Friday, December 13, 2019

लंबक कुठे झुकतोय ?



मकरंद जोशी ह्या सयोंजकानी दीपावली अंकात घडवून आणलेली चर्चा.  भारतीय आणि जागतिक - राजकारणाचा एकूण लंबक डावीकडून उजवीकडे झुकतोय असे जाणवल्यामुळे घडवून आणलेली चर्चा. सर्व लेखक डाव्या किंवा समाजवादी विचारसरणीकडे झुकलेले .उत्तम कांबळे ह्यांना समाज धर्माच्या नावाने हळवा बनत चालला आहे असे वाटते .त्यांनी आरक्षणावर खूप सडेतोड विचार मांडले आहेत . बाकीचे विचार फारसे पटणारे नाहीत . मी त्यांचे मार्क केलेले लिखाण अवश्य वाचा.
जयदेव डोळे ह्यांना मी ते तरुण असताना केलेल्या युक्रांद चळवळीपासून ते जर्न्यालिझमच्या प्राध्यापकी पर्यंत ओळखतो . डावे- समाजवादी कल असलेले. त्यांनी मोदींचा उदय कसा झाला ?,आणि आजचा मध्यमवर्ग त्यास कसा जबाबदार आहे? समाजवाद्यांची - डाव्या विचारसरणीची पीछेहाट होण्यास सुखवस्तू मध्यमवर्ग जबाबदार कसा जबाबदार आहे? ,  असा विचार मांडताना समाजवादी लोकांचे काय चुकत गेलं ह्याचा आढावा घेतला असता तर अधिक चांगलं झालं असतं . त्यामुळे त्यांचे मुद्दे पटत नाहीत.
हेमंत देसाई , पूर्वी मटाचे लेखक-पत्रकार . डाव्या विचारसरणीचे . जगभराच्या राजकारणाचा धांडोळा घेतलाय .अति डावे - अति उजवे ह्याबद्दल लिहिलंय . कम्युनिस्ट राजवटीत हुकूमशहा कसे झालेत आणि त्यांनी मार्क्सला कसं मागे टाकलं , ह्या बद्दल लिहिलं असतं तर...!  कम्युनिझम जगातून कसा नाहीसा झाला ?,हे न सांगता उजव्यांना ठोकून काढण्यात लेखाची लांबी वाढवली . डावे किंवा समाजवादी कुठे चुकतात हे न सांगता उजव्यांना ठोकण्यात अर्थ तो काय?  कंबोडियाची कम्युनिस्ट हुकूमशाही राजवट , सोव्हिएत युनियनचे विघटन , चीनच्या  माओनंतर आजचा नवा भांडवली माओ , व्हिएतनाम मध्ये होत असलेले बदल आणि भारतात निष्प्रभ झालेली कम्युनिस्ट चळवळ ह्याचा कुठेच उल्लेख नाही . त्यामुळे लेख प्रभावी झाला नाही.
अच्युत गोडबोले तरुणपणी कम्युनिस्ट होते . नंतर आयटीत सीईओ होते. मोदी सरकारच्या तीन वर्षाचा आढावा घेताना त्यांच्यातील डावी विचारसरणी जागी झाली आणि त्यांनी मोदींच्या अर्थकारणावर टीकात्मक लिहिलं. राजकारणावर त्यांनी खूप दिवसांनी लिहिलं असावं.
विश्वास पाठक हेच एक उजव्या राजकारणाचे प्रतिनिधी . त्यांनी भाजपचा बाजूने लिहिणे स्वाभाविकच आहे. काही ठोस मुद्दे मांडायला ते विसरले नाहीत. रवी आमले उदारमतवादी शहाणीव ह्याबद्दल लिहिताना उजव्यांना ठोकत होते.
पाठक सोडले तर सगळे डाव्या- समाजवादी वृत्तीचे . ह्या पुरोगामी - समाजवादी लेखकांना - डाव्या विचारसरणीचे लोक आणि पक्ष का मागे पडत आहेत? ,  त्यांचे कुठे चुकत आहे?, उजवे का सबल होत आहेत ?, व काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस का येत नाहीत ?, किंवा चांगला पर्याय का उभा राहात नाही?, ह्या विषयाचे चिंतन कोणीही केलेले नाही. ह्यावर चर्चा व्हावी हे नक्की. झापड लावून लिहिल्यामुळे मुद्दे पटत नाहीत.
काही लेखांचे मुद्दे सोबत जोडतो आहे.

No comments:

Post a Comment