Sunday, December 8, 2013

देणाऱ्याने देत जावे

देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे .....
विंदा करंदीकरांच्या कवितेच्या ह्या ओळी खूप काही सांगून जातात. जपानमधील झेन तत्वज्ञानामध्ये दान देणाऱ्या लोकांची मानसिकता लक्षात घेतली आहे . झेन तत्वज्ञानात देणारा ( दाता ) आणि घेणारा ( गरजू ) ह्यांच्यात एक समतोल साधलेला असतो.
गरजू माणसाला दान स्विकारावे लागते कारण ती त्याची गरज असते. त्याला ती आवश्यक वाटत असल्यामुळे तो ती स्विकारीत असतो. परंतु जो दाता असतो त्याचीही ती गरज असते. दान हे दोघांच्यामधील एक दुवा असते. त्यामुळे समाजात एक चांगले वातावरण निर्माण होत असते. दान देणाऱ्याच्या दृष्टीने दान देताना तो एका तीर्थयात्रेला ( Pilgrimage) जात असतो. त्याची तशी मनोभावना असते.
जगामध्ये अशी पुष्कळ माणसे आहेत की ज्यांना गरजूंच्याकरिता किंवा गरिबांसाठी/ उपेक्षितांसाठी काहीतरी ठोस करावे असे वाटते. त्यामुळे त्यांच्याकडे अशा गोष्टीसाठी द्रव्य किंवा इतर मदत मागितलीकी ते नेहमीच मदत देण्यासाठी उत्सुक असतात. काहीं दाते दान देतात ते त्यांच्या स्वतःसाठीच. कारण त्यांची ती आवश्यकताच असते. काहीं सेवाभावी संस्थामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्ते मंडळीना हे चांगलेच माहीत असते. एका आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचा अध्यक्ष एकदा मला म्हणाला . नरेंद्र , मी हे जे काम करतो आहे त्यासाठी खूप मोठा निधी लागणार आहे. हा निधी जमा करण्यासाठी कोण दाता आहे हे मला चांगलेच माहीत आहे. ह्या कामासाठी मी त्यांच्याकडे भीक मागण्यासाठी जात असतो. त्यांना हे माहीत असते की मी माझ्यासाठी काहीही मागत नाही. ते गरजूसाठी हवे आहे. गरजू त्यांना मागावयास जात नाही. त्यांना द्यावयाचे आहे आणि मला गरजूसाठी घ्यावयाचे आहे. ते देतात आणि मी गरजूसाठी त्यांच्याकडे भीक मागतो. “द्या ,द्या” असे सांगतो. मला अशी मदत घेण्यात आनंद वाटतो व मी झोळी घेऊन भीक मागत फिरतो. देणगी  मागणाऱ्या अशा कार्यकर्त्याचा हा विचार खूप महत्वाचा आहे.
गरजूंना किंवा उपेक्षितांना कधी कधी अशी मदत किंवा दान नकोसे वाटते किंवा ते अतिशय नाईलाजाने ते स्विकारत असतात. अशा प्रकारचे दान स्विकारणे त्यांना कमीपणाचे लक्षण वाटते. त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहणे मनापासून आवडत नसते. त्याचा त्यांना तिटकारा वाटतो. ते खूप कमीपणाचे वाटते. त्यांचा स्वाभिमान दुखावतो. त्यांना मनस्वी दु:ख होत असते. त्यांना असे वाटत असते की हे दान किंवा ह्या दान वस्तू आपण स्वतःच्या कर्तबगारीमुळे मिळवू शकत नाही. त्यामुळे ते अधिक दु:खी होतात. त्यांना असेही वाटते की आज नाही तर उद्या उपकृत करणारा हा दाता आपल्याकडून ही किमंत ह्या किंवा त्या स्वरुपात वसूल करील. त्यामुळे तो दात्याचा थोडासा मत्सर करतो. कारण त्याला त्याचा स्वाभिमान दुखावल्याचा राग आलेला असतो.
सरकार गरिबी हटावह्या योजनेअंतर्गत अनेक योजना आखीत असते.त्या योजनेमुळे गरिबी हटत नसते. त्यामुळे गरिबांना तात्पुरता फायदा होतो. पण गरीब माणूस अधिक लाचार होतो. मग त्याला अशा दानाची सवय होऊ लागते. तो अधिक आळशी होऊ लागतो. अशा योजनामुळे त्यांना त्या फुकट मिळणाऱ्या पैशाची सवय होऊ लागते. त्यांना तो त्यांचा हक्क वाटू लागतो. एक चीनी म्हण आहे , " जे गरीब लोक आहेत त्यांना पोट भरण्यासाठी नुसते मासे देऊ नका तर त्यांना मासे कसे पकडावेत ह्याचे शिक्षण द्या म्हणजे ते  मासे पकडून स्वतःचे पोट भरु शकतील. ते स्वावलंबी होतील. "

मी स्वतः समाजकार्य करताना अनुभवलेला एक किस्सा सांगण्यासारखा आहे. आपण समाजासाठी काहीं देणे लागतो अशा भावनेतून मी समाजसेवी संस्थेशी सलग्न आहे आणि थोडेफार समाजकार्य करीत असतो. आमच्या संस्थेतर्फे गरजूसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्याचे ठरविले. नेत्र शस्त्रक्रिया विशारद डॉक्टर मदतीला तयार होते. संस्थेसाठी एक मोठा निधी उपलब्ध झाला होता. आम्ही विक्रमगड येथे नेत्रचिकित्सा शिबीर भरविले. नेत्र तपासणीसाठी  खूप मोठ्या संख्येने लोक आले. गरजूंना चष्मे दिले गेले. ५० लोकांच्यावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यांच्याजवळ शस्त्रक्रिया करण्यासाठी आवश्यक तेवढे पैसे नव्हते.. त्या सर्वांची शस्त्रक्रिया मुंबईच्या एका नेत्र रुग्णालयात करावयाचे ठरविले. अर्थात मुंबईला येण्याजाण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नव्हते. राहण्याचाजेवणाखाण्याचा प्रश्न होताच. आम्ही येण्याजाण्यासाठी वाहनाची सोय केली. त्यांच्या राहण्यासाठी एका धर्मशाळेची व्यवस्था केली. रुग्णाने सोबत एका नातेवाईकाला बरोबर घेऊन यावे व आम्ही त्यांचीही व्यवस्था करू असे आवर्जून सांगितले. त्या सर्वांची चहापाणी आणि जेवणाची व्यवस्थाही केली होती. अर्थात ह्यासाठी अनेक दाते तयार  झाले होते. आमचे नेत्रतज्ञ आणि रुग्णालय सज्ज होते. आम्ही दोन बसेस घेऊन गावात गेलो. ज्यांचे ऑपरेशन करावयाचे होते ती मंडळी जमली होती. त्यांना घेऊन आम्ही निघणार होतो. काहीं मंडळी आमच्या बसमध्ये चढली आणि सीटवर बसली. काहीं मंडळी बसमध्ये चढण्यास तयार नव्हती. आम्ही त्यांना तुम्ही कां येत नाही? “ असे विचारले. आणि आम्हाला आश्चर्याचा एक धक्का बसला .एकाने आम्हाला विचारले , “ आम्ही ऑपरेशन करून घेतो. आम्हाला किती पैसे देणार आहात ?  “ आम्ही विचारले, कसले पैसे ? आम्ही तर शस्त्रक्रिया फुकट करून देणार आहोत. तुमचा सगळा खर्च करणार आहोत. येण्याजाण्याचा व राहण्याचा खर्च करणार आहोत, तुम्हाला कसले पैसे हवे आहेत ? तुम्हाला यायचे असेल तर या . नाहीतर येऊ नका. असे म्हंटले आणि लगेच बसमधील काहीजण खाली उतरले. शेवटी फक्त दहाजणच आमच्याबरोबर आले. त्यांना मुंबईत नेले . त्यांच्यावर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली. चार दिवसानी त्यांना घरी नेऊन सोडले. त्यांना चष्मेही दिले. ज्यांनी शस्त्रक्रिया करून घेतली त्यांना चांगले दिसू लागले. त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी आमचे मनापासून आभार मानले.एक म्हातारी आजी तर आमच्या पाया पडू लागली.तुमच्यामुळे आम्हाला डोळे मिळाले म्हणून ती डॉक्टरच्या पाया पडली. चार आठवड्यानी आम्ही पुन्हा त्या गावात गेलो. आमच्याभोवती बाकीचे नेत्ररुग्ण जमा झाले. आणि विचारू लागले ,’ आम्हाला शस्त्रक्रिया करून घ्यावयाची आहे . तुम्ही सर्व व्यवस्था चांगली केली होती. आम्हाला शस्त्रक्रिया ज्यांनी करून घेतली आहे त्यांनी सर्व सविस्तर सांगितले आहे. त्यांना आता चांगले दिसू लागले आहे. “. आम्ही विचारले , “ तुम्ही त्यावेळी आमच्याबरोबर कां आला नाहीत ? तुम्हीतर आम्हालाच शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी पैसे मागत होतात ? “ .तेंव्हा त्यांच्यातील एकजण म्हणाला , “ आमचे चुकले. आमच्या गावात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली की पैसे दिले जात होते . आम्हाला वाटलेकी तुम्हाला सरकार पैसे देते. मग त्यातले कमिशन आम्हाला मिळेल. म्हणून आम्ही तुम्हाला पैसे मागितले. आम्ही चुकलो. आम्हाला वाटलेकी सरकारच पैसे वाटते." आणि नंतर आमच्या लक्षात आले की गरजूंना अशी पैसे मागण्याची सवय होते. कारण सरकारी योजना राबवताना असे प्रकार नेहमीच होतात आणि म्हणून हे लोक दात्याकडे अशा वृत्तीने पहात असतात. शेवटी काय ? गरीबीमुळेच माणूस असा विचार करू लागतो.
खूप वर्षापूर्वी मी कविवर्य दत्ता हलसगीकरांची एक सुंदर कविता वाचली होती. आजही त्या कवितेची आठवण होते. ती कविता अशी ....
ज्यांची बाग फुलून आली
त्यांनी दोन फुले द्यावीत
ज्यांचे सूर जुळून आले
त्यांनी दोन गाणी द्यावीत

ज्यांच्या अंगणात झुकले ढग
त्यांनी ओंजळ पाणी द्यावे
आपले श्रीमंत हृदय त्यांनी
रिते करून भरून घ्यावे

आभाळा एवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडे खाली यावे
मातीत ज्यांचे जन्म मळले
त्यांना थोडे उचलून घ्यावे.
      -    दत्ता हलसगिकर
फारच सुंदर शब्दात व्यक्त केलेल्या ह्या भावना देणाऱ्यानी लक्षात ठेवाव्यात. जेंव्हा तुम्ही देणारे असतात तेंव्हा तुम्ही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही ह्या ना त्या स्वरुपात देण्याची सवय करून घेतली पाहिजे. 

मध्यमवर्गीय मानसिकता ही वेगळीच असते “ आहे रे “ आणि “ नाही रे “ ह्यांच्या विचारसरणीतील फरक आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. आनंद हा शेवटी कशात शोधायचा असतो हे आपण समजून घेतले पाहिजे. Real Happiness Is Helping  Others . ह्यासाठी “ Look Beyond Yourself “ अशी मनोवृत्ती हवी.
प्रसिद्ध कादंबरीकार Paulo Coelho आपल्या" BRIDA"  ह्या कादंबरीत एक सुंदर गोष्ट सांगतात.
एक माणूस चालतां चालतां अनवधानाने एका खोल खड्ड्यात पडला .त्यातून बाहेर येण्यासाठी त्याला मदतीची आवश्यकता होती. त्याच रस्त्यावरून जाणाऱ्या एका धर्मगुरूकडे त्याने मदतीची याचना केली. धर्मगुरूने नुसताच आशिर्वाद दिला आणि पुढे निघून गेला. थोड्यावेळाने एक डॉक्टर जातांना दिसला. त्याच्याकडे त्याने आशेने मदतीची याचना केली. डॉक्टरने दुरूनच त्याला काय जखम झाली ह्याची तपासणी केली. एका कागदावर औषधाच्या गोळ्यांची नांवे लिहून ती चिट्ठी त्याच्याकडे फेकली आणि जवळच्या औषधाच्या दुकानातून औषधे घेऊन येण्याचा सल्ला देऊन तो निघून गेला. थोड्यावेळाने असाच एक अनोळखी माणूस जात होता.त्याच्याकडे त्याने मदतीची याचना केली असतां त्या अनोळखी माणसाने त्या खड्ड्यात उडी मारली. तो माणूस हे पाहून अधिकच घाबरला . त्याला वाटले आतां हाही खड्ड्यात पडल्यावर कसली मदत करणार . आतां दोघेही संकटात सापडले .त्याने त्याला विचारले , “ तू कशाला उडी मारलीस? . आतां दोघांना कोण बाहेर काढणार ? “ तो अनोळखी माणूस उद्गारला , “ काहीं काळजी करू नकोस . मला ह्यातून बाहेर पडण्याचा मार्ग माहीत आहे . मी तुला बाहेर काढतो. तू फक्त माझ्या मार्गाने चल." तो त्याच्या मागे चालू लागला आणि सुखरूप बाहेर पडला. त्याला हायसे वाटले.
तात्पर्य ; खड्ड्यात पडलेल्या माणसासाठी धर्मगुरू किंवा डॉक्टर फारसे उपयोगी पडू शकले नाही. मदत करणाऱ्याला मदत कशी करावयाची ह्याचे भान नव्हते.  दात्याला मदत कशी करावयाची ह्याचे भान असले पाहिजे आणि हेच भान अनेकांना नसते. आपण योग्य ती मदत, योग्य त्या वेळी, योग्य त्या माणसाला केली पाहिजे. 



No comments:

Post a Comment