Friday, December 20, 2013

केशवराव देशपांडे


केशवराव देशपांडे 
रेशीम धागा हा इतर धाग्यापेक्षा खूपच वेगळा असतो. कापसाचा धागा , लोकरीचा धागा , नॉयलॉनचा धागा किंवा पॉलिएस्टरचा धागा. ह्या सर्व धाग्यापेक्षा “ रेशीम धागा “ अधिक मुलायम , देखणा, मजबूत (strong ) आणि रंग सौंदर्याने नटलेला असतो. अशाच एका सुंदर रेशीम धाग्याचा विणकर म्हणजे केशवराव देशपांडे – माझे सासरे – मी त्यांना “ काका “ असेच म्हणत असे. माझ्या जीवनात मागे वळून पाहताना काकांच्या अनेक आठवणी आजही डोळ्यासमोर उभ्या राहतात.त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू सहजपणे समोर उभे राहतात.
 “ शब्द नव्हे शस्त्र “ असा ज्यांचा बाणा त्या “मराठवाडा”कार अनंत भालेराव आणि स्वातंत्र्यसेनानी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ ह्या दोघांचे अगदी जवळचे सहकारी , जयहिंद प्रकाशनाचे प्रमुख जगन्नाथराव बर्दापूरकर ह्यांचे निकटतम मित्र आणि सहकारी  अशी त्यांची सार्वजनिक ओळख.अनंत भालेराव आणि गोविंदभाई श्रॉफ ह्यांच्या सहवासात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या बरोबर , त्यांच्याकरिता ज्या निष्ठेने काम  केले त्यामुळेच काका ह्या दोघांचेही प्रमुख सहकारी झाले. हेच त्यांचे सामर्थ्य होते. “मराठवाडा” ह्या भाषिक वर्तमानपत्राचे ते सरव्यवस्थापक होते. “ आमचे ब्रदर जॉन केशवराव देशपांडे “ असा उल्लेख अनंत भालेराव ह्यांनी “ कावड “ ह्या त्यांच्या पुस्तकात केला आहे आणि त्या लेखात अनंतरावांनी त्यांचे सुंदर व्यक्तिचित्र उभे केले आहे.  
      त्यांचा करिअरचा पूर्व इतिहास हा मोठा मनोरंजक आहे. पुण्याच्या “ प्रभात” च्या चित्रनगरीत रमलेले काका  नंतर हैद्राबादच्या चित्रपटगृहाचे व्यवस्थापन आणि चित्रपट  वितरण करीत असत. ह्या व्यवसायातील अनेक गंमतीजमती ते जेंव्हा सांगत असत तेंव्हा त्या वेळच्या चित्रपट व्यवसायाची कल्पना येते . चित्रपट व्यवसायाचा चालताबोलता इतिहास त्यांच्याकडून ऐकताना गंमत वाटत असे. त्यांच्या बरोबर केलेल्या अशाच एका मुंबई- औरंगाबाद रेल्वे प्रवासात त्यांनी त्यावेळच्या चित्रपटसृष्टीच्या अनेक  सुरस कथा सांगितल्याचे आजही आठवते.
    जगन्नाथराव बर्दापूरकर आणि अनंत भालेराव ह्यांच्या आग्रहामुळेच ते “मराठवाड्या"”त आले. वर्तमानपत्र  काढणे तसे सोपे नसते . ते चालविणे महाकठीण काम. “मराठवाडा” हे भांडवलदाराचे वर्तमानपत्र नव्हते. सरकार आणि सरकारी धोरणावर सतत हल्ले करणारे व घनघोर टीका करणारे वर्तमानपत्र म्हणून त्याचा नावलौकिक होता. " शब्द नव्हे शस्त्र " असा त्याचा बाणा होता. टिळक- आगरकरांच्या परंपरेतील वृतपत्र म्हणून ते नावाजले होते. "मराठवाड्या"चा श्वास होता. मराठवाड्याची अस्मिता होती. मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न घेऊन सरकारशी लढणारे वर्तमानपत्र होते.  अशा वर्तमानपत्राला शासकीय जाहिरातींचा पाठिंबा नसतो. असे वर्तमानपत्र चालविण्याचे अर्थशास्त्र फार कठीण असते. त्यामुळेच अनंत भालेराव नेहमी म्हणत असत की अग्रलेख लिहिणे सोपे आहे  परंतू रोजचे वर्तमानपत्र काढण्यासाठी करावे लागणारे व्यवस्थापन अतिशय अवघड आहे . त्या काळात वर्तमानपत्राला कागद मिळवण्यासाठी फार कष्ट पडत असत. टंचाईच्या काळात कागद कसा उपलब्ध करून घ्यायचा हे अतिशय कर्म कठीण काम होते.त्याच बरोबर भांडवली वर्तमानपत्राची स्पर्धा जीवघेणी होती. वृतपत्र वितरकांना फूस लाऊन देणे हे स्पर्धात्मक वर्तमानपत्राचे काम जोरांत चालू होते. आणि अशी स्पर्धा औरंगाबादेत नुकतीच सुरु झाली होती. नियमित कागद पुरवठा आणि आवश्यक असलेल्या जाहिराती ह्यावर वर्तमानपत्र चालतात. त्यामुळेच ती रोजच्या रोज प्रसिद्ध करता येतात. त्याचे गणित जमवणे हेच व्यवस्थापकाचे कठीण काम.
    मराठवाडा दैनिक झाले तेंव्हा छापखाना जुनाच होता. छपाई यंत्र फार जुने होते. सकाळपर्यंत पेपर तयार होत नसे.मराठवाड्यातील नांदेड–लातूर सारख्या ठिकाणी तो पेपर वेळेवर जात नसे . त्यासाठी छापखान्याचे आधुनिकिकरण  करणे महत्वाचे होते. फोटोटाईप सेटिंग यंत्राची आवश्यकता होती. जलदगतीने वर्तमानपत्र छापणे महत्वाचे होते. आधुनिक छपाईची यंत्रे मिळवणे , त्यासाठी निधी उभा करणे , यंत्रकुशल कामगार शोधणे , यंत्र बंद पडले तर लगेच दुरुस्तीसाठी कुशल कामगार/ तंत्रज्ञ शोधणे ,ह्या सर्व व्यवस्थापनासाठी २४ X ७ यंत्रणा उभी करणे हे काम फार जिकीरीचे होते. काकांनी ह्यासाठी अपार कष्ट घेतले. मुद्रणालयातील कामगारांचे पगार वेळेवर देणे आणि चांगले पत्रकार- बातमीदार – जाहिरातदार- वितरक बांधून ठेवणे फार अवघड काम होते. एखाद्या मोठ्या साखळी वर्तमान पत्रासाठी ते सोपे असते. भांडवलाचा प्रश्न नसतो. परंतू ध्येयवेडी पत्रकारिता करणाऱ्या वर्तमानपत्रासाठी हे सर्व कठीण काम असते व वर्तमान पत्र केंव्हाही बंद पडू शकते. असे वर्तमान पत्र त्यांनी चालवून दाखविले. त्यासाठी यंत्रणा उभी केली. एकाचवेळी विविध गोष्टींचे व्यवस्थापन करणे हे फार जिकीरीचे काम होते. त्यात वैयक्तिक असा कोणताही फायदा नव्हता. आपण जे वर्तमान पत्र चालवितो आहोत त्यासंबंधी त्यांची निष्ठा होती. आपल्या संपादकाला ह्या सर्व गोष्टींचा कसलाही त्रास होऊ नये ह्यासाठी त्यांची धडपड होती. म्हणूनच व्यवस्थापनाची लढाई ते स्वतः सक्षमतेने सांभाळत असत. कामगारांचेही अनेक प्रश्न असत. इल्नाचे अध्यक्ष असताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर ह्या प्रश्नांची उत्तरे शोधली. वर्तमानपत्र वितरकाचे प्रश्न फार बिकट असत. पैसे वसुलीही करणे कठीण काम  होते. दैनिकात काम करणाऱ्या कर्मचार्यांच्या वर्तणुकीचे प्रश्न निर्माण होत. ह्या सर्व प्रश्नाच्याकडे ते वेगळ्या दृष्टीने पाहत असत व प्रश्न हाताळताना स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवीत असत. हे व्यवस्थापन कौशल्य त्यांनी कसे मिळविले असेल ह्याचा जेंव्हा मी शोध घेतो तेंव्हा माझ्या लक्षात येते की काही जणांना हे उपजत माहीत असते. व्यवस्थापन हे त्यांना उपजत येत होते हेच खरे. म्हणूनच अनंत भालेराव त्यांना " आमचे ब्रदर जॉन " असे म्हणत असत. 

     आणि हे सारे व्यवस्थापन केशवराव करीत असल्यामुळे अनंतराव ह्यांचा “मराठवाडा” एक प्रमुख वर्तमानपत्र म्हणून नावारूपाला आला. वर्तमानपत्राच्या आणि मुद्रणालयाच्या दुनियेत व्यवस्थितपणा कमीच असतो हे आपण कोणत्याही प्रिंटींग प्रेसला किंवा वर्तमानपत्राच्या कार्यालयास भेट दिल्यास सहज दिसून येईल. काकांचे स्वतःचे कार्यालय अतिशय टापटीप व सुंदर होते. काकांचे अक्षर फार सुंदर होते. त्यांच्या लिहीण्यातील टापटीपपणा उल्लेखनीय होता. इतकेच नव्हे तर त्यांची कामांची पद्धत अतिशय आखीवरेखीव होती. त्यांना कामातील कोणताही गलथानपणा चालत नसे.त्यांनी तीच शिस्त आपल्या हाताखालील लोकांना तर लावलीच पण त्यांच्या सर्व सहकार्यानाही लावली.  
     काकांनी अनंत भालेराव आणि गोविंदभाई श्रॉफ ह्यांना इतके जवळून पाहिले आहेकी ह्या दोन मोठ्या व्यक्तिमत्वांचे अनेक पैलू त्यांना माहीत होते. गप्पा मारताना फार क्वचित वेळा ते त्यांचा उल्लेख करीत असत. त्यांनी ह्यासंबंधी लिहावे व लोकांना ह्या दोन्ही व्यक्तीसंबंधी अधिक कळावे असे मला वाटत असे. आणीबाणीच्या काळात अनंतराव तुरुंगात गेले तेंव्हा त्यांनी मराठवाडा कसा चालविला ह्या संबंधीचा इतिहास समजून घेण्यासारखा आहे. मराठवाडा तेंव्हाच बंद पडला असता. पण तसे झाले नाही.  मी त्यांना त्यासंबंधी लिहावे असे अनेकदा सुचविले होते. त्यांनी ते लिहिण्याचे टाळले. त्यांनी जवळून पाहिलेली ही मोठी माणसे आणि तसेच  त्यांच्या आजूबाजूची सामाजिक – राजकीय चळवळीतील इतर माणसे त्यांच्या खूप परिचयाची होती. ही सारी माणसे एका राजकीय-सामाजिक कादंबरीचा विषय आहेत. त्यांचे कौटुंबिक ताण-तणाव ,आर्थिक समस्या, राजकीय – सामाजिक चळवळीतील सहभाग आणि त्यांच्या समस्या त्यांनी खूप जवळून पाहिल्या होत्या. खरं म्हणजे हा त्यांच्या रोजच्या जीवनाचा एक भाग होता. शेवटी शेवटी त्यांनी त्यावर लिहिण्यास सुरुवात केली होती. पण ते राहून गेले.

     केशवराव देशपांडे हे अखिल भारतीय भाषिक वर्तमानपत्रांची  जी संघटना -- ILNA चे अध्यक्ष होते आणि त्यांनी ह्या संस्थेचे सभासद,कार्यकारिणी सदस्य आणि अध्यक्ष असताना अतिशय भरीव असे काम  केले. इल्नाच्या कार्यक्रमासाठी ते अनेक वेळा मुंबई- दिल्ली असा प्रवास करीत असत तेंव्हा मुंबईभेटीत त्यांच्या विविध कामाचे स्वरूप मी अगदी जवळून पाहिले आहे. त्यांच्या ह्या कामावरून एखादी संस्था किंवा संघटना कशी चालवावी व शासकीय पातळीवर व्यवसायाचे प्रश्न कसे सोडवावे हे मला दिसून आले. काका विज्ञानाचे विद्यार्थी होते तसेच मुद्रणशास्त्र निपुण होते. त्यांना नव्या तंत्रज्ञानाची अचूक माहिती होती.मराठवाडा विद्यापीठात पत्रकारिता ह्या विषयाचा अभ्यासक्रम सुरु झाला त्यावेळेपासून कित्येक वर्षे त्यांनी आमंत्रित प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. "वर्तमानपत्राचे व्यवस्थापन" हा विषय ते शिकवीत असत. त्यासाठी ते भरपूर मेहनत घेत असत. भरपूर अभ्यास करीत असत. खूप तयारी करून ते वर्गावर जात असत. मी त्यांची शिकवण्यासाठी जी तयारी करावी लागते ती जवळून पाहिली आहे. अनेक पदवीधर झालेले विद्यार्थी त्यांच्या अध्यापनाविषयी भरभरून बोलताना दिसतात. आज त्यांचेच विध्यार्थी  विद्यापीठात विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. काही दिवसापूर्वी मी मराठवाडा विद्यापीठात गेलो होतो. डॉ. धारूरकर सध्या विभागप्रमुख आहेत. बोलताना सहज काकांचा विषय निघाला. धारूरकर काकांचे विद्यार्थी. त्यांनी काका व्यवस्थापन विषय शिकवीत असताना ज्या नोट्स काढल्या होत्या त्याचा विशेष उल्लेख केला आणि मला म्हणाले काकांनी ह्या विषयावर पुस्तक लिहावयास हवे होते. त्यांनी हे काकांना अनेकदा सुचविले होते. 
     
     मराठवाड्याचा दिवाळी अंक अगदी झोकात निघत असे. अनंत भालेरावांच्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख साहित्यिक , लेखक आणि कवी मराठवाडा दिवाळी अंकासाठी आवर्जून लिहित असत. मराठवाड्यातील आजचे जे नावाजलेले साहित्यिक ,कवी आणि  चित्रकार आहेत ते मराठवाडा दिवाळी अंकातील लिखाणामुळेच पुढे आले आहेत.  “मराठवाडा’ दिवाळी अंकाला मुंबई पत्रकार संघाचा उत्कृष्ट दिवाळी अंक म्हणून लागोपाठ तीन चार वर्षे पुरस्कार मिळाला होता.त्यामुळे मराठवाडा दिवाळी अंक खूप नावाजला होता  . काकांची  दिवाळी अंकासाठी ४-५ महिने तयारी चाललेली असे. त्यासाठी त्यांच्या मुंबईला चकरा होत असत.  संपादकीय खाते त्यांचे काम  चोख करीत असे. पण रंगीत छपाई, कागद , मुखपृष्ठ , जाहिराती आणि सर्व महाराष्ट्रात वितरण ही सारी कामे करताना मी काकांना  जवळून पाहिले आहे. दिवाळी अंकासाठी रंगीत मुखपृष्ठ , कलाकार , चित्राची निवड , उत्कृष्ट छपाई ह्या अनेक गोष्टी फार महत्वाच्या असतात. त्यामुळेच अंक देखणा होतो. अनंतराव भालेराव ह्यांचे संपादन आणि केशवराव ह्यांचे दिवाळी अंकाचे व्यवस्थापन ह्यामुळेच “ मराठवाड्या” च्या   दिवाळी अंकाला सर्व दिवाळी अंकात अग्रस्थान प्राप्त झाले व "मराठवाडा" दिवाळी अंक नेहमीच लक्षवेधी ठरला.

    अनेक कारणामुळे " दै. मराठवाडा' बंद झाला. त्यामुळे त्यांना शेवटपर्यंत फार वाईट वाटत असे. दैनिक बंद झाल्यानंतर गोविंदभाई श्रॉफ ह्यांनी त्यांना सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या कामासाठी बोलावून घेतले. अनेक वर्षे त्यांनी गोविंदभाई बरोबर ह्या संस्थेचे काम बघितले आणि आपल्या व्यवस्थापनाचा ठसा उमटविला.शाळा-महाविद्यालयांच्या अनेक योजना राबविल्या.   

     टी.व्ही वर “ उंच माझा झोका “ ही न्या. माधव गोविंद रानडे ह्यांच्या जीवनावरची  मालिका बहुतेकांनी पहिली असेल.स्त्री शिक्षणाची चळवळ  स्वतःच्या घरात सुरु करताना रमाबाई रानडे ह्यांना कसा त्रास झाला हे आपणास माहीतच  आहे .मराठवाड्यात स्त्री शिक्षण फारसे पुढे गेले नव्हते. काकांनी ७०-८० वर्षापूर्वी लग्नानंतर आपल्या पत्नीला कुमुदिनी देशपांडे ह्यांना  S.Sc/ Teacher training course करण्यास प्रोत्साहन दिले.एवढेच नाहीतर आपल्या तीन मुलीना उच्चविद्याविभूषित केले. हे फार महत्वाचे आहे असे मला वाटते. आज त्यांच्या मुलींच्या मुली नुसत्या विद्याविभूषित झाल्या नाहीत तर महत्वाच्या हुद्द्यावर समर्थपणे काम करीत आहेत. त्यांनी स्त्री- शिक्षणाचे महत्त्व ओळखले म्हणूनच नवी पिढी पुढे जाताना दिसते आहे. त्याचे कारण काकाना स्त्री शिक्षणाचे महत्व ठावूक होते व त्यांनी तशी कृती केली.
कुमुदिनी व केशवराव देशपांडे 

    कुमुदिनी देशपांडे ह्यां सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या शाळेतील प्रसिद्ध शिक्षिका. समाजकार्याचे भान असलेल्या.त्यांनी  मराठवाडा विकास आंदोलनात सक्रीय भाग घेतला होता. १९८६ साली शाळेतून निवृत्त झाल्यावर पुन्हा नव्याने सुरुवात केली आणि आपल्या घरातच किलबिल बालक मंदिर सुरु केले. हे लहानसे रोपटे वेगाने मोठे झाले आणि त्याचे रुपांतर अनंत विद्या मंदिर ह्या प्रसिद्ध शाळेत झाले आहे. सतत स्वतःला कामात गुंतवून ठेवणारी वृत्ती असल्यामुळे जेष्ठ नागरिक संघाच्या कामात सहभागी होऊन विविध कार्यक्रम राबविले. आणि हे चालू असतानाच लेखन चालू ठेवले आहे . समृद्ध जीवनानुभव असल्यामुळे मराठी वर्तमानपत्रातून विविध विषयावर सातत्याने सदर लेखन केले. आणि त्या  लिहिता लिहिता कथाकार झाल्या. विविध मासिकातून अनेक  कथा प्रसिद्ध होऊ लागल्या.आजवर  चार पुस्तकांच्या लेखिका तर झाल्याच पण औरंगाबादच्या  स्त्री लेखिकांच्या साहित्य चळवळीत त्या  सक्रीय सहभाग घेतात. आज ८५ व्या वर्षीही तोच उत्साह दिसून येतो. 
    
       केशवराव आस्तिक होते. त्यांच्या आजूबाजूचे सर्व सहकारी नास्तिक होते. ते रोज देवपूजा करीत असत.दर वर्षी लघुरुद्र करीत असत. कर्मकांडावर त्यांचा विश्वास नव्हता. अनंतरावांनी  "कावड : मध्ये त्यांच्या देवपूजेविषयी लिहिले आहे. त्यांची देवपूजा बघण्यासारखी असे. देवानाही शिस्तीत स्थानापन्न करणारी त्यांची देव पूजा फार बघण्यासारखी असे. मला तर असं अनेक वेळा वाटलं आहे की मंदिरातील जे पुजारी असतात त्यांना पूजा कशी करावी ह्यासाठी शिक्षक हवा असेल तर त्यांनी हे शिक्षण काकांच्याकडून घ्यावे.
       त्यांनी अनेक वर्षे चित्रपट व्यवसायात काढली असली तरी त्यांनी किती सिनेमे पाहिले असतील ते मला माहीत नाही पण जून्या हिंदी गाण्यांची त्यांची आवड आणि शास्त्रीय संगीताचे प्रेम विलक्षण होते. मराठवाडा साहित्य परिषदेशी त्यांचा जवळचा संबंध होता. 

 मैत्री , दयाबुद्धी , सोशीक वृत्ती , संतुष्ट वृत्ती , दृढ-निश्चय , संयम ,लोकसंग्रह , आनंद आणि दु:ख ह्यांना सहज सामोरे जाणे , क्रोध न दाखविणे ,मौनातून सर्व व्यक्त करणे हे त्यांचे स्वभाव विशेष. "गीताई"तील खाली दिलेल्या ओळीतून  काकांच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलू दिसून येतात.       

       कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनीं
              मी माझे न म्हणे सोशी सुख – दु:खे क्षमा बळे
              सदा संतुष्ट जो योगी संयमी दृढ-निश्चयी
              अर्पी मज मनो-बुद्धी भक्त तो आवडे मज
              जो न लोकांस कंटाळे ज्यास कंटाळती न ते
              हर्ष शोक भय क्रोध नेणे तो आवडे मज
              न उल्लासे न संतापे न मागे न झुरे चि जो
              बरे वाईट सोडूनी भजे तो आवडे मज
              सम देखे साहे वैरी तसे मानापमान हि
              शीत उष्ण सुखे दु:खे करुनी सम मोकळा
              निंदा स्तुती न घे मौनी मिले ते गोड मानितो
              स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज

त्यांचे व्यक्तिमत्व ह्याच शब्दात चपखल बसते.  असे हे "मराठवाड्या"चे ब्रदर जॉन केशवराव देशपांडे.
                                                         
                                            ( त्यांच्या स्मृती दिनानिमित्त ही आदरांजली ) 

No comments:

Post a Comment