Saturday, August 22, 2020

Look Beyond Yourself



मध्यमवर्गीय मानसिकता ह्या गोष्टीवरून लक्षात येते. “ आहे रे “ आणि “ नाही रे “ ह्यांच्या विचारसरणीतील हा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. आनंद हा शेवटी कशात शोधायचा असतो हे आपण समजून घेतले पाहिजे. REAL HAPPINESS IS HELPING OTHERS . ह्यासाठी “ Look Beyond Yourself “ अशी मनोवृत्ती हवी.
           Real Happiness is Helping Others 

प्रसिद्ध कादंबरीकार Paulo Coelho आपल्या BRIDA ह्या कादंबरीत एक सुंदर गोष्ट सांगतात.
एक माणूस चालतां चालतां अनवधानाने एका खोल खड्ड्यात पडला .त्यातून बाहेर येण्यासाठी त्याला मदतीची आवश्यकता होती. त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका धर्मगुरूकडे त्याने मदतीची याचना केली. धर्मगुरूने नुसताच आशीर्वाद दिला आणि पुढे निघून गेला. थोड्यावेळाने एक डॉक्टर जातांना दिसला. त्याच्याकडे त्याने आशेने मदतीची याचना केली. डॉक्टरने दुरूनच त्याला काय जखम झाली ह्याची तपासणी केली. एका कागदावर औषधाच्या गोळ्यांची नांवे लिहून ती चिट्ठी त्याच्याकडे फेकली आणि जवळच्या औषधाच्या दुकानातून औषधे घेऊन येण्याचा सल्ला देऊन तो निघून गेला. थोड्यावेळाने असाच एक अनोळखी माणूस जात होता.त्याच्याकडे त्याने मदतीची याचना केली असतां त्या अनोळखी माणसाने त्या खड्ड्यात उडी मारली. तो माणूस हे पाहून अधिकच घाबरला . त्याला वाटले आतां हाही खड्ड्यात पडल्यावर कसली मदत करणार . आतां दोघेही संकटात सापडले .त्याने त्याला विचारले , “ तू कशाला उडी मारलीस? . आतां दोघांना कोण बाहेर काढणार ? “ तो अनोळखी माणूस उद्गारला , “ काहीं काळजी करू नकोस . मला ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग माहीत आहे . मी तुला बाहेर काढतो. तू फक्त माझ्या मार्गाने चल .”. तो त्याच्या मागे चालू लागला आणि सुखरूप बाहेर पडला. त्याला हायसे वाटले.
तात्पर्य खड्ड्यात पडलेल्या माणसासाठी धर्मगुरू किंवा डॉक्टर फारसे उपयोगी पडू शकले नाही. मदत करणाऱ्याला मदत कशी करावयाची ह्याचे भान नव्हते.  दात्याला मदत कशी करावयाची ह्याचे भान असले पाहिजे आणि हेच भान अनेकांना नसते. आपण योग्य ती मदत योग्य त्या वेळी योग्य त्या माणसाला केली पाहिजे.  
डॉ विकास आमटे  ह्यांनी फेसबुकवर डॉ हरताळकरांची एक सुंदर पोस्ट शेअर केली होती. ती जशाला तशी देण्याचा मोह येथे होतो. सर्वाना अंतर्मुख करणारी ही पोस्ट खूप काही सांगून जाते .
गोष्ट एका शिवरामाची ......
बेल वाजली म्हणून दरवाजा उघडला. दारात शिवराम.
शिवराम आमच्या सोसायटीतल्या लोकांच्या गाड्या-बाईक्स धुवायचं काम करतो.
'
साहेब, जरा काम होतं.'
'
पगार द्यायचा राहिलाय का माझ्याकडून ?'
'
नाय साहेब, तो केवाच भेटला. पेढे द्यायचे होते. पोरगा धाव्वी झाला.'
'
अरे व्वा ! या आत या.'
आमच्या दाराचा उंबरठा शिवराम प्रथमच ओलांडत होता.
मी शिवरामला बसायला सांगितलं. तो आधी नको नको म्हणाला. आग्रह केला तेव्हा बसला. पण अवघडून.
मीही त्याच्या समोर बसताच त्याने माझ्या हातात पेढ्यांची पुडी ठेवली.
'
किती मार्क मिळाले मुलाला ?'
'
बासट टक्के.'
'
अरे वा !' त्याला बरं वाटावं म्हणून मी म्हटलं. 
हल्ली ऐंशी-नव्वद टक्के ऐकायची इतकी सवय झाल्ये की तेवढे मार्क न मिळालेला माणूस नापास झाल्यासारखाच वाटतो. पण शिवराम खुष दिसत होता.
'
साहेब मी जाम खुश आहे. माझ्या अख्ख्या खानदानात इतका शिकलेला पहिला माणूस म्हणजे माझा पोरगा !'
'
अच्छा, म्हणून पेढे वगैरे !'
शिवरामला माझं बोलणं कदाचित आवडलं नसावं. तो हलकेच हसला आणि म्हणाला
'
साहेब, परवडलं असतं ना, तर दरवर्षी वाटले असते पेढे. साहेब, माझा मुलगा फार हुशार नाही, ते माहित्ये मला. पन एकही वर्ष नापास न होता दर वर्षी त्याचे दोन दोन, तीन तीन टक्के वाढले - यात खुशी नाय का ? साहेब, माझा पोरगा आहे म्हणून नाही सांगत, पन तो जाम खराब कंडीशनमधे अभ्यास करायचा. तुमचं काय ते - शांत वातावरन ! - आमच्यासाठी ही चैन आहे साहेब ! तो सादा पास झाला असता ना, तरी मी पेढे वाटले असते.'
मी गप्प बसल्याचं पाहून शिवराम म्हणाला, 'साहेब सॉरी हा, काय चुकीचं बोललो असेन तर. माझ्या बापाची शिकवन. म्हनायचा, आनंद एकट्याने खाऊ नको - सगल्य्यांना वाट !
हे नुसते पेढे नाय साहेब - हा माझा आनंद आहे !'
मला भरून आलं. मी आतल्या खोलीत गेलो. एका नक्षीदार पाकिटात बक्षिसाची रक्कम भरली.
आतून मोठ्यांदा विचारलं, 'शिवराम, मुलाचं नाव काय?'
'
विशाल.' बाहेरून आवाज आला.
मी पाकिटावर लिहिलं - प्रिय विशाल, हार्दिक अभिनंदन ! नेहमी आनंदात रहा - तुझ्या बाबांसारखा !
'
शिवराम हे घ्या.'
'
साहेब हे कशाला ? तुम्ही माझ्याशी दोन मिन्ट बोल्लात यात आलं सगलं.'
'
हे विशालसाठी आहे! त्याला त्याच्या आवडीची पुस्तकं घेऊ देत यातुन.'
शिवराम काहीच न बोलता पाकिटाकडे बघत राहिला.
'
चहा वगैरे घेणार का ?'
'
नको साहेब, आणखी लाजवू नका. फक्त या पाकिटावर काय लिहिलंय ते जरा सांगाल? मला वाचता येत नाही. म्हनून...
घरी जा आणि पाकीट विशालकडे द्या. तो वाचून दाखवेल तुम्हाला !' मी हसत म्हटलं.
माझे आभार मानत शिवराम निघून गेला खरा पण त्याचा आनंदी चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता.
खुप दिवसांनी एका आनंदी आणि समाधानी माणसाला भेटलो होतो.
हल्ली अशी माणसं दुर्मिळ झाली आहेत. कोणाशी जरा बोलायला जा - तक्रारींचा पाढा सुरु झालाच म्हणून समजा.
नव्वद -पंच्याण्णव टक्के मिळवून सुद्धा लांब चेहरे करून बसलेले मुलांचे पालक आठवले. आपल्या मुलाला/मुलीला हव्या त्या कॉलेजात प्रवेश मिळेपर्यंत त्यांनी आपला आनंद लांबणीवर टाकलाय, म्हणे.
आपण त्यांना नको हसुया. कारण आपण सगळेच असे झालोय - आनंद 'लांबणीवर' टाकणारे !
माझ्याकडे वेळ नाही, माझ्याकडे पैसे नाहीत, स्पर्धेत टिकाव कसा लागेल, आज पाऊस पडतोय, माझा मूड नाही !’ - आनंद लांबणीवर टाकायच्या या सगळ्या सबबी आहेत आहेत हे आधी मान्य करू या.
काही गोष्टी करून आपल्यालाच आनंद मिळणार आहे - पण आपणच तो आनंद घ्यायचा टाळतोय ! Isn't it strange ?
मोगऱ्याच्या फुलांचा गंध घ्यायला कितीसा वेळ लागतो ?
सूर्योदय-सूर्यास्त पाहायला किती पैसे पडतात ?

आंघोळ करताना गाणं म्हणताय, कोण मरायला येणारे तुमच्याशी स्पर्धा करायला ?
पाऊस पडतोय ? सोप्पं आहे - भिजायला जा !
अगदी काहीही न करता गादीत लोळत राहायला तुम्हाला 'मूड' लागतो ?
माणूस जन्म घेतो त्यावेळी त्याच्या हाताच्या मुठी बंद असतात.
परमेश्वराने एका हातात 'आनंद' आणि एका हातात 'समाधान' कोंबून पाठवलेलं असतं.
माणूस मोठा होऊ लागतो. वाढत्या वयाबरोबर 'आनंद' आणि 'समाधान' कुठे कुठे सांडत जातात.
आता 'आनंदी' होण्यासाठी कोणावर तरी, ‘कशावर तरी अवलंबून राहावं लागतं.
कुणाच्या येण्यावर-कुणाच्या जाण्यावर. कुणाच्या असण्यावर-कुणाच्या नसण्यावर.
काहीतरी मिळाल्यावर-कोणीतरी गमावल्यावर. कुणाच्या बोलण्यावर- कुणाच्या न बोलण्यावर.
खरं तर, 'आत' आनंदाचा न आटणारा झरा वाहतोय. कधीही त्यात उडी मारावी आणि मस्त डुंबावं.
इतकं असून...आपण सगळे त्या झऱ्याच्या काठावर उभे आहोत - पाण्याच्या टँकरची वाट बघत !
जोवर हे वाट बघणं आहे तोवर ही तहान भागणं अशक्य !
इतरांशी तुलना करत आणखी पैसे, आणखी कपडे, आणखी मोठं घर, आणखी वरची 'पोजिशन', आणखी टक्के.. ! 
या 'आणखी'च्या मागे धावता धावता त्या आनंदाच्या झऱ्यापासून किती लांब आलो आपण I
(Courtesy : Dr Hartalkar , From Facebook ) 


Friday, August 21, 2020

डेव्हिड कोलियर - एक इंग्रज मित्र


एका विचारवंताने युरोपचे उदाहरण दिले आणि विशेष उल्लेख केला तो इंग्लंड आणि इंग्रजांचा. त्यांच्या मते पुरोगामी आणि सुधारणावादी विचार घ्यावा तो इंग्रजाकडून किंवा युरोपकडून. मला थोडेसे आश्चर्यच वाटले. व्यवसायानिमित्त माझा अनेक ब्रिटीश आणि युरोपियन लोकांशी संबंध आला. एकाच ब्रिटीश कंपनीतील चार वेगळ्या स्थरातील व्यक्तींशी मी  संपर्कात आलो तेव्हा त्यांच्यातील वेगळ्या प्रकारच्या जातीव्यवस्थेची कल्पना आली. त्या कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष उमराव संस्कृतीचे प्रतिनिधीत्व  करणारे होते. स्वतःला श्रेष्ठ समजणारे आणि इतरांना तसे तुच्छ समजणारे. खास अशा उच्यभ्रू शाळेतून शिक्षण घेतलेले व त्याचे विशेष अभिमानी असलेले. मी त्या कंपनीचा प्रतिनिधी असल्यामुळे माझ्याशी खूप सन्मानाने वागणारे. म्हणजे हा इंग्लंड मधील उच्चवर्गीय  समाज प्रतिनिधी. हा वर्ग इग्लंड  सोडून कुठेच घर करून राहत नाही. त्याला इग्लंडच अधिक प्यारे. हुजूर आणि मजूर पक्ष हे अशाच दोन वेगळ्या स्तरांचे प्रतिनिधीत्व  करतात. त्याच कंपनीतील एक इंजिनिअर हा वेल्सचा . त्याचे पूर्वज मेंढ्या पाळणारे. म्हणजे आपल्याकडे जशी धनगर जमात आहे तसे. वेल्सच्या लोकांना इंग्लंड मध्ये थोडे कमीच महत्त्व देतात. अजून एक इंंग्रज मित्र .मार्केटिंग  म्यानेजर. तो Cobbler म्हणजे त्याचे पुर्वज चांभार. खूप मेहनत करून शिकलेला. ह्या लोकांना इंग्लंडमध्ये  विशेष मान मिळत नाही म्हणून हे इंग्रज लोक   इंग्लंडबाहेर म्हणजे दक्षिण आशिया किंवा पूर्व आशियात काम करण्यास तयार असतात. त्याचे  मुख्य  कारण, ह्या गोर्या कातडीच्या लोकांना आशिया देशात ब्रिटीश म्हणून खूप मान आणि प्रतिष्ठा मिळत असते . म्हणूनच त्यांना भारत , पाकिस्तान , थायलंड हे देश आवडत असत. त्यांना इंग्लंडमध्ये रहावे असे वाटत नसते. ते इकडे खुश असतात.  चौथा अधिकारी होता ऑस्ट्रेलियाचा . त्याचे पुर्वज  मुळचे ब्रिटीश. ब्रिटिशानी ज्या गुन्हेगारांना बोटीने तिकडे पाठविले त्यात त्याचे पूर्वज होते. ह्या लोकांना ब्रिटनमधील लोकाच्याब्द्द्ल फारसे  प्रेम नाही.एक प्रकारचा तिरस्कारच होता आणि आजही आहे.  ४-५ वर्षे ह्या मंडळीच्या बरोबर काम  केल्यावर हे त्यांच्यातील वर्णभेद  माझ्या  लक्षात आले. वरकरणी ते ब्रिटीश असले तरी त्यांच्यात भेदाभेद, जातीभेद  होते . ते प्रागतिक किंवा सुधारणावादी नव्हते.
सगळ्यांचा असा समज आहे  की ख्रिश्चन धर्म त्यांना एकत्र ठेवतो. पण तसेही  नाही. युरोपला ख्रिश्चन धर्म एकत्र ठेऊ शकला नाही. त्यांच्यात अनेक भेदाभेद आहेत. पंथ आहेत. चालीरीती आहेत. वेगवेगळ्या रूढी आहेत. भाषा , चालीरीती आणि संस्कृती भिन्न आहेत. त्यामुळेच युरोपमध्ये छोटे छोटे देश आहेत. अजूनही ह्या देशांचे तुकडे होण्याची शक्यता आहे.
सानेगुरुजी ह्यांनी पाश्चिमात्य तत्वज्ञ आणि त्यांच्या विचारसरणी संबंधी एक सुंदर पुस्तक लिहिले आहे . त्यावरून आपल्यास युरोपियन संस्कृतीची चांगली कल्पना येते. हे देश खूप पुरोगामी आणि समाज सुधारणावादी आणि जातीभेद विरहीत आहेत असे म्हणणे फारसे बरोबर ठरणार नाही. मी जेंव्हा ह्या मंडळी बरोबर चर्चा केली तेंव्हा हे प्रकर्षाने जाणवले.
डेव्हिड कोलियर 
डेव्हिड कोलियर हा त्यापैकी एक. उंचापुरा, गोरा. आकर्षक व्यक्तीमत्वाचा. तसा लंडनचा. १०-१२ वर्षे हॉंगकॉंग, फिलीपीन्स ,थायलंड आणि भारत ,पाकिस्तान, श्रीलंका ह्या देशात व्यवसायानिमित्त फिरणारा आणि वास्तव्य  करणारा. त्याचा डायव्हर्स झालेला. इंग्लिश पत्नीने पोटगी वसूल केलेली. २० वर्षाच्या मुलाची लंडन मधील शिक्षणाची व्यवस्था त्यालाच करावयाची हे कोर्टाने सांगितलेले . त्यामुळे तो इंग्लंडला फारसा जातच नसे. तो मला म्हणे ,'इकडे आम्हाला गोर्या कातडीमुळे अधिक सन्मान मिळतो . तिकडे सगळेच गोरे'. त्यांत उमराव मंडळी उच्चभ्रू. आम्ही नोकरदार ,चाकरी करणारे ,दुय्यम. अशा दुय्यम ब्रिटीशांनाच  बाहेर देशांत तेथील कंपन्या  पाठवित असतात. तेच आजही चालू आहे. त्यामुळे हे  ब्रिटिश इतर देशात जाण्यास अधिक उत्सुक असतात.
मी डेव्हिड बरोबर ५-६ वर्षे काम केलं. तो रंगतंत्रज्ञान ह्या विषयात तज्ञ . बोलायला गोड. भारतीय उद्योजक गोरी कातडी म्हंटली की खूष होतात व  वेळात वेळ काढून गोर्या कातडीच्या मंडळींना  भेटणार. एरव्ही मला ते सहजासहजी वेळ देत नसत. पण मी गोर्या माणसाला घेवून येतो आहे असे सांगितले की आम्हाला भेटीची वेळ सहज मिळत असे. ते साहजिकच आहे. भारतीय मेंट्यालिटी. गोरे कातडे.
युडीसीटी मधील प्रोफेसर लोखंडे ह्यांच्या रंगविज्ञान  प्रयोगशाळेत डेव्हिड 

एकदा हे गोरे कातडे बरोबर असले की माझा भारतभर दौरा सुरू होत असे.  तंत्रज्ञान विकणे तसे अवघड असते. प्रत्येक कंपनीत ३-४ थरावर चर्चा कराव्या लागतात. खालच्या थरावर तांत्रिक चर्चा होते म्हणजे  नवे तंत्रज्ञान समजावून सांगणे. मधल्या थरावर त्या विभागाची गरज ओळखून चर्चा करणे  , उपाध्यक्ष / अध्यक्ष  ह्या थरावर हो  किंवा नाही असा निर्णय घेण्यासाठी चर्चा पुढे नेणे आणि शेवटी संचालक/ मालक ह्यांच्याकडे किंमतीत सूट देवून करार करणे. हे सर्व करण्यासाठी ४/६ महिने आणि तेवढ्याच मिटींग होतात. डेव्हिड सर्व थरावरील लोकांशी कशी चर्चा करायची हे चांगले जाणून होता. तो बोलण्यात तरबेज तर होताच पण आपला ठसा उमटविणारा होता. माझ्या २/३ मीटिंग्ज झाल्या की त्या पोटेनशिअल कस्टमरकडे मी ह्या गोर्या मंडळींना घेवुन जात असे. डेव्हिडला त्यामुळे चांगले यश मिळत असे .
डेव्हिड हा फार काटकसरीने रहात असे. त्याला 4 / 5 स्टार हॉटेलमध्ये रहाणे त्यांच्या कंपनीच्या नियमाप्रमाणे शक्य असे पण तो 3 स्टार हॉटेलमध्येच रहाणे पसंत करीत असे. त्याला भारतीय व्हेज आणि नॉन व्हेज खाणे फार आवडत असे. कांदाभजी आणि बियर ह्यावर हे  महाशय खूष असत . दोन्ही खाणे मात्र अमर्यादित.  हे चालू असताना  तासनतास गप्पा मात्र चालूच असत. चिकन ही त्याचे अत्यंत आवडीचे. त्याला तिखट आणि  झणझणीत आवडत असे. मी व्हेजवाला आणि मद्यपान न करणारा. तो मुंबईत आला की आम्ही नेहमी  कितीतरी छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये खाण्यासाठी जात असू. त्याच्याशी किती विषयावर गप्पा होत . त्याचे  विविध देशांचे अनुभव ऐकण्यासारखे असत . दक्षिण आणि पुर्व आशियात तर तो खूपच फिरलेला. त्यावेळी ह्या देशातून मी  फारसा फिरलेला नव्हतो. फार उशिरा मी हे देश पाहिले. तेही टूरिस्ट म्हणून.' माणूस ' बघायचा असेल तर कामानिमित्त फिरलं पाहिजे. विविध लोकांशी संपर्क झाला तर तेथील ' माणूस ' समजतो. प .युरोपपेक्षा दक्षिण आणि पूर्व आशिया अधिक बघण्यासारखा तर आहेच. तेथील  माणसं अधिक फ्रेंडली असतात. युरोप -अमेरिकेत माणसं खोटी वागतात आणि खोटी खोटी हसतात.
डेव्हिड हॉंगकॉंग आणि फिलीपीन्सला अधिक राहिला. त्यावेळी त्यांना हॉंगकॉंग म्हणजे लंडन सारखेच होते.  तेथे चिनी प्रभाव नव्हता.  आजही इंग्लंडपेक्षा  तेथील राहणीमान स्वस्त आणि मस्त आहे. इतर देश म्हणजे त्यांच्याकरिता स्वस्ताईच होती. मग कशाला इंग्लंडला जायचं ? म्हणूनच इंग्रजांना आपल्या देशात जावेसे वाटत नसावे. दूसरे कारण तेथील हवामान. वैतागतात ते  तेथील  हवामानाला ! आपण मात्र लंडन रिटर्न ची स्वप्ने पहाणारे.
डेव्हिडचा बॉस होता Alan . तोही मूळचा ब्रिटिश. तो रहात असे सिंगापूरला. नंतर स्थाईक झाला मलेशियात. इकडेच रमला. असे हे इंग्रज. म्हणजे गोरे. इंग्लंडमध्ये ज्यांना संधी मिळत नव्हती म्हणून  ते तो देश असा सोडून इतरत्र  गेले. आपल्याला मात्र ह्या गोर्या कातडीचे महत्व .
नंतर आमचा संपर्क तुटला. काही  वर्षांनी मला डेव्हिड गेल्याचे  समजले. तो चेन स्मोकर होता. मी त्याला अनेकदा सांगितले ,'Stop Smoking ' . तो कसला थांबवतो. त्याच्याबरोबर फिरत असतांना मीच सिगारेट पिल्यासारखा माझा वांस येत असे. मला नुसता वैताग येत असे . शेवटी तो  प्रवास करताना अचानक गेला. एक खरा सेल्समन . काटकसरीने राहणारा माणूस ,खूप धडपड्या , एक जॉली माणूस.

Sunday, August 16, 2020

माणसं : परदेशी

परदेशी प्रवासात आपल्याला माणसं  भेटत राहतात . काही दिवसांनी ती आपल्याला आठवत राहतात. त्याचे कारण  आपण त्यांच्याकडून नकळत काहीतरी शिकत असतो. कामानिमित्त एकत्र येतो तेंव्हा आपल्याला ती माणसं कामाव्यतिरिक्त वेळात अधिक समजू लागतात . त्यांच्यातील खरा 'माणूस' हा कामाच्या १० ते ५ ह्या वेळात असणाऱ्या त्यांच्यातील  'माणसा'पेक्षा  खूप  वेगळा वाटतो . त्यांनाही  आपल्याबाबत असेच  वाटत असणार. नाहीतरी आपण माणसं मुखवटे घालूनच फिरत असतो .
एका परिषदेत हार्टमनच्या बरोबर मी गप्पा मारताना ...... 

मी जर्मन कंपनीशी  अनेक वर्षे संबंधित होतो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे विली  कॉर्नेलिअस . त्याच्याबद्दल मी ह्यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये खूप विस्ताराने लिहिले आहे. मी पाहिलेला  हा एक भन्नाट माणूस .त्याचे आणि माझे वैयक्तिक मित्रत्वाचे संबंध होते. त्याच्या कार्यालयातील त्याचे इतर सहकारी ह्यांच्याशीही माझा जवळून संबंध आला . मी तसे त्यांच्याबरोबर ८-१० वर्षे काम केलं . त्यात दोन जर्मन आणि एक युगोस्लाव्हीयन सहकारी होते .माझी त्यांच्याशी  वैयक्तिक मैत्री झाली होती . हे तिघेही भारतात कामानिमित्त येत असत . ते सपोर्ट इंजिनिअर होते. रंगविज्ञानात  तज्ज्ञ होते. सिस्टीम इंस्टॉलेशन , ट्रेनिंग , यंत्र  दुरुस्ती करणे,  ही त्यांची नेहमीची कामे होती . माझे इंजिनिअर ह्या विषयात शिकले की त्यांना भारतात येण्याचे काम पडत नसे
उजवीकडून हार्टमन . त्याच्यासोबत हॉलंडचा प्रतिनिधी .

हार्टमन हा जर्मन इंजिनिअर भारतात प्रथम आला आणि मी त्याच्याकडून हे तंत्रज्ञान शिकून घेतले. हार्टमन तसा अबोल .कामापुरतेच बोलणारा . ह्या जर्मन लोकांना इंग्रजी भरभर बोलता येत नाही. ते आधी जर्मन भाषेतून विचार करतात आणि नंतर इंग्रजीत भाषांतरित करून बोलण्याचा प्रयत्न  करतात. त्यांना इंग्रजी शब्द सहजासहजी सुचत नाहीत. मग ते हातवारे करून व्यक्त होतात .तसे जर्मन असो व इतर युरोपियन. त्या  लोकांना  इंग्रजीचे  फारसे प्रेम नसते . कारण युरोपमध्ये जर्मन भाषा  अनेक ठिकाणच्या लोकांना बऱ्यापैकी माहित असते. त्यांनाही युरोपमधील इतर भाषा बऱ्यापैकी अवगत असतात. इंग्रजीमुळे युरोपात तसे फारसे अडत नाही. मी स्वतःच जर्मनीत स्थायिक झालो असतो. पण युरोपातील जर्मन , इटालियन आणि फ्रेंच ह्या भाषांचे ज्ञान मला नव्हते आणि ते व्यवसायासाठी असणे अत्यंत आवश्यक होते.  हा हार्टमन तसा युरोपियन . तो  चार भाषा चांगल्यापैकी बोलणारा होता . त्याने इंजिनिअरिंग  डिप्लोमा मिळवलेला होता . जर्मनीत पदवी इतकेच डिप्लोमाला महत्व असते. तो डिप्लोमाधारक इंजिनिअर असला तरी त्याचा  १०-१२ वर्षाचा प्रात्यक्षिक अनुभव होता . त्याने  निरनिराळ्या यंत्रावर / संगणकावर काम केलेले होते . तो कामाला एकदम वाघ. मी त्याला युरोपमधील सर्व औद्योगिक प्रदर्शनात भाग घेताना बघितले आहे . तो  त्याच्या कारला ट्रेलर  जोडून एका शहरातुन दुसऱ्या शहरात सहज फिरायचा .त्याच्या कार्यालयातील कॉम्पुटर कलर सिस्टीम आणि त्याला लागणारी सर्व यंत्रसामुग्री ट्रेलरमध्ये ठेऊन हा कार्यालयातून निघत असे .कधी प्रदर्शन मिलानमध्ये असे तर कधी झ्युरिकमध्ये . कधी  तो पॅरिसमध्ये असे तर कधी रोममध्ये  . तो सारखा एका प्रदर्शनानंतर दुसऱ्या प्रदर्शनाला स्टॉल उभा करण्यासाठी जात असे .हा एकटाच एक दिवस आधी स्टॉलवर पोहोचतो. सर्व यंत्रे इंस्टॉल करतो.ती  चालू करतो. स्टॉलची सर्व व्यवस्था त्याच्याकडेच असते .  आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातील देखावा महत्वाचा तर असतोच पण जेंव्हा लोक प्रत्यक्ष यंत्रसामुग्री चालू असताना बघतात तेंव्हा ते त्या स्टॉलवर आधी खुश होतात. असा हा प्रदर्शनाच्या कामात रमलेला हार्टमन. युरोपात  मजूर किंवा मदतनीस मिळत नाही. स्टॉलवर पडेल ती सर्व कामे इंजिनिअरला स्वतःच  करावी लागतात . कोणतेही काम करण्यास जर्मन माणसाला कसलीही लाज वाटत नाही किंवा 'हे माझे काम नाही ', असे ते म्हणत नाहीत. कचरा काढणे असो का यंत्र पुसणे असो , त्याचा त्यांना कमीपणा वाटत नाही. मी हे त्याच्याकडून शिकलो.अनेकवेळा  मी त्याच्याबरोबरच होतो. त्यामुळे मला ह्या वर्ककल्चरची चांगली ओळख झाली . एकदा प्रदर्शनातील स्टॉलची सर्व व्यवस्था झाली की तो टाय घालून सेल्समनच्या भूमिकेत जात असे आणि त्याचे मिठ्ठास बोलणे सुरु होई . मग आपण   ऐकावे ते त्याचे विविध अनुभव  . स्टॉलवर आलेल्या कोणीही प्रश्न  विचारले की हा होत असे त्या विषयातील एक  तज्ज्ञ . तो समजावून सांगताना एखादा प्रोफेसर शिकवितो आहे , असेच वाटत राहत असे .He  was 'All in  One' .  असे हे व्यक्तिमत्व. बहुतेक  जर्मन लोक हे असेच असतात. अमेरिकन लोकांचे मात्र तसे नसते. त्यांच्यात ज्ञानाची विभागणी असते. सेल्समन ह्याचे तंत्रज्ञान फारच मर्यादित असते. तो स्क्रू ड्रायव्हरला हातांत  घेऊन काहीही  करणार नाही. त्याला त्यातील काहीही माहित नसते व जमतही  नाही. तेथे २-३ वेगवेगळे सहकारी इंजिनिअरला मदत  करायला असतात  . ज्याचे काम  तोच  ते काम करेल आणि निघून जाईल . ह्याऊलट   सर्वच जर्मन इंजिनिअर. कोणतेही काम करतात . ते. Jack of  All and Master of the Subject असे असतात . हार्टमन हा असा इंजिनिअर होता .  अशी माणसं आपल्या सहवासात असली की आपण त्यांच्यापासून  खूप काही   शिकत असतो आणि  लवकरच तसे तज्ज्ञ होतो. आपण त्या विषयात सहज पारंगत होतो. तंत्रज्ञान हे असे अवगत करावे लागते. असा हा हार्टमन . तसा  दिलखुलास  माणूस. त्याच्या व्यक्तिमत्वाला एक दुःखी  छटा होती . त्याचा डायव्हर्स झालेला होता . त्याची मैत्रीण त्याला सोडून निघून  गेली. पुन्हा लग्न करायचा त्याचा विचारच नव्हता . तसे जर्मनीत डायव्हर्सचे प्रमाण बरेच आहे. तेथील कुटुंब व्यवस्था ढासळते आहे असे म्हणतात . तरीही इतर युरोपपेक्षा परिस्थिती अधिक बरी आहे. ही माणसं अशी एकांडी होतात आणि त्यांचे जगणे अवघड होत जाते . अर्थात हे मला समजले जेंव्हा आम्ही चांगले मित्र झालो होतो . असा हा तंत्रज्ञ  हार्टमन  . हा माझा एक मित्र. मी त्याला कधीच विसरणार नाही.
माझा सहकारी अवसरे , बावडेकर , मी नरेंद्र गंगाखेडकर , श्रीनिवासन ( इडीपी मॅनेजर ) आणि  र्हाइनहार्ड 

ऱ्हाईनहार्ड  हा अतिशय तरुण इंजिनिअर माझ्या सहवासात आला. २-३ कलर सिस्टीम इन्स्टॉल करण्यासाठी तो भारतात आला होता . नुकताच इंजिनिअर झाला होता. अतिशय तरुण मुलगा . फारसा अनुभव पाठीशी नसलेला . पण अतिशय प्रयत्नवादी , लॉजिकल विचार करणारा. थोडासा रागीट . एकदम चिडणारा  .मूळ  जर्मन . फारसा मैत्री न करणारा . आपण आणि आपल्या कामात रमलेला . त्याच्याबरोबर काम करणे थोडेसे अवघड होते . युरोपमधील इतर देशातही त्याच्याबद्दल तक्रारी ऐकलेल्या होत्या , असे ऐकले होते .शेवटी तो नोकरी सोडून दुसऱ्या कंपनीत निघून गेला . त्यावेळी कुमाशियाह ह्या युगोस्लाव्हियाच्या इंजिनिअरने त्याची जागा घेतली आणि एका भारतभेटीत ह्याची आणि माझी भेट झाली . तो भारतात कलर सिस्टीम इंस्टाल करण्यासाठी दोन तीन वेळा आला होता .अतिशय शांत स्वभावाचा . पूर्व युरोपातून हा पश्चिम जर्मनीत शिकायला आलेला. त्यानंतर जर्मनीतच नोकरीला लागलेला . मी त्याला पहिल्यांदा त्याच्या पूर्वयुरोपातील जीवनाबद्दल सहज विचारले. त्याने तेथील अनेक कटू अनुभव सांगितले . पण जर्मनीतही त्यांना दुय्यम स्थान मिळत होते असे त्याचे मत होते . तो कामात प्रवीण होता . काम मन लावून करीत असे. त्याचे लग्न झाले होते. त्याची बायको जर्मन होती. तिचा स्वतःचा छोटासा व्यवसाय होता. ती ब्रिटनला कपड्याच्या  वस्तू विकत असे. तो तंत्रज्ञ होता . दिलेल्या कामात चोख असे. माझ्या बरोबरचे इंजिनिअर त्याच्याकडून खूप शिकले. त्यावेळी भारतीयांना पूर्व युरोपमध्ये प्रवास करणे कठीण होते. व्हिसा मिळणे  तर फारच कठीण.कुमशीयाह नंतर कधी भेटला नाही . पूर्व युरोपिअन माणूस जवळून समजला तो त्याच्यामुळेच.
सॉफ्टवेअर  इंजिनिअर आणि ट्रेनर कुमशियाह , युगोस्लाव्हीयन 

आयव्हॅन गॅरट टेक्सटाईल केमिस्ट असलेला व मला भेटलेला एक अमेरिकन तंत्रज्ञ  .तो एकदा अहमदाबादच्या टेक्स्टाईल कम्पनीच्या कलर सिस्टीमसाठी भारतात आला होता . तो टिपिकल अमेरिकन होता  . अमेरिकेशिवाय दुसरे काही जग आहे , हे त्याला माहीतच नव्हते. त्याला केवळ अमेरिकन व्यवस्था  माहित होती .भारत आणि त्यातही अहमदाबादचा प्रवास त्याच्यासाठी पहिल्यांदाच होता. त्याच्यासाठी हे सर्व अगदी नवीन आणि मनोरंजक होते. त्याचे नशीब बघा. त्यावेळी पावसाळ्याचे दिवस होते . जोरदार पाऊस होता . अहमदाबादची धावपट्टी दिसत नव्हती . ढग खाली उतरले होते . मुंबई - अहमदाबाद हे आमचे विमान ३ वेळा उडाले आणि तीन वेळा अहमदाबादला  न उतरताच मुंबईला परत आले. तो ह्या प्रवासाने घाबरून गेला . शेवटी आम्ही एक दिवस मुंबईत राहून अहमदाबादला  कसे तरी पोहोचलो. आमचा तेथे दोन दिवस मुक्काम होता. टेक्स्टाईल कम्पनी मोठी होती. काम करणारे लोक तज्ज्ञ होते. त्यांनी तंत्र खूप लवकर शिकून घेतले. आम्ही मुंबईला परत आलो आणि तो अमेरिकेला निघून गेला. जाताना मला म्हणाला , ' I  love  India . I like Mumbai and people from Ahemedabad . I would certainly like to visit India again .' त्यानंतर त्याला भारतात  येण्याची संधी मिळाली नाही. असा हा एक हुशार अमेरिकन तंत्रज्ञ.
अशी ही परदेशी माणसं . मला कामामुळे भेटत गेली. एकदा तुम्ही जगाशी जोडत गेला की नवी नवी माणसं  भेटत राहतात. काही लोकांशी व्यावहारिक संबंध संपला  की आपण त्यांना विसरून जातो. त्यातील  काही लोक आठवणीत राहतात कारण आपण त्यांच्याकडून नकळत काहीतरी शिकत राहतो आणि जगाशी जोडले जातो. देशी असो का परदेशी , माणसं  सगळी सारखीच .प्रत्येकाच्या  स्वभावाच्या छटा वेगवेगळ्या .त्यांच्यातील  देशी बदल सहज दिसून येतातच . एकमात्र खरे , आपण त्यांच्या सहवासामुळे  हळूहळू  थोडे बदलू लागतो . तेही आपल्यामुळे बदलतात . अशी काही बदललेली परदेशी माणसं  मी पाहीली  आहेत . त्याबद्दल लिहिणार आहे . 

Thursday, August 13, 2020

माणसं : सोल्जर सिस्टीम

माणसं : देशी - विदेशी
मी १९७८ नंतर माझ्या कामानिमित्त युरोप - अमेरिकेचा खूप प्रवास केला. मी सुरुवातीला एका अमेरिकन कंपनीचा  प्रतिनिधी होतो. त्यानंतर इटालियन , ब्रिटिश , तैवानी , स्विस , जर्मन ह्या लोकांच्या बरोबर व्यवसायामुळे संबंध आले. अनेक सेल्स परिषदांमध्ये जसा भाग घेतला तसाच तांत्रिक आणि वैज्ञानिक परिषदांमधून नुसता भागच घेतला नाही तर संशोधन केलेल्या विषयावर पेपर्स वाचले आणि अनेक  चर्चासत्रात विशेष भाग घेतला. काही परिषदांमध्ये मला माझे अनुभव सांगण्यासाठी बोलावण्यात आले होते . दर दोन तीन वर्षाने मी परदेशात जातच असे. त्यावेळी परदेशी जाणे तसे कठीणच होते .पासपोर्ट-व्हिसा मिळवणे म्हणजे महाकठीण काम असे . त्यासाठी बरेच पेपरवर्क करावे  लागत असे . आपल्याला आलेली निमंत्रणे दाखवावी लागत. अडचण असे ती  रिझर्व्ह बँकेकडून परकीय चलन मिळविण्याची .त्यासाठी अनेक कागदपत्राची पूर्णता करावी लागे . ती केल्यानंतर ऐन निघण्याच्या दिवशी परकीय चलन हातात पडत असे. ते तसे मोजकेच असे व फार सांभाळून खर्च करावे लागत असे. असाच  एक अनुभव सांगतो. मी सुरुवातीला ज्या कंपनीत काम करीत असे त्या कंपनीच्या मालकाबरोबरच अमेरिकेला गेलो होतो. त्यावेळी कंपनीतर्फे माझी सर्व व्यवस्था केली जात असे , त्यामुळे मला स्वतःला परदेश प्रवासासाठी कसलाही पत्रव्यवहार करायचे काम नव्हते .मी प्रोफेसर बिलमेअर ह्यांच्या रंगतंत्रज्ञान विषयाच्या 3 अभ्यासक्रमासाठी जात होतो व त्यानंतर माझ्या कंपनीचे मालक - डायरेक्टर आणि मी काही कंपन्यांना भेटी देऊन तेथील टेक्नॉलॉजी बघून आपल्यासाठी काही उपयुक्त आहेत  का ?, ह्याची चौकशी करणार होतो. आम्ही दोघे न्यूयॉर्कला भेटलो. एकाच हॉटेलमध्ये राहिलो. तेथून प्रिन्स्टनला रेल्वेने गेलो. दिवसभर दोन कंपन्यांना भेटी दिल्या. रात्री हॉटेलवर परत आलो आणि जेवायला बाहेर पडलो. अशाच एका हॉटेलमध्ये जेवण केलं . आणि नंतर रूमवर पोहोचलो.त्यापूर्वी आम्ही खाली गप्पा मारीत असताना त्यांनी दिवसभराचा आमच्या दोघांच्या खाण्यापिण्याचा आणि प्रवासाचा खर्च लिहिला आणि मला अर्धे पैसे देण्यासाठी सांगितले. मला त्यांचा मनातून राग आला. आपण एका उद्योगप्रमुखाबरोबर जात आहोत आणि हा गृहस्थ आपल्याला खर्च विभागून मागतो आहे. नंतर काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की परदेशात जाताना प्रत्येकाला  त्याच्यापुरतेच परकीय चलन मिळत असते .ज्याचे त्याने स्वतःचे चलन खर्च करायचे असते. मग हा मालक आपल्यासाठी असा कसा खर्च करील ? नंतर अमेरिकेत आणि युरोपमध्ये 'सोल्जर सिस्टीम' प्रमाणेच ज्याचे त्याला  पैसे खर्च करावे लागत असत,  ह्याचा खूपदा अनुभव घेतला. परिषदांमधून एखाद्या ग्रुपबरोबर असे काही केले की लगेच सगळ्यांनी सारखे खर्चाचे पैसे वाटून घेणे चालूच असे.
डाव्या बाजूला मी , नरेंद्र गंगाखेडकर. टेरी  डाऊन  ह्यांच्या बाजूला .
विली  कॉर्नेलियसच्या बाजूला डॉन  हॉल  , कंपनीचे अध्यक्ष 

असाच एक अनुभव मला स्विट्झरलँडमध्ये आला .अशीच एक सेल्स कॉन्फरन्स होती. सर्व युरोपातील प्रतिनिधी आले होते . अमेरिकन कंपनीचा डायरेक्टर ही एक मोठी श्रीमंत असामी होती   . त्याचे नांव डॉन हॉल . ते  आमच्या बरोबरच फिरत होते .आम्ही अर्धा दिवस  होता म्हणून बाहेर फेरफटका मारायला निघालो होतो . तेही आमच्याबरोबर निघाले होते . त्यांना काय  ?कोणत्याही गाडीतून कुठेही फिरणे सहज शक्य होते. आम्ही  रात्री हॉटेलवर परत आलो तर त्यांनी सर्वांचा दिवसभरचा  खर्च विचारला ?   तो आपण सगळेजण  सारखा वाटून घेऊ यात , असे ते म्हणाले .कोणाएकाला त्रास नको. असे त्यांनी सर्वांना सांगितले .अशी ही 'सोल्जर सिस्टीम' पाळणारी मोठी श्रीमंत माणसे. ही वृत्ती आपणही  जपायला पाहिजे. आपले नातेवाईक / मित्रमंडळी हे हीच गोष्ट टाळत असतात म्हणून माझ्या हे  अधिक लक्षात येते.
परदेशात अनेक माणसं भेटली. त्यांचा कळत नकळत प्रभाव पडत गेला. खूप काही शिकयला मिळालं . त्यांचे असे अनेक किस्से मला सांगता येतील.
एका परिषदेत सेमिनार घेताना टेरी  डाऊन . जगातील अनेक देशाचे प्रतिनिधी नवे तंत्रज्ञान समजून घेताना 

असाच एक माणूस . टेरी डाऊन . मी त्यांना १०-१२ वर्षे ओळखतो आहे. सुरुवातीला भेटलो तेंव्हा ते सॉफ्टवेअर मॅनेजर होते . खूप हुशार तंत्रज्ञ. संगणकात दर २-३ वर्षात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बदलत असतात. रंगतंत्रज्ञानात असेच बदल होतात. गणिती समीकरणेही  वेगळी मांडली  जातात. त्यामुळे रंगतंत्रज्ञान म्हणजे कम्प्युटर कलर सिस्टीम दर २-३ वर्षाने बदलत जाते. नवे तंत्रज्ञान नेहमी पुढे येते. टेरी डाऊन ह्यांनी  हे सर्व जवळून बघितले होते  आणि तसे बदल  त्यांनी घडवून आणले होते. टेरी पुढे कम्पनीचे व्हाईस प्रेसिडेंट आणि  प्रेसीडेन्ट झाले . ह्याची माझी दर दोन- तीन वर्षाने भेट होत असे . त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं . तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अशा दोन्ही गोष्टी मी त्यांच्या कडून शिकलो .तसे ते पक्के सेल्समन होते .नुसते गोडबोले नव्हते .  ते तंत्रज्ञान विक्रेते होते . अगदी सोप्या भाषेत ते विषय समजावून  सांगत असत . सेमिनार कसा घ्यायचा?, हे त्यांना चांगले  अवगत होते. तंत्रज्ञान विक्रेत्याने निरनिराळ्या पातळ्यांवर असलेल्या लोकांशी कसा संवाद साधायचा ,हे मी त्यांच्याकडून शिकलो . टेक्स्टाईल कंपनीचा मालक असो की लॅब मधला केमिस्ट असो , त्यांना आपला विषय नीट समजला पाहिजे .तरच ते हे तंत्रज्ञान आपल्याकडून विकत घेतील किंवा त्याची नीट माहिती करून घेतील. मग हेच ते  लोक ह्या तंत्रज्ञानाचे आपले विक्रेते होतील असे ते म्हणाले .हे मी प्रथम त्याच्याकडून शिकलो. ते फार अतिशय हजरजबाबी होते . ते निखळ विनोद सहज करीत असत . ते अगदी सौम्य स्वभावी  होते. लोकांच्यामध्ये मिसळणारे होते  . गर्व नसणारे होते .पुढे  बऱ्याच वर्षांनी त्यांची  एका परिषदेत भेट झाली. लहानखोर दिसणारा हा माणूस आतां  थोडा वयस्कर दिसू लागला होता .मी त्यांना सहज  चेष्टेने म्हणालो , ' You are looking very old '. ते माझ्याकडे बघून हसले  आणि मला पटकन म्हणाले ," This is  not really true. I am looking old because my daughter is making  me old'. मग  माझ्या पटकन लक्षात आलं की मीही असाच वयस्कर दिसू लागलो आहे . त्याचे कारण माझ्या मुली मोठ्या होऊ लागल्या आहेत. त्यानंतर मी मुलींना नेहमी  म्हणत असेकी   ' मी म्हातारा होतो आहे त्याचे कारण तुम्ही मुली   मोठ्या  होत आहेत  व मला  म्हाताऱ्या  करीत आहात  '. तसे पाहीले  तर हे एक सत्य असते .टेरी  हे अगदी सहज बोलून गेले . ते वाक्य कायमचे माझ्या लक्षांत  राहिले . आपली मुले आपल्याला म्हातारी करीत असतात  तर आपली नातवंडे आपल्याला लहान मूल बनवितात. जगात सर्वानाच हा अनुभव येत असतो . तो अमेरिकन असो वा  भारतीय. टेरी डाऊन ह्यांनी मात्र हे माझ्या लक्षांत अगदी सहज आणून दिले. आपण जगतांना  असेच शिकत असतो दुसऱ्यांच्याकडून .
मी डॉ नरेंद्र गंगाखेडकर आणि कंपनीचे सीईओ  बोरिस मोमीरॉफ 

बोरिस मोमीरॉफ आणि त्याची पत्नी असेच ओळखीचे झाले .बोरिस हा कम्पनीचा प्रमुख होता. तरुण आणि खूप उत्साही माणूस .आक्रमक आणि सडेतोड. त्यांची पहिल्यांदा  ओळख झाली ती त्यांनी  केलेल्या प्रेझेंटेशनमुळे. चर्चासत्रात सर्वच तसे धीरगंभीर असतात  . ही मंडळी खुलतात ती संध्याकाळच्या डिनर कार्यक्रमाला. बोरीसची बायको संध्याकाळच्या डिनर कार्यक्रमाला आली होती. अमेरिकेत डिनर संध्याकाळी ६ वाजता सुरु करतात. पिण्याचा  कार्यक्रम हा तसा डिनर नंतरच  सुरु होतो. तेथे गप्पाष्टक अधिक रंगतात . माझा होस्ट होता बोरिस आणि त्याची पत्नी. मी एकटा भारतीय. बाकीचे अमेरिकन .

 बोरीसची पत्नी  एक पुढारलेली अमेरिकन स्त्री .नव्या वळणाची , स्त्रीमुक्ती चळवळीतून  पुढे आलेली अमेरिकन स्त्री  . आमच्या अशाच गप्पा चालल्या होत्या . मी पडलो भारतीय .म्हणजे तसा मागासलेलाच . माझी बायको फारशी शिकलेली नसणार असे तिला वाटले असणार . कदाचित ती अशिक्षित असेल असे तिला वाटलेले असणार .  तिला आपल्या देशातील  स्त्रिया कशा सुधारलेल्या असतील असे वाटले असणार ?  तसे पाहीले  तर त्यांच्यासाठी भारत म्हणजे एक मागासलेला देश . तिचा तसाच समज झालेला होता .म्हणून तिने माझ्या स्वतःविषयी माहिती विचारण्यास सुरुवात केली. आणि दोन मिनिटात तिचा आवाज बसला . माझी बायको ही एक उच्च पदवीधर स्त्री आहे . ती  महाविद्यालयात पदार्थविज्ञान हा विषय शिकविते. हे ऐकल्यावर तिला नुसते  आश्चर्यच वाटले नाही तर भारतातील स्त्रिया इतके शिकलेल्या आहेत हेच खरे वाटत नव्हते.  तसे अमेरिकन असूनही तिचे स्वतःचे शिक्षण फारसे झालेले नव्हते .अमेरिकेतील स्त्रीमुक्ती आंदोलन हाच तिचा बोलण्याचा मुख्य विषय होता . विषय बदलण्यासाठी बोरिस  तिला म्हणाला, ' आतां  तुला माझ्याबरोबर भारतात यावे लागेल आणि डॉक्टरच्या बायकोकडून  काही नवे शिकावे लागेल'. त्यानंतर मात्र आमच्या जेवणात स्त्रीमुक्तीचा विषय पुन्हा निघाला नाही. आजही अमेरिकेतील  तेथील लोकांचे वैवाहिक जीवन तसे भरकटलेलेच दिसते आणि तुलनेने तेथील  स्त्रिया फार मोठ्या प्रमाणावर खूप शिकलेल्या दिसत नाहीत. माझी बायको आणि माझ्या दोन मुली उच्च विद्याविभाषित तर आहेतच पण त्या मोठ्या अधिकारावर नोकऱ्याही करतात , पैसेही कमवितात . त्यांना स्त्रीमुक्तीच्या  चळवळीचा  झेंडा हाती घेऊन काम करावे लागले नाही. अर्थात असे सर्व भारतीय स्त्रियांसाठी असते असे नाही. प्रवासात  अशी माणसं  भेटतात आणि तेथील समाजातील अंतरंग आपल्याला  दिसू लागते . अर्थात आपणही आपल्या समाजाचे छोटेसे अंग असतोच .