Friday, September 22, 2017

Hell - Heaven by Jhumpa Lahiri

कादंबरी वाचानाकडून लघुकथा वाचनाकडे केलेला प्रवास वेगळा असतो. लघुकथा वाचायला कमी  वेळ लागतो. कादंबरीचा आकार पसरट असल्यामुळे पानांची संख्या खूप असते . धावपळीच्या जगण्यात वेळ तसा कमी असतो आणि मग वाचन टप्प्याटप्प्याने करावे लागते . त्यामुळे मला लघुकथा हा प्रकार अधिक आवडतो.  महाविद्यालयीन जीवनात आम्हाला पांच लघुकथाकार हे पुस्तक होते . त्यातील अरविंद गोखले आणि वामन चोरघडे हे दोन कथाकार त्यावेळी खूप आवडून गेले. त्यानंतर अनेक कथाकार वाचत गेलो . नंतर कादंबरी वाचनाकडेही वळलो . दीर्घकथा हा प्रकार ही वाचत गेलो. दीर्घकथा हा प्रकार कमी पसरट असल्यामुळे  तो अधिक आवडत गेला .
 झुम्पा लहिरी ही खर्या अर्थाने वैश्विक कादंबरीकार . Namesake आणि The Low Land ह्या त्यांच्या दोन प्रसिद्ध कादंबरया वाचल्या होत्या . ह्याच लेखीकेचे Hell – Heaven हे  दीर्घकथा असलेले पुस्तक किंडलवर डाऊनलोड केलं आणि एका दमात वाचून टाकलं .  Frank O’  Connor International Story Award मिळवणारी ही कथाकार तशी कादंबरीकार म्हणून खूपच प्रसिद्ध आहे. तिच्या साहित्याचा आवाका मोठा आहे . तिच्या साहित्यातून एकाचवेळी बंगाली ( भारतीय ) आणि अमेरिकन जीवनाची ओळख होते.  तिच्या कथा – कादंबर्यातून NRI आणि अमेरिकन अशी दोन्ही पात्रे भेटतात . ही कथा लेखिका एका अमेरिकेत स्थाईक झालेल्या बंगाली कुटुंबातील आहे . त्यामुळे तिला दोन्ही संस्कृतीची चांगली ओळख आहे . भारतीय कुटुंबे अमेरिकेत स्थाईक झाल्यावर त्यांची दुसरी – तिसरी पिढी एका वेगळ्या तणावात जगत असते . त्याचेच चित्रण तिच्या साहित्यातून होत राहते . तिच्या साहित्यातून आपण प. बंगाल मधील शहरातून / खेड्यातून फिरून येतो आणि अमेरिकन जीवनातील विविध रूपे पहात जातो. ह्या दोन संस्कृतीतील फरकामुळे तेथील स्थाईक झालेल्या भारतीय  कुटुंबातील ताणतणाव आपल्या लक्षात येतात. ज्यांनी अमेरिकेत स्थाईक झालेल्या भारतीय कुटुंबाना जवळून पाहिलं आहे त्यांना हे साहित्य अधिक भावतं .

अशाच एका बंगाली दाम्पत्याची उषा नावाची मुलगी ही दीर्घकथा आपल्याला सांगत जाते. आपले आई-वडील भारतीय असल्यामुळे  वर्षानुवर्षाच्या सहवासाने एकत्र राहिल्यामुळे एकमेकावर सहज प्रेम करू लागतात हे ह्या मुलीच्या फार उशिरा लक्षात येतं, लहान असताना आई – वडिलांचा दुरावा तिच्या सहज लक्षात येतो आणि आपली आई त्यांच्या घरी येणाऱ्या वडिलांच्यापेक्षा खूप लहान असणाऱ्या एका बंगाली तरुणाच्या  प्रेमात कशी पडते , हे तिला लहान असतानाच  जाणवते. त्यांची प्रेम कहाणी ती आपल्याला सांगत जाते . तिचे वडील मात्र आपण संशोधनात गर्क असल्यामुळे आपल्या पत्नीला कोणीतरी कम्प्यानियन  मिळाला म्हणून त्या तरुणाकडे पहातात असे तिला जाणवते . माणूस आणि नाती तशी अगम्य आहेत. एकांडा पुरुष असाही असतो हेच ह्या कथेत दिसून येतं . पुढे हा तरुण एका अमेरिकन मुलीबरोबर लग्न करून संसार करू लागतो . इथे आपल्याला तेथील अमेरिकन जीवनाची ओळख होत जाते आणि त्या तरुणाला पुढे घटस्फोट घेऊन वेगळे जीवन कसे जगावे लागते ते ह्या कथेत चित्रित केलं आहे . एकाच वेळी हेल आणि हेवन असा दोन्हीचा अनुभव जगताना येणे हाच ह्या कथेचा आत्मा  आहे.  कथा खूप प्रवाही आहे . अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय माणसांची घुसमट सांगणारी ही कथा आहे . शेवटी हे चांगले की ते चांगले असा प्रश्न उभा करते . हा अमेरिकेत स्थाईक झालेल्या भारतीय माणसांचा शोध खूप छान घेतला आहे .  

  

Monday, September 11, 2017

THE DRAMATIC DECADE


राजकारणातील घडामोडी आपण रोज वर्तमानपत्रातून वाचत असतो . पत्रकार त्यांच्याजवळच्या पुड्या सोडतच असतात . राजकीय विश्लेषक त्यांचे अभ्यासपूर्ण लेख छापतच असतात . अग्रलेखातून प्रतिक्रिया समजतच असतात . गप्पामध्ये राजकारणावर चर्चा चालूच असते .ह्या सर्वाहून अधिक स्फोटक असते ते राजकारणातील व्यक्तींचे चरित्र - आत्मचरित्र . पी व्ही नरसिंहराव ह्यांनी Insider ही कादंबरी लिहिली पण ते त्यांचे आत्मचरित्रच अधिक आहे . संजय बारू ह्यांनी डॉ मनमोहन सिंग ह्यांच्या सहवासातील क्षण टिपताना पंतप्रधानांचे राजकीय जीवन लोकांच्या पुढे आणले . ही दोन्ही पुस्तके राजकारणाची दशा आणि दिशा समजावून सांगणारी होती . प्रणव मुखर्जी ह्यांचे ' The Dramatic Decade ' हे पुस्तक हातात पडलं आणि वाचताना तो सर्व काळ आठवू लागला . आपलं ज्ञान वर्तमानपत्रातील माहितीवरचे . ह्या व्यक्तीने तर ते राजकीय जीवन जगलेलं . स्वतःचे अस्सल अनुभव . राजकारणाची गुंतागुंत पूर्ण माहित असलेली ही व्यक्ती राजकीय गुंता कसा सोडवायचा ह्यातच तद्न्य . राजकीय शक्तिकेंद्राची एक शक्ती . राजकारणात मानलेल्या नेतृत्वाला लॉयल असणारी आणि म्हणूनच प्रभावी असणारी व्यक्ती . रूढार्थाने तळागाळातून वर आलेली लोकप्रिय राजकीय व्यक्ती नव्हे . केवळ बुद्धी सामर्थ्यावर राजकारणात स्थिर असलेली ही राजकीय व्यक्ती . आत्मचरित्रात सगळंच काही लिहायचं नसतं .त्यामुळे ते वाचताना आपणच शोधून काढायचं असतं . नेमकं काय काय झालं असेल त्यावेळी ? दिल्लीच्या राजकारणात प्रदीर्घ काळ ज्यांनी घातला आहे त्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला मिळतं . हाच मोठा वाचन अनुभव . इंदिरा गांधी ह्यांच्याबद्दल अधिकरवाणीने दुसरा कोण सांगणार ? मोरारजी - चरणसिंग - जगजीवनराम ह्या त्रिकुटातील सत्तेतील भांडणे त्यांनीच जवळून पाहिलीत . जॉर्ज फर्नांडिस आणि मधू लिमये ह्यांनी जनता प्रयोग अयशस्वी करण्यासाठी कसा हातभार लावला . राजनारायण ह्यांनी संजय गांधींच्या बरोबर कसा संपर्क साधून जनता पार्टीत खिंडार पाडले . यशवंतराव आणि शरद पवार ह्यांच्या इंदिरा विरोधी राजकारणामुळेच काँग्रेसमध्ये फूट पडण्यास वेग आला पण त्यांना दिल्ली जिंकता आली नाही . देवराज उर्स ह्यांनी इंदिरा गांधी ह्यांना दक्षिणेतून विजय मिळवून दिला आणि त्यांना वाटू लागले की आपणच खरे नेते . शेवटी त्यांना राजकारणातून संपवण्यासाठी कसे प्रयत्न करावे लागले . हे सर्व वाचताना भारतीय राजकारण कसे चालते ह्याची झलक वाचायला मिळते . ही राजकीय मंडळी छोटी वाटू लागतात . शेवटी माणूस असाच असतो . सत्तेचे राजकारण असेच असते . नरसिंहराव ह्यांची 'इनसायडर' ही कादंबरी अधिक मनोरंजक झाली आहे . ह्या आत्मचरित्रातून व्यत्तिचित्रे मात्र अधिक ठळक दिसू लागतात . त्यातील खरं - खोटं मात्र शोधनं आवश्यक आहे . कारण लिहिणार्याची दृष्टी एकांगी असू शकते .
बंगालचे राजकारण स्वातंत्र्यापूर्वीपासून असेच होते . मुस्लिम अनुनय किंवा मुस्लिम वर्चस्व ह्या भोवतीच ते फिरत होते . प्रणव मुखर्जी ह्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात त्यावेळच्या मुस्लिम राजकारणाचा सुंदर आढावा घेतला आहे . प्रणव मुखर्जी काँग्रेसच्या आधी बंगला काँग्रेसमध्ये होते . त्यांनी बंगालच्या राजकारणावर सविस्तर लिहिलं आहे . ते वाचलं की त्यावेळची काँग्रेस , मुस्लिम लीगचे राजकारण आणि बंगला देशची निर्मिती ह्यावर पूर्ण प्रकाश पडतो . मुस्लिम संख्या खूप अधिक असल्यामुळे ( त्यावेळी ४० % पेक्षा अधिक होती ) तेथील राजकारण कसे होते आणि आजही तसेच आहे ह्याची कल्पना येते .
सीपीएम असो का ममताचा पक्ष त्यांनी मुस्लिम अनुनय केल्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली . काँग्रेसचा तर तो इतिहास होताच . काँग्रेसने मुस्लिमांचा कितीही अनुनय केला असला तरी काँग्रेसला तेव्हाही हिंदूंचा पक्ष असेच मुस्लिमांनी संबोधले .
भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणाला मुस्लिम अनुनय जबाबदार आहे . ते त्यांचे प्रतिक्रियावादी राजकारण आहे . त्यात चूक त्यांची नाही .
इतिहासकार गुहा ह्यांनी ' हिंदू पाकिस्तान ' असा नवा शब्द वापरून लोकांची दिशाभूल करून नवे राजकारण सुरु केलेले दिसते . हिंदू इंडिया / मुस्लिम इंडिया असे शब्द पूर्वी राजकारणात होतेच . ब्रिटिशांनी त्या शब्दांची पेरणी खुबीने केली होती . देशाच्या फाळणीचा इतिहास गुहा ह्यांना नीट माहित असेलच . आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांचे The Dramatic Decade ' हे आत्मचरित्र त्यांनी वाचले असेलच .
स्वातंत्र्यापूर्वी मुस्लिम मताला अधिक महत्व देऊन काँग्रेसने त्यावेळी बंगालमध्ये कसे राजकारण केले ह्याचा आढावा ह्या पुस्तकात दिला आहे . स्वातंत्र्यानंतरही जेथे जेथे मुस्लिम बहुसंख्या आहे (उदाहरणार्थ प बंगाल )तेथे मुस्लिमांचा अनुनय काँगेसने केला आहे . तेच सीपीएम आणि ममता दीदींच्या पक्षाने केले आहे .
आजचे' इंडिया' गुहा ह्यांना ' हिंदू पाकिस्तान' झाले आहे असे वाटते . त्याची काय कारणे आहेत हे गुहा ह्यांनी आपल्या इतिहासात शोधून काढावीत . लोकांची उगाच दिशाभूल करू नये . We must talk of only India , Not Hindu India or Muslim India or Hindu Pakistan.
प्रणव मुखर्जी ह्यांच्या आत्मचरित्रातील पुस्तकात ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्या आहे त्या प्रांतात राजकारणाची वळणं वेगळी असतात ह्याचा परामर्श त्यांनी घेतला . बंगाल , आसाम आणि पंजाब ह्या तीन प्रांताचा विशेष उल्लेख त्यांनी केला आहे . इंग्रजी राजवटीत प्रांतिक निवडणुका घेतल्या त्यावेळपासून त्यांनी आढावा घेतला . त्यावेळी मुस्लिम लिगचे जे राजकारण चालले होते त्या पुढे काँग्रेस Backfoot वरच होती . काँग्रेसला हिंदूंचा पक्षच मानले जात असे .
काँग्रेस मुस्लिम नेत्यांना पुढे करून इंग्रजांना आपण खरे प्रतिनिधी असे दाखविते म्हणून जिना त्यांच्या मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी मंडळात एक दलित वर्गाचा प्रतिनिधी घेत असत .
त्या वेळच्या बंगालमध्ये मुस्लिम बहुसंख्य असल्यामुळेच पु .पाकिस्तानची निर्मिती झाली . एव्हढेच नव्हे तर कलकत्ता हे शहर पु .पाकिस्तानची राजधानी व्हावी ह्यासाठी मुस्लिम नेते प्रयत्नशील होते . सरतचंद्र बोस सारखे काँग्रेस नेते फझहूल गटाच्या जवळचे होते. सरदार पटेल ह्यांनी त्यांना चांगलेच फटकारले .नाहीतर कलकत्ता पु .पाकिस्तानची राजधानी झाली असती . 
बंगालची फाळणी व्हावी ह्यासाठी डॉ शामा प्रसाद मुखर्जी अनुकूल होते .कारण मुस्लिम बहुसंखेमुळे हिंदूंना सुरक्षीत वाटत नव्हते .
आजही मुस्लिम लोकसंखेमुळेच काँग्रेस किंवा ममताची टीएमसी ह्यांना मुस्लिम अनुनयामुळेच निवडणूक जिंकणे शक्य झाले आहे .सीपीएमची भूमिका तशीच आहे . 
मुस्लिम अनुनय ह्यावरच तेथील राजकारण चालते . 
शेख मुजिबर रहमान आणि बंगला देश निर्मिती ह्याचा आढावा घेताना बंगाली भाषिकांचा सबनॅशनलइझम कसा जन्माला आला ह्याचा इतिहास खूप काही सांगून जातो . 
काश्मीरचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आहे , ते तेथील ९८ टक्के मुस्लिम संख्येमुळेच .



रस्किन बॉण्ड ......

रस्किन बॉण्ड ह्यांचे शैला सायनाकर ह्यांनी अनुवादित केलेले पुस्तक हातात घेतले आणि निखळ वाचनानुभव मिळाला. १८५७ चे इंग्रजांविरुद्धचे बंड ( युद्ध ) ह्यावरची ' कबुतरांची झेप ' ही दीर्घ कथा सर्वात उत्तम . शाम बेनेगल ह्यांनी ' जुनू ' हा चित्रपट त्यावर काढला होता . मी काही बघितला नव्हता . सुंदर असणार . कथाच सुरेख . त्या वेळच्या भारतीय मुसलमानांचे इंग्रजांविरुद्धच्या लढाईतील योगदान तसेच त्यावेळचा हिंदू - मुस्लिम सामाजिक तणाव. 
इंग्रज - युरोपिअन येथे आले . त्यांची इतर माणसे शासकीय आणि व्यापारी कामासाठी येथे स्थायिक झाली . त्यांची मानसिकता , त्यांचे कौटुंबिक प्रश्न आणि त्यांचे येथील भारतीयांशी न कळत जुळत गेलेले ऋणानुबंध ह्या साऱ्या गोष्टी ह्या लिखाणातून दिसून येतात . 


त्यांच्या दृष्टिकोनातून भारतीय समाज बघताना आपल्या समाजाचे आकलन तर होतेच पण युरोपिअन माणसांची अधिक ओळख होते. दोन - तीन संस्कृतींची सरमिसळ एकत्र पहायला मिळते . शेवटी माणूस तोच. वृत्ती त्याच. एक सुंदर वाचन अनुभव .

Thursday, September 7, 2017

विनोबा भावे : एक आठवण

विनोबा भावे ह्यांना ' राजकीय संत ' म्हणून बोलले जात असे ,ते पूर्ण चुकीचे होते . राजकीय नेत्यांना विनोबांची गरज भासत असे . विनोबांना राजकीय नेत्यांची काहीही गरज नव्हती . ते त्यांच्याकडे कधीच जात नसत . 
मला विनोबा भावे प्रिय आहेत ते त्यांच्या ' गीताई ' मुळे . ज्ञानोबा नंतर विनोबा . त्या दोघांनी मराठी भाषेला सम्रुद्ध केले . मी एकदा व्यवसायानिमित्त दिल्लीला गेलो होतो . एका राजस्थानातील उद्योगपतींना भेटायचे होते . बरोबर एका अमेरिकन कंपनीचा जर्मन मॅनेजर होता . अमेरिकेतील औद्योगिक प्रदर्शनात त्यांची भेट झाली होती . राजस्थानात अतिशय आधुनिक अशा सूतगिरण्यांचे ते मालक आहेत . अतिशय साधी राहणी . पूर्णपणे गांधीवादी . अतिशय बुद्धिमान . त्यांच्या केबिनमध्ये प्रवेश केला . पहिला धक्का बसला . त्यांच्या टेबलावर विनोबा भावे ह्यांचा फोटो होता . त्यांनी आमच्यासाठी चहा मागवला .स्वतः करिता गरम पाणी मागविले . चहा आला . आम्ही दोघे चहा तयार करीत होतो . पाहिजे तशी साखर टाकत होतो . त्यांनी त्यांच्या टेबलाच्या खणातून मधाची बाटली काढली आणि त्यांच्या कपात एक चमचा मध आणि गरम पाणी ओतले . मी गार . हा दुसरा धक्का .आमचा जर्मन मित्र माझ्याकडे बघत होता . आमची चर्चा सुरु होती . इतक्यात त्यांचा फोन घणघणला . ते हिंदीतून बोलत होते . फोन त्यावेळचे केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ला ह्यांचा होता . हेवी वेट . दोघेही . त्यांनी फोन खाली ठेवला . ते माझ्याशी हिंदीतून बोलले . त्यांनी मला सांगितले की विनोबा भावे गेले . हा तिसरा धक्का. त्यावेळी इंदिराजी रशियाला गेल्या होत्या आणि त्यांना विनोबांच्या मृत्यूची बातमी मंत्र्यांनी सांगितली होती आणि त्या भारताकडे परतण्यासाठी निघाल्या होत्या .हा चौथा धक्का .ह्याचा अर्थ राजकारणी मंडळींना विनोबा असे प्रिय होते .ते उद्योगपती भूदान चळवळीमुळे विनोबांच्या जवळ होते . विचाराने सर्वोदयी होते . त्यानंतर आम्ही दुसरे दिवशी भेटण्याचे ठरविले . माझ्या बरोबरच्या जर्मन मित्राला हा सगळा प्रकार समजावून सांगताना मला बरेच कष्ट पडले .विनोबांच्यावर प्रेम करणारे , त्यांचे विचार निष्ठेने आचरणात आणणारे , साध्या राहणीचे , बुद्धिमान उद्योगपती मी जवळून पाहिले . हा पाचवा धक्का. आपल्याला विनोबा भावे समजले नाहीत हे आपले दुर्दैव . भूदान चळवळीचा दौरा करीत असताना विनोबा भावे औरंगाबादला आले होते . मी लहान होतो . त्यावेळी मी त्यांना पाहिले होते . त्यांचे भाषण ऐकले होते . फारसे समजले नाही . आजही ते आठवतात . गांधीजींना पहिला शिष्य विनोबा कसे मिळाले ह्याचे आज आश्चर्य वाटत नाही . हा खरा संत होता .