सध्या मी भालचंद्र नेमाडे ह्यांची " हिंदू " ही कादंबरी वाचतो आहे . ह्या कादंबरीला " हिंदू " हे नाव का दिले? हाच पहिला प्रश्न पडला. ही एक "देशी " कादंबरी आहे . कृषी जीवनावर आधारलेली कुणबी कुटुंबातील खानदेशीमाणसे ह्या कादंबरीतील प्रमुख पात्रे असून खंडेराव हा ह्या कादंबरिचा नायक आहे . आमच्या मराठवाड्यात अशी माणसे मी खूप जवळून बघितली आहेत .
कादंबरीचा परीघ खूप मोठा करण्याचा प्रयत्न केला असला तरी कादंबरीखूप पाल्हाळ झाली आहे. नेमाड्यांनी एवढा फापट पसारा कां वाढवला आहे हेच कळत नाही. कादंबरीची पाने कमी करता आली असती व एक सुटसुटीतकादंबरी लिहिता आली असती . त्यामुळे नेमाड्यांची ही कादंबरी तशी निराशाच करते . एक कंटाळा आणणारी कादंबरी असेच वर्णन करावे लागेल. चांगल्या लेखकाला अगदी थोड्या शब्दात व्यक्त करता येते . नेमाड्यांना हे जमले नाही . माझी तर खूपच निराशा झाली आहे.
मराठीमध्ये ह्या कादंबरीच्या एवढ्या आवृत्या फारच थोड्या वेळात निघतात कश्या ? हा मला पडलेला प्रश्न प्रकाशक सोडवतील का ? प्रकाशनानंतर पंधरा दिवसातच दुसरी आव्रत्ती
निघाली.म्हणजे बहुधा आधीच छापून झाली असावी व दिनांक बदललेला असावा.आजकाल बरेच
प्रकाशक असे करू लागले आहेत. एवढी लोकप्रियता असलेली कादंबरी म्हणजे एक आश्चर्यआहे.अलिकडेच ह्या कादंबरीला कुसुमाग्रज
जनस्थान पुरस्कारही मिळाला आहे . म्हणून वाचायला घेतलेली ही कादंबरी एकदम बोअर आहे.
भालचंद्र नेमाडे ह्या समृद्ध जीवन जगलेल्या मुंबई /औरंगाबादच्या ईंग्रजी प्राध्यापकाच्या मनुस्मृतीतील (मनातील आठवणींची ) अडगळीच्या आठवणींची कहाणी
म्हणजे खंडेराव ह्या कादंबरीतील पात्राने सांगितलेली स्वतः ची गोष्ट .एका खानदेशी कुणबी शेतकऱ्याच्या कुटुंबाची ही कहाणी . नेमाडे तुमची ही निर्मिती फारसा आनंद देणारी साहित्यकृती नाही.
खानदेशी
माणासांची व्यक्तिचित्रे चांगली आहेत,ह्यात वाद नाही , मी अशी माणसे मराठवड्यात ही खूप बघितलेली आहेत. श्री ना
पेंडसे ह्याच्या कादंबरीतील कोकणी माणसे अधिक लक्षवेधी वाटतात . व्यंकटेश माडगुळकरांची
बनगरवाडीतील व्यकिचित्रेही अधिक प्रभावी वाटतात .
कादंबरीचा
परीघ वाढवताना फापटपसारा विनाकारण वाढविला आहे . एखाद्या चांगल्या संपादकाने
काटछाट करून ही कादंबरी संक्षिप्त करावयास हवी होती. स्वतः नेमाड्यानीच हा विचार
का केला नाही? हेच समजत नाही.
ह्या
कादंबरीची भाषा कधी कधी मराठी आहे . खानदेशी , अहिराणी ,ह्या बोली भाषेचा वापर करूनच
लिखाण केले आहे.संवाद भाषा सारखी बदलत असते . ते ठीक आहे . वाचण्याचा सराव झालाकी
काही वाटत नाही.प्रादेशीक कादंबरीत असेच होते.असावायास काहीच हरकत नाही.
ह्या
कादंबरीतील खंडेराव ची सगळी नातेवाईक मंडळी खूप खरी म्हणजे वास्तववादी आहेत .
त्याचे वडील ,आई, आजी ,आत्या ,भाऊ, बहिणी ,मेव्हणे , ही सगळी पात्रे खूप खरी आहेत .
कृषी संस्कृतीतील बारा बलुतेदार हे कुटुंबाचे घटकच असतात. ते ही खरेच आहेत.हिंदूंची शेती संस्कृती म्हणजेच हिंदू जीवन असा नेमाड्यांचा विचार असावा म्हणून त्यांनी “हिंदू” हे नाव
कादंबरीला दिलेले असावे. नाहीतर त्या नावाशी कसलाच खऱ्या अर्थाने संबंध येत
नाही.किंवा एक सनसनाटी नाव असावे व लक्ष वेधून घ्यावें म्हणून उपयोग केलेला
दिसतोय.
ग्रामीण
जीवन खरे आहे.जीवंत चित्रण आहे ह्यात वाद नाही.एका कुणब्याच्या कुटुंबाची ही कथा देशी आहे. खंडेरावला ही
ग्रामीण दुर्दशा नको आहे. तो मार्ग शोधतो आहे तरीही तो ह्या गावाकडील माणसामध्ये
गुंतला आहे. त्याला मोरगावचे जगणे नको आहे .त्याला खूप शिकायचे, संशोधन करावयाचे आहे
. संशोधनात त्याला खूप रस आहे. मिळालेल्या संधी त्याला सोडायच्या नाहीत.त्याची ही घालमेल म्हणजे ह्या कादंबरीचा
विषय.
लेखक हा
खंडेरावच्या मुखातून आपले म्हणणे मांडत असतो तेव्हां खूपच खटकत
जाते.नेमाड्यांची मुक्ताफळे न उमजणारी आहेत. खंडेराव एम ए साठी औरंगाबादला
मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतो आणि त्या दोन वर्षाचा काळ लेखकाने चांगला
चित्रित केला असला तरी अनेक गोष्टी खूप खटकतात . त्या वेळचे मराठवाडा विद्यापीठ , ब्राम्हण - मराठा वाद , मराठा-मराठेत्तर वाद , विद्यापीठ नामांतर चळवळ,कुलगुरूच्या नेमणूकी , महाविद्यालयाचा कारभार, प्राध्यापकांच्या नेमणुकीचे राजकारण ह्या सर्वाचे वर्णन
बरेचसे खरे असले तरी काही उल्लेख आणि पात्रांची रचना खूप खटकते.अनंतराव हे नाव
असलेला जर्नालिझमचा कोर्स करणारा खंडेरावचा मित्र म्हणजे औरंगाबादचे
पत्रकार अनंत भालेराव नव्हेत हे खरे पण मराठवाडा दैनिकाचा उल्लेख करून
त्यांना अनंत भालेराव ह्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करावयाचा आहे, असेच
दिसते. तसा उल्लेख करताना महाराष्ट्राचे सप्तर्षी पत्रकार असे अनेकदा लिहिले आहे. के बी देशपांडे , गोविंददादांचे कॉलेज वगैरे
उल्लेख खूपच खटकतात.कारण ही प्रसिद्ध नावे आमच्या चांगलीच परिचयाची आहेत. माजी न्यायमूर्ती
असलेले विद्यापीठाचे कुलगुरू एक बरे कुलगुरू होते पण ते पात्र वेगळेच रंगवले आहे. नेमाडे ह्यांनी बराच काळ मराठवाड्यात प्राध्यापकी केली आहे
त्यामुळे त्यांना आणि आम्हा मराठवाडी मंडळीना तेथील परिसर , तेथील माणसे खूप माहितीची व परिचयाची
आहेत. त्यांनी कोणत्या हेतूने पात्रासाठी ह्या नावांची योजना केली हेच समजत नाही.लेखकाला स्वातंत्र्य असते पण
त्याचा उद्देश काय असावा हे ही समजणे महत्वाचे आहे . नेमाडे असे का करतात हे
त्यांचे त्यांना माहित.गोविन्ददादा कॉलेज असा उल्लेख ते करतात, ते गोविंदभाई श्रॉफ
ह्यांचे महाविद्यालय. त्या ठिकाणीच नेमाडे प्राध्यापक होते.कादंबरीतील कॉलेज तसे
वेगळे आहे,पण हे उल्लेख खूप खटकतात.
कोणती कादंबरी चांगली असे मला विचारले तर मी
असे म्हणेन की जी कादंबरी वाचतांना खाली ठेऊ नये असे वाटते , ती कादंबरी अधिक सुंदर. ह्या
एकाच निकषावर मला "हिंदू" कादंबरी आवडली नाही .
६००
पानाचे पुस्तक वाचायला मला तसा वेळ नसतो . मुंबई सारख्या महानगरीतील धकाधकीचे
आयुष्य जगत असल्यामुळे व व्यवसायामुळे फारच कमी वेळ मिळतो. त्यामुळे कादंबरी वाचन
खूप कमी केले आहे. .मनाला आनंद देणारे, अंतर्मुख करणारे पुस्तक वाचावे
म्हणून मी विकत घेउन पुस्तक वाचतो. महाविद्यालयात असतांना नेमाड्यांची "कोसला
" वाचायला घेतली होती.काही पाने वाचल्यावर वाचणे सोडून दिले. मराठी साहित्य
विश्वात नेमाडे ह्यांनी स्वतः चे स्थान निर्माण केले असे बोलले
जाते."हिंदू" चा बराच गवगवा झाला नि होतो आहे म्हणून मी त्यांची ही दोन्ही
पुस्तके वाचावयास घेतली आहेत. “हिंदू” वाचून झाली आहे.त्यावर खूप काही
लिहण्यासारखे आहे. लिहिणार आहे. मी सध्या अमेरिकेत सुट्टीवर आहे. खूप फावला वेळ
आहे. अतिशय प्रयत्नपूर्वक ,नेटाने
हे पुस्तक वाचले आणि खूप निराशा झाली.मी अनेक चांगल्या मराठी आणि इंग्रजी
कादंबर्याशी ह्या कादंबरीची तुलना करतो तेंव्हा ही कादंबरी फारशी आवडली नाही.
मराठी समीक्षक एखाद्या लेखकाला एवढे मोठे का करतात, हेच कळत नाही.एक पाल्हाळ
निवेदन असलेली ,फसलेली
कादंबरी असाच उल्लेख करावा अशी ही साहित्यकृती. नेमाडे तुम्ही इतर मराठी
साहित्यिकांना फार तुच्छ समजतात , घणाघाती टीका करता , स्वतःचा नेमाडपंथी गट करुन आपण
फार वेगळे आहोत असे भासवतात. त्यामुळे खूप अपेक्षा समोर ठेवून मी ही कादंबरी
वाचायला घेतली आणि बराच वेळ वाया घालविला असेच वाटले. कादंबरीचा
अवकाश मोठा आहे असे समीक्षक सांगतात. बहुधा मराठी समीक्षकांना वैश्विक कादंबरी कशी
असते, हे ठावूक नसावे. ही एक प्रादेशिक, खानदेशी बोलीभाषेत सांगितलेली शेतकरी
लोकांची कहाणी आहे. नेमाड्यांनी बघितलेली, अनुभवलेली ही माणसे मात्र खरी आहेत. हे
समाजचित्रण फार प्रभावी आहे. परंतु कादंबरी मात्र फसली आहे.
डॉ
.नरेन्द्र गंगाखेडकर
मुक्काम
पोस्ट : फ्लोरिडा, U S A