Saturday, October 19, 2019

तिरू कोनेश्वरम


तिरू कोनेश्वरम , श्रीलंका 

श्रीलंकेच्या दौर्यावर होतो . कोलंबोला उतरलो .तेथून  १६२ मैलावर असलेल्या त्रिंकोमाली  ( गोकर्ण ) ह्या शहराकडे निघालो . रस्ता सुंदर होता . हिरवागार निसर्ग होता . पहिल्याच प्रवासात श्रीलंका खूप आवडले.

कोलोंबोचा समुद्र किनारा  

श्रीलंका म्हणजे लंकाधिपती रावणाचे एकेकाळचे राज्य . मुख्य रामायण  येथेच घडले . रावण हा श्रीलंकेत व्यापारी  म्हणून आला .म तो सुरवातीला चांचेगिरी करीत असे . नंतर आयात-निर्यात  व्यापार करू लागला आणि एक दिवस येथील राजा झाला. व्यापार करण्यासाठी येथे आला आणि प्रथम स्थाईक  झाला ते गोकर्ण ह्या नैसर्गिक बंदर असलेल्या शहरात. गोकर्णचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे . सोनेरी वाळूचा हा निसर्गरम्य किनारा. सुनील नभ हे , सुंदर नभ हे ...., सुनील सागर , सुंदर सागर.... असेच ह्वया किनार्याचे वर्णन करता येईल . संध्याकाळी ह्या शहरात पोहोचलो . अतिशय सुंदर अशा रिसोर्टमध्ये मुक्काम केला. संध्याकाळ फार  मजेत गेली . दुसरेदिवशी पासून भ्रमंती सुरु होणार होती, रामायण जेथे  जेथे घडले त्या त्या ठिकाणी भटकून येण्याचे ठरविले होते. गोकर्ण हे पहिले ठिकाण.
सुनील नभ हे , सुंदर नभ हे , नभ हे अतलची अहा
सुनील सागर , सुंदर सागर , सागर अतलची अहा 
दुसरे दिवशी सकाळी निघालो . आम्ही प्रथम निघालो सिगीरीयाकडे ( सिंहगिरी ).  कुबेराची  ही राजधानी . तो येथील मोठा आयात - निर्यात करणारा मोठा  व्यापारी . तो नंतर येथील राजा झाला . सिगीरीयात  एका उंच डोंगरावर त्याने स्वतः चा महाल उभा केला होता  . तेथे त्या  उंच पाषाणावरील महालात जाणे तसे फारच कठीण .

सिगीरीया 
 रावण सुरवातीला येथे कधीच आला नव्हता. त्याचा व्यापार गोकर्णहून चालत असे . मग  तो कुबेराचा  उजवा हात झाला आणि एक दिवस तो त्याचा सैन्यप्रमुख  झाला . त्याच्या मेघदूत ह्या  पंतप्रधानाला कटकारस्थान करून मारल्यानंतर कुबेराचाच पंतप्रधान झाला आणि काही वर्षांनी  त्याचेच  राज्य ताब्यात घेतले . आमच्या गाईडने आमची गाडी मध्येच एका ठिकाणी थांबवली . ते होते तिरू कोनेश्वरम देऊळ  . ऋषी  विश्वामित्रांचा आश्रम येथेच होता . अगस्ती ऋषींनी हे देऊळ बांधले होते . प्रभू रामचंद्राने येथेच  भगवान शंकराची पूजा केली होती आणि  रावणवध करण्याची  शपथ घेतली होती ,असे म्हणतात.
सिगीरीया महालाकडे जाणारा रस्ता 
विश्वामित्राचे वास्तव्य कोनेश्वर मंदिरातच असे . ते भगवान रुद्राचे पूजक होते . हे मंदिर अतिशय भव्य आणि सुंदर आहे . हे पुराणकालीन मंदिर खूपच  देखणे आहे. समुद्रकिनारीच असलेले हे मंदिर म्हणजे एक  पुराणकालीन ठेवा आहे . बंगालच्या  उपसागराच्या नयनमनोहर लाटा वेगाने येऊन त्या मंदिराच्या भिंतीवर आदळत असतात . आजूबाजूला दाट जंगल आहे .येथे  वन्यपशू मुक्तपणे फिरतात . हरिणे खूप दिसतात.
पुराणकालीन कोनेश्वर मंदिर 
ह्या मंदिराबद्दल तशा  खूप कथा प्रचलित  आहेत . अशीच एक कथा ...आपल्याला  खूप काही सांगून जाणारी .. मला आवडलेली ... रामायण घडविणाऱ्या विश्वामित्रांची .....
कोनेश्वर मंदिर
कैकेसी ही रावणाची आई .ती रुद्रभक्त .ती गोकर्णला मुलाकडे रहात होती.  तिला विश्वामित्रांना भेटायचे होते .अशीच एका दिवशी कुंभकर्ण ह्या आपल्या धाकट्या मुलाला घेऊन ती कोनेश्वरला आली. त्या मंदिरातील धर्मशाळेत ती उतरली . तिचे पती ऋषी  विश्रवा ह्यांच्या आश्रमात ती विश्वामित्रांना २ वर्षापूर्वी  भेटली होती . अरीष्ट्नेमी हा त्यांचा उजवा हात होता .तिची आणि अरीष्ट्नेमीची चांगलीच ओळख होती. ती त्याला भाऊच मानीत असे . तिने अरीष्ट्नेमिला विश्वामित्रांची  भेट घडवून आण अशी कळकळीची विनंती केली. अरीष्ट्नेमीने तिला थोडे  बसण्यास सांगितले आणि तो  ऋषी विश्वामित्रांच्या कुटीत  गेला . त्यां दोघांचे बोलणे चालू होते . ते बोलणे  कैकेसिला  बाहेर ऐकू येत होते .विश्वामित्र कोणालाही भेटण्याच्या मन:स्थितीत नव्हते . त्यांना कोणालाही भेटण्याची इच्छा नव्हती . कैकेसीला थोडा अंदाज आला . ती कुंभकर्णाला घेऊन सरळ  त्यांच्या कुटीत  गेली आणि विश्वामित्रांच्या पुढे उभी राहिली.
नंदीची भव्य मूर्ती 

विशावामित्रांचे लक्ष तिच्याकडे गेले . त्यांच्या लगेच लक्षात आले की ही तर विश्रवा ऋषींची पत्नी . त्यांच्या हे ही लक्षात आले की त्यांच्या आजोबाच्या  एका शिष्याची ती  नात आहे . तिला पाहून त्यांची थोडी चिडचिड झाली . त्यांच्या  काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या . ते लगेच म्हणाले , ' हे बघ कैकेसी , तुझ्या आजोबांनी माझ्या वडिलांच्या मृत्युनंतर आम्हाला खूप त्रास दिला आहे . मला त्या जुन्या गोष्टी आठवून खूप त्रास होतो आहे . तुला भेटावे असे मला वाटत नाही.'.
हिंदी महासागर- बंगालचा उप्म्हसागर  

कैकेसी थोडी हिरमुसली . त्याच वेळी छोटा कुंभकर्ण चुळबुळ करीत होता . तो ६ वर्षांचा होता पण दिसायला  मोठा वाटत होता . थोडा कुरूप होता . त्याचे  केस लांब वाढलेले व अस्ताव्यस्त  . त्याच्या खांद्यावर अजून दोन हात आलेले . काही  जखमांचे व्रण दिसत होते . त्याचे  कान ही आकाराने  खूपच मोठे आणि विचित्र आकाराचे होते  . तो नागा आहे असे लोक म्हणत होते . तो  आर्य वाटत नव्हता . दिसायला अगदी वेगळा आणि कुरूप . त्याचे ते वेगळे दिसणे विश्वामित्रांच्या लक्षात आले . विश्वामित्र हे तसे  सुऱ्हदयी होते . ज्यांना काही व्यंग असते त्यांच्याबद्दल त्यांना विशेष  सहानुभूती असे. ते कैकेसीकडे पाहून उद्गारले ,' किती गोड आहे हा मुलगा !'  माता  कैकेसी थोडीशी आनंदली आणि म्हणाली , ' हो ! माझा कुंभ गोडच आहे !' . विश्वामित्रांनी कुंभकर्णाला जवळ घेतलं , कुंभकर्ण थोडासा  ओशाळला. कैकेसीला थोडा आनंद झाला, विश्वामित्रांनी कुंभकर्णाच्या डोळ्यात पाहिलं आणि त्याला  प्रेमाने जवळ घेतलं  आणि ते त्याच्याकडे बघून  थोडेसे हसले . त्यांच्यासमोर लाडवाचे ताट होते . त्यातील एक लाडू त्यांनी कुंभकर्णाला दिला . त्याला लाडू आवडतच होता , त्याने एका दमात अधाशासारखा तो लाडू खाऊन टाकला . विश्वामित्रांना त्याने  दुसरा लाडू मागून घेतला आणि तोही  एका दमात  फस्त केला  . कैकेसीला  आपल्या मुलाचा हा  हावरटपणा आवडला नाही .
मंदिराच्या आजुबाहुला दाट जंगल - हरणाचा कळप 
कैकेसी उभी राहिली आणि विश्वामित्रांच्या पाया पडू लागली . ती  ऋषींना म्हणाली , ' हे ऋषी , माझ्या ह्या मुलाकडे बघा . त्याचे हे जास्तीचे आलेले दोन हात  , हे     मोठे आणि विचित्र आकाराचे  कान आणि ह्या त्याच्या  चिघळलेल्या जखमा.  ही कसली व्याधी झाली आहे ह्याला . हे कशामुळे होते  ? त्याच्यावर एखादा उपाय सांगा ना ! मी त्यासाठीच तुमच्याकडे आले आहे .' 
विश्वामित्र कैकेसीकडे पाहून म्हणाले ,' हे असेच असतं . हे एक  व्यंग आहे . काही लोकांना अशी अनैसर्गिक वाढ होत असते . त्यावर उपाय असा काहीच  नाही. तो  नागा आहे . जर त्याला रक्तस्त्राव झाला आणि वेदना झाल्या तर त्याचा मृत्यू जवळ येईल .'

कैकेसी घाबरून गेली . ती म्हणाली ,' तुम्ही तर आयुर्वेद तज्ञ आहात , काहीतरी उपाय सांगा '. विश्वामित्र तिला म्हणाले ,' ह्यावर काहीही  उपाय नाही . तरीही मी एक औषधी देतो . त्यामुळे त्याच्या वेदना थांबतील . रक्तस्त्राव थांबेल आणि त्याचे आयुष्य वाढेल . त्या औषधाचे नांव आहे   अगस्त्यकुटम . विश्वामित्रांनी अरीष्ट्नेमिला हांक मारली आणि ती औषधी  कैकेसिला देण्यास सांगितली. कैकेसी खूप आनंदली. तिच्या डोळ्यात पाणी आलं . ती नमस्कार करताना त्यांना म्हणाली , ' माझा मोठा मुलगाही असाच  नागा आहे . तो ही असाच दुर्दैवी आहे . त्यालाही  अशाच वेदना होत असतात . त्यालाही असेच वाढलेले अवयव आहेत '. विश्वामित्रांना त्यात  फारसे आश्चर्य वाटले नाही . त्यांना खरं म्हणजे हे आधीच  माहित होते . ते तिला म्हणाले , ' त्याचे नांव रावण आहे ना !  . तो मोठा चाचेगिरी करणारा खलाशी आहे  ना ! तो आयात - निर्यात व्यापार करतो . कुबेराचा तो उजवा हात आहे .  '
ती त्यांना म्हणाली , ' हो , ते खरे आहे , माझ्या पतीने तर मला सोडून दिले आहे .  तो तर परदेशी गेला आहे .मला सोडून दिले आहे . परदेशी  जाऊन त्यांनी तिकडे दुसरे लग्न केले आहे . मी ही अशी अभागी . आम्हो सध्या  वाईट परिस्थितीत दिवस काढतो आहोत . रावण खलाशी  आहे . त्याच्या २०० बोटी आहेत . तो आयात -निर्यात  करून पैसे मिळवतो. तो  दुसरे काय करणार ?  आम्हाला भरतवर्ष सोडून येथे  यावे लागले .तो स्वत:च्या हिंमतीवर व्यापार करतो'. विश्वामित्र तिला म्हणाले , ' काहीही काळजी करू नकोस . रावण खूप  हुशार आहे , मेहनती आहे , कार्यक्षम आहे , डोकेबाज आहे , बुध्दिमान आहे , योद्धा आहे .त्याचे स्वतः: चे असे  ध्येय आहे . तो त्याच्या  ध्येयासाठी लढतो आहे . तो ह्या भरतवर्षाचे  एक स्वप्न पूर्ण करणार आहे . ही माझी भविष्यवाणी आहे . तू काळजी करु नकोस . मी त्याच्यासाठीसुद्धा औषधी देतो '. कैकेसीच्या डोळ्यात पाणी आले . ती उठली . त्यांना नमस्कार करताना विश्वामित्रांनी तिच्या मस्तकावर आशीर्वादाचा हात ठेवला . ते तिला म्हणाले , ' हे सर्व कठीण आहे .तू  धीर धर . सर्व व्यवस्थित होईल . माझी औषधी लागू पडेल . त्या दोघांना  लवकर मरण येणार नाही '. 
कैकेसी कुंभकर्णाला घेऊन बाहेर पडली . अरीष्ट्नेमी विश्वमित्रांच्याकडे बघून म्हणाला ,'
गुरुवर्य , तुम्ही असे का केले ? रावणाला अशी औषधी  का दिली ? तो तर राक्षसी आहे ? तो क्रूर आहे . तो  आता अधिक क्रूर होणार !' 
विश्वामित्र त्याला म्हणाले  , ' हे वत्सा , तू  काही काळजी करू नकोस . प्रत्येकाचे एक आयुष्य असते . त्याचे एक जीवितकार्य असते . त्यासाठी परमेश्वराने त्याला येथे पाठविलेले असते . रावण हा एक शिवभक्त आहे . तो त्याचे परमेश्वराने दिलेले कार्य  पूर्ण करणार . तो आपल्या कामाला येणार आहे .  मला त्याचा उपयोग होणार आहे . काही  वर्षांनी एका नव्या विष्णूचा अवतार येणार आहे . त्याला दोन कार्ये   पूर्ण करावयाची आहेत . 
पहिले कार्य म्हणजे महादेवाला म्हणजे रुद्राला एक  मदतनीस हवा आहे . रावण हा रुद्राचा भक्त असेल . तो नष्ट करेल ह्या  जगातील दुष्टपणा .
दुसरे कार्य म्हणजे ह्या पृथ्वीवर एक  नवा विष्णू  अवतार जन्माला येणार आहे आणि त्यामुळे एक आदर्श राज्य निर्माण  होणार आहे . सूर - असुरांच्या युद्धात रावण उपयोगी पडणार आहे . तेच त्याचे जीवित कार्य आहे . तुला हे येत्या काळात दिसून येईल आणि मग मी हे का करीत आहे , हे समजेल . हा नियतीचा खेळ खेळण्यासाठीच मला ह्या ठिकाणी पाठविण्यात आले आहे . मी माझे काम करीत आहे .रावणाचा जन्म हा शिवाच्या  मदतीसाठी आहे तर  सीता ही नवी विष्णू अवतार असेल  . ती एक भूमिकन्या असेल . ती  रावण जेंव्हा क्रूर होईल तेंव्हा त्याचा नाश करील आणि आपल्या पतीच्या मदतीने येथे रामराज्य निर्माण करीन. 
अरीष्ट्नेमी अचंबित झाला . त्याला विश्वामित्रांचे मन समजले . त्यांची चाल ही समजली . त्यांचे जीवित कार्य समजले . विश्वामित्र  म्हणूनच आर्यावर्त सोडून श्रीलंकेत  कोनेश्वरला  आले होते . नियतीनेच हे सर्व रचले होते.  असे हे तिरू  कोनेश्वर मंदिर  . विश्वामित्रांच्या पदकमलाने पवित्र झालेला हा परिसर . ते जणूकाही नवे विश्व निर्माते होते  .ते  रामराज्य निर्माते होते . ह्या  विश्वाचे ते खरे सूत्रधार . असे हे विश्वामित्र . रामायण घडले ते त्यांच्यामुळेच . ह्या नियतीचा  निर्माता म्हणजे विश्वामित्र . 

गोकर्ण 















No comments:

Post a Comment