Saturday, March 15, 2014

स्मरणातील ‘गिधाडे’चा पहिला प्रयोग


मी मुंबई विद्यापीठाच्या माटुंग्यातील यु.डी.सी.टी मध्ये संशोधन करणारा विद्यार्थी होतो. पीएच.डी साठी औरंगाबादहून येथे आलो. विद्यार्थी जीवनातील एकटेपणा अनुभवत होतो. नाटक–सिनेमा पाहणे हा एक विरंगुळा होता."भुवन सोम", "सारा आकाश", "अपराजितो" असे सुंदर चित्रपट पाहत होतो. त्या वेळी नाटक/सिनेमा पाहण्यासाठी मी कुठेही प्रवास करीत असे. तो एक विरंगुळा होता. कधी कधी माझे मित्र मला शोधण्यासाठी 'शिवाजी मंदिर' किंवा ‘साहित्य संघात’ येत असत. बाळ कोल्हटकर, वसंत कानेटकर ह्यांची नाटके जोरांत चालत असत. मग श.ना.नवरे, सुरेश खरे, जयवंत दळवी, श्री. ना. पेंडसे ह्यांची नाटके गाजू लागली. प्रायोगिक रंगभूमीवर नवे नवे प्रयोग होत असत. खानोलकर-तेंडुलकरांची नाटके होऊ लागली. 

असाच एक रविवार असतो. सकाळची “कोवळी उन्हें” पडलेली होती. मध्येच कुठेतरी काळ्या ढगांचा पुंजका दिसतो. काळे ढग वाढू लागतात. पावसाची सर येऊन जाते. ५-६ मिनिटांनी परत ऊन पडते. 'मुंबईच्या पावसाचा आणि पोरींचा भरवसा नसतो', असे कोणी तरी म्हणाले होते. कालचा पेपर टेबलावर पडलेला असतो. त्यातील जाहिरातीवर सहज लक्ष जाते. विजय तेंडुलकरांची "गिधाडे" गवालिया Tank जवळच्या तेजपाल नाट्यगृहापाशी भिरभिरणारी असतात. ही "गिधाडे" साहित्य संघ किंवा शिवाजी मंदिराकडे उडत येणार नाहीत असे जाहिरातीत लिहिलेले असते. त्यामुळे गवालिया Tank पर्यंतचा प्रवास ही “गिधाडे” बघण्यासाठी करावा लागणार असे लक्षात येते. इतक्या लांब प्रवास करावयाचा कां नाही?, ह्या बद्दल मनात विचार चालू असतो.

विजय तेंडूलकर मटा मध्ये “कोवळी उन्हे” लिहित असत तेव्हापासून आवडत असत. " माणूस" मध्ये “रातराणी” हे त्यांचे सुंदर सदर मी आवर्जून वाचत असे. “शांतता कोर्ट चालू आहे”,ह्या नाटकाला बक्षीस मिळाले होते आणि हा नाटककार गाजू लागला होता . त्यांना एक वलय प्राप्त झाले होते. फार पूर्वी “मी जिंकलो, मी हरलो” ह्या त्यांच्या नाटकावर आचार्य अत्रे ह्यांनी अग्रलेख लिहिला होता, तो वाचला होता पण ते नाटक बघितले नव्हते. औरंगाबादकडे अशी नाटके कोण सादर करणार? पुणे – मुंबई बाहेर अशी नाटके फारशी होत नसत. तेंडुलकरांची नाटके गंभीर वळणाची आहेत. नाट्यगृहातून बाहेर पडल्यावर अस्वस्थ करणारी आहेत. ती मन सुन्न करणारी आहेत, अशी नाट्यसमीक्षा वाचली होती. अस्वस्थ करणारा नाटककार म्हणून माधव मनोहर ह्यांनी "पंचम" ह्या त्यांच्या सदरात उल्लेख केला होता. अर्थात अपवाद होता तो फक्त "अशी पाखरे येती" ह्या नाटकाचा. ते एक आनंद देणारे नाटक होते.
नाटक पाहायला तेजपालला गेलो. तो पहिलाच प्रयोग होता. त्यावेळी नाटकाचे पहिलेच प्रयोग पाहणे हा माझा छंद होता. नाटक पाहिल्यानंतर त्यावेळी जे वाटले ते डायरीत लिहिले होते. आज ती जूनी डायरी चाळताना ह्या नोंदी दिसल्या. त्यातील खालील भाग.

प्रेक्षकांचे मन पाखरूं पाखरूं असतं. पाखरासारखी मन असणारी माणसे त्यांना नाटक सिनेमातून आवडतात. तेंडूलकरांना मात्र समाज जीवनातील “गिधाडे" दिसतात. हे नाटक पाहून आल्यावर समजले. हा दोन तास करमणुकीचा प्रकार नव्हता. हा एक वेगळा नाट्यानुभव होता. जीवनामध्ये नाट्य नसावे , पण नाट्यामध्ये जीवन असणे आवश्यक आहे. स्वतःवरच प्रेम करणारी लंपट माणसे, दुसर्यांच्या जीवनानंदाचा लचका तोडून स्वतःला  सुखी करण्यासाठी गिधाडासारखी प्रयत्न करणारी आजूबाजूची माणसे असतात पण त्यांच्यावर नाटक लिहून वेगळा अनुभव देणारे तेंडूलकर हे त्या वेळी वेगळे नाटककार होते. फार नंतर छबिलदासची चळवळ आली.

पाश्चिमात्यिकरण, औद्योगिकरण, व आधुनिकीकरणाचे परिणाम आपल्या समाजावर झाल्यामुळे कसे निरनिराळे प्रश्न उभे राहतात व एका अधोगतीला गेलेल्या कुटुंबाचे उदाहरण घेऊन त्या कुटुंबातील पांच गिधाडे कशी वागतात ह्यावर आधारलेले हे नाटक वेगळे होते. ३५-४० वर्षापूर्वी असे नाटक लिहिणारा हा नाटककार वेगळाच आहे, हे लक्षात येत होते. 

दोन नमुनेदार भाऊ, एक इरसाल बहिण, त्यांचा बाप, अभागी वहिनी व एक अनौरस मुलगा अशी एकाच कुटुंबातील पांच गिधाडे. पैशासाठी बापालाच मारायला उठलेले दोन भाऊ व एक बहिण , पुढे बहिणीपासून पैसा मिळावा म्हणून कट रचणारे तेच दोन भाऊ, पुत्र होत नाही म्हणून अभागी असलेली वहिनी व  ठेवलेल्या बाईपासून झालेल्या दिराबरोबर भोग भोगणारी स्त्री, हे सारे कुटुंबच अध:पतनाला गेलेले असते.  स्वतःवर, पैशावर प्रेम करणारी ही माणसे व गिधाड्यासारखी लचका तोडणारी त्यांची वृत्ती मानवी स्वभावाचे वेगळे रूप होते. अशी गिधाडे समाजात खूप दिसून येतात हे नाटकातून दाखवल्यामुळे ते वास्तववादी नाटक झाले आहे.

ताई-माई ची नाटके पाहणाऱ्या प्रेक्षकासाठी हे फार अवघड होते. चि.त्र्यं. खानोलकर ( अवध्य ) आणि तेंडुलकरांचे (गिधाडे) ही दोन नाटके वेगळ्या वळणाची प्रभावी नाटके होती. त्यावेळी बाळ कोल्हटकर आणि वसंत कानेटकरांची नाटके पाहणारा प्रेक्षक भांबावून गेला होता. ही नाटके निखळ करमणूक नव्हती. पु.ल.चा हसविण्याचा धंदा असलेली ही रंगभूमी नव्हती. जीवनामध्ये अनेक प्रश्न असतात आणि अनेक समस्या उभ्या राहतात. चार घटका करमणूक म्हणून नाटक –सिनेमाला जाणारा प्रेक्षक पैसे देऊन हा ताप कशाला विकत घेईल. त्यात मनोरंजन नव्हते.  नाटक पाहून गंभीर होण्याचा तो अनुभव होता. त्यामुळे एकंदर जीवनाबद्दल अधिकच विचार करावा लागत असे. 

नाटककाराने "गिधाडे" हे प्रतीक वापरून नाटकाचे नांव आकर्षित केले व वेगळा परिणाम साधला. वेगळ्या समस्या मांडल्या. निराशावादी सूर लावला. त्यामुळे हे नाटक मनाला आनंद देत नाही. उदास करते. खिन्न करते. उत्तर आपल्याला शोधायला लावते. त्यामुळे आपण अस्वस्थ होतो. 

आपण आजूबाजूची परिस्थिती पाहिली की अधिक अस्वस्थ होऊ लागतो. नाटककाराने ते त्यावेळी पाहिले, अनुभवले आणि आपल्यापुढे नाटक म्हणून उभे केले. कधी कधी किळसवाणे वाटणारे हे नाटक आपल्यावर वेगळा परिणाम करून जाते. त्यात नाटककार मात्र  यशस्वी झाला असे वाटते. थिएटर युनिटने सादर केलेला तो प्रयोग अप्रतिम होता. परिणामकारक होता. कसलेले नट-नट्या होत्या. त्यांचा अभिनय अप्रतिम होता. वातावरण निर्मितीसाठी आवश्यक असलेले नेपथ्य, प्रभावी संगीत, परिणामकारक प्रकाश योजना हे सारे सुरेख होते. आजही तो नाट्यानुभव स्मरणात आहे. नाट्यानंद न मिळताही खूप काही देऊन जाणारे हे नाटक तसे विलक्षण नाट्यानुभव देणारे होते हे नक्की.

खरं म्हणजे अशी नाटके म्हणजे एक वैताग होता. जीवनातील उभे राहणाऱ्या प्रश्नाचा विसर पडावा म्हणून विरंगुळ्यासाठी येणारा प्रेक्षक अधिक वैताग घेऊन जात असे. तरीही मोजका प्रेक्षक वर्ग तेंडूलकरांच्या – खानोलकरांच्या नाटकाकडे वळला. जीवनाची काळीकुट्ट बाजू प्रभावीपणे  मांडण्यात तेंडूलकर – खानोलकर यशस्वी झाले होते. “आतां मुक्ती नाही, आता मुक्ती नाही”, असे काहींसे निराशावादी विचार त्या नाटकातून ते देऊन जात होते. त्याच वेळी गिरीश कर्नाड, बादल सरकार ह्यांची नाटके हिंदीतून होऊ लागली होती. "आधे अधुरे" आणि "स्टील फ्रेम" ह्या दोन नाटकांचे प्रयोग गाजू लागले होते. त्यासाठी प्रायोगिक रंगभूमीवर होणारी नाटके पहाण्यासाठी प्रेक्षकांना तेजपाल सभागृहाकडे जावे लागत असे.

तेजपालच्या ह्या प्रयोगाला तेंडुलकराना पहिल्यांदा पाहिले. ते शेवटच्या रांगेत बसले होते. त्यावेळी त्यांनी दाढी ठेवली नव्हती. दिसायला सुंदर असलेले त्यांचे उमदे व्यक्तिमत्व. "कोवळी उन्हे" लिहिणारा हा माणूस “गिधाडे” नाटक लिहिणारा आहे, हे खरे वाटत नव्हते. 

खूप वर्षांनी त्यांची प्रत्यक्ष ओळख झाली आणि थोडीशी मैत्री झाली. त्यांच्याबरोबर प्रवास ही केला. अनेक विषयावर गप्पा मारल्या.त्यांना जवळून बघितले. 

आजही मला “ कोवळी उन्हे” , “रातराणी” आणि “ अशी पाखरे येती” लिहिणारे तेंडुलकरच जास्त आवडतात. "राम प्रहर"चा प्रकाशक तर मीच होतो. "पेशा लेखकाचा" हे त्यांचे  सुंदर सदर मटा मध्ये होते. ते त्यांनी बंद केले. ते पुस्तक मी काढायचे ठरविले होते.  

Saturday, March 8, 2014

आहे मनोहर तरी - तक्रारीचा सूर

सुनिता देशपांडे ह्यांचे “आहे मनोहर तरी” वाचल्यानंतर त्या वेळी जे वाटलं ते त्यांना पत्र लिहून कळविले होते. त्या पत्रास त्यांचे उत्तर ही मिळालं. आज ते वाचताना थोडीशी गंमत वाटते.

दिनांक १८ ०१ १९९२
सुनिता देशपांडे
सप्रेम नमस्कार ,
दिनांक १४ जानेवारी. माझ्या बायकोचा वाढदिवस. ह्यावर्षी तिच्या वाढदिवसानिमित्त तुमचे गाजत असलेले “आहे मनोहर तरी” हे पुस्तक भेट म्हणून दिले. पुस्तक भेट दिल्यानंतर मी ते पुस्तक चार दिवसात वाचून काढले. तसं पुस्तक प्रसिद्ध होऊन बरेच दिवस झाले होते. महाराष्ट्र टाइम्समध्ये काही भाग पूर्वी प्रसिद्ध झालेला वाचला होता. त्यामुळे पुस्तकाबद्दल थोडेसे औत्सुक्य होतेच. प्रसिद्ध झाल्यानंतर थोड्याच दिवसात पुरस्कारही मिळाला. काहीं परीक्षणे वाचण्यात आली आणि पुस्तक गाजू लागले.
साऱ्या महाराष्ट्राला पुलकित करणाऱ्या पु.ल.च्या बायकोने लिहिलेले पुस्तक आत्मचरित्रात्मक असल्यामुळे गाजणार होतेच. बाई पु.ल.च्या बद्दल काय लिहितात हेच लोकांना हवे असणार. सर्व प्रथम दुकानात पुस्तक बघितले आणि त्या अनाकर्षक मुखपृष्ठामुळे थोडासा नाराज झालो. साधेपणात सौंदर्य असते हे खरे आहे पण मौज प्रकाशन आणि श्री. पु .भागवतांनी काटकसर कशासाठी केली हे समजले नाही. खर्च न करताही पुस्तक अधिक सुंदर करता आले असते. रा. ज. देशमुखांशी पु.ल.च्या पहिल्या पुस्तकानिमित्त बोलणी करताना वाद घालणाऱ्या व्यक्तीने ‘मौज’लाही हे सांगावयास हवे होते. चांगल्या मुखपृष्ठाचा आग्रह धरावयास हवा होता. एवढ्या चांगल्या पुस्तकाला इतके अनाकर्षक मुखपृष्ठ नको होते. असो.

पुस्तक वाचावयास घेतले आणि पुस्तकात रमलो. खूप मनमोकळेपणाने लिहिलेले हे स्वैर मुक्त चिंतन. आत्मपरीक्षणाचे (Self Analysis) उत्तम उदाहरण आहे. पु.ल.च्या बद्दल साऱ्या महाराष्ट्राला आकर्षण आहे. त्यांनी महाराष्ट्राला हसवून हसवून खूष केले आहे. अशा एका थोर लेखकाची/कलावंताची बायको आत्मचरित्रात्मक लिखाण करते तेव्हा तिचेही व्यक्तिमत्व असामान्य आणि प्रभावी आहे हे पुस्तक वाचताना जाणवते.

खरं म्हणजे तुमच्या प्रभावी व्यक्तिमत्वाची ओळख झाली ती तुम्ही उभयतांनी बोरकरांच्या  कवितांचे काव्यवाचन सुरु केले तेंव्हा.कवितेत रमणारी ही व्यक्ती निराळीच आहे हे तेव्हाच जाणवले. ही व्यक्ती तत्वनिष्ठ आहे , शिस्तशीर आहे हे ही जाणवत होते.
पुस्तकातील काही भाग हा तर एखाद्या कवितेसारखाच आहे. मुक्त काव्यासारखा. तुमचे आत्मचिंतन हे एक तत्व चिंतन आहे. एक वेगळी जीवन दृष्टी आहे. एक गंभीर (Serious) स्वरूपाचे लिखाण आहे. पु.ल.च्या लिखाणात ही काव्यमयता आणि चिंतनशीलता जाणवत नाही. तो त्यांचा पिंडच नाही. पण आम्हा वाचकांना "हसविण्याचा धंदा" करणारे पु.ल.ही हवे हवेसे असतात आणि तुम्ही जे लिहिले आहे ते काव्यमय, गंभीर वळणाचे मुक्त चिंतन ही आवडते. हे लिखाण एक नवी दृष्टी देते.
पुस्तकास थोडासा पसरटपणा आला आहे. श्री.पु भागवत आणि विजया राजाध्यक्ष ह्यांनी छापण्यापूर्वी वाचन केले होते असे तुम्ही लिहिले आहे. मग त्यांनी तशा सूचना करावयास हव्या होत्या. थोडेसे संपादन (Editing) हवे होते. गप्पा मारल्यासारखे स्वैर चिंतन वाटते.घटनांचा क्रम बदलत गेला. तो पसारा थोडासा व्यवस्थित लावावयास हवा होता.

एक गोष्ट विशेष खटकली. पुस्तकात सर्वत्र तुमचा तक्रारीचा सूर जाणवला. त्यामुळेच लिखाणात तोच तोपणा आला असावा. भाईंचे व्यक्तीदोष दाखविताना पुन्हा पुन्हा तेच ते लिहिले गेले आहे. ते संपादित केले असते तर अधिक बरे झाले असते.

साहित्य निर्मितीच्या वेळचे पु.ल. सोडले तर ते सामान्य मध्यम माणसासारखे एक “माणूस” आहेत म्हणूनच ते सामान्य माणसाना जवळचे वाटतात. तुमच्या व्यक्तिमत्वातील 'असामान्यत्व’ पु.ल.नी सुरुवातीलाच ओळखले असणार.

पु.ल. आणि सुनिता ही दोन व्यक्तिमत्वे गणिताच्या भाषेत वर्णन करावयाची असतील तर दिसतात “३६” सारखी. परंतू असे भिन्न व्यक्तिमत्व असलेले हे जोडपे राहते मात्र “६३” सारखे. हेच तुमच्या दोघांच्या सहजीवनाचे यश आहे.

पुस्तक खूप आवडले. मनापासून अभिनंदन.असेच लिहीत रहा .पुस्तक वाचून थोडासा भारावून गेलो. एका वेगळ्या व्यक्तिमत्वाचे दर्शन झाले. म्हणून हा लेखन प्रपंच.
पु.ल.ना सप्रेम नमस्कार.
आपला,
डॉ. नरेंद्र गंगाखेडकर

ह्या पत्राला पोच पावती म्हणून पोस्ट कार्ड मिळाले. त्यात लिहिले होते ....

दिनांक २९ १ १९९२
सप्रेम नमस्कार,
माझे पुस्तक वाचून मुद्दाम अगत्यपूर्वक पाठवलेले पत्र मिळाले. आभारी आहे.
पुस्तकाचे मुखपृष्ठ तुम्हाला आवडले नाही. मला स्वतःला चित्रांतले फारसे कळत नाही. पण काही चित्रे एकदम मनात भरतात हे खरे. माझ्या पुस्तकाचे मुखपृष्ठ त्यापैकी नाही. पण मला स्वतःला त्यात काही उणीव आहे असे वाटले नाही. उलट , साधेसेच म्हणून चांगले वाटले. असो.
माझ्या लिखाणाला समजदार दाद देताना त्यात तुम्हाला ज्या उणिवा वाटल्या त्या बद्दल तुम्ही मोकळेपणाने लिहिले आहे , त्याचा आनंद झाला.मी तुमचे पत्र श्री.पु. भागवताना जरूर दाखवीन.पत्राबद्दल पुनश्च आभार.
आपली ,
सुनिता देशपांडे
  


Monday, March 3, 2014

“वडिलांच्या सेवेशी”

Like / Comment
मला पुस्तक वाचून काय वाटले हे लिहून काढायची सवय होती. कधी कधी लेखकाला पत्र लिहून कळवावे असेही वाटत असे. काहीजणांना अशी पत्रे मी लिहिली होती. आज सहज जून्या फायली चाळत होतो. आणि माझी अशीच काही पत्रे सापडली. त्याला आलेली लेखकांची उत्तरेही त्या बरोबर होती. आज तो पत्र व्यवहार वाचताना थोडीशी गंमत वाटली.
शिरीष पै ह्यांचे “वडिलांच्या सेवेशी” आणि सुनिता देशपांडे ह्यांचे “ आहे मनोहर तरी” ही दोन पुस्तके वाचली होती. मी मला त्यावेळी जे वाटले ते लिहून त्यांना  कळविले होते आणि त्या दोघींनी माझ्या पत्राला उत्तर दिले होते . त्यावेळी इ-मेल / इंटरनेट / फेसबूक नव्हते. Like / Comment चा प्रकार नव्हता. लेखक वाचकाच्या पत्रांना आवर्जून उत्तर देत असत. पोस्ट कार्ड येत असे.अशी काहीं पोस्ट कार्ड सापडली. त्यासंबंधी हा ब्लॉग.  
दिनांक २१ मे,१९९२
प्रिय शिरीष पै,
स. न .
“वडिलांच्या सेवेशी” हे पुस्तक वाचण्यात रमलो होतो. ह्या पुस्तकाविषयी औत्सुक्य होते. थोडेसे उशीराच वाचण्यात आले. ह्यातील काहीं भाग कुठेतरी प्रसिद्ध झाला होता आणि तो वाचण्यात आला होता. व्यंकटेश पै ह्यांचे व्यक्तिमत्व "मनोहर” होते म्हणूनच तुम्ही त्यांच्या प्रेमात पडला असाव्यात. परंतू तुम्हा उभयतांच्या जीवनास “ आहे मनोहर तरी” म्हणता येणार नाही. प्रेमात पडलेल्या व्यक्तीकरता “नाच ग घुमा” ची भूमिका घेऊन ही बरेचसे नैराश्य पदरी पडत असावे . ह्या मानवी गुंतागुंतीचा अर्थ लागत नाही. जीवन इतके फरफटणारे नसावे. असे कां घडते ?आपल्या हातात काहींच नसते कां ? आपल्याला पाहिजे असलेले आखीव–रेखीव जगणं प्रयत्न करूनही जगता येत नाही कां? कां कुणीतरी कळसूत्री बाहुल्याप्रमाणे सारे घडवीत असतो ?असे अनेक प्रश्न डोक्यात येत राहतात. “पपा – आई – व्यंकटेश आणि मी” अशी जी मालिका तुम्ही गुंफली आहे ती वाचताना पुस्तक खाली न ठेवता पुढे वाचत जावे असेच वाटते. थोडीशी पुनरोक्ती होऊनही पुस्तक खूपच वाचनीय झाले आहे. खूप आवडले. बऱ्याच वेळा मन सुन्न झाले.
कदाचित माणूस जेव्हा सुखदु:ख भोगतो तेव्हाच त्याचे वेगळे असे विलोभनीय व्यक्तिमत्व घडत असावे. एक कवी मन त्यातूनच उमलत गेलेले असते. एका सकस कवितेचा जन्म होण्यासाठी ही अनुभूती हवी असावी. नाहीतर शिरीष पैंच्या “हायकू” जन्माला आल्या नसत्या. कवी मन आणि कविता होण्याची प्रक्रिया झाल्याच नसत्या. सुखदु:ख भोगलेल्या व्यक्तीकडूनच हे घडू शकते.
पुस्तकातील “मी” हा भाग. “मी” काही घडत गेले. “मी”वर कशा कशा सावल्या पडत गेल्या. “मी” घडण्यासाठी कोण कोण जबाबदार आहेत. कळत नकळत कुणी कुणी influence केला. साहित्याचा आस्वाद घेता घेता नव्या दिशा कशा मिळत गेल्या. हे आत्मचिंतन सुरेख.
विजय तेंडुलकरांच्या व्यक्तिमत्वाचा आणि साहित्याचा कसा प्रभाव पडला हे सांगताना तुम्ही तेंडुलकरांच्या साहित्यासंबंधी खूप सुंदर निरीक्षण केले आहे. इतर ही साहित्यीकाबद्द्ल अशीच पोच-पावती दिलेली दिसते. फार थोडी साहित्यिक मंडळी असे मोकळेपणाने लिहितात.
काहीं वर्षापूर्वी शाम जोशी ह्यांनी तुमच्या “हायकू" करिता सुंदर चित्रे काढली होती. मी ते चित्र प्रदर्शन पाहिले होते. एका चित्रकाराने कवितेला विलक्षण सामर्थ्याने चित्रित केले होते. तुमच्या कविता मी वाचल्या आहेत. माझ्या वहीत मी आवडलेल्या अशा अनेक कविता लिहून काढल्या होत्या. त्यात तुमच्या “हायकू” होत्या. एकटेपणी कविता वाचून आस्वाद घेणारा मी वाचक आहे. तुमचे पपा म्हणजे आचार्य अत्रे ह्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही “दुर्गा भागवत” किंवा "इरावती कर्वे" झाला नाहीत हे एका दृष्टीने चांगलेच झाले. नाहीतर मराठी साहित्यात “हायकू" लिहिणारी कवियत्री झाली नसती.
विजय तेंडुलकरांना अत्र्यांचा सहवास लाभला होता. त्यांनी “माणूस" मध्ये “प्रचंड" ह्या शिर्षकाचा एक लेख आचार्य अत्रे ह्यांच्यावर लिहिला होता. मला आवडलेला तो लेख आजही आठवतो. तेंडुलकराच्या विलेपार्ल्यातील सत्कार समारंभात तुम्ही फार सुंदर भाषण केलं होते. छोटसं भाषण.खूप काही सांगून गेलं. आचार्य अत्र्यांनी लिहिलेला “मी जिंकलो , मी हरलो’ हा अग्रलेख आठवला. “ शांतता कोर्ट चालू आहे” ह्या नाटकात तुमचीच कविता होती हे नंतर कळले. तुमच्या त्या कवितेच चांगलं कौतुक झालं असंच म्हणावे लागेल. सुलभा देशपांडे ते “स्वगत काव्य” फार सुंदर सादर करीत असत. त्यामुळेच त्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देताना विजय तेंडूलकर म्हणाले,“नवा जन्म मिळाल्यास कवी होईन,कविता करीन”. हा तुमचा सन्मान. मासिकात कविता न छापणाऱ्या संपादकाकडून. म्हणजेच विजय तेंडुलकराकडून.
पुस्तक वाचल्यानंतर जे सुचलं ते लिहावसं वाटलं म्हणून हा पत्र प्रपंच.
आपला
डॉ नरेंद्र गंगाखेडकर

ह्या पत्राला लगेच उत्तर मिळालं. ते असं.

दिनांक २७ ५ १९९२
सप्रेम नमस्कार ,
आपले पत्र पोचले. “वडिलांच्या सेवेशी” आवडले. रसग्रहणात्मक पत्र पाठवून आस्थेने,आत्मीयतेने कळवले ह्या बद्दल फार आनंद झाला . आपले कोणत्या शब्दात आभार मानू?
आपली
शिरीष पै