Sunday, March 26, 2023

नर्मदा परिक्रमा - ३

 

महेश्वर – नेमावर – जबलपूर

आमचा परिक्रमेचा मार्ग होता तो असा – ओंकारेश्वर- ममलेश्वर, शूलपाणी जंगल, विमलेश्वर, काटेश्वर, रेवसागर जेथे नर्मदा अरबी समुद्राला मिळते ते भरूच जवळील भृगुतीर्थ, जवळच गोल्डन ब्रिज लागतो तेथे नर्मदा न ओलांडता रेवासागर पार करून नर्मदेच्या दुसऱ्या तटावर जायचे – गरुदेशवर, सरदार सरोवर, Statue of Unity, शूलपाणी परिसर, महेश्वर, मंडलेश्वर, इंदूर, ओंकारेश्वर, नर्मदासागर, नेमावर, भेदघाट जवळून जबलपूर मार्गे नर्मदा कुंड म्हणजे आमरकंटंक, मैय्या की बगिया, दिंडोरी, त्रिवेणी संगम, बरनीगाव, बरमान घाट, नर्मदापूर (होशंगाबाद), खंडवा मार्गे ओंकारेश्वर-ममलेश्वर, नागरघाट आणि शेवटी ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर.










गरुडेश्वर नंतर निघालो महेश्वर- नेमावरकडे. उज्जैन मार्गे महेश्वरला पोहोचलो. २५० किलोमीटर अंतर. रात्रीचा मुक्काम महेश्वरलाच होता. महेश्वर म्हणजे राणी अहिल्याबाई होळकर यांची त्यावेळची राजधानी. जगतगुरू शंकराचार्य यांच्यानंतर हिंदू सनातन धर्माची पताका उंच फडकवली ती राणी अहिल्याबाई होळकरांनी. मुगल सम्राट औरंगजेब आणि त्यापूर्वीच्या यवनांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी अनेक मंदिरांना उद्ध्वस्त केले होते. काशी विश्वेश्वर, रामेश्वर आणि भारतातील अनेक मंदिरांना राणी अहिल्याबाई होळकरांनी पुन्हा  नव्याने बांधून काढले. महेश्वर आजही खूप छान अवस्थेत आहे. तेथील नर्मदा घाट फार सुंदर आहे. राजराजेश्वर मंदिराच्या परिसरातील हा प्रसिद्ध घाट. आदीगुरु शंकराचार्य यांचे येथे वास्तव्य होते. महेश्वर या शहराचा इतिहास खूप प्राचीन आहे. हैवानशी राजा सहसत्रार्जुन याची ही राजधानी होती. त्याने रावणाचा पराभव केला होता. हेच ते ठिकाण. ऋषि जमदग्नी येथीलच. त्यांचे पुत्र भगवान परशुराम यांनी वध केला होता सहस्त्ररंग यांचा. 


 





महेश्वरचे फोटो दिले आहेत ते त्यावेळच्या राजधानीचे शहर किती सुंदर असेल याची कल्पना देईल. राणी अहिल्यादेवींचा अतिभव्य राजवाडा सुरेख आहे. त्यावेळचा राजदरबार कसा भरत होता याची कल्पना येईल. अहिल्याबाईंनी किल्ला आणि राजवाडा फार सुंदर बांधला होता. त्यांचा काळ होता १७६५ ते १७९६. बाजूचा नर्मदा घाट देखणा तर आहेच. विशेष लक्ष वेधते ते अहिल्याबाईनीं बांधलेले देऊळ. त्या स्वत: रोज पूजा करीत असत ते ह्या मंदिरात. त्या रोज १००० शिवलिंगाची पूजा करीत असत असे गाईड सांगत होता.

सुलभ्य देह दुर्लभं  

महेश धाम गौरवं  


येथील प्रसिद्ध महेश्वरी साडी खूप प्रसिद्ध आहे. राणी अहिल्याबाई होळकरांनी स्त्रीयांच्या हाताला काम असावे. त्यांनी स्वावलंबी असावे. त्यासाठी हँडलुम साडीचा प्रयोग सुरू केला. तो खूप यशस्वी झाला. अहिल्याबाईंनी बांधलेले राजराजेशवर मंदिर वास्तूकलेचा अप्रतिम नमूना आहे. 






महेश्वरहून निघालो ते देवास जिल्ह्यातील नेमावरकडे. सिद्धनाथ नेमावर हे आहे सुप्रसिद्ध तीर्थस्थान. नर्मदेचे हे बेंबीस्थान. जमदग्नी ऋषींचे हे राहण्याचे ठिकाण. परशूरामांचा जन्म येथेच जानापाव गांवी झाला. जवळ ग्वाल टेकडी आहे. त्याला मणिगिरि असेही म्हणतात. सिद्धनाथाचे प्राचीन मंदिर म्हणजे पाषाण कारगिरिचा अद्भुत नमूना आहे. पांडवानी ह्या मंदिराची निर्मिती केली होती. ते त्यांना पूर्ण करता आले नाही म्हणून कौरवानी ते पूर्ण केले असे सांगतात. सध्या जीर्णशीर्ण अवस्थेतील हे तसे सर्वात जूने मंदिर आहे.




नेमावरचे सिद्धार्थ महादेव मंदिर आणि नर्मदा मैया दर्शन मन प्रसन्न करते.

सिद्धेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेतले आणि लक्षात आले ते कितीतरी टन वजन असलेले ते भव्य शिवलिंग. ही एक अद्भुत मूर्तीकला! या शिवलिंगाची स्थापना चार सिद्ध ऋषि – सनक, सननंदन, सनातन, सनतकुमार यांनी केली. तेथील ब्रम्हानंद घाट बघण्यासारखा आहे. नेमावर सोडले आणि भोपाळमार्गे ३५० किलोमीटरवर असलेल्या जबलपूरला पोहोचलो. रस्ते चांगले आहेत म्हणून बरे!  मान-पाठ आकसून जातात पण प्रवासतील गप्पा मनोरंजन करतात म्हणून मजा येते. जबलपूरच्या सरस्वती घाटावर नर्मदेचे छान दर्शन झाले आणि सारा थकवा निघून गेला.





तेथील ग्वारी घाटावरील नर्मदा आरती बघण्यासारखी आहे. आठवण झाली ती काशीच्या गंगा आरतीची.






 

नर्मदेत नर्मदा देवी मंदिर 


*****



 

 

  
                  

 


नर्मदा परिक्रमा – ४


अमरकंटक 


नर्मदाकुंड 


कवी कालिदासाने अमरकंटकला अमरकुटा असे म्हंटले आहे.   

अमरकंटक निज धाम तुम्हारा, दो धारा के बीच  

जहां शिवशंकर करे तपस्या, उच्य शिखर कैलास .. ओ मैया !


जबलपूरहून २५० किलोमीटर अंतरावर अमरकंटक आहे. अमरकंटक हे नर्मदेचे उगमस्थान. त्याला कोटीतार्थमां असे म्हणतात. तेथून ही परिक्रमा सुरू करता येते. हा पहाडी भाग आहे. विंदय आणि सातपुडा ह्या पर्वतांच्या रांगा एकमेकाना भेटतात. तेथेच मैकल पर्वताच्या रांगाही ह्या दोन्ही पर्वत रांगांना मिळतात. हे दाट जंगल आहे. येथे ६०० विविध प्रकारची वनौषधी झाडे आहेत. ऊन्हामुळे पानझड झाली होती. पावसाळ्यात हा परिसर खूप सुंदर दिसत असेल. येथे एकूण ३४ मंदिरे आहेत. सूर्य. लक्ष्मी, शिव, गणेश, आणि विष्णु ह्या पांच देवतांची प्रमुख मंदिरे आहेत. नर्मदा जेथे उगम पावते ते ठिकाण म्हणजे नर्मदा कुंड. या ठिकाणी ती उगम पावते आणि थोड्याच अंतरानंतर ती लुप्त होते. ती छोट्या कुंडातून एका मोठ्या कुंडात जाऊन मिळते.  नंतर काही किलोमीटर अंतरानंतर रेवाकुंडात दिसते. तेथून तिचे वाहणे सुरू होते. मांडवगडच्या राणीने तिच्या महालासमोर हे कुंड उभारले. ती वयस्कर झाली होती आणि रोज नर्मदा घाटावर जाऊन स्नान करणे हा तिचा नियम होता. त्यासाठी तिने हे कुंड बांधले. त्या कुंडाच्या आजूबाजूला मंदिर समूह आहे.







रेवाकुंड - नर्मदा येथे पुनः प्रगट होते 

रेवाकुंडच्या आजूबाजूची मंदिरे  

                                                                                नर्मदा माता 





दुर्वासऋषी यांचे वास्तव्य येथेच होते. 


नर्मदा 


अमरकंटक ते नरसिंगपूर हे अंतर ३५० किलोमीटर आहे. ह्या जंगलातून जातांना आपण नर्मदेच्या काठाकाठानेच चालू लागतो. नर्मदेची विविध रुपे आपले मन प्रसन्न करतात. कपिलमुनींनी येथेच १२ वर्षे तपस्या केली. त्या परिसराला कपिलधारा असे म्हणतात. कपिलधारा हा नर्मदेवरील पहिला मोठा धबधबा. नर्मदा येथून वहात असतांना एखाद्या अवखळ मुलीसारखी दिसते. त्या नंतर थोड्याच अंतरावर आपण दूसरा धबधबा बघतो. त्याचे नाव आहे दुग्धधारा. पाण्याचा रंग आहे दुग्धरंग. या धबधब्याजवळच दुर्वास ऋषींचा आश्रम होता. हा सर्व परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. नर्मदेची मोहक रुपे बघत आपण चालत रहातो.

कपिलधारा 


                                    कपिलधारा 

दुग्धधारा  


                हम रेवा मां के बालक, मैया दूध पिलावत है

रेवा आणि पद्मावती 

पद्मावती रेवा जंगल 

पद्मावती - आमचा ग्रुप 

नर्मदा तटाकी 


असे अनेक धबधबे ह्या परिसरात दिसले 

विंदय सातपुडा पर्वत रांग  - सर्वात उंचावर  


जैन मंदिर स्तंभ 

जैन मंदिर 





भगवान महावीर 


अतिशय सुंदर शिल्प 

 
शबरी 

नर्मदा 

नर्मदा घाट - नर्मदापूर 








महादेव 



रामकृष्ण मिशन आश्रम - येथे राहिलो 


येथील महत्वाचे मंदिर ज्वालेश्वर. त्याच्या अनेक दंतकथा ऐकल्या. नर्मदा जेथे उगम पावते तेथे अमरेश्वर महालिंगम हे महादेवाचे सुंदर मंदिर आहे. ५१ टन वजनाची हे लिंग ११ फुट लांबीचे आहे. हा परिसर छत्तीसगढ मध्ये आहे. येथील जंगलाला मैय्या की बगिया असेही म्हणतात. गुलबकावलीची फुले सर्वत्र आहेत. आंबा – केळीच्या बागा आहेत, कालाचुरी  महाराजांनी येथे त्रीमुखी देऊळ बांधले. (१४४१ – १०७३ AD). 

 

नर्मदेला एकूण ४२ नद्या येऊन मिळतात. त्यातील पांच मोठ्या नद्या. नर्मदा, सोन आणि जोहिला या तीन प्रमुख नद्या. मसलन, हिरन, बंजर, बुढनेर, डेब, गोई, कारम, चोरल, बेदा या इतर प्रमुख उपनद्या. यात्रेकरूसाठी नर्मदा परिक्रमा हा पंचकोशी यात्रा असते.

नर्मदेला १५ नावे आहेत: १) नर्मदा २)त्रिकुटा ३) दक्षिण गंगा ४) महती ५) सुरसा ६) कृपा

७) मंदाकिनी ८) महार्णवा ९) रेवा १०) विपापा ११) विपाशा १२) विमला १३) करभा १४) रंजना १५) वायुवाहिनी / बालूवाहिनी    

नर्मदेच्या ११३ उपनद्या आहेत. २५ पक्के घाट बांधले आहेत. ३/४ ज्योतिर्लिंग आहेत. नर्मदेतील गोटे म्हणजे शालिग्राम. साक्षात शिवशंकर  

मैय्या की गलिया आडी तेडी, हम से चलो न जाय 



 



अमरकंटकजवळच एक धबधबा दिसतो त्याला शंभू धारा असेही म्हणतात. तेथे नर्मदेला पद्मावती ही नदी मिळते. तो भाग खूपच सुंदर आहे. तेथून पुढे पद्मावती- अमरावती या दोन नद्यांचा संगम दिसतो. जवळच एक जैन मंदिर बांधण्याचे काम चालू आहे. अतिशय भव्य मंदिर उभे होत आहे. तेथील शिल्पकला अप्रतिम आहे. 1008 भगवान मुनिस व्रतनाथाची २४ टन वजनाची भव्य मूर्ती लक्ष वेधून घेते. तेथील संगमरवर भेडाघाटचा आहे. जवळच धर्मपाणी हे मंदिर आहे व एक सुंदर आश्रम आहे.


अमरकंटकच्या जंगलातून आपण होशंगाबादकडे म्हणजे नर्मदापुराकडे जातो.(१७५ किलोमीटर)१५५१ मध्ये मालवा नरेश यांनी हे गाव वसवले. जानकीबाई यांनी पक्का घाट बांधला (१८८१). त्यालाच सेठानी घाट असे म्हणतात.

रस्त्यात आपण बरमान घाट बघतो. हा घाट खूप सुंदर आहे. नरसिंह जिल्ह्यातील हा घाट प्रसिद्ध धार्मिक स्थान आहे. ब्रम्हदेवाची ही तपोभूमी आहे, असे म्हणतात. येथून जवळच लोकनाथ तीर्थ महाराजांचा सुंदर मठ/आश्रम आहे. तेथे रहाण्याची सुंदर व्यवस्था आहे. ह्या आश्रमात यात्रेकरूना जेवण फुकट असते. जवळच शेठाणी घाट आहे. आपण नर्मदेच्या दर्शनासाठी घाटावर जातो आणि ते विहंगम दृश्य पाहून खूप आनंदी होतो. ते आनंद तरंग आजही आठवतात.

राम बिना कोई पाले नही,

कृष्ण बिना कोई तारे नही

जयतू नर्मदे I

तेरे पद पंकंन मे रेवा I

सदा वंदना मेरी मा II


आमचे स्वयंपाकी बरोबरच होते. त्यांना मठातील स्वयंपाकघर मिळाले आणि त्यांनी ३०-४० मिनिटातच सुंदर स्वयंपाक केला व आमची क्षुधाशांती झाली. येथून जवळच असलेला दूसरा खारा घाट बघितला.


नर्मदा उत्तरतट: भरूच येथील भृगु ऋषी आश्रम, मिठी तलाई, नील कंठेश्वर, गरुडेश्वर, सरदार सरोवर, कुक्षी, मांडू, महेश्वर, महू, इंदूर, नेमावर, जबलपूर, भेडाघाट, बरमान, अमरकंटंक

नर्मदा दक्षिणतट: अमरकंटक, डिंडोरी, नरसिंहपूर, होशंगाबाद, खांडवा, ओंकारेश्वर 

ओंकारेश्वर 

होशंगाबादहून आपला प्रवास पुनः सुरू होतो ओंकारेश्वराकडे. जेथे आपण परिक्रमा सुरू केली त्याच नागर घाटावर आपली संकल्पपूर्ति पूजा सुरू होते. आपले गुरुजी आपली पूजेची व्यवस्था करीत असतात आणि आपण नर्मदेत डुबकी मारून पूजेसाठी तयार होतो. ही पूजा दीड दोन तास चालते. गुरुजी पूजेचा अर्थ समजाऊन सांगत असतात. मंत्रघोष चालू होतो. सुंदर वातावरण निर्मिती होते. हा पूजेचा पहिला भाग. नंतर ममलेश्वर मंदिरात पूजेचा उत्तरार्ध. ती पूजा संपल्यावर आपण नर्मदेवरील जूना पूल ओलांडून ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जेथे आहे त्या मंदिरात महादेवाच्या पिंडीवर नर्मदा जलाभिषेक करण्यासाठी जातो. आपण ती बाटली जपून ठेवलेली असते. रोज तिची आरती केलेली असते. अशा रीतीने ओंकारेश्वराच्या महादेवाला नर्मदा जलाभिषेक केल्यानंतर आपली परिक्रमापूर्ती होते.

नर्मदा  - जगदानंदी,

मैय्या जय आनंद करणी

मैया सुरमंडल रमती

अमरकंटक से विराजत,

घाटन घाट विराजत

नमामी देवी नर्मदे

नर्मदे हर !   नर्मदे हर !  नर्मदे हर !  

हे नर्मदा परिक्रमेचे वर्णन खास तुमच्यासाठी ..

घर बैठे ही दर्शन देखो

जीवन सफल हो जाय ! 



नर्मदे हर ! शेवटच्या दिवशी नर्मदेत स्नान करून पूजा केली 

संकल्पसिद्धी पूजा करताना 


 



*****