Tuesday, June 4, 2019

भाई

'भाई ' चा उत्तरार्ध आज संध्याकाळी ६ चा शो-  बिग  सिनेमा  संगम , अंधेरी  येथे पाहिला . मोजून १६ प्रेक्षक होते . पहिल्या भागावर लोकसत्तेतील लेखामुळे परिणाम झाला  होता . टीव्ही चॅनेल्सवर उलटसुलट चर्चा झाली . दुसऱ्या भागाकडे प्रेक्षक वळलेच नाही असे दिसते . मिडीयाचा असा परिणाम होतो आणि चित्रपट डब्यात जातो . मीडियावर फारसा विश्वास ठेऊ नका .
हा चित्रपट मला तर आवडला . ज्यांनी पुलंना पाहिले आहेत ,त्यांना ऐकले आहे ,त्यांचे साहित्य वाचले आहे, त्यांना  ह्या चित्रपटातून पुलं सतत भेटत राहतात , त्यांचे संवाद  आपल्या कानांत घुमत राहतात , त्यांचे गाजलेले विनोद  आपल्याला हसवत राहतात .  ' आहे मनोहर तरी ' ह्या त्यांच्या पुस्तकातील सुनीताबाई  आणि पुलं सतत भेटत राहतात . पुलं आणि त्यांचे गायक मित्र - कुमार गंधर्व ,वसंतराव देशपांडे आणि भीमसेन जोशी  चित्रपटातील संगीत मैफलीतून भेटतात आणि त्या सर्वांच्या  अजरामर गाण्यामुळे आपण मंत्रमुग्ध होतो . आपण ती गाणी असंख्य वेळा ऐकलेली असली तरी ह्या मंडळींच्या एकत्र मैफलीची आपल्याला नुसती ऐकीव माहिती असते . त्यांच्या ऋणानुबंधाच्या गाठी ह्या संगीतामुळेच पडल्या  होत्या .त्यांचे  ते  विलक्षण मैत्री असलेले लोभस चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसते . ह्या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम खूप काही सांगून जाते . बाबा आमटे ह्यांच्या आनंदवनात  रमणारे  पुलं बघताना  आपल्याला त्यांचे मोठेपण जाणवत राहते.  पुलं हा  नुसता विनोदाचा बादशहा नाही  तर 'देणार्याने देत जावे ' हे  सांगणारा  महामानव आहे . मध्यांतर होण्यापूर्वी असलेले  ते प्रसंग  नकळत  आपल्या डोळ्यात पाणी आणतात. आणीबाणीतील पुलं आपल्याला माहित आहेतच.   पहिला ' महाराष्ट्र भूषण ' हा राज्य पुरस्कार ज्यांनी त्यांना दिला त्यांचे  त्या मागचे नंतरचे राजकारण आपल्यात विलक्षण  चीड निर्माण करते . पण  पुलं ह्या माणसाची मान कशी ताठ होती ह्याचे दर्शन आपल्याला अधिक आनंद देते .
हा चित्रपट अवश्य पहा . हा एक सुंदर चित्रपट आहे . उत्तरार्ध मला अधिक आवडला . सर्वच कलाकारांचे काम अप्रतिम .पुलंसाठी  पहा  पण ह्या  सर्व कलाकारासाठी  अवश्य पहा . पुलं च्या चित्रपटासाठी   रिकाम्या खुर्च्या  पाहतांना मला थोडं वाईटच वाटलं .

'आहे मनोहर तरी' मधील पु ल आणि आपण पाहिलेले , ऐकलेले आणि आपल्याला समारंभातून दिसलेले पु ल थोडेसे वेगळे आहेत. तसेच मांजरेकर दिग्दर्शित 'भाई 'मधील पु ल अनेक बाबतीत वेगळे आहेत . 'भाई 'मधील संवाद रत्नाकर मतकरी ह्यांचे आहेत .त्यांनी पु ल ना जवळून बघितले असेलच .म्हणूनच पटकथाकार गणेश मतकरी ह्यांनी मांजरेकर ह्यांना रत्नाकर मतकरी ह्यांच्याकडून संवाद लिहून घेण्यास  सांगितले असावे. मांजरेकर ह्यांनी त्यांचे स्वातंत्र्य वापरले असेलच. शेवटी सिनेमाच्या गुणदोषात सर्वच थोडेबहूत जबाबदार आहेत. शेवटी हा सिनेमा त्या सर्वानी मिळून तयार केला आहे. प्रेक्षकांनी ज्याचेत्याचे पु ल शोधावेत .

मुकुंद संगोराम हे चांगले कला समीक्षा करणारे लेखक आहेत. आजचा लोकसत्तेतील त्यांचा ' भाई : पुलंचे भंपक चित्रण ' हा लेख वाचला. त्यांची टीका मला तरी चुकीची वाटते. सिनेमा भंपक नाही. तो बघण्यासारखा आहे. असामान्य माणसेही रोजच्या जीवनात तशी सामान्यच असतात.पुलंचं  ' आहे मनोहर तरी ' असं जे वर्णन सुनीताबाईनी  केलं आहे ते खरं असलं तरी त्यामुळे पुलंचे मोठेपण कमी होत नाही. पु लं च्या जीवनाची विविध रूपे पहायला मिळतात. त्यांच्या आयुष्यातील दु:खद घटना मनाला चटका लावून जातात. हा सिनेमा भंपक मुळीच नाही. असे हेडींग देउन सनसनाटी निर्माण करण्याचा हा प्रयत्न वाटतो.

बायोपिक चित्रपटात असे होत रहाणारच.
आत्मचरित्रात तरी सगळे कुठे खरे असते.

खरं म्हणजे अनेक नावाजलेले कलाकार हे दारू पिल्यानंतर अधिक खुलतात . त्यांच्या संगीत मैफिली त्यानंतर अधिक रंगतात. ह्याची अनेक उदाहरणे माहितीची आहेत. बायोपिक सिनेमात ह्याचा खुबीने वापर करणारे दिग्दर्शक गल्ला भरण्यासाठी ह्याचा उपयोग करून घेतात असे म्हणणे तसे चूकच आहे.

गिर्यारोहक

गिर्यारोहक मंडळी भन्नाट जीवन जगत असतात . त्यांच्या  जगण्यात  एक थ्रिल असतं . किती विविधता अनुभवतात ! निसर्गाशी नातं जुळलेलं असतंच . निसर्ग साथ देतो असं नाहीच . किती तयारी करावी लागते ? प्रवास , व्हिसा , प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम , इतर देशातील वकिलातीतील  माणसं , वाटाडे , कुक , बांधून घ्यायचं सामान , होणारी चिडचिड , बरोबर घ्यावी लागणारी औषधं , सहप्रवासी असलेल्या लोकांचे स्वभाव , निराश होणारं मन , अत्युच्च आनंदाचे क्षण , निसर्गाची विविध रूपं . एक ना अनेक .
एरीक न्युबीचं हिंदुकुश पर्वतावरील शिखरं गाठण्याचं प्रवास वर्णन वाचत असताना मीच त्या गिर्यारोहणाचा अनुभव घेत होतो .
विशेष म्हणजे भौगोलिक परिसराचे वर्णन करताना जुना  इतिहासही तितकाच महत्वाचा . ग्रेट अलेक्सझांडर ह्याने हिंदुकुश पर्वताच्या बाजूने प्रवास करीत हिंदुस्थान कसा गाठला ?न्यूरिस्तान / काफिरीस्तान ओलांडून बाबर भारतात कसा आला ? लॉर्ड कर्झन ह्यांनी ह्या भागाला भेट कशी दिली ? युरोपियन लोकांनी अनेकदा स्वाऱ्या करून ह्या भागातील सुंदर स्त्रियांशी संग साधून युरोपियन रंगाची संतती कशी निर्माण झाली ? अशी आणि विविध माहिती ह्या पुस्तकातून मिळते . बाबरनामा इंग्रजीतून अनुवादित झाला आहे . इंग्रजांनी त्याचा अभ्यास करून हा भाग पादांक्रत केला आहे . तो जणू रोड मॅप टू इंडिया . इतिहास आणि भूगोल एकत्रच वाचले पाहिजेत . हा ऐतिहासिक भाग वाचायचा नसेल तर सरळ पुढच्या प्रकरणाकडे जा , अशी नोट दिली आहे .
ह्या भागातून निघालेल्या नद्या पुढे सिंधू नदीला कशा मिळतात ह्या संबंधीचे वर्णन सुंदर आहे . आपण लेहला सिंधू नदी पहातो . त्यानंतर ती पाकिस्तानात जाते . नुब्रा व्हॅलीला आपण काराकोरम पर्वतांच्या रांगा पहातो . सियाचेनचा पुढील भाग लष्करी परवानगीशिवाय आपण पाहू शकत नाही . हिंदुकुश पर्वतांच्या रांगा विलोभनीय आहेत . हे लक्षात येते . बाबर किंवा अलेक्झांडर त्या मार्गाने भारतात कसे आले असतील  ?, आणि इंग्रजांनी हा भाग कसा पालथा घातला असेल, ह्याचे चित्र ह्या पुस्तकातून समोर उभे राहते . हे नुसते गिर्यारोहणाचे प्रवास वर्णन नाही . ह्यातून ह्या भागाचा इतिहास - भूगोल डोळ्यासमोर उभा राहतो . एक अप्रतिम प्रवासवर्णन .

गुजरातचा विकास


खरं म्हणजे गुजरातचा विकास गेल्या २० - २२ वर्षात झाला का ? असा प्रश्न काही जणांना पडतो . मी १९८० ते २००० ह्या वर्षात अनेक वेळा - महिन्यातून चारदा - व्यवसायानिमित्त गेलो होतो . वापी - अंकलेश्वर - भरूच - बडोदा - सुरत -  अहमदाबाद - जामनगर ह्या भागात संचार होता . दत्ता सामंत ह्यांच्या गिरणी कामगार संपानंतर गुजरातमधील कापड गिरण्या भरभराटीस आल्या होत्या . रासायनिक उद्योगात वेग आला होता . शहरे बकाल झाली होती . सर्वत्र घाणीचेच राज्य होते . साबरमती गचाळ नाला झाली होती . अनेक छोटे उद्योग पुढे येत होते . त्यानंतरच्या काळात खूप काही बदलले . एका नव्या उत्साहाने उद्योग निर्मिती झाली . जागतिक बाजारपेठ गुजरातला मिळाली . आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात गुजरात चमकू लागला . नवीन शिक्षित गुजराती  पिढी सर्वत्र दिसू लागले . नवी पिढी शिक्षित व्यावसायिक मंडळी म्हणून जगा समोर आली . उद्योगात' घरना माणूस' कन्सेप्ट संपला . इतर प्रांतातले लोक गुजरातमध्ये स्थायिक होऊ लागले . हा बदल गेल्या २० वर्षातला . गुजरात मॉडेल म्हणजे काय ? हे समजून घ्यायचे असेल तर आधीचा गुजरात आणि आजचा  गुजरात समजून घ्यावा लागेल .
तोच अनुभव मध्यप्रदेशचा . एका बिमारू राज्याचा . आज मध्यप्रदेश अधिक पुढे आहे .
अंबानी आणि अदानी म्हणजे गुजरात नव्हे . तेथे छोट्या मोठ्या उद्योगात अनेक लहान मोठे अंबानी आहेत .
अंबानी ह्यांचे नाव जगातील श्रीमंत लोकात गणले जाते . पण ह्याच अंबानीमुळे अनेक जण खूप श्रीमंत झाले , हे लोकांच्या लक्षात येत नाही . साध्या माणसांनी रिलायन्स मध्ये पैसे गुंतवून खूप पैसे कमविले . फ्लॅट घेतले .गाड्या घेतल्या . छोटे उद्योग सुरु केले . पैशातून पैसे कमविले . हे इतरांना जमले नाही . पैसे कमविणे हे काही पाप नसते . गरिबीला गोंजारत जगणे पाप असते .
ह्या लोकांना हे यंत्र सापडले आहे .
Aisi machine lagaunga, iss side se aaloo ghusega, uss side se sona niklega. हे शक्य आहे . ते तर  ह्या गुजराती समाजाला चांगले जमते .


सौदी अरेबियात भेटलेला मराठी माणूस

मी एकदा सौदी अरेबियात एका कंपनीत ट्रेनिंग देण्यासाठी गेलो होतो . त्या कंपनीत अनेक मराठी लोक कामाला होते . माझी येण्या - जाण्याची सोय करण्यासाठी एक कार होती . त्याचा ड्रायव्हर कोकणातील मराठी मुलगा होता . ८ वर्षांपासून तेथे आहे . कारखान्यात मराठी तंत्रज्ञ होते . एक आर अँड डी मॅनेजर होता .पुण्याचा .वय ४५  .बायको आणि मुले पुण्यात. १२ वर्षांपासून तेथे . २ - ३ वर्षाला पुण्याला येऊन जातो . प्रत्येक वेळी त्याला परत जायचे नसते . त्याची बायको आणि मुलगी त्याला म्हणते , ' तुम्ही येथे परत येऊ नका . तुमच्या पैशाची सवय झाली आहे . आमचे कसे होणार ? येथे फारसे पैसे मिळणार नाही .मग आमचे कसे होईल? ' . अतिशय निराश चेहरा करून तो हे मला सांगत होता .'  माझ्या बायको - मुलीला मी येथेच राहून त्यांना पैसे पाठवावे असे वाटते .मी त्यांना नकोच आहे ' , असे म्हणताना त्याच्या डोळ्यात पाणी आले .
अतिशय हुशार , उच्च विद्याविभूषित तंत्रज्ञ पुणेकरांची ही अवस्था . मन हेलावले 

प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातून ......


प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातील पुस्तकात ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या आहे त्या प्रांतात राजकारणाची वळणं वेगळी असतात ह्याचा परामर्श त्यांनी घेतला . बंगाल , आसाम आणि पंजाब ह्या तीन प्रांताचा विशेष उल्लेख त्यांनी केला  आहे . इंग्रजी राजवटीत प्रांतिक निवडणुका घेतल्या त्यावेळपासून त्यांनी आढावा घेतला . त्यावेळी मुस्लिम लिगचे  जे राजकारण चालले होते त्या  पुढे काँग्रेस back  फुटवरच होती . काँग्रेसला हिंदूंचा पक्षच मानले जात असे .
काँग्रेस मुस्लिम नेत्यांना पुढे करून इंग्रजांना आपण खरे प्रतिनिधी असे दाखविते म्हणून जिना त्यांच्या मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी मंडळात एक दलित वर्गाचा प्रतिनिधी घेत असत .
त्या वेळच्या बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळेच पु .पाकिस्तानची निर्मिती झाली . एव्हढेच नव्हे तर कलकत्ता हे शहर पु .पाकिस्तानची राजधानी व्हावी ह्यासाठी मुस्लिम नेते प्रयत्नशील होते . सरतचंद्र बोस सारखे काँग्रेस नेते फझहूल गटाच्या जवळचे होते. सरदार पटेल ह्यांनी त्यांना चांगलेच फटकारले .नाहीतर कलकत्ता पु .पाकिस्तानची राजधानी झाली असती .
बंगालची फाळणी व्हावी ह्यासाठी डॉ शामा प्रसाद मुखर्जी अनुकूल होते .कारण मुस्लिम बहुसंखेमुळे हिंदूंना सुरक्षीत वाटत नव्हते .
आजही मुस्लिम लोकसंखेमुळेच काँग्रेस किंवा ममताची टीएमसी ह्यांना मुस्लिम अनुनयामुळेच निवडणूक जिंकणे शक्य झाले आहे .सीपीएमची भूमिका तशीच आहे .
मुस्लिम अनुनय ह्यावरच तेथील राजकारण चालते .
शेख मुजिबर रहमान आणि बंगला देश निर्मिती ह्याचा आढावा घेताना बंगाली भाषिकांचा सबनॅशनलइझम कसा जन्माला आला ह्याचा इतिहास खूप काही सांगून जातो .
काश्मीरचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आहे , ते तेथील ९८ टक्के मुस्लिम संखेमुळेच .
बंगला देशाची निर्मिती हा बंगला भाषा हीच आमची मातृभाषा ह्या चळवळीतून झाली आणि त्यांना उर्दू भाषेसारखाच दर्जा हवा होता .
अवामी लीगला १९७१ साली पाकिस्तान नॅशनल असेम्ब्लीत सर्वात अधिक जागा मिळाल्या होत्या आणि पश्चिम पाकिस्तानवर त्यांनी राज्य केले असते .
जीनांनी बंगाली भाषेला उर्दूसारखा दर्जा कधीच देणार नाही म्हणून स्पष्टपणे सांगितले होते त्यामुळेच पूर्व बंगालचे मुसलमान विरुद्ध गेले .
पूर्व बंगालच्या मुसलमानांना कलकत्ता शहर त्यांच्याकडेच हवे होते .
अनेक हिंदू आणि बौद्ध लोकांची शहरे पूर्व बंगालमध्ये गेली होती .
इंग्रजांनी बंगाल आणि पंजाब ह्या प्रदेशांची फाळणी करण्यासाठीच कमिशन नेमले होते .
फोडा आणि झोडा हीच इंग्रजांची नीती होती .
कलकत्ता आणि नौखालीच्या दंगली त्यामुळेच झाल्या . गांधीजी ही फाळणी थांबवू शकले नाहीत .
पश्चिम पाकिस्तान विरुद्धचा लढा जेव्हा शेख मुजाबर  रहमान ह्यांनी सुरु केला त्यावेळी १ कोटी बंगला देशी भारतात आले . त्यावेळी ते प बंगाल , आसाम आणि त्रिपुरात ते आले . ते परत गेलेच नाहीत . आणि त्यामुळेच इंदिरा गांधी ह्यांनी बंगला देशाला पाठिंबा दिला . तो दिला नसता तर अधिकांश बंगला देशी भारतातच घुसले असते .
All these points are mentioned in Autobiography of Pranav Mukherjee .

मुसाफिर

'मुसाफिर' अच्युत गोडबोले ह्यांचे ४७४ पानाचे ( आवृत्ती ४५ ) आत्मचरित्र वाचायला घेतलं. आज वाचून संपवलं. हा इन्फोटेकमधला दादा माणूस. नारायण मूर्ती ह्यांनी पटणी कॉम्पुटर सोडली तेंव्हा त्या खुर्चीवर जाऊन बसलेला हा गृहस्थ. पुढे अनेक मोठ्या आय टी  कंपन्यात सीइओ. हे माहित असल्यामुळे पुस्तकातील त्या भागापासून वाचायला सुरुवात केली. मी गणकयंत्राशी त्यावेळपासून संबंधित असल्यामुळे मला विशेष उत्सुकता होती. अर्थात मी बिझिनेस Application मध्ये कधीच नव्हतो. पण technical application मध्ये सर्व जनरेशनचे कॉम्पुटर वापरले होते. त्यामुळे हा भाग मी प्रथम वाचला. हा तर भारतीय आय टी व्यवसायाचा इतिहास. प्रत्येक आयटीवाल्याने अवश्य वाचावा. सुंदर. अच्युत गोडबोले ह्यांच्या करिअरचा ग्राफ.
सोलापूरच्या मध्यमवर्गीय ब्राम्हण कुटुंबातील एक हुशार विद्यार्थी. मुंबईला आय आय टीत प्रवेश घेतो. अभ्यासाव्यतिरिक्त अनेक विषयात रस. चौफेर वाचन. त्याच्यासारखेच त्याचे अनेक मित्र. डाव्या विचारसरणीकडे झुकलेले. वेगळं काहीतरी करू पाहणारे. बीटेक झाल्यावर नोकरीचा विचार सोडून आदिवासी लोकांच्या कल्याणासाठी चळवळ उभारणारे.
दहा दिवसाची तुरुंगाची हवा खाल्यानंतर अच्युतच्या लक्षात येते की हे आपलं काम नाही. मुंबईला परतल्यानंतर असेच भटकणे. वाचत राहणे. बेकारीचे दु:ख सोसणे. नाटक , साहित्य , तत्वज्ञान , चित्रकला . अर्थशास्त्र , कामगार  चळवळी दलित चळवळी, ह्या सर्वच क्षेत्रात रस. केमिकल  इंजिनीअरिंग विसरून जाणे. आणि मग नुकत्याच नव्याने सुरु झालेल्या आयटी क्षेत्रात नोकरी. तेथे मन लागतच नाही. Jack of All - Master of  None अशी अवस्था. विलक्षण जिद्दीने प्रोग्रामिंग मध्ये तज्ञ होणे. हा प्रवास उल्लेखनीय. मग वाटचाल व्यवस्थापकीय पदाकडे. यशामागून यश. आर्थिक सुबत्ता. एक देखणे यश. हा प्रवास म्हणजे हे आत्मवृत्त. वाचण्यासारखे.
ह्या आत्मचरित्राचा मन हेलावून सोडणारा भाग म्हणजे अच्युत आणि त्याच्या पत्नीने सोसलेले दु:ख . त्यांच्या मुलाला ऑटीझमचे दुखणे आहे. कोणताही माणूस कोलमडून पडेल. पण अच्युत त्यातून कसा उभा राहतो हे वाचताना आपण त्याच्या जिद्दीने प्रभावित होतो.
असा हा चौफेर व्यक्तिमत्वाचा माणूस समजून घेतला तर आपलेही जीवन समृद्ध होते. एक विलक्षण व्यक्तिमत्व.

Saturday, April 20, 2019

फेसबुक (सोशल मिडिया क्रांती)


There are three archetypes that are essential for invention.The dreamer, the first person who thinks of an idea. The Engineer who reduces the idea to prototype. And then the entrepreneur who takes that one prototype and works out the marketing, financing and business model to make thousands or millions of them. – Tom Zimmerman 
 इंटरनेटचा गोल्ड रश संपला होता . आतां नवीन काय ? ह्या विचारात काही ब्रेनी लोक होते . फेसबुकची आयडिया मार्क झुकरबर्गच्या डोक्यात घोळत होती. त्याचे दोन तीन मित्र उत्तम इंजिनिअर होते. त्यांनी त्यावर काम करायला सुरु केलं. मार्क खरा उद्योजक विचाराचा होता. आणि त्याने थोड्याच काळात फेसबुकचे साम्राज्य निर्माण केले.  इंटरनेट सुरु झालं . त्याला ३० वर्षात १ बिलियन युजर्स मिळाले. फेसबुकला केवळ १० वर्षात १ बिलियन युजर्स मिळाले. आज फेसबुकने जवळजवळ सर्व विश्वच  व्यापून टाकलंय. ज्याच्या हातात स्मार्ट फोन दिसतो तो थोड्याथोड्या वेळाने फेसबुकवर न्यूजफीड वाचत असतो. नाहीतर फोटो पहात असतो. त्याचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला त्याच्या फेसबुक तंद्रीतून जागे करावे लागते. अशा ह्या फेसबुकचा इतिहास थोडासा समजावून घ्यायचा असेल तर Adam Fisher चे Valley of Genius हे पुस्तक वाचा. त्यातील ' I am CEO ... Bitch ' - Zuck moves to Silicon Valley to 'dominate' ( and does ) हा लेख वाचा. त्यात झुक आणि त्याचे सहकारी आपल्याला फेसबुकबद्दल माहिती सांगताना दिसतात. तुमच्या हे लक्षात येईल की उद्योगात यशस्वी होण्यासाठी नवी कल्पना सुचणारा एक माणूस लागतो. ती अमंलात आणणारा इंजिनिअर लागतो आणि उद्योगाची उभारणी करणारा उद्योजक लागतो. DREAMER,ENGINEER And ENTREPRENEUR  हे सर्व जेंव्हा एकत्र येतात तेंव्हाच  तुम्ही गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट सारखी जागतिक इंटरनेट कंपनी उभी करू शकतात. 

मार्क झुकरबर्ग हा फेसबुकचा निर्माता. फेसबुक ही त्याचीच संकल्पना. ती अंमलात आणणारे मित्र त्याचेच. इंटरनेटचा गोल्ड रश संपला होता . हार्वर्डचे विद्यार्थी काहीतरी नव्याच्या शोधात होते. वसतिगृहात राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची यादी संगणकावर टाकायची होती. विद्यार्थ्याचा फोटो , वसतिगृहाचे नांव , रूम नंबर , त्याचा फोटो संगणकावर टाकून एकमेकाशी संपर्क साधायचा ही संकल्पना समोर ठेऊन पहिली डिरेक्टरी बनविली गेली तिचे नांव होते facebook. सोशल मिडियाचे पर्व सुरु झाले ते असे. त्यावेळी डॉटकॉम पर्व संपले होते . Napster हा सोशल मिडीयाचा पहिला प्रयोग तरुणांना आकर्षित करीत होता. ब्लॉग हा प्रकार तेंव्हा नुकताच सुरु झाला होता आणि विद्यार्थी ब्लॉगमधून व्यक्त होऊ लागले होते . ते संवाद साधू लागले. तेथील आजूबाजूच्या सर्व विद्यापीठात हे लोन पसरत गेले. MySpace ही सोशल मिडिया साईट त्यावेळी विद्यार्थीप्रिय होती, त्यात पोरनोग्राफीची चित्रे पहावयास मिळत होती.
झुकच्या मनांत फेसबुकची संकल्पना तयार होती. तो न्यूयार्कला होता, त्याचे काही मित्र सिलिकॉन valleyत होते. ते  २-३ मित्र त्याला भेटायला न्यूयॉर्कला आले. त्यांची चर्चा झाली . झुकने सिलिकॉन Valley ला  जाण्याचे ठरविले . एका छोट्या घरात त्यांनी कंपनी सुरु झाली . ही तरुण मुले म्हणजे हिप्पी मुलांचा गट होता. सर्व रुममध्ये  संगणकाचे जाळे उभारले गेले . सर्वजण तेथेच जमत . गप्पा , चर्चा , सिगारेट ओढणे , बिअर पिणे , रात्रंदिवस संगणकावर बसून काम करणे चालू असे. अशी ही कंपनी सुरु झाली. Sean Parker, Ruchi Singhavi, Aaron Sitting आणि Mark Zukkerberg ही सुरुवातीची मंडळी. नंतर अनेक जण येऊन मिळाले. झुकच्या एका संकल्पनेवर सुरु झालेला हा छोटा उद्योग.
ही मंडळी तेंव्हा चर्चा करीत होती , गुगल की फेसबुक ? Kate Losse हा तरूण इंजिनिअर म्हणतो , “ मला नाही वाटत मी गुगलमध्ये काम करू शकेल?  मला फेसबुक अधिक आकर्षक वाटत असे. तो गुगलमध्ये काम करण्यास 'Nerdy' म्हणजे मुर्खपणा समजत असे. त्याचे कारण त्याला सोशल नेटवर्कवर काम करणे अधिक आवडत असे. त्या मुलांना BEER PONG  हा बिअर पिणाऱ्या लोकांचा सोशल क्लब अधिक आवडत असे. ह्या Beer Pong खेळात बिअर पिणारे लोक समोर ठेवलेल्या बिअर ग्लासवर टेनिसचा चेंडू टाकत असत . ज्या ग्लासमध्ये आपला चेंडू पडत असे तो बिअर ग्लास तुम्हाला पिण्यास मिळत असे. हा त्यांचा सोशल क्लब.
Terry Winogard म्हणतो , “गुगल म्हणजे पदवीप्राप्त इंजिनिअर लोकांची कंपनी होती तर फेसबुक म्हणजे पदवीपूर्व शिकलेल्या पण शिक्षण अर्धवट सोडून दिलेल्या मुलांची कंपनी होती. हा कंपनी कल्चरचा मुळ फरक होता”.
Jeff Rothschild ला फेसबुकमध्ये काम करताना सुरुवातीला असे वाटले की ही जमलेली मुले येथे डेटिंगची साईट तयार करण्याचे काम करतात व डेटिंग पार्टनर शोधत असतात. त्याला तेथील कामाचे स्वरूप कळायला ८-१० दिवस लागले . मग मात्र  तो त्यात रमला. एकदिवस मार्कने त्याचा क्लास घेतला व त्याचे फेसबुकचे स्वप्न सांगितले. मार्कने आपण सोशल नेट्वर्किंग Platform कसा तयार करणार आहोत?, MySpace पेक्षा ते कसे वेगळे असेल, मित्रांच्यामध्ये नेट्वर्किंग चर्चा कशी करता येईल?, ह्याबद्दल खूप माहिती दिली आणि त्याला त्याच्या कामाचे खरे स्वरूप समजले. मार्क बोलत होता व तो मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता.
Max Kelly आणि मार्क  ह्यांच्यात ही अशीच चर्चा झाली तेंव्हा त्याने आपली संकल्पना अधिक स्पष्ट केली. ‘ लोकांना नेटवर एकमेकाशी कसा संपर्क साधता येईल?, तुम्ही कोण आहात?, कुठे आहात? 
, तुमच्या डोक्यात कसला विचार चालू आहे ?, तुमच्या आयुष्यात काय बदल होत आहेत ?, तुम्ही एकमेकांशी कसा संपर्क साधू शकता ?, अशा अनेक विचारांची देवाणघेवाण करणारा मित्रसमूह म्हणजे फेसबुक. FIND FRIENDS .CONNECT FRIENDS and SHARE WITH FRIENDS. USE INTERNET.” हा फेसबुकचा उद्देश त्याने सर्वाना स्पष्ट केला.
ही सर्व मुले इन्टरनेटने प्रभावित झालेली होती. त्यांना हा प्रकल्प खूप नवा होता. वेगळा होता. सोशल मिडिया हा एक नवा विषय होता. इंटरनेटवर एकाच वेळी अनेक मित्र एकमेकाशी कसा संपर्क साधू शकतील ह्याचीच कार्यप्रणाली ते तयार करीत होते. तेच तर फेसबुकचे खरे वैशिष्ट्. इंटरनेट व सोशल मिडीयावर आधारलेला हा प्रकल्प त्यांना आकर्षित करीत होता. Aaron Sittig म्हणतो, ‘ २००५ मध्ये मार्क झुकने आपल्या सहकार्यांना फेसबुकसंबंधी आपली भूमिका अधिक स्पष्टपणे विषद केली. त्याला ५ प्रमुख गोष्टींचा अंतर्भाव करावयाचा होता.
        1) NEWS FEED -मित्र नेमके काय करतात हे एकमेकाला कळविणे. 
*   2)फोटो टाकणे3)आजूबाजूच्या Eventsची माहिती देणे.4)Party    करण्यासंबंधी एकमेकाला कळविणे 5)Local Business Product संबंधी माहिती देणे  
अगदी सुरुवातीला News Feed हा प्रकार फेसबुकमध्ये नव्हता . फोटो टाकता येत नव्हते. प्रोफाईल फोटो टाकतां येत असे. तो बदलला की लोक पुन्हा प्रोफाईल उघडून फोटो बघत असत . त्यावेळी लोकांना प्रोफाईल फोटो सारखा बदलण्याचे जणू वेड लागले. आजही आपण अनेकजण तो बदलत असतो पण आपल्याला ते लगेच लक्षात येते. त्यावेळी त्यांनी एक महिन्यात फोटो लोड करण्याची सोय करून दिली आणि लोक वेडे झाले. ती फेसबुक क्रांती होती . लोकांना फोटो टाकण्याचे वेड लागले. पहिल्याच दिवशी एका व्यक्तीने स्वतःचे ७०० फोटो टाकले. मग त्यात अल्बमची सोय झाली.
सर्वात फेसबुक क्रांती झाली ती Tagging ह्या सोयीमुळे. हा प्रकार Game Changing होता . एका महिन्यात ५० लाख लोक युजर्स झाले.ते सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी होते. हा प्रोग्राम तेथील सर्व विद्यापीठातील विद्यार्थ्यापर्यंत अतिवेगाने पसरला.
Max Kelley म्हणतो , ‘ फोटो टाकण्याच्या सोयीमुळे तुम्ही प्रत्येक लग्नाला उपस्थित राहू लागला .तुम्ही जेथे जात तेथील फोटो मित्रांना सहज दिसू लागले.ही भन्नाट कल्पना लोकांना खूपच आवडली. मात्र फेसबुक इंजिनिअरचे काम वाढू लागले. सिस्टीम प्रश्न निर्माण झाले. ३ महिन्यात इंटरनेटवर सगळ्यात जास्त फोटो फेसबुकच्या माध्यमातून टाकले गेले . ई-मेलने फोटो पाठविणे त्रासदायक होते. Tagging केल्यामुळे आपल्या मित्रांना , नातेवाईकांना ते जगांत कुठेही असले तरी सहज दिसू लागले.हे सर्व स्वस्त आणि मस्त होते. वेळ खूप कमी लागत असे. Tagging मुळे खूपच फायदा झाला. संपर्क सहज होऊ लागला. सुरुवातीला महाविद्यालयीन मुलासाठी असलेला हा प्रोग्राम वेगाने सामान्य माणसात प्रिय झाला. २००६ मध्ये News Feed मुळे फेसबुक म्हणजे २४ तासाचे जागतिक वृत्तपत्र झाले. एका क्षणात बातम्या जगभर पसरू लागल्या. त्याचे नांवच “What is new?” असेच होते. सुरुवातीला तुम्ही काय करता ?, इतर लोक काय करीत आहेत ? ह्या मर्यादित स्वरुपाची माहिती इतरांना देणारे २४ तासाचे जागतिक वृत्तपत्र झाले. News Feed तुमचे होम पेज झाले. वैयक्तिक , कौटुंबिक , सामाजिक , राजकीय , राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय बातम्या एका क्षणात जगभर पसरू लागल्या. Tagging मुळे तुमच्या आप्तस्वकियाना तुमची माहिती सहज उपलब्ध झाली. वर्तमानपत्रांची आवश्यकता कमी भासू लागली. १० अब्ज वर्तमानपत्रे म्हणजे फेसबुक. तुमचे स्वतःचे 'मतपत्र'. मर्यादित किंवा अमर्यादित लोकासाठी .हा एक नवा चमत्कार होता . ह्यामुळे जग बदलले तसेच अनेक नव्या समस्या निर्माण झाल्या .  
रुची संघवी हा झुकचा पहिल्यापासुनचा एक सहकारी. एक दीड वर्षात फेसबुकचे स्वरूप वेगाने बदलले होते. अनेक नव्या समस्या निर्माण होऊ लागल्या. त्या वाढू लागल्या. तो म्हणतो ,’ आम्ही एक अवाढव्य न्यूज डीस्ट्रीब्यूटेड सीस्टीम तयार केली खरी पण त्यामुळे जग वेगाने बदलू लागले.’ फेसबुकचा उपयोग करणारे काही लोक अतिसुज्ञ असतात तर काही लोक अतिमूर्ख असतात, हे आमच्या लक्षात येऊ लागले'.त्यामुळे त्यांच्याकडे असंख्य चौकशा करणारे लोक येऊ लागले आणि ते बेजार होऊ लागले.काहीना असं वाटू लागलं की हे सर्व सगळ्या लोकांना अगदी सहज समजू लागलंय . ते धोकादायक आहे . नको त्या गोष्टींची माहिती नको त्या लोकांना होऊ लागली.त्यामुळे काहीजण खूपच चिंतेत पडले. वैयक्तिक काहीच राहिलं नाही. हे अनेकांना धोकादायक वाटू लागलं.चुकीची माहिती नकळत जगांत क्षणात पसरू लागली. लोकांच्या समस्या वाढू लागल्या. आजही त्या चालू आहेत. सोशल मिडीयाने नुसता धुमाकूळ घातला आहे.वैयक्तिक माहिती मर्यादित कशी ठेवता येईल ह्याचाही विचार होऊ लागला.
News Feed खाली सुरुवातीला AWESOME बटण होते . ते नंतर LIKE झालं. COMMENTS हे बटण असल्यामुळे लोकांच्या प्रतिक्रिया वाढू लागल्या. मोबाईल इंटरनेटने अधिकच धुमाकूळ घातला.
रुची संघवी म्हणतात , ‘ लोक फेसबुकवर रागावले. प्रतिक्रिया वाढू लागल्या. कायद्याचे प्रश्न निर्माण होऊ लागले.माहितीच्या गोपनीयतेचा प्रश्न निर्माण झाला.न्यायालयीन तंटे निर्माण झाले. अनेक नव्या समस्या निर्माण झाल्या. फेसबुकवर बदल घडवून आणण्यासाठी मागण्या होऊ लागल्या.१० टक्के लोकांनी फेसबुक सोडून दिले.एका बाजूला फेसबुकवर  टीका होत होती तर दुसर्या बाजूला फेसबुकचा वापर दुप्पट – चौपट वाढला’. काही लोकांना फेसबुकची झिंग आली. जगांत सतत काहीतरी घडते आहे आणि ते जाणून घेण्यासाठी फेसबुक उघडण्याची लोकांना संवय झाली . त्याचेच  वेड लागले. लोकांना त्याचे व्यसनच लागले.
रुची सिंघवी ह्यांनी पहिला ब्लॉग फेसबुकवर लिहिला तेंव्हा त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.मार्क झुकने अनेक जागतिक परिषदा घेतल्या.लोकांनी असंख्य प्रश्न त्याच्यासमोर मांडले. सिस्टिममध्ये सतत बदल करावे लागले आणि ते चालूच आहेत. आज लोकांना News Feed ची संवय झाली आहे. तेच फेसबुकचे वरदान – खरे बूम .
आज फेसबुक म्हणजे फेसबुक युजर्सची जागतिक Directory झाली आहे .कोणालाही कोणाचीही एका क्षणात माहिती अगदी सहज मिळते. आज सर्वच लोक ते वापरतात. त्यांचे नेटवर्किंग झाले आहे.फेसबुकवर आपले आस्तित्व असणे लोकांना आवश्यक होऊन बसले आहे.
मार्कचे एकच ध्येय होते . “ DOMINATE”
तो नेहमी म्हणत असे, 'My aim is to Dominate on Internet'.
आज त्याने त्याचे 'Domination' सिद्ध केले आहे.
त्याने त्याची कंपनी याहूला विकली नाही. त्याने तो प्रस्ताव ठुकरून लावला. त्याला असे वाटत असे की ९० टक्के मर्ज झालेल्या कम्पन्या नंतर यशस्वी होत नसतात . त्याने आपली कंपनी विकली नाही आणि आज 'फेसबुक'  गुगल – MICROSOFT सारखे इंटरनेटवर DOMINANT झाले आहे.
Domination !!!
काही सहकार्यांच्या मदतीने उभे केलेले हे झुकचे इंटरनेटवरील साम्राज्य !
झुक म्हणजे इंटरनेट जगातले एक Dominant व्यक्तिमत्व !
आज फेसबुकने सामाजिक – राजकीय बदल वेगाने घडवून आणले आहेत. सामाजिकशास्त्राचे तज्ञ हा गुंता कसा सुटेल ह्यासाठी विचारविनिमय करीत आहेत. सोशल मिडीयाचा गैरवापर , कायद्याचे प्रश्न , राजकीय – सामाजिक परिणाम जगभर दिसून येत आहेत. इंटरनेटला पुढे कुठे जायचे हे इंटरनेट ठरवीत आहे. पण लोकांना काय पाहिजे हे त्यांचे तेच ठरविणार.
Erza Collahan  झुकला म्हणतात , ‘ DOMINATION हा शब्द वापरू नकोस .
Sean Parker म्हणतो , “ एकदा तू DOMINANT झालास की तुला कोणीही स्पर्धक रहाणार नाही. स्पर्धक हा हवाच !’
स्टीव्हन जॉन्सन म्हणतो , ‘ इंटरनेट सुरु झालं . त्याला ३० वर्षात १ बिलियन युजर्स मिळाले. फेसबुकला केवळ १० वर्षात १ बिलियन युजर्स मिळाले. Facebook is not a service or an application. It is fundamentally a platform , on the same scale as the internet itself.

Steve Jobs हा झुक्चा चाहता होता. तो म्हणतो .' झुकने पैशासाठी कंपनी विकली नाही आणि इन्टरनेटवर स्वतःचे साम्राज्य निर्माण केलं म्हणून तो ग्रेट '. 
कंपनी सुरु केली तेंव्हा मार्क झुकरबर्गच्या व्हिजीटिंग कार्डवर लिहिलेलं होतं
'"I am CEO …. Bitch". अशी ही व्यक्ती आणि वल्ली .

( संदर्भ आणि लेखाचा आधार  : VALLEY OF GENIUS by Adam Fisher )