैज्ञानिक सत्य सिद्ध करणे कलेशिवाय शक्य नाही. Scientific Analysis of Art
and Art of Scientific Investigation या दोन्ही विचारांची आवश्यकता आता सर्वांनाच
मान्य होत आहे. अर्थात कलेला आणि विज्ञानाला स्वतःच्या अशा काही मर्यादा आहेत,
हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
प्रयोगसिद्ध
माहितीचे पृथक्करण करणारा आणि ‘कारणां’चा शोध घेणारा वैज्ञानिक आणि ‘प्रतिभा’वंत
कलावंत किंवा कवी यांच्यामध्ये असणारा भेद समजून घेणे आवश्यक आहे.(असं नेहमीच
म्हंटले जातं की विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्यामुळे आजच्या या आधुनिक युगात कला
आणि कलेसंबंधीची ‘रसिकता’ लोप पावत चालली आहे , हळूहळू नष्ट होते आहे . तर याउलट
कलेची जाणीव असलेले कलावंत विज्ञानाकडे डोळेझाक करताना दिसून येतात.हे बर्याच अंशी
सत्य आहे)
Goethe - Painting ART - CRAFT- SKILL-TECHNIQUE |
वैज्ञानिक आणि कवी किंवा कोणताही कलावंत हे निर्मिती करणारे ( Creative work ) निर्माते असतात. दोघेही निर्मितीच्या प्रक्रियेत गुंतलेले असतात, ( निर्मिती हा त्यांचा धंदा नसतो). विज्ञानातील किंवा कलाप्रांतातील ( Creative Work ) निर्मितीमध्ये तसा मूलतः फारसा भेद असू शकत नाही. नव्हे , तसा तो नाहीच. दोघेही एकाच प्रक्रियेत गुंतलेले असतात.
कवीला
निर्मितीपूर्वी अस्पष्टपणे काही वेदनांची-संवेदनांची जाणीव होते.ह्या त्याच्या
स्वतःच्या वेदना आणि संवेदनांना तो जेव्हा काव्यरूप देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा
त्याला अस्पष्ट अशी जी काव्यानुभूती जाणवते , तिला तो शब्दात व्यक्त करण्याचा
प्रयत्न करतो. सुरुवातीला तो मनातल्यामनात काही तरी गुणगुणत असतो, झपाटलेला असतो, हे गुणगुणनेच नंतर शब्दरूपी साकार होते. त्याचप्रमाणे वैज्ञानिक त्याच्या प्रयोगसिद्ध
माहितीच्या आधारावर काही संकल्पना तयार करण्याचा प्रयत्न करतो. तर्कशास्त्र,
तर्कसुसंगत प्रयोगसिद्ध आधार , गणित शास्त्राचा उपयोग या सर्वांच्या आधारे तो
संकल्पनेचे परिपूर्ण चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. तर्कशास्त्रीय विवेचन ,
सूत्रबद्ध विचार , प्रयोगसिद्ध सत्यता पडताळून पाहणे , या सर्वांचा एकत्रित (Integrated
)विचार केल्यानंतर शास्त्रीय संकल्पना ( Concept ) साकार होते. तेव्हा ही सुद्धा
Creative Process नव्हे काय?
प्रतिमा , संकल्पना
आणि सूत्र ( Image – Concept – Formula ) यांना एका साखळीमध्ये गोवणे , हे
वैज्ञानिकाचे संकल्पना निर्मितीचे कार्य. अर्थात प्रत्येक वैज्ञानिकाची स्वतःची
अशी स्वतंत्र शैली आणि पद्धती असते. शीघ्रता ( Rapidity ) ,सामर्थ्य , आकलन शक्ती
आणि कल्पनाविलास हे प्रत्येक वैज्ञानिकाचे वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म. ही संकल्पना
निर्मितीची प्रक्रिया इतर गोष्टीवरही अवलंबून असते. वैज्ञानिकाचा स्वतःचा अनुभव ,
त्याचा अंदाज ( Guess Work ) , त्याच्या चुका , त्याने संपादित केलेले विषयासंबंधीचे
पूर्व ज्ञान ,त्याचे स्वतःचे भाषा वैभव , त्याची विचारपद्धती , त्याचा स्वतःचा
विशिष्ट दृष्टीकोन आणि त्याची समरसता. या सर्वावर त्याच्या शोधसंकल्पनेची
श्रेष्ठता अवलंबून असते. तेव्हा कवी /कलावंत आणि शास्त्रज्ञ ह्यांच्या
नवनिर्मितीच्या प्रक्रियेमध्ये तसा मुलभूत असा फरक नाही. शास्त्रज्ञ हा कवीच असतो.
कलावंत असतो. वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून निर्मिती करणारा तो ‘वैज्ञानिक कलावंत’ असतो.
निर्मिती मग ती कलेच्या क्षेत्रात असो किंवा विज्ञानाच्या क्षेत्रात असो – त्यात
फारसा फरक असू शकत नाही. एखादे सुंदर संगमरवरी शिल्प , एखादी अप्रतिम कलाकृती (
साहित्यिक किंवा कला ) किंवा सूत्रमय प्रयोगसिद्ध सिद्धांत - ह्या साऱ्यांची निर्मिती एकाच विशिष्ट्य
पद्धतीने होत असते. ह्या ‘निर्मिती’चा आनंद सारखाच असतो. वेगळा कसा असू शकेल? प्रयोगाने
सिद्ध झालेली शास्त्रीय संकल्पना आणि अमर अशी अप्रतिम कलाकृती ह्या दोन्ही
सारख्याच असतात.त्यांच्या निर्मितीच्या आनंदाच्या ऊर्मी तशाच असतात. त्यात फरक
असूच शकत नाही. म्हणूनच शास्त्रज्ञ आणि कलावंत दोघेही सारखेच.
( प्रसिद्ध रशियन
लेखक एल. पोनोमारेव्ह ह्यांच्या “ In Quest of the Quantum” ह्या पुस्तकातील एका
लेखावर आधारित )
I acknowledge with thanks for Images taken from "Google Images" available in public domain.
I acknowledge with thanks for Images taken from "Google Images" available in public domain.
पूर्व प्रसिद्धी : दै. मराठवाडा , ३० जानेवारी ,१९७७
No comments:
Post a Comment