विनोबा भावे ह्यांना ' राजकीय संत ' म्हणून बोलले जात असे ,ते पूर्ण चुकीचे होते . राजकीय नेत्यांना विनोबांची गरज भासत असे . विनोबांना राजकीय नेत्यांची काहीही गरज नव्हती . ते त्यांच्याकडे कधीच जात नसत .
मला विनोबा भावे प्रिय आहेत ते त्यांच्या ' गीताई ' मुळे . ज्ञानोबा नंतर विनोबा . त्या दोघांनी मराठी भाषेला सम्रुद्ध केले . मी एकदा व्यवसायानिमित्त दिल्लीला गेलो होतो . एका राजस्थानातील उद्योगपतींना भेटायचे होते . बरोबर एका अमेरिकन कंपनीचा जर्मन मॅनेजर होता . अमेरिकेतील औद्योगिक प्रदर्शनात त्यांची भेट झाली होती . राजस्थानात अतिशय आधुनिक अशा सूतगिरण्यांचे ते मालक आहेत . अतिशय साधी राहणी . पूर्णपणे गांधीवादी . अतिशय बुद्धिमान . त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला . पहिला धक्का बसला . त्यांच्या टेबलावर विनोबा भावे ह्यांचा फोटो होता . त्यांनी आमच्यासाठी चहा मागवला .स्वतः करिता गरम पाणी मागविले . चहा आला . आम्ही दोघे चहा तयार करीत होतो . पाहिजे तशी साखर टाकत होतो . त्यांनी त्यांच्या टेबलाच्या खणातून मधाची बाटली काढली आणि त्यांच्या कपात एक चमचा मध आणि गरम पाणी ओतले . मी गार . हा दुसरा धक्का .आमचा जर्मन मित्र माझ्याकडे बघत होता . आमची चर्चा सुरु होती . इतक्यात त्यांचा फोन घणघणला . ते हिंदीतून बोलत होते . फोन त्यावेळचे केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ला ह्यांचा होता . हेवी वेट . दोघेही . त्यांनी फोन खाली ठेवला . ते माझ्याशी हिंदीतून बोलले . त्यांनी मला सांगितले की विनोबा भावे गेले . हा तिसरा धक्का. त्यावेळी इंदिराजी रशियाला गेल्या होत्या आणि त्यांना विनोबांच्या मृत्यूची बातमी मंत्र्यांनी सांगितली होती आणि त्या भारताकडे परतण्यासाठी निघाल्या होत्या .हा चौथा धक्का .ह्याचा अर्थ राजकारणी मंडळींना विनोबा असे प्रिय होते .ते उद्योगपती भूदान चळवळीमुळे विनोबांच्या जवळ होते . विचाराने सर्वोदयी होते . त्यानंतर आम्ही दुसरे दिवशी भेटण्याचे ठरविले . माझ्या बरोबरच्या जर्मन मित्राला हा सगळा प्रकार समजावून सांगताना मला बरेच कष्ट पडले .विनोबांच्यावर प्रेम करणारे , त्यांचे विचार निष्ठेने आचरणात आणणारे , साध्या राहणीचे , बुद्धिमान उद्योगपती मी जवळून पाहिले . हा पाचवा धक्का. आपल्याला विनोबा भावे समजले नाहीत हे आपले दुर्दैव . भूदान चळवळीचा दौरा करीत असताना विनोबा भावे औरंगाबादला आले होते . मी लहान होतो . त्यावेळी मी त्यांना पाहिले होते . त्यांचे भाषण ऐकले होते . फारसे समजले नाही . आजही ते आठवतात . गांधीजींना पहिला शिष्य विनोबा कसे मिळाले ह्याचे आज आश्चर्य वाटत नाही . हा खरा संत होता .
No comments:
Post a Comment