Friday, September 20, 2013

यशस्वी होण्यासाठी......

शाळा - महाविद्यालयातील मुलांच्या बरोबर आणि महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झालेल्या तरुणांच्या बरोबर संवाद  साधताना "यशस्वी होण्यासाठी काय करावयास हवे? " असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. तेंव्हा झालेल्या चर्चेवर आधारित हे चिंतन.
 यशस्वी होण्यासाठी नुसते कष्ट करू नका. आपण आपले काम  चांगले करतो आहोत हे लोकांना दिसू द्या. Working hard is not important, working smart is important. आपण जे काम करतो आहोत ते आपल्या वरिष्ठांना आणि सहकार्यांना समजले पाहिजे.
आपण कोण आहोत? आपले साध्य काय आहे ? आपल्याला काय मिळवायचे आहे ? हे आपण निश्चित केले पाहिजे. हे एकदा आपण नक्की ठरवले पाहिजे. आपल्या विचारात दोलायमानता नसावी. विचारांचा पक्केपणा हवा.धरसोड वृत्ती नको. आपल्याकरिता कोणीतरी प्रयत्न करावेत असे काहींजणांना वाटत असते ,ते चुकीचे आहे. आपण आपल्याकरिता काय करू इच्छितो हेच सर्वात महत्वाचे आहे.आपण कोणाकडून काहीं अपेक्षा ठेवणे योग्य नाही.
 " मी माझ्या क्षेत्रातील तज्ञ / नामवंत आहे " असा विचार करूनच काम  केले तर आपण उच्च पदावर जाऊ शकतो. म्हणजे स्वतःत न्यूनगंड नसावा.आपण स्वतःला कमी लेखता कामा नये. आपली क्षमता काय आहे हे जाणून घेताना जे शक्य आहे त्याकडे दुर्लक्ष करतां कामा नये,विचारांची स्वच्छता असेल तर आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अनेक गोष्टी सहज शक्य होतात,हे लक्षात ठेवणे  आवश्यक आहे .
आपण जे काम करतो ,ते करतांना आपल्याला गंमत वाटली पाहिजे .आनंद वाटला पाहिजे . त्या कामात आपले मन रमले पाहिजे.आपले काम  हे आपल्या आयुष्यासारखे असायला पाहिजे. कधी गमंत असलेले ,कधी वेगवान तर कधी महत्वपूर्ण घटनांनी व्यापलेले.
कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो किंवा आपल्याला दिलेले जे काम आहे  ते आपण परिपूर्णतेनेच केले पाहिजे. Perfection and Excellence in your work is most important. परिपूर्णतेकडे जातांना काहीं चुका होणारच.परंतु संपूर्ण यश तेंव्हाच मिळेल जेंव्हा आपले काम  परिपूर्ण असेल.
जी व्यक्ती महत्वाकांक्षी असते , ती व्यक्ती घोड्यावर स्वार होण्यासाठी स्वतःचा घोडा शोधून काढते.कोणीतरी आपणास घोडा आणून देईल आणि मग आपण घोड्यावर स्वार होऊन विजयाचा झेंडा फडकवत पुढे जाऊ असे म्हणणे म्हणजे यशापासून दूर जाणे आहे. आपण आपले काम  इतरापेक्षा अधिक चांगले करू शकतो हा आत्मविश्वास हवा.जिद्द हवी.प्रयत्नांची पराकाष्ठा हवी.आपण बर्याच वेळा आपल्या कर्तृत्वशक्तीवर अनभिज्ञ असतो.आपल्याला त्याची पूर्ण जाणीवच नसते.तेंव्हा आपण आपल्या आत्मविश्वासावर अवलंबून राहिले पाहिजे .तरच यश आणि नांव दोन्हीही धावत सामोरे येतील.जेंव्हा तुम्ही आत्मविश्वासाने एखादी  गोष्ट करतात तेंव्हाच यश धावून येते. पण जेंव्हा आत्मविश्वास डळमळीत होतो तेंव्हा तुम्हीच स्वतःला मागे खेचत असतात व त्यामुळे अयशस्वी होतात.आपण प्रयत्नवादी  असलेच पाहिजे व ध्येयाला घट्ट धरून वाटचाल केली पाहिजे . नुसते कष्ट करून काहीही साध्य होत नाही.एकत्रित प्रयत्न करणे महत्वाचे आहे.
आपली पात्रता ,गुणवत्ता व प्रयत्न हे महत्वाचे आहेतच.परंतु आपण पात्र आहोत , गुणवान आहोत व प्रयत्नशील आहोत हे इतरांना समजले पाहिजे. तरच आपल्या यशाला खरी मान्यता मिळेल.
जर तुम्हाला खरेच यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःलाच  स्वतःचा घोडा शोधावा लागणार आहे. आपण आपल्यासाठी काय करू शकतो हे अधिक महत्वाचे आहे. लोक आपल्यासाठी काय करतात हे डोळे लावून बघणे व मग कामाला लागणे योग्य नाही.आपणच आपल्या यशाचे खरे सूत्रधार आहोत हे लक्षात ठेवले पाहिजे.आपल्याला योग्य वेळी मोबदला / यश मिळतच असते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे
अपयश ही आपल्याला अजून एक नवी संधी प्राप्त करून देते हे ही लक्षात असणे आवश्यक आहे.आपण कितीही बुद्धिमान असलो आणि खूप परिश्रम घेतले तरी यश नुसते बुद्धीवर व श्रमावर अवलंबून नसते. आपणच आपली दिशा ठरवली पाहिजे आणि बदलली पाहिजे.एकाच ठिकाणी जाण्यासाठी अनेक मार्ग असतात व मार्ग निवडताना सर्व मार्गांचा विचार करून योग्य ते वळण निवडले पाहिजे .फारच थोड्या लोकांना काही गोष्टी अगदी सहजपणे प्राप्त होतात. पण ते अपवाद असतात.त्यालाच काहीजण नशीब असे नांव देतात.सामान्य बुद्धी, मोजकेच कष्ट व सहज उपलब्ध झालेली संधी ह्याच्या जोरावर फार थोडे लोक यश मिळवतात पण ते दैदिप्यमान यश नसते. यशाचे सुमधुर चांदणे हवे असेल तर प्रयत्नांचा चंद्र तेजोमय ठेवला पाहिजे , हे खांडेकरी विचार डोक्यात बसले पाहिजेत. अपयश पचविणे फार कठीण असते .परंतु अयोग्य वेळी मिळालेले यश ही फारसे चांगले नसते.ह्यामुळेच आयुष्यावर विपरीत परिणाम होतात.
आपली वृत्ती आपले यश ठरविते. एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. बांधकाम करणारे तीन गवंडी होते.त्यांना प्रश्न विचारण्यात आला. " तुम्ही हे बांधकाम कशासाठी करता आहात?" पहिला गवंडी उत्तरला, " मी माझ्या रोटी-रोजीसाठी करतो आहे '. दुसरा गवंडी म्हणाला, 'मी माझ्या कुटुंबाला मदत व्हावी म्हणून करतो आहे ". तर तिसरा गवंडी अगदी सहजपणे म्हणाला, ' मी एक सुंदर देऊळ बांधण्यासाठी माझा हातभार लावतो आहे . मी आयुष्यात पहिल्यांदाच एक सुंदर देऊळ बांधण्याचे काम  करतो आहे त्यामुळे मी फार आनंदी आहे' ही वृत्ती महत्वाची आहे.
आपल्या आयुष्याचे यश हे आपल्याला काय हवे ह्यावर अवलंबून असते आणि ते मिळवण्यासाठी आपण काय करतो ह्यावर ते महत्वाचे असते.त्याला Desire Management असे म्हणतात.Desire आपलीच असते. ती नेहमीच बदलत जाते. वाढत जाते. आपण आणखी आणखीच्या मागे लागतो. त्याची परिपूर्णता करण्यासाठी चाललेले प्रयत्न किती यशस्वी होतात त्यावर  आपले अंतिम यश अवलंबून असते. यश हे आपल्यावरच अवलंबून असते .दुसर्या व्यक्तीच्या भरवशावर आपण यश गाठू शकत नाही.. मर्यादित उंचीवर भरभक्कम पावले टाकून आपण यशाचा गड जिंकला पाहिजे.आपणास काही संधी मिळतात. आपल्या हातातून काहीं संधी निघून जातात किंवा आपण त्या संधीचा उपयोग करून घेत नाही.Opportunity lost is lost for ever. They do not come again . मिळालेल्या संधीचे सोने करणे आपल्या हातात असते.
One must work smartly.One must be smart enough and you  must sale yourself. आजूबाजूच्या लोकांना आपली गुणवत्ता , आपले ज्ञान ,आपली क्षमता , आपले कौश्यल्य आणि किमंत माहित असली पाहिजे.अनुभव खूप काहीं शिकवून जातो.त्याकडे डोळस दृष्टीने बघायला शिकले पाहिजे. अनुभवात विविधता हवी. त्यामुळेच व्यक्ती विकास होतो. जगण्याचे प्रयोजन डोक्यात नसते. ते हृदयात असते. आपल्या जगण्याचा हेतू मानेवरती नसतो.म्हणजे डोक्यात नसतो. तर हृदयात असतो.मन आणि हृदय दोन्ही महत्वाचे आहेत. विचार मेंदू करतो पण समरसता हृदयात असते. जेंव्हा हृदयाशी संवाद चालू होतो तेंव्हा डोकेदुखी थांबते आणि इतर वेदना बंद होतात .हृदयाला कशात तरी गुंतवून ठेवणे महत्वाचे आहे . मेंदू हा हृदयाचा शिपाई असायला हवा.त्यामुळेच  आपली असलेली दुर्बलता सबलतेत बदलून जाते .
व्यावसायिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्याला एखादा God Father असावा लागतो. आपण कोणाचे तरी Blue Eyed Boy असणे आवश्यक असते.हे आपल्याला जमले तर काहीं संधी निश्चितच चालून येतात आणि त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. स्वतःला म्हणजे स्वतःच्या व्यक्तिमत्वाला विकता आले पाहिजे. हे व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक आहे. "We must have good qualities of a salesman ." जो विक्रेता एस्किमोलाही फ्रीज विकू शकतो तो चांगला विक्रेता" हे लक्षात आले तर आपण सहज यशस्वी होऊ शकतो . ज्ञान व विकण्याची कला ह्यांचा सुंदर संगम हवा. त्यामुळे लोकांचा विश्वास प्राप्त होतो. आपणच आपल्या आयुष्याचे ( चरित्राचे) लेखक असावयास हवे, हे मी माझ्या व्यावसायिक अनुभवातून सांगतो आहे. बघा पटते  का?

डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com

Monday, September 16, 2013

" आहे रे" आणि "नाही रे "

" आहे रे" आणि "नाही रे "
समाजात प्रामुख्याने हे दोन वर्ग दिसून येतात. त्यांची मानसिकता ही भिन्न असते. काहीं व्यक्तीमध्ये दोन प्रकारची व्यक्तिमत्वे असतात.कामगार किंवा कष्टकरी वर्गाची मानसिकता ( Working Class ) किंवा शिक्षित माणसांची ( Educated Class ). कामगार मानसिकता म्हणजे शाळा / कॉलेज अर्धवट सोडून काहींतरी नोकरी/व्यवसाय करून पोट भरणार्या माणसांची मानसिकता. शिक्षित मानसिकता म्हणजे उच्च विद्याविभुषित पदवीधर माणसांची मानसिकता .ह्या दोन मानसिकतेमध्ये जमीन-अस्मानचा फरक असतो.
चांगल्या कुटुंबातील वातावरणातून शिक्षित झालेल्या माणसाला "मी समाजाचे काहींतरी देणे लागतो" असे सारखे वाटत असते.त्याच्यामध्ये नेतृत्व गुण ( Leadership) असतात. " नेतृत्व म्हणजे काय ?" तर "बदल घडवून आणणे( Make a difference )" अशी त्याची धारणा असते." मी जर काही वेगळा फरक घडवून आणू शकलो तर माझे जीवन अधिक सार्थकी लागेल", अशी भावना असणे म्हणजे नेतृत्व करणे. "आयुष्याला अधिक काय अर्थ आहे ?" असे त्यांना वाटत असते." नुसतेच खोट्या मोठेपणाला काहींच अर्थ नसतो", असे त्यांना वाटते. ही मंडळी स्वतः:ला सामाजिक कार्यात गुंतवून घेतात किंवा स्व:ता:च्या संस्था काढतात. चळवली उभ्या करतात.असा हा शिक्षित माणूस आपल्या जीवनाचा हेतू समाजाला आपण किती उपयोगी पडतो ह्याचाच विचार करीत असतो.अर्थात सगळीच शिक्षित मंडळी असा विचार करतात असे नाही. ह्या उलट कामगार आणि कष्टकरी असलेला माणूस त्याचाच विचार करतो. कारण,तो परिस्थितीने वेढला गेलेला असतो.त्याची वृत्ती काहींशी संकुचित झालेली असते. ह्या वर्गातील माणसे नेहमीच असे बोलतात की ," तुम्ही चांगल्या कौटुंबिक ,आर्थिक वातावरणात राहून खूप शिकला आहात , तुम्हाला सगळे काहीं सहज मिळाले आहे , तुमची गोष्टच वेगळी.तुम्ही काय ,आनंदीच असणार. आमच्यासारखे दु:ख तुम्ही भोगले नाही .... वैगरे वैगरे .." शिक्षित माणसाजवळ त्यासाठी प्रत्युत्तर नसते.त्याला त्यामुळे विनाकारण अपराधी वाटू लागते व आपणच अन्याय तर केला नाहीं ना? अशी मानसिक बोच वाटू लागते.म्हणजे " नाही रे " वर्ग हा नेहमीच " आहे रे " वर्गाकडे अशा संशयाने पहात असतो आणि "आहे रे "वर्गाला नं कळत आपणच अपराधी आहोत असे वाटू लागते.
तेंव्हा हे द्वंद्व समजून घेणे आवश्यक आहे. " आहे रे " वर्गाने ' नाही रे " वर्गासाठी काम करतांना जपून पावले उचलली पाहिजेत.
सामाजिक ताण- तणाव , पराकोटीची गरिबी,वाढती लोकसंख्या , कर्जबाजारीपणा , लांचलुचपत,बेकारी ,नैराश्य, वैद्यकीय सुविधांची नसलेली उपलब्धता ह्या सर्वांच्यामुळे " नाही रे "वर्ग , "आहे रे " वर्गाकडे द्वेशाने पहात असतो. ही एक सर्वसामान्य समस्या आहे. लोक स्वतःलाच दोष देतात कारण ते कोणत्याही प्रश्नाला विलक्षण गंभीरपणे घेतात असे दिसत नाही.
गरीब लोकांना निवड करण्याची संधीच मिळत नाही. तरीही ते बर्यापैकी आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. आपण बर्याचवेळा गरीब लोकांची ही आनंदी वृत्ती अंगात बाणवली पाहिजे." कां ?", असे विचाराल तर त्याची कारणे अशी .......
गरिबांना गरिबीत राहावयाचे नसते. त्यांना बहुसंख्य अडचणीना सामोरे जावे लागते. प्रत्येक वेळी त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.त्यामुळेच स्वतःचा विकास करणे शक्य नसते. त्यांना आपले जीवन अधिक सुखकर करण्याची आंस असते.त्यासाठी त्यांची सतत धडपड चालू असते.त्यामुळे पैसा कमविण्यासाठी कोणताही नवा मार्ग दिसला की  ते त्या मार्गाने जातांना दिसतात.अर्थात सर्व गरीब लोक असे करतातच असे नाही. काहीं जण असे प्रयत्न करतांना दिसतात. अगदी मनापासून गरिबी नाहीशी करण्यासाठी ते प्रयत्न करतांना दिसतात.
रोटरीच्या माध्यमातून समाजकार्य करतांना मला आलेला एक अनुभव सांगण्यासारखा आहे. मी क्लबचा अध्यक्ष होतो. विक्रमगढ ह्या ठाणे जिल्ह्यातील गावी आम्ही एक वैद्यकीय शिबीर घेतले. Cataract Operation ची आवश्यकता असलेले अनेक लोक आढळून आले. नुसते वैद्यकीय शिबीर घेऊन उपयोग नव्हता म्हणून वैद्यकीय शस्त्रक्रिया शिबीर घेण्याचे ठरविले. मुंबईच्या एका रुग्णालयात अशी व्यवस्था करावयाची, असे ठरले. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करावयाची त्यांच्या करिता येण्याजाण्यासाठी वाहन व्यवस्था केली. राहण्यासाठी एका धर्मशाळेची व्यवस्था केली. खाण्यापिण्याची ,जेवणाची व्यवस्था केली. सोबत एक नातेवाईकही असावा म्हणून त्याचीही व्यवस्था केली. त्याप्रमाणे नोंदणी झाली. पहिली १० ची तुकडी ठरली. आम्ही त्यांना मुंबईला घेऊन जाण्यासाठी गावात पोहोचलो. आमचे वाहन उभे होते. सर्व मंडळी वाहनात चढण्यासाठी तयार झाली आणि चढण्यापूर्वीच त्यातील काही लोकांनी आम्हाला  घेराव घातला. एक जण म्हणाला ," आम्ही शस्त्रक्रिया करून घेतो , आम्हाला किती पैसे देणार? ". ह्या अनपेक्षित प्रश्नामुळे मी तर चाटच पडलो. आम्ही सर्व विना मोबदला करणार होतो. आणि ही मंडळी त्यासाठी आमच्याकडूनच पैसे मागत होती. आम्ही त्यांना सर्व समजून सांगितले. त्यांचा आमच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. त्यांना असे वाटत होते की आम्हाला सरकारकडून खूप पैसे मिळतात आणि त्यातील काही हिस्सा आम्ही त्यांना द्यावा. मला हे त्यांचे तर्कशास्त्र समजले नाही. त्यानंतर मला असे कळलेकी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमात असे पैसे दिले जात असत. त्यामुळे त्यानाही हा तसाच कार्यक्रम आहे असे वाटले. शेवटी फक्त ५ जण आमच्या बस मध्ये चढले. आम्ही त्यांना मुंबईला आणले. शस्त्रक्रिया झाल्या. त्यांची राहण्याची आणि इतर व्यवस्था केलीच होती. चार दिवसांनी त्यांना घरी घेऊन गेलो. दहा  दिवसांनी गावात परत गेलो तेंव्हा गावकरी आमच्या मागे लागले आणि विचारू लागले ,आम्हाला शस्त्रक्रिया करून घ्यावयाची आहे, पुढील कार्यक्रम कधी आहे. ज्यांनी शत्रक्रिया करून घेतल्या होत्या ती मंडळीच आम्ही केलेल्या कामाबद्दल तोंड भरून स्तुती करत होती. अक्षरशः
 आमच्या पाया पडत होती. नवे डोळे मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अशी असते गरीब लोकांची मानसिकता.
सामाजिक कार्य करणे तसे फार कठीण असते. ज्या गरीब लोकांच्यासाठी तुम्ही सामाजिक काम  करतात त्यांना नेहमी तुमच्याबद्दल एक अविश्वास वाटत असतो. त्याचे कारण आपली राजकीय आणि सामाजिक व्यवस्था. सर्वत्र जो लांचखोरपणा दिसतो त्यामुळे एक अविश्वास निर्माण झालेला असतो. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते. अर्थात आपणच  हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. नाहीतर आपण कशाला हे सारे करावयाचे ? असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो.
सामाजिक कार्य करतांना अनेक वेळा आपला आत्मा राजकीय पुढार्यांना विकावा लागतो असे काही लोकांचे अनुभव आहेत हे दुर्दैव. तुम्हाला तुमच्या कामाकरिता जो पैसा उभा करावा लागतो तेंव्हा अनेक अडचणीना तोंड द्यावे लागते. कोणीतरी तुमच्या पाठीत खंजीर खुपसणारा असतोच. त्यांना लोकांची पर्वा नसतेच. Keeping them poor is their business. गरिबांना गरिबीत ठेवणे हाच त्यांचा व्यवसाय असतो. त्यातच त्यांचे यश सामावलेले असते. लोकांना गरिबीत ठेवण्यासाठीच त्यांना नव्या नव्या शासकीय योजना समोर करून पैसे कमवायचे असतात. त्यातूनच ते  नवी अनुदाने मिळवितात.त्यासाठीच त्यांची कार्यकर्त्याची फौज असते. ते कार्यकर्त्याला सांगतात की,"तुम्हाला माझी गरज आहे. मला तुमची गरज आहे.मी चांगला आहे. तुमच्या उपयोगाचा आहे.तुम्हाला मी काहीतरी मिळवून देऊ शकतो".आणि देणाराच घेणाऱ्याकडून सर्व वसूल करतो. हे गरिबांनी समजून घेतले पाहिजे. प्रत्येक वेळी सरकारी मदतीवर अवलंबून नं राहता प्रयत्न केले पाहिजेत. कारण राजकीय पुढाऱ्यांचा मिंधेपणा तुमची गरिबी दूर करू शकत नाही. सत्तेचे जे केंद्रस्थान आहे त्या ठिकाणी चकरा मारून किंवा सरकारी अनुदाने मिळवून गरीबीचे प्रश्न सुटू शकणार नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे.
प्रत्येक गरीब माणसाला स्वाभिमानाने व सन्मानाने जगता आले पाहिजे.मिंधेपणा आला तर ते स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील? स्वतःमध्ये बघावयास शिकले पाहिजे. "ASSETS AND RESOURCES ARE MORE WITH POOR PEOPLE", हे त्यांच्या लक्षात आणून देणे महत्वाचे आहे. " नाही रे " लोकांचा हाच एक मोठा प्रश्न आहे. "आहे रे " असलेल्या सामाजिक कार्यकर्त्याची हीच एक वेदना आहे.

डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com

Friday, September 6, 2013

आपण आणि आपला आतला आवाज


आपला असा एक आतला आवाज ( calling) असतो. गांधीजींना  असा आतला आवाज खर्या अर्थाने समजला. प्रत्येकालाच असा एक आतला आवाज असतो.तो समजला पाहिजे. त्याचे ऐकले पाहिजे. आपल्याला आपली ओळख झाली पाहिजे. आपला आतला आवाज आपल्याला आपली ओळख करून देत असतो. आपल्याला आपल्या स्वतःचीच प्रचीती होणं फार महत्वाचे आहे.
आपण सामान्य माणसं अगदी साधं आणि नगण्य जीवन जगत असतो. आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपापल्यापरीने  प्रयत्न करीत असतो. आपलं आयुष्य नं कळत बदलत असतं. कठीण काळ संपून आपण पुढच्या टप्प्यावर येतो. अगदीच नाईलाज असतो तेंव्हा नं कळत आयुष्य थांबलेले असतं. अज्ञान , रोगराई , भ्रष्टाचार ,बेकारी ह्या रोजच्या समस्यांना तोंड देताना आपला जीव मेटाकुटीला आलेला असतो. वैयक्तिक सुख-दु:खे ,आप्तस्वकीयांचा अकाली मृत्यू ह्यांच्यामुळे आपले आयुष्य काहींसे थांबते.आपल्या चुका होतात. आपल्याजवळ धैर्य नसते. कोणते चांगले ह्याचे मोजमाप आपल्याला करता येत नाहीं.अशावेळी आपला आतला आवज आपल्याला  साथ देत असतो. ज्यांना हा आवाज समजतो तेच पुढे जातात. हा आतला आवाज ओळखता आला पाहिजे. आपण त्याचेच ऐकले पाहिजे.
आपल्या प्रत्येकाला काहीना काही नैसर्गिक देणगी असतेच. आपला आतला आवाज आपल्याला ती समजावून सांगत  असतो. आपण त्याकडे दुर्लक्ष करावयाचे नसते. त्यातच आपले यश असते.
मी समजून घ्या
आयुष्यात आपण काय कमावले ह्याचाच आपण जास्त विचार करतो. त्यामुळे जगण्याचा खरा आनंद घालवून बसतो. आपण काय मिळविले ह्याकडे जगाचेच लक्ष असते. परंतु त्यामुळे आपण आपला आनंद हरवून बसतो. आपल्याला काय मिळवायचे ह्याच्या विचारात आपण आपल्या जगण्याचा खरा आनंद घालवून बसतो. आपल्या जगण्याला एक हेतू असतो. आपली काहीं ध्येये असतात. त्यासाठी आपली धडपड चालू असते. त्या जगण्याच्या हेतूसाठी प्रयत्न करतांना आनंद मिळविणे आवश्यक आहे. आपण आपल्या आयुष्याची आखणी करतांना काहीं छोटी छोटी ध्येयं समोर ठेवली पाहिजेत. त्यांना तुम्ही ध्येयं म्हणा, उद्दिष्टे म्हणा किंवा प्रयोजन म्हणा.
जेंव्हा आपल्या जीवनात कठीण समय असतो, दिवस त्रासदायक असतात तेंव्हा आपण जगण्याच्या नव्या वाटा शोधू लागतो. जेंव्हा चांगले दिवस असतात तेंव्हा आपण फक्त "बदला"बद्दल बोलत असतो.
आपले आयुष्य फार गंमतीदार असते.आपण जेंव्हा आपल्या आयुष्यावर विचार करतो तेंव्हा खालील गोष्टींचाच प्रामुख्याने विचार करीत असतो.
       माझे भविष्य काय आहे ? कधी कधी ज्योतिष्यशास्त्राचा आधार घ्यावा असेही आपल्याला वाटत
       राहते.
       मी माझ्या ambition चा विचार गोठवावा कां ?त्यातून तणाव कमी होईल कां?
       मी प्रथम पैसा कमवावा व नंतरच मला जे आवडते ते करावे कां?
       माझी आवड (Passion ) महत्वाची आहे कां? तिचाच विचार करून मार्ग निवडावा कां?
       बाह्य परिस्थितीचा विचार करूनच  माझे मार्ग बदलावेत कां?
       मी मला असलेला बदल केंव्हा घडवून आणावा ?
माझे आई-वडील किंवा आप्तस्वकीय माझ्याबाबतीत चिंतेत असतात तेंव्हा मी त्यांना केंव्हा आणि काय सांगावे ? माझा मार्ग मी बदलणार आहे ह्याबद्दल सल्ला घ्यावा कां?
मला नैराश्य येते , ते मी कसे टाळावे ?
मी मला हवे असलेले मिळविल्यानंतर कसा असेल? खरचं आनंदी असेल कां?
ह्या आणि अशा अनेक प्रश्नाची उत्तरे शोधताना माझ्या हातात काहीं पडणार आहे कां? ही निष्फळ चर्चाच नसेल ना ? ह्या सेवामुळे मी माझ्या उद्दिष्टापासून दूर जाईल कां?
मला जे हवे आहे ते मिळविताना मला पडणारे कष्ट , यश-अपयश ,निराशा ह्यांचा माझ्यावर कसा परिणाम होईल हे ही लक्षात घ्र्तले पाहिजे. बाह्य परिस्थिती स्वतःच्या हातात नसल्यामुळे घडणारे बदल माझ्या हातात नसतात, तेंव्हा मी काय करीन हे लक्षात आले पाहिजे.
मी मला समजून घेतले पाहिजे. माझा प्रवास मीच केला पाहिजे.त्यातून मार्ग काढणे माझ्याच हातात आहे. मीच मला समजून घेतले पाहिजे.
आपण अयशस्वी कां होतो?
आपण यशस्वी कां होत नाही ह्यांची प्रमुख कारणे अनेक असू शकतात. योग्य तो अनुभव पाठीशी नसल्यामुळे योग्य तो निर्णय आपण घेत नसतो. आपण आपल्याला नीट ओळखलेले नसते त्यामुळे गुंता निर्माण केलेला असतो. नव्या आर्थिक रचनेमध्ये व हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी जमावण्याच्या नादामुळे आपण मेटाकुटीला येऊन दु:खी होत असतो. परस्पर विरोधी वातावरणामुळे जीवन कठीण झालेले असते. आपण त्यातून योग्य तो मार्ग शोधत असतो. त्यावेळी आपल्या मनातील स्वतःचे स्वतःशी असलेले भांडण पहिल्यांदा दूर केले पाहिजे. आपले मिशन नीट निवडले पाहिजे. त्यांत आपले मन रमले पाहिजे.आपल्या आजूबाजूला अनेक प्रलोभणे असतात त्यांना बाजूला सारले पाहिजे. आपण आपल्याला कोणत्या परिस्थितीत तग धरता येईल तेच वातावरण निर्मीले पाहिजे. आपण आपल्या आवडीनिवडी आई-वडील किंवा आप्तस्वकीय ह्यांच्या मतावर आधारित केल्या असतील तर अनेक वेळा चूक होतेच. आपली आवडनिवड नं बघतां घेतलेला निर्णय फार महाग पडतो. आपण संयम आणि सतत काम करण्याची तयारी ठेवीत नसतो. त्यामुळे अपयश मागे लागते. सातत्य फार महत्वाचे असते, धरसोड वृत्तीच आपले नुकसान करते. जवळचा मार्ग शोधताना अनेक वेळा मुलभूत चुका होतात व पुढे यश मिळणे कठीण होऊन बसते.
“ मी माझ्या आयुष्यात काय करू “ ह्याचा अर्थ म्हणजे मी कोणता व्यवसाय- नोकरी-धंदा करू असा नाही तर मी माझ्या आयुष्यात आनंदी होण्यासाठी काय केले पाहिजे ह्याचाच सर्वांगीण विचार करणे व स्वतःला समजून घेणे महत्वाचे आहे. आपण काय करावे ?
·         कोणते चांगले , कोणते वाईट ह्याचा अंदाज घेणे
·         आपल्या ऊर्मी . महत्वाकांक्षा , जीवनेच्छा कोणत्या ?
·         आपला प्रवास कसा असेल ह्याची आखणी
·         आपण स्वतःला ओळखणे
·         बदल घडणे / घडवून आणणे /बदलणे
·         आपले कुटुंबीय ,आप्तस्वकीय ह्यांचा आपल्या जीवनाशी असणारा संबंध , त्यांचे महत्त्व आणि आपले कर्तव्य
·         वेळेत सर्व घडवून आणणे
आपण काय करतो हे फारसे महत्वाचे नसतं.आपण कोण आहोत हे अधिक महत्वाचे असते. आपण कसला व्यवसाय करतो , काय नोकरी करतो ह्याचाच अधिक विचार केला तर आपण आपल्याला विसरतो आणि दु’खी कष्टी होतो. ९ ते ५ नोकरी करणार्यांची मानसिकता वेगळीच असते. काहीतरी नोकरी करायची म्हणून नोकरी करायची , आवश्यक असलेला पैसा कमावणे एवढेच मर्यादित ध्येय असणारी मंडळी आनंदापासून दूर जातात. त्यांचे मन कशातच रमत नसते. आपण कसे जगतो हे त्यांनी तपासून बघितले पाहिजे. “ स्वप्नातील नोकरी “ अशी कधी नसतेच हे लक्षात असू द्यावे. Who are you is more important than what you do. हे लक्षात आले पाहिजे. तीच आनंदाची गुरुकिल्ली.

डॉ नरेंद्र गंगाखेडकर
drnsg@rediffmail.com   


Wednesday, September 4, 2013

ह्या जगण्यावर शतदा प्रेम करावे .....


“What Should I Do With My Life?” हे P O Bronson  ह्या लेखकाचे पुस्तक सहज हातात आले. थोडेसं चाळले. आणि वाचण्यात मन रमून गेले. मग पुस्तक खाली ठेवावे असे वाटलेच नाही. “ आयुष्यावर बोलू काही “ हा संदीप खरे आणि सलील कुलकर्णी ह्यांचा काव्यगायनाचा सुंदर कार्यक्रम काही वर्षापूर्वी पाहिला होता.तसाच विषय. आपण आपल्या आयुष्याच्या यशापयशावर बोलत असतो. कधीकधी स्वतःशीच. आपल्याला काय मिळाले किंवा काय मिळाले नाही ह्याचा विचार करीत असतो. परंतु नुसता विचार करणे नव्हे तर आपले जगणे किती आनंदी करू शकतो ह्यावर बोलणे आवश्यक आहे. आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण करण्यासाठी आपण सारेच जण झटत असतो. जगण्याचा अर्थ शोधत असतो. रोजच्या जगण्याला अधिक सुंदर करण्याचा व आनंद निर्माण करण्याचा आपला प्रयत्न असतो. वरील पुस्तक वाचू लागलो. हे पुस्तक म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सर्व"सामान्य माणसाच्या धडपडण्याचा शोध घेणारे सुंदर पुस्तक. आयुष्यात काय हवे? ते कसं मिळवायचे ? कसं आनंदी व्हायचे?" त्यासाठी कसा प्रयत्न करायचा. हे सारं ९०० निवडक व्यक्तींच्या जीवनाचा शोध घेणारे पुस्तक. ह्या व्यक्तींचे आयुष्य कसं सुंदर होत गेले आणि त्यानीं आयुष्यात आनंद कसा मिळविला. त्यांनी काय मिळविले आणि काय गमावलं. हे खूप काहीं सांगणारे अप्रतिम पुस्तक. हा लेखक माणूस कसा शोधतो ह्याचा प्रत्यय येतो.तुम्ही-आम्ही अशी माणसे रोजच पहात असतो पण असा शोध घेत नाही. ह्या पुस्तकातून दिसणारी ही इंद्रधनुष्याचे विविध रंग असणारी मानवी आयुष्ये समजून घेतली तर आपण नक्कीच म्हणू .. “ ह्या जन्मावर शतदा प्रेम करावे ...”
ह्या पुस्तकात काय आहे? सामान्य माणसातील असामान्य माणसे आहेत . नियतीचे भान असलेली माणसे आहेत तसेच जे ठरविले ते दुर्लक्ष करणारी माणसे आहेत. कठीण काळापासून खूप काहीं शिकणारी व धडपडणारी माणसे आहेत. आत्मविश्वासाला अर्थ प्राप्त करून देणारी माणसे आहे. असणे आणि करून दाखविणारी माणसे आहेत.विचारातील पारदर्शिकता असलेली पण त्यासाठी थांबणारी आणि धडपडणारी माणसे आहेत." मी कुणाचा आहे ?" असा प्रश्न पडलेली पण मला जे हवय त्या आनंदासाठीच मी जगणार ,धडपडणार असा विचार असलेली माणसे आहेत. मेंदूला उत्तेजित करणारी स्त्री- पुरुष मंडळी आहेत." प्यारासाईट उद्योगशीलता" असलेली माणसे आहेत. जगण्यासाठी माणसाजवळ एक " off switch" असावे असे सांगणारा माणूस आहे." स्वतंत्रतेची छत्री असावी" असे म्हणणारी माणसे आहेत. कर्तव्य विसरणारी माणसे आहेत. कामगार वर्ग विरुद्ध सुशिक्षित मध्यमवर्ग ह्यांच्यातील भांडण पेटवणारी माणसे आहेत. त्यांचे जगणे आहे. शिक्षणाची आंस असलेला सामान्य ड्रायव्हर आहे तर स्वप्न पाहणारा आणि चर्च बांधणारा वेगळा माणूस आहे. क्यासिनोचे अर्थशास्त्र समजून घेणारा माणूस आहे. बातमी देणारी स्त्री बातमीदार आहे. पैसे नं स्वीकारणारी माणसे आहेत. मानसिक व्यंगावर मात करणारा माणूस आहे." श्रीमंती" माणसाला कशी बदलुन टाकत असते, असे सांगणारा माणूस आहे." हे नंतर , ते आधी", असे म्हणून स्वतःवर प्रयोग करणारी माणसे आहेत." आई होणे" हे भरवण्यापेक्षा अधिक काही आहे हे समजावून सांगणारी स्त्री आहे.
उपदेश , मार्गदर्शन आणि अधिकार ह्याचे महत्त्व सांगणारी माणसे आहेत." बदल" हाच आपल्याला जिवंत ठेवतो, असे सांगणारी प्रभावी माणसे आहेत. "स्वतःला ऐकून घेत चला , स्वतःच स्वतःचे श्रोते व्हा. वास्तव समजून घ्या. पूर्वानुभव आड येऊ देऊ नका", असा नं कळत सल्ला देणारी माणसे आहेत." मी आणि बदलणारा मी" ह्याचा शोध घेत चला असं सांगणारा माणूस आहे. यशाच्या नव्या गाथा लिहिणारी ध्येयवेडी माणसे आहेत." प्रश्नाचे उत्तर नं देता प्रश्नाचे महत्वच कसे कमी करावे", असे सांगणारा वेगळा विचार करणारा माणूस आहे. समविचारी लोकांच्या सहवासात आनंद शोधणारी माणसे आहेत. यशाचा पिच्छा नं सोडणारी  विलक्षण धडपडणारी माणसे आहेत . परदेशात अनुभवासाठी जाणारी माणसे आहेत. एकाचवेळी अनेक करिअरचा विचार करणारी आणि धडपडणारी विलक्षण यशस्वी माणसे आहेत.  असा हा माणसांचा शोध घेणारे हे पुस्तक.
स्वप्नें, भीती , आत्मविश्वास, अपयश ,अनुभव असणे आणि नसणे , प्याशन, जगण्याचे प्रयोजन, नोकरी आणि  वळणावरच्या वाटा , पैसा मिळवणे , स्वप्नातील नोकरी , आयुष्याचा हेतू, विवाह ,मुलं आणि आयुष्य . स्वातंत्र्य ,ध्येयपूर्ती, बदल ,जगण्याचे नाट्य,आपला आतला आवाज ,जिद्द, “स्व “चा शोध, आपल्या गरजांची भूक ,व्यवसाय आणि त्यांत मिळवायचा आनंद, शहरी जीवनशैली, निसर्ग आणि विज्ञान ,निराशा आणि अलिप्तता, ठेविले अनंते वृत्ती, वेगळेपणाचा ठसा, न्यूनगंड, डोके आणि हृदय,इत्यादी.. इत्यादी.....ह्या सर्वावर प्रत्येकाचे वेगळे वेगळे बघणे ...
असा हा माणूस शोध खूप काही सांगून जातो. ही माणसे मनापासून आवडतात आणि खूप काहीं शिकवून जातात.

डॉ नरेंद्र गंगाखेडकर

drnsg@rediffmail.com