Monday, March 2, 2015

' ने मजसी ने परत मातृभूमीला ..... '


'ने मजसी ने परत मातृभूमीला ....' ह्या सावरकरांच्या काव्यपंक्ती अनेक जण एन.आर.आय लोकांच्यावर टीका करताना वापरताना दिसतात.
" आपले परदेशातील मराठी बांधव पुढ्यात हार्मोनियम वगैरे घेऊन ' ने मजसी ने ..'म्हणतात तेव्हा गंमतवाटते कारण एकीकडे त्यांची ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी धडपड चालू असते " हे अवधूत परळकरांचे स्टेटस फेसबुकवर वाचण्यात आले होते व त्यावरील अनेकांच्या प्रतिक्रिया वाचण्यात आल्या. सावरकरांच्या ह्या काव्यपंक्ती  एन.आर.आय लोकांच्यावर टीका करताना वापरल्या होत्या. असे करताना त्यांना नेमके कोणावर टीका करावयाची होती हे समजत नव्हते.  
    मुख्य म्हणजे उच्च शिक्षणासाठी अनेक भारतीय परदेशात जातात. त्यानंतर तेथेच स्थाईक होतात. हे फार पूर्वीपासून चालू आहे. अगदी इंग्रजांच्या काळात अनेक भारतीय शिक्षणासाठी इंग्लंडला जात असत. आपले सगळेच नावाजलेले पुढारी महात्मा गांधी , जवाहरलाल नेहरू , नेताजी सुभाष , सरदार पटेल , वि दा सावरकर , असे कितीतरी लोक त्या वेळी विलायतेला गेले. गांधीजी नंतर दक्षिण आफ्रिकेत गेले. कदाचित ही मंडळी इंग्लंडला गेली नसती तर पुढे स्वातंत्र्य लढ्यात पडलीच नसती.  अर्थात आज
तशी परिस्थिती नाही. 
    सुरुवातीला ब्रेनड्रेनमुळे परदेशात जाणार्यांची संख्या खूप वाढली. अलिकडे सर्वच क्षेत्रात रिझर्वेशन असल्यामुळे १०० टक्के मार्क मिळवले तरी पाहिजे त्या क्षेत्रात प्रवेश मिळणे कठीण झाले आहे. मग पर्याय कोणता ? परदेशगमन. आधी उच्च शिक्षणासाठी. मग अधिक पैसा मिळवण्यासाठी. मग अधिक सुखी जीवन जगण्यासाठी. जोडीदार मिळण्यासाठी मग भारत भेटी चालू होतात. पुढे स्थिरस्थावर होण्यास वयाची ३० वर्षे निघून जातात.  
     सावरकरांची वर उल्लेख केलेली कविता त्यांच्या मातृभूमीच्या ओढीची कल्पना देते. देशभक्तीने प्रेरित झालेल्या सावरकरासारख्या संवेदनशील माणसाच्या मनातील ते भाव ह्या कवितेत उत्कटतेने व्यक्त झाले आहेत. त्यामुळे ती कविता किंवा त्या ओळी कोणत्याही भारतीयाला स्वदेशाची आठवण करून देतात. शालेय जीवनात क्रमिक पुस्तकात वाचलेल्या ह्या काव्यपंक्ती त्यांच्या मनात कुठेतरी दडून बसलेल्या असतात. कोणत्याही माणसाला आपले गांव , आपला देश सोडून काही दिवस परदेशी गेल्यानंतर एकटे असताना आपल्या गावाच्या , आपल्या देशातील माणसांच्या आठवणीने ह्या ओळी आठवाव्या  हे स्वाभाविक आहे. हे त्याच्या संवेदनशीलतेचे लक्षण आहे. हा त्या काव्यपंक्तीचा प्रभाव आहे.   

      स्वातंत्र्यवीर सावरकरांची अगतिकता आपल्याला दिसते पण परदेशात गेलेल्या अनेकांची अगतिकता आपल्याला दिसत नाही त्यामुळे विनोदाचा आधार घेऊन ह्या एन.आर.आय. लोकांची चेष्टा करणारे बरेच लोक आहेत. ते त्यांना समजावून घेताना दिसत नाहीत.  

      अनेकांचा एन.आर.आय भारतीयावर फार राग दिसून येतो . आज मोठ्या प्रमाणावर प्रत्येक कुटुंबातील एखादी व्यक्ती तरी उच्च शिक्षणासाठी परदेशात जात आहे , तेथेच स्थाईक होत आहे. त्यांचे जीवनमान सुधारते आहे. काहीजण गर्भश्रीमंतही झाले आहेत. सुरुवातीला अधूनमधून हे लोक भारतात येतात . जवळच्या नातेवाईक आणि आप्तस्वकीय मित्रमंडळीना भेटतात आणि सुट्टीनंतर परत जातात. असे काही वर्षे नित्यनेमाने चालू असते. पुढे ते कमी कमी होत जाते.  भारतात येताना त्यांचा उत्साह असतो. भारतातून परत जाताना येथे कशाला आलो , असे त्यांना वाटत राहते. येथील दैनंदिन अडचणी आणि जगण्याच्या गैरसोयी ह्यामुळे ते परेशान झालेले असतात . पु. ल. देशपांडे दरवर्षी कोकणात खूप उत्साहाने जात असत पण तेथून परतताना ' मी कां आलो?' असा प्रश्न त्यांना पडत असे . अगदी तसेच ह्या एन.आर.आय. मंडळीचे भारतात आल्यावर होत असणार.
        शहरात राहून मजा करणा-या अनेकाना आपल्या गावाचा, आपल्या माणसांचा आणि त्यातील जुन्या दिवसांचा उमाळा येत असतो हे खरंच आहे. आयुष्यातील बरेवाईट दिवस त्यांच्याबरोबर काढलेले असतात. हा उमाळा असणारच. तो माणूस स्वभाव आहे.  परदेशात जाण्याचा एक फायदा असतो. तेथील प्रगत जीवनपद्धतीमुळे बहूतेकांचे डोळे दिपून गेलेले असतात. आपल्या देशातील अनेक गोष्टी त्यांना खटकू लागतात. इकडेही काही गोष्टी बदलणे आवश्यक आहे असे त्यांना वाटू लागते. असे वाटणे चूक नसते. बोलताना असे काही सुचविले की इकडच्या लोकांना ते आवडत नाही. तिकडे राहून इकडच्या लोकांना भारत का सुधारत नाहीतुम्ही काय करायला पाहिजे म्हणजे भारत सुधारेल असे त्यांनी सुचविले की इकडच्या लोकांना आवडत नाही. त्यांना त्याचा राग येतो. फुकटचे सल्ले कशाला देता? असा उलटा प्रश्न विचारला जातो. काही बोलले की अशी उत्तरे दिली जातात. मग काय ? गुपचूप बसलेले बरे. सुट्टी संपली की परत जाणे हाच उत्तम उपाय. तेथे त्या देशात मन रमत नाही. येथे ह्या देशात भवितव्य नाही. इकडे आड , तिकडे विहीर. 

      अलिकडे ह्या भारतीय मंडळींची छोटी छोटी मंडळे स्थापन झाली आहेत. ती प्रादेशिक असतात. साहित्य , कला आणि मनोरंजन हाच प्रमुख उद्देश असतो आणि आपण ज्या भागातून आलो तेथील संगीत , नाट्य आणि कला ते जोपासत असतात. त्यामुळे त्यांच्या वार्षिक महोत्सवात भारतातील साहित्यिक आणि  कलावंत ह्यांना आवर्जून बोलावतात. त्यांची आपल्या लोकांशी असलेली नाळ तुटलेली नसते. त्यांना प्रेम आणि आपुलकी असते. भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान असतो. तेथील जीवनाशी ते पूर्ण एकरूप झालेले नसतात. त्यांची पाळेमुळे तेथे रुजलेली नसतात. त्यांना आपल्या देशाची , गावाकडल्या माणसांची ओढ असते. ती दूर गेलेली असली तरी त्यांचे दूर गेलेले गाव आणि माणसे त्यांच्या मनात घर करून बसलेली असतात. आजकाल असे सर्वांचेच झालेले असते . त्यासाठी परदेशात कशाला जायला हवे ? आपण एका प्रांतातून दुसर्या प्रांतात गेलो की हेच अनुभवतो. 
      गावाकडून मुंबईत कामासाठी येणारा कामगार असो किंवा युपी-बिहार मधून पोट भरण्यासाठी मुंबईत आलेला दुध घालणारा भय्या / भाजीवाला असो किंवा नेपाळमधून भारतात नोकरी शोधत आलेला गेटवरचा  सेक्युरिटी गार्ड असो , हे सारे एन.आर.आय सारखेच जीवन जगताना दिसतात. काही दिवस सुट्टी घेऊन ते गावी जातात तेव्हा ते आपल्या लक्षात येतात . कोणीतरी बदली माणूस असतो म्हणून आपण त्याचा विचार करत नाही . परत आल्यावर आपण दोन जुजबी शब्द बोलून त्यांची चौकशी करतो आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्यांना विसरून जातो. त्याच्या मनातील गावाकडील तगमग त्या एन.आर.आय व्यक्तीसारखीच असते. त्यात फारसा फरक नाही.
       जे सुखी एन.आर.आय आहेत त्यांचे थोडे वेगळे. असंख्य भारतीय जगाच्या कानाकोपर्यात काय काय कारणासाठी गेले आहेत , त्यांच्या जीवनाकडे बघितले की त्यांच्या मनात काय चाललेलं असतं , हे समजून घेणं महत्वाचं आहे. अशीच एक प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. एन.आर.आय. व्यक्तीवरचा राग व्यक्त करणारी आहे. "तुम्हाला नाही कळणार NY किंवा LA मधल्या अलिशान फ्ल्याटमध्ये पिझ्झा किंवा ब्रोकोली खातकोकचे किंवा बिअरचे सिप घेत 'सागरा प्राण तळमळलाम्हणण्यातली गम्मत. ने मजसी ने रॉक्स! शिवाय वीकेंडच्या इव्हला आम्हालाही वाटतेच की ओढ इंडियाची. तुम्हाला काय प्रॉब्स?" .पण एखादी निर्वासित व्यक्ती जेव्हा मातृभाषेत गाते तेव्हा परक्या देशात तिला निराळा आधार प्राप्त होतो. हे अनेकांना परदेशात वास्तव्य केले की जाणवते. मग तो जर्मन अमेरिकेत स्थाईक झालेला असो किंवा इंग्रज थायलंडमध्ये मध्ये काम करणारा असो. त्याचे प्राण स्वतःच्या देशासाठी तळमळतातच.
        भारतीय मानसिकतेची गंमत बघा. हेच एन.आर.आय. भारतीय. जेंव्हा
नेत्रदीपक यश मिळवतात तेंव्हा 'He is of Indian Origin' म्हणून ह्यांची मान एकदम ताठ. मग ते नोबेल विजेते हर गोविंद खुराणा असो की मायक्रोसॉफ्टचे सीईओ नाडेला असो. एरव्ही प्रकाशात नसलेल्या असंख्य एन.आर.आय.ला विनोदी भाषेत टोमणे.  
        मी ३० वर्षापूर्वी अमेरिकेला गेलो होतो. मी ज्या अमेरिकन कंपनीचे भारतात प्रतिनिधित्व करीत होतो त्या कंपनीत एक भारतीय इंजिनिअर काम करीत होता. तो तसा ज्युनिअर. तो गुजराती आणि मी मराठी. त्याची माझी ओळख झाली. आठवड्याच्या सुट्टीत म्हणजे शनिवार - रविवार तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. खूप पाहुणचार झाला. आजूबाजूला फिरवून आणले. त्याचे बरेच नातेवाईक होते. माझी दोन-चार तासांची ओळख. रविवारी मी माझ्या हॉटेलवर निघालो. त्या मंडळीनी माझा असा काही सत्कार केला की मी जणू काही बर्याच दिवसांनी माझ्या घरी माझ्या नातेवाईकाना भेटायला गेलो आहे असे मला वाटले. दूरदेशी स्थाईक झालेल्या लोकांना आपल्या देशीचा माणूस भेटल्यावर एवढा कां आनंद होत असावा ? मला त्या परदेशस्थ भारतीयांचे मन त्या दिवशी समजले. तो सत्कार माझा नव्हता तर मी त्यांच्या गावाचा होतो आणि खूप दिवसाने भेटलो होतो म्हणून ते गहिवरून आले असावेत.  
 झुम्पा लाहिरी ह्या लेखिकेने अशा परदेशस्थ भारतीय माणसांची मने शोधण्याचा प्रयत्न त्यांच्या दोन-तीन कादंबर्यातून केला आहे. त्यातील काही माणसे मी युरोप अमेरिकेत पाहिली आहेत. सुभाष भेंडे ह्यांची " अदेशी" कादंबरी ह्याच विषयावर होती. गोव्यातील शिक्षणासाठी परदेशी गेलेला युवक गोव्यात परत आल्यावर त्याची झालेली घालमेल हा त्या कादंबरीचा परीघ. तो परदेशात भारतीय असतो आणि भारतात "अदेशी"च असतो. 
        मॉस्कोतील भारतीय हॉटेलमध्ये काम करणारी मुलं आणि मुली  पाहिल्या . त्यांचे जीवन  बघितले. बर्लिन , वॉस्को , व्हिएन्ना अशा ठिकाणी भारतीय हॉटेलला भोजनासाठी भेटी दिल्या तेंव्हा त्या हॉटेलचे मालक आणि कुटुंबियांना भेटलो . त्यांच्याकडील काम करणाऱ्या कामगारांना भेटलो. त्या एन. आर. आय. लोकांचे जीवन समजून घेतले. त्यांच्या जीवनातील संघर्ष समजून घेतला . ही मंडळी तेथे गेलीच कशी ? तेथे स्थिरस्थावर झाली कशी ? अस्थिर असूनही राहतात कशी ? कित्येक वर्षात ' ने मजसी ने मातृभूमीला ... ' असे प्राण तळमळून स्वतःच्याच जीवाला सांगत असूनही येथे येऊ शकली नाहीत. आपण भेटलो की जणूकाही त्यांच्या गावाकडली माणसे भेटली असा आनंद त्यांना होत असतो. फार प्रेमाने आणि आपुलकीने ते विचारपूस करीत असतात. बर्लिनला होशियारपूरचा एक माणूस भेटला. मी सहज होशियारपूर किती छान आहे. सुंदर शेती आहे, माणसे चांगली आहेत. असा उल्लेख केला. गेल्या दहा वर्षात तो इकडे आला नव्हता. त्याचे डोळे पाण्याने भरून आले. गावाकडल्या आठवणीनी तो गहिवरून गेला. त्यांनी आमच्या करिता खास पंजाबी पदार्थ करून आणला. खूप प्रेमाने भरवले.
       असेच एकदा विमानात दोन तरूण  भेटले. इस्त्रालयमध्ये काम करणारे. तेथे वृद्ध लोकांची संख्या खूप जास्त आहे. त्यांना मदतनीस म्हणून लोक हवे असतात. मुंबईत चांगली नोकरी होती पण तेथे अधिक पैसे मिळतात आणि घरी मुलामुलींच्या शिक्षणाचा अधिक खर्च. म्हणून त्यांनी ही अधिक पैसे देणारी नोकरी स्वीकारली. २ वर्षांनी ते घरी येत होते. त्यांची बायका-मुले वाट पहात होती. त्यांच्या डोळ्यातील भाव मला काय सांगत होते. ' ने मजसी , ने मज ..... ' . असे कितीतरी भारतीय गल्फमध्ये नोकऱ्या करतात. त्यांना सारखेसारखे भारतात येणे जमत नाही. ज्यावेळी भारताकडे निघतात तेंव्हा त्यांचे चेहरे किती प्रफुल्लीत असतात.
       कोकणात मुंबईहून मनीऑर्डरची वाट पहाणारे आजही खूप मोठ्या संख्येने आहेत आणि गणपतीला कोंकणात जाणारे एवढे कासावीस कां झालेले असतात? त्यांचे प्राण तळमळतानाच दिसतात. अगदी तसेच हे परदेशी नोकर्या करणारे भारतीय. 
माझ्या नात्यातला एकजण आहे. ८-१० वर्षे इंग्लंडमध्ये होता. स्थिरस्थावर झाला. घर घेतले. नवरा-बायको आणि मुले तेथे रुळली. तेथील नागरिकत्वही मिळाले, त्यामुळे तसा तो इंग्रज झाला. असाच  एका क्षणी भारतात जावे , तेथे स्थिर व्हावे , असा विचार त्याच्या डोक्यात आला. आणि तो भारतात परतला. पुण्यात घर घेतले. मुलं शाळेत जाऊ लागली. कुटुंब नातेवाइकात - आजोबा-आजीत रमली. दहा वर्षे होऊन गेली. एक वर्षात मुलगा एस. एस. सी. होईल आणि महाविद्यालयात जाईल. आणि त्याच्या लक्षात आले . जर मुलाला चांगले उच्च शिक्षण हवे असेल तर इंग्लंडचा नागरिक असल्यामुळे तेथे सवलतीत अधिक चांगले शिक्षण मिळू शकते. आणि भारतात रिझर्वेशनमुळे जे पाहिजे तेथे प्रवेश मिळवणे कठीण आहे. आणि त्याचा नाईलाज झाला . त्याला पुन्हा परदेशात जाणे भाग पडले. पण त्याच्या मनात मात्र ' ने मजसी ने ... ' हे गाणे चालूच असते. असे कित्येक लोक माझ्या पाहण्यात आहेत.     
      व्यवहार आणि भावना यांची गल्लत केली की अशी गोची होते . हे खरे आहे. पैसेे खूप काळ कमावायचे असतील तर मग ग्रीनकार्ड हवेच. हे अमेरिकेत गेलेल्या तरुणांना माहित असतेच. सध्याची बहुसंख्य मध्यम वर्गीयांची मनोवृत्ती.....पैसे कमवण्याकरतासर्व प्रकारची सुख उपभोगण्याकरताग्रीन कार्ड हवे अशीच असली तरी ह्या देशात आपण त्यांच्यासाठी काय देण्यास तयार आहोत, ह्याचाही विचार करावयास नको का ? आपण जर अशा संधीच उपलब्ध करून देणार नसू तर नुसते टोचून बोलणे अयोग्य आहे. ब्रेनगेन हवा असेल तर तसे प्रयत्न नको का करावयास ? डॉ होमी भाभा आणि डॉ विक्रम साराभाई ह्यांनी हे ओळखले आणि अनेक तरुणांना भारताकडे आकर्षित केले. त्यांनी आपली कर्तबगारी येथे करून दाखविली.        
       तेंव्हा विनोदाचा आधार घेऊन 'अदेशी' झालेल्या लोकांना दुखावण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा विचार केला पाहिजे व त्यांना समजून घेतले पाहिजे. ' ने मजसी ने ......' अशी संवेदनशील भावना जपणारी माणसे जो पर्यंत आपल्यात आहेत तो पर्यंत त्यांच्या भेटीचा आनंद होतच राहणार. भले ते लोक उद्या मंगळावर नोकरीच्या शोधात जावो. आज खऱ्या अर्थाने ही मंडळी ग्लोबल होऊ पहात आहेत तेंव्हा आपण लोकल मंडळींनी थोडासा ग्लोबल होण्याचा प्रयत्न करावयास हवा. 
*****













3 comments:

  1. सर तुमचे लिखाण चं आहे ह्याचे एक पुस्तक प्रकाशित करा

    ReplyDelete