Wednesday, March 11, 2015

‘इन्शाअल्ला’ – सत्यदेव दुबे ह्यांच्या आत्मवृताचे नाट्यरूप


काल सत्यदेव दुबे लिखित चेतन दातार अनुवादित ‘इन्शाअल्ला’ हे ‘अविष्कार’ निर्मित नाटक पाहिले. अजित भगत ह्यांचे दिग्दर्शन. एक प्रचंड ताकदीचा प्रयोग. ह्याला नाटक म्हणावयाचे की एका प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शकाने स्वतःच्या जगण्याच्या अनुभवाला दिलेले नाट्यरूप म्हणावयाचे. हे नाट्यविषयाचे चिंतन म्हणावयाचे की स्वतःच्या जगण्याचे तत्वज्ञान म्हणावयाचे. स्वतःचे नाट्यविश्व आणि जगणे ह्यातील संघर्ष मांडताना आयुष्यात घडलेल्या काही घटना आणि कडू-गोड आठवणींचा आधार घेऊन केलेले हे मुक्त चिंतन आहे. तसे हे रूढार्थाने नाटक नाही.  

दुबेंनी आयुष्यभर प्रायोगिक नाटकेच केली. अनेक वर्षापूर्वी तेजपाल सभागृहात मी त्यांची सुरुवातीची नाटके पाहिली होती. त्या वेळी ह्या नाट्यदिग्दर्शकाला जवळून पाहिले होते. नंतर त्यांच्या विक्षिप्त स्वभावाबद्दल खुप ऐकले आणि वाचले होते. नाट्यप्रशिक्षक म्हणून ते नावाजलेले होते. त्यांची कडक शिस्त अनेक कलाकारांनी अनुभवली होती. त्यासंबंधी अनेकांनी लिहिले होते. तसे हे नाट्यक्षेत्रातील वादग्रस्त व्यक्तिमत्व. त्यांच्या स्वतःच्या काही जीवन संकल्पना आणि नाट्याविषयीच्या तीव्र जाणीवा होत्या. प्रेक्षकाला काय आवडतं ह्यांच्याशी त्यांचं काही देणं घेणं नव्हतं. तरीही ते नाटके करीत राहिले. त्यांचा एक चाहता वर्ग होता.
असा हा प्रचंड ताकदीचा नाट्यदिग्दर्शक. तसा तो यशस्वी नाटककार कधीच नव्हता. ह्याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. आपण कोण आहोत? आपली काय क्षमता आहे? , ह्याची पूर्ण जाणीव त्यांना होती. ते ओळखूनच त्यांनी केलेले हे आत्मचिंतन. स्वतःला शोधण्याचा केलेला प्रामाणिक प्रयत्न. हे तसे त्यांचे आत्मचरित्रच. त्याला नाट्यरूप देणे तसे अवघडच. संवादातून प्रेक्षकांशी थेट बोलण्यासाठीच दुबेंनी हे लेखन केले आहे. आपल्याशी दुबे बोलत आहेत आणि संवाद साधून स्वतःचे मनोगत व्यक्त करीत आहेत असाच नाटकभर भास होत राहतो. एखादे आत्मचरित्र वाचताना जसे वाटते तसेच वाटत राहते. पण हा आत्मचरित्र नायक आपल्याशी संवाद साधत असतो. प्रायोगिक नाटकासाठीच्या  छोट्याशा सभागृहात आपल्यापासून हा नायक अगदी थोड्याशा अंतरावर असल्यामुळे जणूकाही आपल्याशीच , आपल्याच डोळ्यात बघून बोलतो आहे , असाच भास होतो. अर्थात तोच बोलत असतो आणि आपण ऐकत असतो. अंतर्मुख होऊन जगण्याचा अर्थ शोधत असतो.  
सुशील इनामदार ह्यांनी सर्वेश्वर म्हणजे सत्यदेव दुबे ह्यांचीच भूमिका केली असून ज्यांनी दुबें ह्यांना पाहिले आहे त्यांना त्यांची आठवण व्हावी इतके सुंदर काम केले आहे. गौतम बेर्डे ह्यांचा देवेंदर आणि मृणाल वरणकर हिची गुलनची भूमिका उल्लेखनीय आहे. अगदी तोडीस तोड. संवाद फेक अप्रतिम. खरं म्हणजे अगदी छोट्या छोट्या भूमिका करणारे ‘अविष्कार’चे सर्वच कलाकार कलागुणसंपन्न आहेत. ते नुसतेच हौशी नाहीत तर एखाद्या कसलेल्या कलावंताला खूप काही शिकवून जातात. त्यामुळेच ह्या न-नाट्याचे सादरीकरण इतके अप्रतिम की हे लक्षात राहणारे नाटक होऊन जाते. प्रायोगिक नाटकाला तसे मोजकेच प्रेक्षक असतात हे आपल्या सर्वाना माहितच आहे पण ‘अविष्कार’चे काकडेकाका असे नवे नवे प्रयोग करीतच असतात. ह्या नाट्यकर्मीची ह्या वयात कमाल वाटते. JUST GREAT. अवश्य नाट्यानुभव घ्यावा.    
     

  

No comments:

Post a Comment