Thursday, April 20, 2017

म्हातारपणची शोकांतिका


काही दिवसापूर्वीच Being Mortal हे अतुल गवांडे ह्यांचे ‘म्हरातारपणाचं  जगणं’ ह्या विषयावरचं पुस्तक वाचलं आणि गेले कित्येक दिवस म्हातारपण , वृद्धाश्रम , उत्तरायण ह्या विषयाचा भुंगा पाठीमागे लागला.
प्रसिद्ध कादंबरीकार पावलो कोएलहो ( Paulo Coelho ) ह्यांनी लिहिलेले आठवले ....
When I was young, I was dazzled by all things life could offer me. I thought I was capable of achieving all of them. When I got married, I had to choose just one path, because I needed to support the woman I love and my children. When I was 55 and a highly successful executive, I saw my children grown-up and leave home and I thought that from then on , everything would be a mere repetition of what I already experienced. That was when my spiritual search began. 
WHAT A TRUE PICTURE ! That is the old age . 
काही दिवसापूर्वी म्हातारपण ह्याच विषयावरचा  “ अस्तू “ हा मराठी चित्रपट पाहिला. डिसेंबर २०१३ चा हा चित्रपट . दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक पुरस्कार प्राप्त झालेला . मुंबईत फार उशिरा चित्रपटगृह मिळाले. फारच थोड्या ठिकाणी चालू होता .मुद्दाम जिथे चालू आहे तेथे जाऊन पहावा लागला . तिकडे सलमान खानचा चित्रपट ५०० कोटीचा गल्ला मिळवतोय आणि इकडे ह्या सुंदर चित्रपटाला १०० म्हातारी डोकी काठी टेकवत येत आहेत . कोण पहाणार? शरीराने जिवंत पण मनाने मेलेल्या असलेल्या एका म्हाताऱ्याची शोकांतिका ?
म्हातारे होणं ( Ageing ) मोठं कठीण असतं .परावलंबी असलेलं म्हातारपण अधिक कठीण असतं . आपण धडधाकड राहून निवृत्तीनंतरचं शांतपणे सुखाने जगणं वेगळं आणि स्मृतीभंश होऊन म्हातारपण जगणं अधिक कठीण . ती एक शोकांतिकाच असते. आपल्या मुला-मुलीनी ह्या शोकांतिकेला बरोबर घेऊन आणि स्विकारून कसं जगायचं ? हा खरा प्रश्न आहे . त्यांच्याकरिता हे महाकठीण काम आहे . संवेदनशील मुलामुलींना ते अधिक त्रास देणारं आहे.
एक बुध्दिमान संशोधक प्राध्यापक . संपूर्ण जीवन रसरसून जगलेला . दोन मुलीना जेवढे देता येईल तेवढे देऊन सुखी शांत जगणारा हा म्हातारा. अल्झायमरसारख्या रोगामुळे लहान मुल झालेला . शरीराने जिवंत पण मनाने मेलेला . अशा ह्या मुलाला सांभाळणारी त्याची मुलगी आणि तिचा डॉक्टर जावई. आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात कशाला ठेवायचे ? असा विचार करून वडिलांचीच आई झालेली ही मुलगी संवेदनशील मनाची असल्यामुळे खूप काही सहन करीत वडिलांचे सर्व काही करीत असते आणि एक दिवस तिचे हे म्हातारे वडील नाहीसे होतात . त्यावेळी तिची जी अवस्था झाली आहे त्याची  गोष्ट सांगणारा हा चित्रपट. माणूस संवेदनशील असला की त्याची जी फरफट होते ते आपण अनेक कुटुंबातून पहात असतोच. तिची धाकटी बहिण. दूर राहणारी . Intimacy at a distance असा Rational विचार करणारी आणि स्वतःच्या करिअरमध्येच रमलेली . दूर असलेल्या मुलीला मात्र असे वाटत असते की बाबांचे प्रेम जवळ असलेल्या मुलीवरच अधिक आहे . अनेक कुटुंबात असे प्रकर्षाने जाणवते . ते कौटुंबिक ताणतणाव सर्वत्रच दिसून येतात.
म्हाताऱ्या मंडळीकडे सुखाने जगण्यासाठी पैसा आहे , घर आहे. तरीपण अधिक म्हातारे होणं आणि कसल्याही प्रकारचे पंगुत्व येणे हे आपल्या अपत्यासाठी त्रासदायक आहेच. आपल्याला लहान मुलासारखं जपताना त्यांना बरेच काही सहन करावे लागते. ती मुलं अधिक संवेदनशील असतील तर त्यांचा अधिक कोंडमारा होत असतो. त्यांच्या जगण्याच्या वेगात आपण एक अडथळाच असतो. असे होणे फार क्लेशकारक असते. आपल्याकडे वृद्धाश्रम इतके चांगले नाहीत. Assisted Living हा प्रकार फारसा उपलब्ध नाही.

आपण ज्या वडिलावर प्रेम करतो आणि त्यांना सांभाळतो ते वडील ( अप्पा) आपल्याला साधे ओळखत नाहीत हे दु:ख फार मोठं आहे . त्या मुलीची ( इराची) भूमिका  इरावती हर्षे ह्यांनी फार सुंदर केली आहे . मनाला चटका लावून देणारी ही भूमिका पहाण्यासाठी तरी हा चित्रपट एकदा पहावा. वडिलांची भूमिका करणारे मोहन आगाशे म्हणजे नटसम्राट . अतिशय सुंदर भूमिका . त्यांची ही भूमिका पाहिल्यानंतर असे म्हातारपण आपल्या वाटेला येऊ नये असा विचार अनेकदा डोक्यात येतो आणि मग आपल्या डोक्यातून जातच नाही. अर्थात हे आपल्या हातात नसते. जावई ( मिलिंद सोमण ) आणि धाकटी मुलगी ( देविका दप्तरदार ) ह्यांच्या भूमिका उल्लेखनीय आहेत. अमृता सुभाष पारितोषिक विजेती आहेच. तिच्या भूमिकेतील माणूसपण कायम लक्षात राहतं. चित्रपट अस्वस्थ करणारा आहे . 

म्हातारपण म्हंटलंकी आपल्याला संवाद आठवतात ते 'नटसम्राट' आणि ' संध्याछाया' ह्या 

नाटकातले. अंतर्मुख करणारे.

माणसाला म्हातारपणी जे रडू येतं ते एका विशिष्ट गोष्टीचं नसतं . त्याच्या हातात काही उरलेलं नसतं . तो दु:ख कुरवाळीत बसतो. पुन्हा पुन्हा जिगसा पझल सारखं तो ते वेगवेगळ्या पद्धतीने लावून बघतो . त्याच्या लक्षात येतं  की आपण चुकलो . मग तो दुसरं काय करेल . तो रडतो? 
म्हणूनच तुम्ही तरुण मुलांनी म्हातार्याच्या रडण्याकडे दुर्लक्ष करावे. चुका केल्या म्हणून भोग आले. तुम्ही चुका कराल तर तुम्हीही भोगाल . तसं गंभीरपणे काहीही घ्यायचं नाही. रडण्यासाठी सगळं म्हातारपण पडलय. म्हातारपण  येणारच  पण  अवलंबून जगनं  महा  कठीण . आपल्यापेक्षा  आपल्या  आप्तस्वकीयांसाठी .   






Tuesday, April 18, 2017

प्रवास असा आणि तसा ....


एक जीवनप्रवास ....... सुखाचा .........दु:खाचा .........वेदनेचा........निखळ आनंदाचा........... सुखद सहवासाचा.......... हव्या हव्याशा वाटणाऱ्या कोमल तरल भावनांचा ....... नको असणाऱ्या आठवणींचा ......... यशाच्या ध्येयत्ताऱ्याकडे झेपावणारा ......कधी कधी अगतिकतेचा ......अनेकदा विलक्षण नको असणारा ......सर्व संपवणारा ..... कधी अंतर्मुखतेकडून अध्यात्माकडे नेणारा .......तर कधी भौतिक सुखाची उधळण करणारा ...... कधी स्वतःला विसरणारा .......तर कधी कधी फक्त स्वतःचाच विचार करणारा ...... मनस्वी ......
आपल्याला सूर्य उर्जा देतो. नं चुकता ,नियमितपणे तो त्याचे काम बिनभोबाट खंडही न होऊ देता अविरतपणे चालू ठेवतो. तो रोज सकाळी आपल्याला जागा करतो व जगण्याची नवी आशा निर्माण करून जगण्याचे नवे सामर्थ्य देतो. संध्याकाळी तो मावळल्यानंतर एक उदास अंधार निर्माण करतो. त्या रात्रीच्या गर्भात असतो म्हणे उद्याचा उष:काल.
आपलं आयुष्य वाहत राहते ...एखाद्या नदीसारखे – अखंड – नं संपणारं ... आपण अनेक अडचणींना तोंड देत पुढे जात असतो . यश-अपयश सामोरे येत असते. नैराश्य आणि आशावाद ह्यांच्या दोन टोकावर आपण झोके घेत असतो. आनंद – सुख , आशा – निराशा ह्यांच्या हिंदोळ्यावर आपण रमतो , दमतो आणि विसावतो.
अगदी छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपले मन आपला आनंद गमावून बसते . त्याचा शोध घेणे तसे कठीणच असते. साधं बघा . आपला शेजारी , मित्र किंवा नातेवाईक जर आनंदी असेल तर आपणही त्याच्या आनंदात सामील व्हावयास हवं . त्यावेळी आपल्याला दु:ख का बरे वाटावे ? आपण कोणताही पाश न स्वीकारता इतरांच्या सुखदु:खात सामील कां होऊ शकत नाही ?
कोणत्याही दु:खाच्या क्षणी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की “ हे ही दिवस जातील “. तसेच सुखाचे दिवस येतात नि जातात. ते ही असेच येतील आणि जातील.
हे जग बदलतंय . बदलणारच. बदलत राहणं ( Change ) हा एक स्थायीभाव आहे, हे आपल्या लक्षात असावयास हवं .
आपण आणि आपले जीवन इतक्या विविध गोष्टीवर अवलंबून असतं. अनेक बाह्य घडामोडीमुळे आपल्या जीवनावर सतत परिणाम होत असतो. ‘Expect the Unexpected’, हेच आपल्या लक्षात येत नाही.
आपण आपल्या स्वतःला घडवीत गेले पाहिजे. आपला ‘ आत्मानंद ‘ हेच खरे आनंदाचे स्वरूप आहे . मन:शांती ( Inward Peace ) फार महत्वाची असते. आपल्याला जर खरा आत्मिक आनंद हवा असेल तर आपल्याला जे हवे ( श्रेयस किंवा प्रेयस ) त्याचा आपण त्याग करावयास हवा. आपण आपल्याला विसरायला हवं .चित्रकाराला चित्रातून मिळणारा आनंद , शिल्पकाराला शिल्पकृती पूर्ण झाल्याचा आनंद, हे आनंदाचे खरे रूप. तेच आपण शोधले पाहिजे.
प्रत्येकाला आनंदी असावे असेच वाटत असते. कोणालाही दु:ख नकोच असते. दु:ख हे आयुष्याच्या जगण्याच्या अवस्थेशी निगडीत आहे. दु:ख आणि त्रास हा जगण्याचा अविभाज्य भाग आहे . आशा – आकांक्षा हे दु:खाचे मूळ आहे असे गौतम बुद्धाला जाणवले म्हणून तो हिमालयात निघून गेला. जगातला कोणताही माणूस मरेपर्यंत आनंदी राहू शकत नाही. माणूस हा आनंद त्याच्या स्मशान यात्रेलाच घेऊन जातो. जगनं म्हणजे जन्मल्यापासून वेदनेला घेऊन राहणं. आपण म्हणूनच निवृत्त होण्याचा प्रयत्न करावयास हवा. आशेपासून दूर जावयास हवे. निवृत्त होणं व राजीनामा देऊन अलिप्त राहणे म्हणजेच जगण्याच्या हव्यासातून बाहेर पडणे . ते जमलं पाहिजे.
जीवनपूर्तता कशी प्राप्त होईल ? मन खरे कसे समाधानी असेल? ज्याच्याजवळ आपल्यापेक्षा खूप काही आहे ,त्याच्याकडे न बघता आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे खूप काही नाही व आपल्याकडे इतरांच्यापेक्षा खूप जास्त आहे , असा विचार केला तरच आपण समाधानी होऊ शकू.
एका ख्रिस्त धर्मगुरुनी म्हंटले आहे की , ‘ मी लहान असताना पायातल्या बुटासाठी रडत होतो पण जेव्हा एका व्यक्तीला पायच नाहीत  हे दिसले तेंव्हा मी बुटासाठी रडणे सोडून दिले ‘. आपल्याला अनेक गोष्टी हव्या हव्याशा वाटतात व त्या मिळवण्यासाठी आपण जीवापाड कष्ट करून मिळवतो. परंतु ह्या मिळवलेल्या गोष्टीच अनेक दु:खे निर्माण करीत असतात. अशा मिळवलेल्या वस्तूतून आनंदाच्याऐवजी अनेक दु:खे निर्माण होताना दिसतात आणि आपला भ्रमनिरास होतो. कित्येक लोकांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या किमान गरजा उपलब्ध नसतात . तरीही ही मंडळी सुखी-समाधानी कशी असतात ? आनंद ही मनाची एक अवस्था आहे . ही अवस्था आपण कशी प्राप्त करून घ्यायची हे आपण ठरविले पाहिजे .
आपण आत्मकेंद्रित असावयास नको. आपण आत्मप्रौढीपासून दूर असावयास हवे. आपण हे जर करू शकलो तर छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपले मन दुभंगणार नाही. आपण बौद्धिक आणि आत्मिक  आनंद मिळवू शकू. भौतिक सुखे व पारमार्थिक सुखे ह्याच्याबरोबर आत्मिक सुख ही फारच महत्वाचे आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
भौतिक सुखे मिळाली तरी मन पूर्णपणे समाधानी होईल ह्याची शक्यता नाही. आपण फार छोट्या छोट्या कारणामुळे आनंद गमावून बसत असतो. जर एखाद्याने आपणास जेवणाचे आमंत्रण दिले नाही म्हणून आपण त्याच्यावर राग धरतो. एखाद्या सहकार्याला जास्त पगाराची बढती मिळाली म्हणून आपण चिडतो. आपला सहकारी परदेश प्रवासाला गेला म्हणून आपण जळफळतो. आपल्या मनात नकळत अशा असूया निर्माण होत असतात. त्यामुळे आपण दुसर्यांच्या आनंदात सहभागी होऊ शकत नाहीत.
जगातली सगळीच माणसे खूप छान किंवा खूप वाईट असू शकत नाहीत. अशी एका टोकाची माणसे असू शकत नाहीत. आज चांगली असलेली माणसे उद्याही चांगली असतीलच असे नाही. ती बदलत असतात. जर आपला मित्र किंवा शेजारी त्याला मिळालेल्या यशामुळे आनंदी झाला असेल तर आपणही त्याच्या आनंदात सहभागी व्हावयास हवे.
आपण आपल्या जवळच्या माणसात गुंतणे स्वाभाविक आहे .परंतु न गुंतता गुंतले पाहिजे. आपण एकरूप असून वेगळे असावयास हवे ( Detached Attachment ). कोणत्याही सुखदु:खाच्या क्षणी हे लक्षात ठेवावयास हवे की ‘ हे ही दिवस जातील ‘. नेहमीच सुखाचे किंवा दु:खाचे दिवस नसतात. ते येतात आणि जातात. सुख हे दिवसासारखे असते. रात्र त्या नंतर येतेच. रात्रीच्या गर्भातच उद्याचा उष:काल असतो. ‘ होता होता काळ रात्र झाली ..... ‘ हे लक्षात घेतले पाहिजे. आनंद शोधला पाहिजे . आनंदाच्या झाडाखाली विसावले पाहिजे.


आपण साधी सामान्य माणसं कशी असतो?


कुणावर तरी जमलं तर प्रेम करतो. नव्या फ्याशन प्रमाणे कपडे घालतो. देशप्रेमाच्या गप्पा मारतो. राजकारणावर चर्चा करतो. जीवनमान किती महागले ह्या विषयावर तासनतास वादविवाद करतो. आपली केश रचना बदलतो. देव- देव करतो. नित्य नेमाने देवळात जातो. परमेश्वराकडे क्षमा याचना करतो. गर्वाने राहतो, मुलांना आपल्या पावलावर पावले पाडण्यास सांगतो. नव्या जास्त पगाराच्या नोकर्या शोधतो. आपल्या शिक्षणाचा उपयोग करून घेतोच असे नाही. बहुधा आपल्या शिक्षणाचा व नोकरीचा काहीं संबंध नसतोच. आपण आई –वडिलांना दु:खी-कष्टी करतो. न कळत दुरावतो. कधी कधी संगीतात रमतो. कधी कधी नाटक सिनेमा पहातो. रिमोटने टीव्हीचे प्रोग्राम बदलतो. फेसबुकवर पिचकारी टाकतो. खूप बडबड करतो, तेच आपल्या आयुष्याचे सार . हेच आपले जगणे. म्हणजे आपण सतत मरत असतो. मरत मरत जगत असतो . असं आपलं जगणं असतं. दु:खाची अनेक कारणे असतात. प्रेम आहे पण लग्न नाही. लग्न आहे पण प्रेम नाही. संसार आहे पण सुख नाही म्हणून जीवनात आनंद नाही. मुलं आहेत पण त्यांच्यापासून त्रास आहे. ते शिकत नाहीत. बेकार आहेत. त्यांची लग्नं होत नाहीत किंवा म्हणावा तसा पैसा कमवीत नाहीत. तर काहीना मुलं  नाहीत म्हणून एकटेपणा असतो.  काहीच्याजवळ पैसा आहे पण आनंद नाही तर काहीच्याजवळ  पैसा नाही म्हणून अनेक विवंचना असतात. सत्ता आहे पण लोकप्रियता नसते. लोक मागे असतात पण सत्तेचे गणित जमत नाही. घर असते पण घरपण नसते. लग्न होते पण दाम्पत्य सुख नसते. अशा ह्या अनेक जणांच्या अनेक चिंता. काहीजण अजूनअजूनच्या मागे लागतात आणि अति व्यस्त झाल्यामुळे अधिक दु:खी कष्टी होतात.
दिवस येतात नि जातात. सूर्य वेळच्या वेळी उगवतो. अंधार संपतो. उजेड होतो. महिनेही उलटतात. उन्हाळे-पावसाळे निघून जातात. न कळत वय वाढत जाते. तरुणाई संपते. संध्याछाया जाणवू लागतात. जगण्याचे नवे प्रयोजन शोधण्यासाठी आपण जगू लागतो. मनाची उभारी नाहीशी झालेली असते. जीवनाची निरर्थकता जाणवू लागते. शरीर आणि मन एकमेकाला थकवू लागतं.
आपण मध्यमवर्गीय माणसे नेहमी हजार चिंतांनी आपले डोके खाजवीत असतो. नको त्या गोष्टीवर विनाकारण अवास्तव विचार करीत बसतो. ही चिंताच आपल्याला खात असते. निराश करते. त्रास देते. ह्या चिंतेपासून दूर होण्यासाठी मन रिझवले पाहिजे.
“वेळ पाहून खेळ मांडणे” प्रवृत्तीची माणसे अनेक गोष्टी सहज साध्य करू शकतात, स्वभावातील ही लवचिकता हा गुण की दुर्गुण. Non-compromising attitude असलेली माणसे जगतांना खूप काहीं त्रास सहन करतात. शासकीय नोकरीत आणि राजकारणात अशी माणसे कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. ह्या स्वभावामुळेच अनेक गोष्टी जमू शकत नाहीत.
Deviating Personality असलेली माणसे वेगळी असतात. मी म्हणतो तीच पूर्व दिशा म्हणणारी माणसे हट्टी असतात. “ मीच ठरविणार दिशा वाहत्या पाण्याची” अशी त्यांची वृत्ती असते. स्वतःवर असलेला पूर्ण विश्वास चांगला आहे पण दुसर्या कोणाचे मत जाणून न घेणे म्हणजे हेकेखोरपण आहे. असा माणूस एकटा असतो. व त्याला एकटेच लढावे लागते. ह्यामुळे आपलेच नुकसान होते हे उशिरा लक्षात येते. वेळ निघून गेलेली असते. एकदा घेतलेला निर्णय. मग त्यासाठी वादळातून चालणारी बोट सोडून देता येत नाही. किनारा गाठणेच महत्वाचे असते.लढणे हाच एक उपाय असतो.
डोंगर चढून जाताना आपण उंचीचाच विचार करतो पण एकदा उंचावर गेले की आपल्याला खोलीच दिसून येते. संपूर्ण उंची गाठता आली नाही तर मर्यादित उंचीवर भक्कम पावले रोवित जाणेच योग्य. यशाचे असेच असते. ते टप्प्या टप्प्यानेच मिळविले पाहिजे. त्यातून समाधान मिळते. आणि जेंव्हा वैफल्याची अवस्था असते तेंव्हा आपल्याला जाम कंटाळा आलेला असतो. काहींच करू नये असे वाटते आणि आपण निष्क्रिय होतो. हा कंटाळाच (Killing) मारक  असतो. आपण आपल्यातील Frustation  थांबवले पाहिजे. उत्साहासाठी आनंदी असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी जगण्यातील आनंद शोधावयास हवा. मन दुसर्या कशात रमविले पाहिजे . त्यासाठी जगण्याची त्रिज्या वाढविली पाहिजे. इतर अनेक गोष्टीत रस घेतला पाहिजे. बहुविध विषयात रस निर्माण केला पाहिजे व व्यक्तिमत्व बहुविध विद्या पारंगत असले पाहिजे.
पंढरपूरला वारकरी जातात तेंव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. कितीतरी चिंतांचे गाठोडे त्यांच्या डोक्यावर असते. ते सारे विसरून ते कसे विठ्ठलाच्या ओढीने चालत असतात. चंद्रभागेचे दर्शन होताच आणि मंदिराचा कळस दिसताच त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. अगदी निरागस बालकाचा आनंद असतो तसा हा आनंद.
आपण मध्यमवर्गीय  माणसे अनेक चिंतांनी डोके खाजवीत बसतो. नको त्या गोष्टीवर विनाकारण अवास्तव विचार करीत बसतो. ही चिंताच आपल्याला खात असते. अशावेळी कसल्यातरी कामात मन रमवले पाहिजे . गाणे ऐकणे , सिनेमा बघणे , बाहेर फिरावयास जाणे, पक्षी निरीक्षण करणे , बागकाम करणे , मुलात रमणे, गप्पा मारणे , मन मोकळे करून बोलणे. आपण मोर व्हायला पाहिजे. आनंदाने नाचावयास शिकले पाहिजे. हळवे मन सुंदर असते. शहाणे असते.आपण सौंदर्याचा पुजारी असावयास हवे. निसर्ग सौंदर्यात रमले पाहिजे. कवी नसलो तरी कवी व्हायला पाहिजे. रम्य क्षण जगले पाहिजेत. जखम झाली तरी फुंकर घालता आली पाहिजे. आपल्याला आपले जगणारे क्षण इतरांच्या बरोबर share करता आले पाहिजेत. जगण्याला प्रयोजन शोधले पाहिजे.रिमझिम पावसात भिजलो की आपल्याला त्रास वाटत नाही. अजून भिजावेसे वाटते. त्याचा ताप वाटत नाही. प्रश्न समोर असतातच.उत्तर ही शोधता येते. चुकले तरी प्रश्न नीट समजतो व योग्य ते उत्तर मिळतेच. त्यामुळेच जगणे हे एक सुंदर गाणे होते. जगण्याची कविता होते. त्यासाठी कवी असण्याची गरज नसते. ह्या जगण्यावर प्रेम करताना न कळत आपण प्रेम कवी होतो.       

तदा आईचे हृदय असेही असते .....


आई म्हंटलं की आपल्याला कवी यशवंतांची “आई” ही कविता आठवते. कोणाचीही आई तशीच असते. पण मी बापाचे हृदय असणारी कणखर आई पाहिली आहे.
माझा एक सहकारी मित्र . खूप हुशार. मुंबई विद्यापीठात एम.एससी.( पदार्थविज्ञान ) विषयात पहिला आलेला. टाटा फंडामेंटल रिसर्च मध्ये निवड झालेला. ते न स्विकारता युडीसीटी मध्ये माझ्या गाईड बरोबरच संशोधन करणारा. शिष्यवृत्ती ३०० रुपये मिळालेली. घरी बेताचीच परिस्थिती. भाऊ-बहिण शिकणारे. वडिलांच्या पगारात घर कसे चालवणार? घरचा आर्थिक व्यवहार आईच्याच हातात. आई हिशोबी. घर तीच चालवीत असे. तिने आपल्या मुलाला म्हणजे माझ्या मित्राला पहिल्याच महिन्यात सांगितले की घर खर्चासाठी रु २०० दरमहा द्यायचे. माझा मित्र नेहमी पैसे मिळाले की आईच्या हातात पैसे देत असे. त्यामुळे त्याला थोडी कडकीच असे. सर्वच कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात परिस्थिती अशीच असते. 
पदार्थविज्ञान विषयात ३ वर्षात पीएच.डी. मिळणे तसे कठीण. मित्राची शिष्यवृत्ती संपली . थोडे काम राहिले होते . करणार कसे ? आई म्हणाली , ‘ नोकरी कर . पुरे शिक्षण. ‘. त्याला कॉलेजमध्ये Demonstrator ची नोकरी मिळाली. पगार ५०० रुपये . आईला ४०० रुपये द्यावे लागत असत. नोकरी करून संशोधनाचे काम करणे जमत नसे. वेळ आणि पैसा . दोन्हीचा प्रश्न . त्याच महाविद्यालयात त्याला नोकरी मिळाली. पगार वाढला . पैसे आईच्या हातात द्यावे लागत असत . आईची आर्थिक शिस्त. सिनेमा पहावा असे वाटले तरी आईला पैसे मागावे लागत असत. त्यावेळी मला वाटत असे ,' अशी कशी आई ?', सर्व तिच्या मनाप्रमाणे . मुलाने पैसे तिच्याच हातात द्यायचे व लागल्यास मागायचे . ती ठरवणार मुलाला द्यायचे किंवा नाही. पै आणि पै चा हिशोब द्यावा लागे. त्याला संशोधन मध्येच सोडून द्यावे लागले. पगार पुरत नाही म्हणून शिकवण्या घ्याव्या लागत असत. त्याने नंतर शिकवण्यात खूप पैसा मिळवला . संशोधन मात्र सोडावे लागले.
खूप वर्षांनी हे लक्षात आलं की त्याच्या आईचे बरोबर होतं. त्यावेळी मला त्याच्या आईचा राग आला होता. . एका संशोधकाला संशोधन सोडून द्यावे लागले. व नोकरी आणि शिकवण्या करत बसावे लागले. घर चालवायचे तर पैसा हवाच. मुलांना शिकवलं . पण किती पैसे त्यांच्या शिकवण्यावर खर्च करणार ? त्या आईचा दृष्टीकोन practical होता. तिचा मुलांच्यावर अधिकार होता. घरातील इतर सदस्यांचा विचार होता.
आज अनेक आई-वडील आपले सर्व जमा केलेले पैसे मुलाला – मुलीला अमेरिका – युरोपमध्ये शिक्षण घेण्यासाठी खर्च करतात. मुलं त्या पैशाचा जोरावर अमेरिकेत जातात. आई-वडील कर्जाचे हप्ते भरत राहतात. मुलगा तिकडेच स्थाईक होतो. आतातर H1B व्हिसा मिळण्याचे वांदे. कर्ज फेडणार कसे ? , हा प्रश्न . वयोवृद्ध आई-वडील काय करणार ? आर्थिक हाल . शारीरिक त्रास. पैसे तर देऊन टाकलेले. अनेकांची परिस्थिती वाईट. अनेक कनिष्ठ आणि मध्यम वर्गीय घरामध्ये ह्या समस्या दिसून येतात . सर्व पैसा मुलांच्याकरिता खर्च केला की असा त्रास होणारच.
मग मला माझ्या मित्राच्या आईची आठवण होते . आई-वडिलांनी नुसते भावूक असणे योग्य नव्हे. आपला विचार करूनच  मुलांच्यावर खर्च करावा. त्यांच्यावर हक्क गाजवावा. त्यांनी मुलांना कुटुंबाची जबाबदारी घेतलीच पाहिजे, हे स्पष्टपणे सांगितले पाहिजे. आई-वडिलांनी थोडे खमके असणे आवश्यक आहे .आर्थिक व्यवहार महत्वाचा आहे. त्याचा विचार करून घर चालविले पाहिजे. नाहीतर घर चालविणार कसे ? काही वडील असे व्यवहारी नसतात . आईला अशी जबाबदारी अधिक चांगली उचलता येते , असे दिसून येते. आई ही आई असतेच . तिने असेही कणखर असणे आवश्यक असते .